Smita Pawadshetti-Gayakude

Others

3  

Smita Pawadshetti-Gayakude

Others

माझा चेन्नईतला पहिला दिवस

माझा चेन्नईतला पहिला दिवस

5 mins
45


मी ट्रैनिंग साठी मे 2013 मध्ये मुंबई च्या पटनी कॉम्प्युटर्स मध्ये जॉईन झाले.. पुढच्या चार महिन्यात ट्रैनिंग पूर्ण झालं आणि मला चेन्नई ला पोस्टिंग मिळाली.. प्रश्न चेन्नई ला पोस्टिंग मिळाल्याचा नव्हता तर पूर्ण ट्रैनिंग बॅच मधून दोन मुले आणि मी एकटीच मुलगी... चेन्नई मिळालं होतं.. चेन्नई मध्ये माझे कोणीच ओळखीचे नव्हते.. ट्रैनिंग नंतर तीन दिवसात मला चेन्नई ऑफिस ला जॉईन व्हायचं होतं.. मनात खूप भीती होती.. पण डोळ्यापुढे मनात रंगवलेली स्वप्ने ही दिसत होती..


दुसऱ्याच दिवशी मी आणि बॅचमधील ती दोन मुले विमानाने चेन्नई ला पोहचलो.. आमच्याच ट्रैनिंग बॅच मधून आधी गेलेली सात मुले चेन्नईत राहत असल्याने त्या दोघांचा राहण्याचा प्रश्न नव्हता.. पण माझं तसं कोणीच ओळखीचे नसल्याने कुठे राहायचं हा मोठा प्रश्न होता.. माझे बाबा तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होते.. त्या माझ्यासोबतच्या दोंघांनी माझ्या राहण्याबद्दल चौकशी केल्यावर आमच्याच कंपनीतून आधीच्या बॅचमधली काही मुली एका फ्लॅटवर राहत असल्याचं कळालं.. त्या दोघांचीही फारशी ओळख नव्हती त्या मुलींशी ... पण कोणाकडून तरी नंबर मिळवून त्यांनी तिथे माझी राहायची व्यवस्था केली.. मग मीही जास्त विचार न करता एका रात्रीसाठी तिथे राहायचं ठरवलं..


आम्हांला चेन्नईला पोहचायला रात्रीचे 8.30 वाजले.. आमच्या तिघांसाठी चेन्नई खूपच नवीन होतं.. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आम्ही टॅक्सी करून त्या मुलींच्या फ्लॅटवर जायचं ठरवलं.. त्यांचा फ्लॅट मेन रोड पासून खूप आत होता.. जवळपास चालत वीस मिनिटे लागतील इतका आणि रस्ताही वळणावळणाचा.. त्यामुळे फ्लॅट शोधण्या मध्येच आमचा खूप वेळ गेला आणि आम्ही 10.15 ला त्यांच्या फ्लॅट जवळ पोहोचलो.. फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता.. मला खाली घ्यायला फ्लॅट मध्ये राहणारी (जिचा मोबाईल नंबर होता आमच्याकडे ) एक मुलगी आली.. तिने साधं स्मितहास्य ही न करता मला फ्लॅट वर नेलं.. माझ्याजवळ सामान खूप होता.. मी एका कोपऱ्यात सामान ठेवून दिलं..


"पानी चाहिये तो वहा किचन में फिल्टर है ले लेना.. " इतकं बोलली आणि थोडक्यात कुठे काय काय आहे बाथरूम वगैरे ते सांगितलं आणि तू ह्या रूममध्ये झोप असं सांगून रूम मध्ये निघून गेली.. मी बाबांना कॉल करून सुखरूप पोह्चल्याचं सांगितलं..


मी थोडीशी फ्रेश होऊन रूममध्ये गेले..रूममध्ये दोन मुली कानाला हेडफोन लावून लॅपटॉप वर मूवी बघत होत्या.. मी गेल्यावर एक नजर टाकून फक्त फॉर्मॅलिटी म्हणून स्माईल दिली आणि परत लॅपटॉप मध्ये गुंग झाले.. मी विमानात बसण्याआधी जेवली होती.. त्या नंतर आम्ही काहीच खाल नव्हतं.. जेवणाबद्दल कोणी काही विचारत नसलेलं बघून मी हळूच बॅग मधून माझ्यासोबत असलेला बिस्कीटचा पुडा काढला.. त्यांना तुम्हीपण घ्या असा आग्रह केला.. त्या दोघांनी एक एक बिस्कीट घेतली.. ही बिस्कीट खाते आहे हे बघूनही त्या मुलींच्या मनात मी जेवले की नाही ह्याची साधी चौकशी करावी असं वाटलं नाही..


मला खूप रडायला येतं होतं.. मी कुठे येऊन अडकले असं वाटत होतं.. त्या माझ्या सोबतच्या मित्रांनी जेवलीस का विचारायला कॉल केला.. त्यांना खोटंच हो जेवले सांगून झोपून घेतले.. खरंतर त्या दिवशी मी खूप थकली होती.. पण झोप काही यायचं नाव घेईना.. डोळ्यातले अश्रू काही थांबेनात.. कसतरी मनाला समजावलं आणि नंतर थोडया वेळासाठी झोप लागली.. सकाळी बाबा चेन्नई त पोहचणार होते.. त्यामुळे मी लवकरच उठली.. अंघोळ केली आणि बाबांना पत्ता मेसेज केला होता.. त्यामुळे ते मेन रोडवर च्या बस स्टॉप वर येणार होते..


