सलाम
सलाम
पांढरा रंग... शांततेचं प्रतीक.
भलेही या पांढऱ्या रंगावर पलीकडचे अशांतीचे कित्येक रंग हल्ला करत असले तरी, आपला हा पांढरा रंग कोणातही सामावून जात नाही. तो तसा जाणारच नाही कधी. कारण त्यात ओघळतोय देशभक्तीच्या लाल रंगाचा ओघळ. हा लाल रंग त्यात मिसळतोय म्हणून आतल्या इतर भागातला हिरवा आणि केशरी रंग सही सलामत आहे. त्या पांढऱ्यात लाल मिसळला नसता तर...कल्पनाही करवत नाही, किती काळाकुट्ट अंधःकार पसरला असता इथं. त्या लाल रंगाला सलाम...आतल्या भागातली ऊब कायम रहावी म्हणून हाडं गोठवणाऱ्या वजा तापमानाच्या पांढऱ्यावर आपले उष्ण लाल ओघळ सांडवणाऱ्या त्या अद्भूत शक्तीला सलाम...
मुठीत वाळू धरली तर थोड्यावेळात बोटांमधल्या फटींमधून घरंगळून जाते. आतल्या भागातले जीव त्यांच्या त्यांच्या मुठीत, कुडीत सुरक्षित रहावेत म्हणून आपला जीव त्या वाळूप्रमाणे घरंगळून टाकणाऱ्या त्या असंख्य जीवांना सलाम...आतल्या भागाला कोणत्याही उष्णतेची धग जाणवू नये म्हणून अक्षरशः त्वचा वितळून जाईल की काय असं वाटणाऱ्या भयंकर कडक तापमानात शांत डोक्याने लढणाऱ्या अचाट शक्तीला सलाम..
आतल्या वाटा सरळसोट, विना अडथळा असाव्यात म्हणून दऱ्या डोंगर, कडेकपारी, घनदाट जंगल, खडतर वाट या कशाकशाची बिलकुल पर्वा न करता त्याच्याशी समरुप होत आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शक्तीला सलाम..
संपूर्ण देशातल्या सामान्य घरातली ऊब कायम रहावी म्हणून स्वतःच्या घरची मायेची ऊब कुलूपबंद करुन जीवानिशी लढणाऱ्या आपल्या वीर जवानांना सलाम. वंदे मातरम्
