माय माझी हिरकणी
माय माझी हिरकणी
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपलं कोणी ना कोणी तरी एक आदर्श असतंच. त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिमा बघून आपल्याला असं वाटतं आपणही अगदी तसंच व्हावं. नशिबाने म्हणा किंवा भाग्याने माझ आदर्श मी जन्मल्या पासूनच माझ्यासोबतच आहे. ते आपण म्हणतो ना आई हिच आपली पहिली गुरु असते.आपल्या आयुष्यातली पहिली आदर्श व्यक्ती असते. हे वाक्य माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं ठरलं आहे.माझी आई ही माझ्या आयुष्यातली आदर्श,प्रेरणा,गुरु आणि शिक्षक आहे. खरं पाहायला गेलं तर माझी आई कुठल्या कार्यालयात कामाला नाही. कोणत्याही सरकारी नोकरीला मोठ्या पदावर नाही. माझी आई अशिक्षित सर्वसामान्य साधी स्त्री आहे. जी ने आयुष्यात अनेक संघर्ष करून देखील आज खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. माझी आई व तिच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल लिहायला गेलं तर एक पुस्तकच होईल कदाचित.
कारण तिने संघर्षच तेवढा केला आहे तिच्या आयुष्यात. फक्त शिकलेल्याच स्त्रिया स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात हा गैरसमज तिने दूर केला आहे. कारण माझ्या आईच शिक्षण झालेल नसून देखील स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनती ने ती एक स्वावःलंबी स्त्री म्हणून जगासमोर उभी आहे. तिच्या याच जिद्दीने मेहनतीने व संघर्षामुळे माझ्यासाठी ती माझं आदर्श व प्रेरणा ठरली आहे. माझ्या आईच्या संघर्षा विषयी थोडक्यात सांगायच तर..आईचे बालपण अतिशय हालाखीत खडतर व गरिबीत गेले. लहानपणापासून गरिबीत वाढलेली. वयाच्या पाचव्या वर्षी आईचे वडील गेले. घरातील कर्ती व्यक्ती जबाबदार माणूस अचानक निघून गेल्याने त्यांच्या गरिबीत अजूनच वाढ झाली. डोक्यावर वडिलांची सावली नाही. घरची आर्थिक परिस्थिती नीट नाही. त्यात तीन बहिणी दोन भाऊ. एकटी आई पाच मुलं. माझी आई मधली मुलगी. आजोबांचे निधन झाले तेव्हा आई फक्त पाच वर्षाची होती. पण एवढ्या लहान वयात जणू तिला परिस्थितीची जाणीव झाली. ज्या वयात लोक भातुकलीचे खेळ खेळतात. मित्र-मैत्रिणी समवेत शाळेत जातात. तो लहान पाच वर्षाचा एक जीव. ज्याला दुःख म्हणजे काही माहीत नसतं.
खेळणं बागडणं आणि बालपणीचा आनंद घेण ज्या वयात असतं. त्या परिस्थितीत तिने लहानपणीच मोठी जबाबदारी घेतली. घरात सगळ्यात लहान असूनही मोठी होऊन घरात वावरली. अगदी तेव्हापासून म्हणजे वयाच्या ५ वर्षापासून ते आतापर्यंत वयाच्या ४५ वर्षापर्यंत माझ्या आईने संघर्ष केला आहे. एवढ्या लहान वयातच आईने अनेक संकटांचा सामना केला.आईचे वडील वारल्यानंतर घरी मदत म्हणून तिने लहानपणीच भाज्या विकल्या.ज्या हातात वही पुस्तक हवे होते. त्या हातांनी ती लोकांची धुणीभांडी करत होती. घर चालवण्यासाठी व घरी मदत व्हावी म्हणून तिला जे काही शक्य होते ते तिने केले.आयुष्यात बालपण हा देखील जीवनाचा एक भाग असतो हे जणू ती विसरली होती. बालपणासोबतच तिने तिच्या स्वप्नांचा देखील त्याग केला होता. तिला शाळेत जाऊन शिकायचे होते. आयुष्यात मोठे व्हायचे होते. परंतु तिचे हे स्वप्न देखील घरच्या गरिबीमध्ये हरवून गेले.घरी लहान भावाला सांभाळायला कोणी नाही म्हणून आईला शाळेत जाऊन शिकता आले नाही. वयाच्या पाच वर्षांपासून अडचणींना तोंड देऊन त्यांच्या पुढे कसं जायचं हे ती कदाचित तेव्हाच शिकली होती. ज्या वयात मुले शाळेत जातात मित्र-मैत्रिणींसोबत खेळतात. त्या वयात ती घरच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होती. त्यावेळी देखील तिच्या आयुष्यात अनेक वाईट अनुभव येऊन गेले. ती खरोखर तर शाळेत नव्हती गेली, पण आयुष्याच्या संघर्षाने तिला खूप काही शिकवलं होतं. काही वर्षांनी माझी आई व बाबा यांचे लग्न झाले. राजा राणी चा खूप छान संसार सुरू झाला. कष्टांना कुठेतरी पूर्णविराम लागून आईने आता एका नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. सर्व काही छान चाललं होतं. काही वर्षांनी आम्हा तीन बहिण-भावंडानचा जन्म झाला. मी, माझा मोठा भाऊ आणि लहान बहिण. आईने तिच्या आयुष्यात केलेल्या कष्टाची जाणीव बाबांना होती. त्यांनी ही आईला नेहमीच प्रत्येक गोष्टीत साथ दिली.ते नेहमी आईला सहकार्य करत. तिच्या नवीन कल्पना ऐकत आणि त्यानुसारच कोणतेही काम करत. सर्व काही फार छान चालं होतं. अगदी गोकुळासारखं घर झालं होतं. सुख-दुःख तेव्हाही होते पण ते सांभाळून देखील आमचं कुटुंब छान आनंदी होतं. माझा मोठा भाऊ दहावीला होता त्याला देखील वडिलांनी मोठ्या नामवंत क्लासला टाकले होते. मी नववीत होते आणि माझी लहान बहीण सातवीत होती. सर्वकाही छान होत.पण अचानक राजाराणीच्या या सुखी संसाराला दृष्ट लागली. अचानक माझ्या बाबांची प्रकृती बिघडली. सलग तीन महिने बाबा आजारी होते. खूप डॉक्टर केले इलाज केला. पण तरीदेखील त्यांचा काही उपयोग झाला नाही. ते म्हणतात ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आमच्या बरोबर ही तसंच झालं होतं. २९ डिसेंबर २०१२ ची ती सकाळ आमच्यासाठी फार वाईट ठरली. आमच्यावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. आजारामुळे माझ्या वडिलांचं निधन झालं. जे नाही व्हायला हवं होतं ते घडलं.
आमच्या डोक्यावरून वडिलांची सावली कायमची निघून गेली. तीन लेकरांन सोबत आई आता एकटी पडली होती. तीन मुलं अजूनही शिकत होती. एक ही कमावणार नाही.स्वतःचे घर नाही. भविष्याची खूप स्वप्न बघितले असताना वडिलांच्या अचानक जाण्याने आईला खूप मोठा धक्का बसला. राजा राणीच्या संसारात राजा-राणीला एकटच सोडून गेला होता. तरी देखील राणीने हार मानली नाही. आईने स्वतःच्या मनाला व भावनांना सावरुन तिने आम्हाला तीन मुलांना आधार दिला. तिने तिचे मन किती घट्ट केले असेल. मनगट किती बळकट केले असतील की तिने पती निधनाचे दुःख बाजूला ठेवून तीन मुलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आमच्यासाठी आमची आई व बाबा दोन्ही तिच झाली.मी कितीतरी वेळा तिला तिचे स्वताःचे मन मारताना बघितले आहे. फक्त या एकाच कारणासाठी की आम्हाला कधीच वडिलांची आठवण येऊ नये. त्यांची उणीव कधीच भासू नये म्हणून.