माझी पहिली नोकरी
माझी पहिली नोकरी


इंजिनीरिंग ची परीक्षा संपली आणि मी हॉस्टेल वरून घरी आले.. खरंतर हॉस्टेल वरच्या दिवसांना खूप मिस करत होते... ते हॉस्टेल वरचे तीन वर्षे कसे निघून गेले कळलंच नाही पण खूप साऱ्या आठवणी सोबत होत्या त्या दिवसाच्या..
माझी शेवटच्या वर्षाला असतानाच एका नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली होती त्यामुळे टेन्शन नव्हतं पण जॉइनिंग कधी येणार ह्याचा पत्ता नव्हता.. परीक्षेनंतरचे दोन महिने तरी घरीच घालवले.. तीन वर्षांपासून घरापासून लांब असल्याने आई बाबांसोबत वेळ घालवायला मिळत होतं त्यामुळे मी खुश होते.. परीक्षेनंतर दिड महिन्यातच रिझल्ट लागला.. आता मात्र घरी बसायचा कंटाळा ही यायला लागला आणि इतकं शिकून घरी बसलोय ही भावना ही अस्वस्थ करायला लागली.. प्लेसमेंट तर झाली आहे पण जॉइनिंग चं काहीच माहीत नसल्याने जॉबची काहीच शाश्वती नव्हती.. त्यामुळे माझी दररोज जॉइनिंग लेटर येईपर्यंत काय करता येईल ह्यासाठीची शोधमोहीम चालू झाली..
दुपारी जेवणानंतर असच वर्तमानपत्र वाचत बसली होती तर एका जाहिरात माझ्या नजरेत पडली.. एका डिप्लोमाच्या कॉलेज मध्ये लेक्चरर पदासाठी जागा होती आणि दिलेल्या प्रोफाइल ची अपेक्षा ही मी पूर्ण करू शकत होती त्यामुळे मी बायोडाटा घेऊन दिलेल्या तारखेला कॉलेज मध्ये मुलाखतीसाठी गेली.. खूप सारे जण आले होते.. मी तर गर्दी बघून अवाक झाले कारण दोन रिक्त पदासाठी जवळपास साठ - सत्तर लोकं होती..
मुलाखत झाली आणि सगळं देवावर सोडून मी घरी आली.. दोन दिवसाने मला एका नंबर वरून कॉल आला..
"मॅडम, तुमची मुलाखतीच्या पुढच्या राऊंड साठी निवड झाली आहे तर उद्या कॉलेज मध्ये येऊन भेटा.. "
खूप आनंद झाला होता.. दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये गेली.. प्रिन्सिपॉल मुलाखत घेत होते.. माझा टर्न आला.. मी सगळ्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे दिली आणि बाहेर येऊन निकालाची वाट पाहत बसली..थोडया वेळाने मला आत बोलावलं..
"अभिनंदन, तुमची लेक्चरर पदासाठी निवड झाली आहे.. इथे सगळे लेक्चरर साडीत येतात.. हा कॉलेजचा नियमच आहे तर तुम्हालाही दररोज साडीतच यावं लागेल.. "
" अरे बापरे, हा काय प्रकार आहे.. साडीत? आणि तेही दररोज? कसं शक्य आहे.." मी मनातल्या मनात बोलत होती..
"ओके सर, थँक्स यु " म्हणून मी बाहेर आली..
निवड झाल्याचा आनंद ही झाला होता आणि दररोज साडी नेसायचं टेन्शन ही आलं होतं..
कॉलेज वरून घरी येता येताच माझ्या हौशी बाबांनी चार नवीन साड्या घेऊन दिल्या.. पहिला दिवस उजाडला... मी लवकर उठले.. कारण साडी कुठे मला नेसता येत होती.. आई होतीच मद
तीला.. मस्तपैकी कॉटन ची ब्लु कलर ची साडी नेसली.. आई बाबांच्या डोळ्यातला आनंद काही वेगळाच होता.. कारण ज्या कष्टाने त्यांनी मला शिकवलं होतं तेच कष्ट सार्थकी ठरवायला मी निघाले होते.. नाश्ता केला, डब्बा आणि बॉटल घेतली आणि बाबांसोबत कॉलेजला जायला निघाली.. मनात खूपच धाकधूक होत होती..
स्टाफ रूम मध्ये खूप साऱ्या लेक्चरर शी ओळख झाली.. माझ्यासोबत अजून एका जण नवीन जॉईन झाली होती.. दोघांची मनःस्थिती सारखीच होती त्यामुळे थोडया वेळात च आमची चांगली गट्टी जमली.. डिपार्टमेंट हेड ने माझ्यासाठी ठरवलेला विषय आणि त्याचं टाइमटेबल आणून दिलं.. पहिला दिवस थोडा निवांतच गेला.. घरी आले आणि दुसऱ्या दिवशी एका वर्गावर तास असल्याने थोडी तयारी करायला घेतली.. पहिला तास चांगला गेला आणि जमतंय आपल्याला हा आत्मविश्वास ही आला.. मग काय पुढचे दहा महिने सकाळी उठून साडी नेसणे, नाश्ता करणे, बाबांसोबत कॉलेज ला जाणे, टाइम टेबल प्रमाणे लेक्चर्स घेणे, येताना ऑटो ने घरी येणे, आईच्या हातचा काहीतरी स्पेशल बनवलेला गरमा गरम पदार्थावर ताव मारणे आणि उद्याच्या तासाची तयारी करणे हाच दिनक्रम फिक्स झाला..
पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय दिलं मला माझ्या ह्या पहिल्या नोकरीने..??
एक व्यक्ती म्हणून आयुष्य स्वतःच्या हिंमतीवर जगण्याचं धाडस दिलं.. कॉलेज लाईफ मधल्या अल्लड मला व्यवहारज्ञान शिकवलं.. प्रगल्भ बनवलं.. पैशाची किंमत कळाली.. ह्या जगात फुकट काहीच मिळत नसतं ह्याची जाणीव करून दिली.. पैशाचं नियोजन करायला शिकवलं.. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती चांगलीच असते असं नाही, स्वार्थ ही असू शकतो ही मोलाची शिकवण ह्या नोकरीने दिली.. बाहेरच्या जगात माणसांना ओळखायला शिकवलं.. माझ्यात नवनवीन काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण केली.. पैशाची बचत आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणं किती महत्वाचं आहे ह्याचं शिक्षण दिलं..
पहिला पगार हातात आला... घरी येऊन देवासमोर ठेवून देवाचे आणि आई बाबांचे आशीर्वाद घेतले आणि पूर्ण पगार बाबांच्या हाती ठेवला... खूप दिवसांपासूनची बाबांना आर्थिक मदत करायची माझी इच्छा पूर्ण झाली.. बाबांनी तो पगार माझ्या अकाउंट मध्ये जमा करायला सांगितलं.. कारण त्यांना मिळालेल्या पैशाचं नियोजन ही करायला शिकवायचं होतं..
दहा महिन्याने मला प्लेसमेंट झालेल्या कंपनीतून जॉइनिंग साठी चा मेल आला आणि ह्या लेक्चरर पदाचा मी राजीनामा दिला आणि कंपनीत रुजू झाले..
शेवटी इतकंच म्हणेन ह्या माझ्या पहिल्या नोकरीने आयुष्य स्वतःच्या हिंमतीवर जगण्यासाठीचा आत्मविश्वास दिला.. तिथून माझ्या प्रगतीचा सुरु झालेला प्रवास अजूनच बहरत आहे..