मी मेन रोडवर जाण्यासाठी बाहेर पडले पण काल रात्री पोहचल्याने मेन रोडचा रस्ता काही नीट आठवेना.. फक्त इथून खूप लांब आहेत इतकंच माहीत होतं आणि माझ्याकडे साधाच मोबाईल होता त्यामुळे मॅप चा वगैरे प्रश्नच नव्हता.. रस्त्यावर कोणीच दिसत नव्हतं.. तेवढ्यात एक विचित्र बाई समोरून येताना दिसली.. तिचे केस विस्कटलेले होते.. अंगावर मळकट साडी होती आणि हातात एक काठी घेऊन ती त्या काठीला इकडे तिकडे फिरवत वेड्यासारखी मोठ्याने बडबडत आणि हसत होती.. त्या बाईला बघून मी अक्षरशः इतकी घाबरली की काही सेकंड साठी मला माझा हृदय बंद पडल्यासारखा वाटला.. मागे वळते तर मोठमोठी घरे आणि सगळ्याचे मेन गेट बंद केलेले.. पुढे जावं तर ती बाई.. काय करू काहीच कळेना.. त्या क्षणी मला काय वाटलं माहीत नाही पण मी जिथे आहेत तिथे तिच्याकडे न बघता देवाचं नाव घेत थांबायचं ठरवलं.. तीबाई जसजशी जवळ येतं होती तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते.. ती बाई माझ्या बाजूने चालली तशी मी डोळे बंद करून घेतले आणि काही वेळाने डोळे उघडले तर ती बाई पुढे निघून गेली होती..

"बापरे सुटले एकदाचे " म्हणत पायाचा वेग वाढवला.. पण रस्ता कुठे माहीत होता मला? ... मनाला वाटेल तसं उजवा डावा टर्न घेत मी पुढे निघाले तर काही अंतरावर एक किराणा दुकान उघडलेलं दिसलं.. म्हटलं चला ह्या दुकानदारालाच रस्ता विचारूया.. तमिळ काही येत नसल्याने हिंदीत विचारलं..

"काका मेन रोड को कैसे जानेका? "

काकांनी तमिळ मध्ये काहीतरी लेफ्ट राईट सांगितलं पण खूप क्लिअर असं काही कळालं नाही.. तसंच पूढे निघाले तर समोरून एक आजोबा येत होते.. आजोबांना विचारून बघू असा विचार करून रस्ता विचारला.. मी हिंदीत बोलते आहे बघून मी इथली नाहीय हे बहुदा त्यांच्या लक्षात आलं.. त्यांनी मला मेन रोडचा रस्ता इंग्लिश मध्ये सांगितला.. तोपर्यंत मी रस्ता चुकले होते... मी परत मागे जाऊन आजोबांनी सांगितल्याप्रमाणे मेन रोडला जाऊन पोहचले..


बस स्टॉपवर असलेल्या बेंच वर बसून बाबा येण्याची वाट पाहू लागले.. थोडया वेळात बाबांचा कॉल आला..

"बाळा कुठे आहेस? "

"बाबा मी जो पत्ता दिलेला त्या स्टॉप वरच बसले आहे.. "

"मीपण तिथेच आहे बाळा.. "

दोघेही आजूबाजूला बघतोय पण एकमेकांना दिसत नाहीय.. त्यानंतर दोघांनी आमच्या आजूबाजूला असलेल्या खूप सारे पॉईंट्स सांगितले पण त्यापैकी काहीच एकमेकांना दिसत नव्हतं.. तेव्हा बाबा दुसऱ्याच स्टॉप वर आहेत हे आमच्या लक्षात आलं..

"बाळा जिथे आहे तिथेच थांब.. मी येतो लवकर.. "

आता तर माझा पूर्ण चेहरा रडवेला झाला होता.. बाबांना ऑटो वाल्याने नवीन आहे हे ओळखून पैसे लुबाडण्यासाठी किंवा पत्त्याचा गोंधळामुळे माझ्यापासून दोन स्टॉप पुढे सोडलं होतं..


थोडया वेळाने बाबा मला ऑटोतून उतरताना दिसलें आणि माझं गोंधळलेलं मन एकदम शांत झालं... असं वाटलं खुप खूप रडावं आणि मोकळं व्हावं... पण बाबांना टेन्शन नको म्हणून कसबसं आवरलं स्वतःला..


त्यानंतर पुढचे आठ दिवस मी आणि बाबा एका लॉज वर राहिलो.. मी ऑफिसला गेली की बाबा पेइंग गेस्ट शोधायचे आणि मी एकदा का ऑफिस मधून आली तर बाबांना आवडलेले पेइंग गेस्ट बघून यायचो.. असं करत करत आठ दिवसात आम्हाला एक पेइंग गेस्ट आवडलं जिथे दोन तीन महाराष्ट्रयीन मुलीही होत्या.. त्या आठ दिवसात मी बऱ्यापैकी चेन्नईत रुळले होते..बाबा सगळं काही ठीक असल्याची खात्री करून आणि परत लवकर भेटायला येतो असं सांगून गावाला गेले.. त्यानंतर मला नवीन मैत्रिणी भेटत गेल्या... ऑफिस मध्ये पण ओळखीचे झाले आणि अधून मधून बाबा होतेच भेटायला यायला... त्यामुळे चेन्नईतले पुढचे दहा महिने सुखकर गेले..


Rate this content
Log in