वडील गेल्यानंतर पूर्ण घराची जबाबदारी आईवर पडल्यावर आईने मिळतील ते काम करण्यास सुरुवात केली. अतोनात कष्ट केले लोकांच्या घरी घरकाम केली. दसरा दिवाळीला हार फुल विकली. फक्त या कारणासाठी की आमचं शिक्षण कुठेच थांबू नये. ती नेहमी मला सांगते मी तर नाही शिकली. माझी परिस्थिती नव्हती पण माझ शिकण्याच स्वप्न मी तुमच्याकडून पूर्ण करते आहे. तुमच्या शिक्षणाला लागणारा पैसा मी कष्ट करून मेहनत करून जमा करीन. पण तुमच शिक्षण थांबता कामा नये. एवढच नाही आईने तिच्याकडे असलेल्या पाक कलेतून स्वतःचा खाद्यपदार्थांचा स्टॉल उघडला आहे. पण स्टॉल उघडण्या करता देखील तिला फार कष्ट घ्यावे लागले आहेत. हिवाळा,उन्हाळा,पावसाळा काही ही असो पहाटे चार वाजता उठून ती सर्व खाद्यपदार्थ तयार करून विकण्यास स्टॉलवर जाते. तिच्यात असलेला प्रामाणिकपणा,जिद्द आणि मेहनत त्यामुळे ती आज एक स्वावलंबी स्त्री म्हणून जगासमोर उभी आहे. आम्हा तिघा बहिण भावंडांना आयुष्यात शिक्षणात काही कमी पडू नये. यासाठी तिने फार कष्ट घेतले आहेत. सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आमची आई स्वतः शिकलेली नसून तिने आम्हाला तिन्ही भावंडांना उच्च पदवीचे शिक्षण दिले आहे. आज आम्ही तिघेही बहीण-भावंडे जे काही आहोत ते आमच्या आईच्या कष्टामुळे. आज आम्ही आमच्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती म्हणून वावरतो ते फक्त नि फक्त आमच्या आईमुळे. आम्हाला सांभाळणं.मोठं करणं,शिक्षण देणं. या सर्व गोष्टी आईनी चांगल्या पद्धतीने केल्याच पण या सगळ्यांमध्ये एक विशेष गोष्ट सांगायची तर मी बहुदा असं ऐकलं आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर सासरकडची माणसं दुरावतात.पण खरं सांगू तर आईने बाबांच्या आई वडिलांना म्हणजेच माझ्या आजी-आजोबांना कधीच दूर नाही केलं.त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला आहे याची जाणीवही आईने त्यांना कधी होऊ दिली नाही.ती त्यांची सून तर होतीच.पण बाबा गेल्यानंतर ती आजी आजोबांची लेक पण झाली. तिने तिच्या आयुष्यात मुलगी,बहीण,बायको आई व सून या सर्व भूमिका खूप जबाबदारीने निभावल्या. आई या सर्व भूमिकांमध्ये उत्कृष्ट ठरली.एवढं सगळं असून देखील तिचा साधे भोळा पणा अजूनही तसाच आहे.माणसाने आयुष्यात कितीही मोठ झालं तरी आपले पाय आपल्या मातीशी नेहमी घट्ट धरून ठेवायचे हा तिचा विचार तिने आमच्यात देखील रुजवला आहे. प्रामाणिकपणा चांगुलपणा याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझी आई. आपण म्हणतो ना स्त्रीमध्ये देवी ची सगळी रूप असतात. एक स्त्री वेळ आल्यावर देवीचं रूप साकार करू शकते.तसंच आईने आमच्यासाठी पार्वती,दुर्गा,लक्ष्मी सरस्वती व आलेल्या प्रत्येक संकटाला मात देण्यासाठी महाकाली अशी अनेक रूपे साकारली.खरंच आई तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू आमच्यासाठी किती कष्ट केले आहेत. किती सहन केल आहेस. कदाचित ते या चार पानात देखील नाही सांगता येणार. पण तरीदेखील ही कथा लिहायचं कारण एवढेच की तिने आमच्यासाठी केलेल्या कष्टाची संघर्षाची जाणीव आम्हाला आहे.आमचं भविष्य घडवण्यासाठी तू खूप संघर्ष केलास. तू खचलीस हरलीस पण पुन्हा तेवढ्याच जोमाने उभी राहिलीस. तुझ्याकडे पाहून कधी कधी असं वाटतं की तुझ्याकडे एक दैवी शक्तीच आहे. आम्ही खरंच खूप नशिबवान आहोत की आम्ही तुझ्यापोटी जन्म घेतला.
आई हे फक्त तुझ्यासाठी आणि तू आमच्यासाठी केलेल्या कष्टांसाठी:-
जिम्मेदारी सिर्फ पिता उठाता है। यह कौन कहता है?
मैंने तो अपनी मांँ को मांँ नहीं बाप बनते देखा है।
चंद मुश्किलों से लोग घबरा जाते हैं ।
मैंने अपनी मांँ को घर का पहाड़ उठाते देखा है।
