STORYMIRROR

Shubhangi Dhanurdhari

Inspirational

3  

Shubhangi Dhanurdhari

Inspirational

मासिक पाळी-नैसर्गिक प्रक्रिया

मासिक पाळी-नैसर्गिक प्रक्रिया

4 mins
436

या आधुनिक जगात आपण कितीही स्वतंत्र झालो तरी काही विषय असे आहेत जे आजही आपण मोकळेपणाने बोलत नाही. त्यातलाच एक विषय म्हणजे मासिक पाळी. खरं तर आपण या विषयावर मोकळेपणाने बोलायला हवे. एवढे आधुनिक होऊन एकविसाव्या शतकात येऊन देखील मासिक पाळी हा विषय आपण चार चौघात बोलणे किंवा त्याबद्दल सांगणे चुकीचे समजतो. शहरात काही प्रमाणात गोष्टी बदलले आहेत पण ग्रामीण भागात किंवा अनेक ठिकाणी मासिक पाळी बद्दलच्या धारणा तशाच आहेत धारणा म्हणण्यापेक्षा मी त्यांना अंधश्रद्धा म्हणेन.


मासिक पाळी ही एक अत्यंत महत्त्वाची व नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीचा संबंध स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांशी आणि नैसर्गिक रित्या होणाऱ्या प्रक्रियेशी आहे. मासिक पाळीचा कोणत्याही धर्म, रूढी परंपरा यांच्याशी काही संबंध नाही तरीदेखील आपला समाज या नैसर्गिक प्रक्रियेला चालीरीती रूढी परंपरा यांच्याशी जोडतो आणि मासिक पाळी येण्याला व ती आलेल्या स्त्रीला विटाळ किंवा अशुद्ध समजतो. पाळी आली आहे ना? मग मंदिरात नको जाऊ, देवघरात नको जाऊ, प्रसाद नको खाऊ, कोणाला शिवायचं नाही, स्वयंपाक घरात शिरायचं नाही, चार-पाच दिवस वेगळं राहायचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे लोणच्याच्या बरणीला हात लावायचा नाही कारण ते नासेल. पाचव्या दिवशी पाळी थांबली की आंघोळ करायची आणि शुद्ध व्हायचं. कमाल वाटते या सगळ्याची. मला हेच खरं तर समजत नाही मासिक पाळी हा एक स्त्रीयांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या क्रियांमुळे त्यांना मातृत्व प्राप्त होते जर ही प्रक्रिया स्त्रीला मातृत्व प्राप्त करून देत असेल एक नवीन जीव जन्माला येणार असेल तर मासिक पाळी ही प्रक्रिया विटाळ किंवा अशुद्ध कशी?


पूर्वीच्या काळी स्त्रियांना मासिक पाळी आल्यावर स्वयंपाकघरात जाण्यास किंवा घरातले कोणतेही काम करण्यास बंदी होती. कारण मासिक पाळी आल्यावर स्त्रियांना चार दिवसात फार त्रास होतो आणि तो त्रास कमी व्हावा त्यांचे ते चार दिवस आरामात जावे यासाठी त्यांना घरातील कामे करु नव्हते देत. मासिक पाळी आलेल्या बाईने देवघरात किंवा मंदिरात मुळीच पाऊल टाकायचं नाही ही देखील एक चुकीची धारणा आहे. खरं बघायला गेलं तर मंदिरात जाणं न जाण हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. आपण सर्व स्वतंत्र आहोत आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक मत आहे. कारण कोणताही धर्म किंवा ग्रंथ तुम्हाला हे सांगत नाही की मासिक पाळी आल्यावर स्त्रियांना मंदिरात प्रवेश देऊ नये किंवा त्यांना अस्पृश्य असल्यासारखी वागणूक द्यावी. मासिक पाळी हा निसर्ग धर्म आहे. मला सांगा अशी एखादी व्यक्ती जी नेहमी लोकांना फसवते लोकांविषयी वाईट विचार करते आणि तेच वाईट विचार घेऊन ती व्यक्ती मंदिरात प्रवेश करते हे योग्य आहे पण एखादी स्त्री जी नैसर्गिक व शारीरिक प्रक्रियेमध्ये आहे तिला मंदिरात प्रवेश दिल्यानंतर मंदिर अशुद्ध होते यामागे काय तर तर्क आहे काहीच नाही. देवाने फक्त चांगले विचार व चांगले कर्म या दोनच गोष्टींना महत्त्व दिले आहे. देवाचा कोप होईल रुढी परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान अशुद्ध ठरवन त्यांना अस्पृश्य सारखी वागणूक देण चुकीच आहे आणि आपण हे सर्व थांबवायला हवं.


सॅनिटरी पॅड विषयी बोलताना किंवा खरेदी करताना लोक फार मोठा गुन्हा असल्यासारखे वागतात. मेडिकलवाला पॅडस् वर्तमानपत्रात गुंडाळून, काळ्या पिशवीत लपेटून तुमच्या हातात असं सोपवतो की जणू तो चोरी करतोय. यामुळेच आजही खेड्यापाड्यातल्या बर्‍याच स्त्रिया जुने कपडे वापरताना दिसतात. त्या कपड्यांची स्वच्छता आणि परिणामी त्या स्त्रिच्या स्वच्छतेचा ही खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो. यातून बरेच आजार उद्भवतात आणि बऱ्याच स्त्रिया त्यांच्या अज्ञानामुळे त्या रोगांना बळी पडतात.


आपल्या सर्वांना हे समजायला हवा की मासिक पाळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळी आल्यावर स्त्रियांना विटाळ किंवा अशुद्ध समजण्यापेक्षा मासिक पाळी या मातृत्व देणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा आपण सन्मान करायला हवा. कोणत्याही रुढी परंपरा जाती-धर्म यापेक्षा आपण हे लक्षात ठेवायला हवं की स्त्री सुद्धा एक मनुष्य (मानव) आहे. मासिक पाळी आली आहे म्हणून घरातील स्त्रिला एकटे ठेवणं घरातील सगळ्यांपासून लांब बसवणं. आणि तिला अशी वागणूक देऊन तिच्या भावना दुखावन चुकिच आहे.


आपल्या रूढी परंपरा चालीरीती अश्या असाव्यात ज्यांनी समाजाच कल्याण होईल लोकांचे कल्याण होईल आणि कुठला ही जीव दुखावला जाणार नाही. चुकीच्या चालीरीती व परंपरा मोडण्यासाठी व बदलण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला देखील महाभारत म्हणजेच (महायुद्ध) करावं लागलं होतं आपल्याला तर फक्त आपले विचारच बदलायचे आहेत. मासिक पाळी संदर्भातल्या त्या जुनाट रुढी-परंपरांच्या बेड्या खरंतर कधीच मोडून टाकण्याची गरज होती. पण संधी आणि वेळ अजूनही गेलेली नाही. या! उद्याचं भविष्य जन्माला घालणाऱ्या आजच्या वर्तमानाला तितक्याचं पवित्रतेने स्वीकारुयात… त्याचा सन्मान करुयात!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational