STORYMIRROR

Jasmin Joglekar

Romance

4  

Jasmin Joglekar

Romance

माझे मन तुझे झाले

माझे मन तुझे झाले

3 mins
197

मायन्याशिवायचं हे माझं पत्र पाहून तुला आश्चर्य मुळीच वाटणार नाही. हो न? कुठल्याच बंधनात रहायला न आवडणारी मी तुला चांगली माहितेय. म्हणूनच तर पडलास न प्रेमात! आणि अशी स्वच्छंदी मी तुला आवडतेय म्हणून तुझ्या प्रेमात पडलेली मी.. अजबच आहे न सगळं! आपल्या दोघांच्या आवडीनिवडी किती वेगळ्या...पण कुठंतरी सूर जुळले आणि हा सुंदर प्रवास आपण एकमेकांच्या सोबतीनं आपोआपच सुरू झाला. 

  मला आठवतोय तो काळ..मी तुला कितीतरी पत्रं लिहिली होती तेव्हा...आणि तू? मला म्हणायचास, 'छ्या हे पत्र बित्र लिहिणं मला काही जमणार नाही. मी आपला तुला रोज फोन करत जाईन.' तेव्हा आपल्या या घरात तुझ्या फोन ला रेंज नसायची. म तू समोर बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंग च्या गच्चीत रात्री धडपडत जायचास. फक्त माझ्याशी बोलण्यासाठी. फोनवर माझा आवाज ऐकलास की तू खुश व्हायचास..आणि मला मात्र तू पत्रातून कायम माझ्यासमोर हवा वाटायचास. ए..पण मला आता एक खरं खरं सांग ना..तुझ्या फोनला तेव्हा खरंच रेंज नसायची की, एकांतात बोलण्यासाठी ते कारण असायचं? 

   आता मला माझंच हसू येतंय. त्या पत्रातून मी तुला काय काय सांगायचे! ते प्रेमपत्र कसलं डायरीच असायची माझी. पण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आपण आपल्या जवळच्या, प्रेमाच्याच व्यक्तीला सांगणार न! I Love U पेक्षा तुला माझं ते अघळपघळ सांगणं जास्त आवडायचं. हो न? 

   तुला आठवतंय..आपण समुद्रावर फिरायला जायचो..समुद्र पाहिला की, मी एकदम शांत, अंतर्मुख होऊन जायचे. त्या पाण्यात भिजायला मला कधीच आवडलं नाही. मी आपली किनाऱ्यावर कोरड्या वाळूत शांत बसून रहायचे. मावळत्या सूर्याकडे आणि त्याच्या सोनेरी किरणांनी चमचमणाऱ्या लाटांकडे एकटक बघत..किनाऱ्यावरची ती लाटेची ओली किनार असायची न..ती माझी मर्यादवेल. एकतर तिच्या पलीकडे बसायचं नाहीतर त्या किनारीच्या सोबतीने गाणं गुणगुणत हळुवार चालत रहायचं. आणि तू? मला आठवतोस तो तू कसा माहितेय. किनाऱ्यावरच्या दगडांवर आपटून उसळणाऱ्या भरतीच्या लाटेसारखा फेसाळणारा..समुद्र पाहिला की, तुला तर मस्तीच करावी वाटायची. मग किनाऱ्यावरून जोरात पळत काय जायचास..समोरून येणाऱ्या सातव्या मोठ्या लाटेला दोरीउडी सारखं पायाखालून काय जाऊ द्यायचास..आणि काय काय..पण एक सांगू...तुझं हे वागणं पाहून मला कधी भीती वाटली नाही. का माहितेय? मी पूर्ण जाणून होते की तुला माझी काळजी आहे. 

   तो दिवस मला अगदी नीट आठवतोय. आपण असेच समुद्रावर गेलो होतो. मी माझ्या मर्यादवेलीजवळ आणि तू पाण्यात. अचानक पाण्यातून तू माझ्याजवळ येऊन बसलास. जरा शांत झालास आणि मग माझा हात हळुवारपणे हातात घेऊन, माझ्या डोळ्यात बघत एक छानशी कविता म्हणत गेलास..कविता..ती ही तू स्वतः माझ्यासाठी केलेली. तो क्षण आठवला तरी अजून अंगावर शहारा येतोय! आश्चर्याने मी तुझ्याकडे बघत होते आणि तू माझ्याकडे.. काय म्हणाला होतास तेव्हा मला..'तुझ्या डोळ्यातली चमकणारी लाट मला तुझ्याकडे खेचून घेतेय गं! नको बघूस अशी! आणि तूच उठून गेलास माझ्या शेजारून...खांद्याला माझ्या हलकासा स्पर्श करत. वेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करण्याची जरुरीच नव्हती आपल्याला कधी. मर्यादा जाणून होतो आपण..पण तुझ्या त्या स्पर्शात मात्र जादू होती. माझी मी न उरता तुझ्या पाठोपाठ कधी त्या बेभान लाटांवर स्वार झाले कळलंच नाही मला. आता आश्चर्यचकित होण्याची तुझी वेळ होती. पाण्यात शिरलेल्या मला पाहून तर काय!! तुला उधाणच आलं जणू. तुझ्या बरोबरीने किंवा थोडा जास्तच दंगा केला असेन तेव्हा मी पाण्यात. एकदम खुश..तू ही आणि मी ही. 

    असंच तुझं वेडं बाईक प्रेम..किती जोरात गाडी चालवायचास तू..बापरे! बघून भीतीच वाटावी एखाद्याला. पण पहिल्यांदा तुझ्या मागे बसले आणि कळलं की, तुझा तुझ्या चालवण्यावर किती व्यवस्थित कंट्रोल आहे ते! आणि मग आवडतच गेलं तुझ्या मागे बसून मस्त वेगाने फिरणं..श्वास घ्यायलाही जड जाईल इतका तो भन्नाट वारा.. आठवतंय मला अजूनही..गाडीवर माझ्या घट्ट विळख्यात तू असायचायस म्हणूनच मी एकदम निर्धास्त ते सगळं एन्जॉय करू शकायचे. किती विश्वास होता न आपला एकमेकांवर..

    बघ न..हे प्रेम कसं असतं! आपण आपले रहात नाही यात. दोघंही एकमेकांपाशी मोकळे, एकमेकांची स्पेस जपणारे असले की, हे प्रेम खुलतच जातं. आपलंही तसंच आहे ना रे! एकमेकांच्या आवडी जपत, त्यात समरस होत आपण ही वाटचाल केली म्हणून अजूनही आपलं प्रेम तितकंच ताजं टवटवीत आहे, जितकं पहिल्या दृष्टीत होतं. मला विश्वास आहे कायमच ते तसंच राहील. आपण एकमेकांबरोबर घालवलेला वेळ, आपलं एकमेकांवरच प्रेम मनात आलं न की, मला आठवतं ते 'माझे मन तुझे झाले..' हे गाणं. आपल्यासाठीच असेल का रे ते? सांग ना...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance