Hrushikesh Marathe

Romance

4.8  

Hrushikesh Marathe

Romance

Love is an Illusion

Love is an Illusion

8 mins
2.0K


   "काय झालं रे तुला, असा नाराजसा दिसतोस.

काही प्रोब्लेम आहे का? आजवर इतका पडका चेहरा कधी पहिला नाही रे तुझा."

  प्रियाचा व्हाट्स अप वरचा मेसेज पाहून समीरचा चेहरा अजुन गंभीर झाला. त्याला काही सुचेनासे झालं होतं. कसाबसा तो आपल्या जागेवरून उठून कॉफी मशीन कडे गेला. एक कप कॉफी सोबत घेऊन थेट पायऱ्याचा दिशेने तो निघुन गेला. 

  प्रियाला समजेना. तिचा मनात शंकांचे काहुर माजले होते.

याच कोणाशी भांडण नसेल ना झालं? तब्येत बरी नसेल का याची? की काही घरचा प्रोब्लेम? तिला काही सुचेना. शेवटी तिने सुद्धा आपला कॉम्प्यूटर लॉक केला आणि समीर चा मागे मागे जाऊ लागली. 

     समीर साठे आणि प्रिया साने, एकाच प्रोजेक्ट वर गेले 2 वर्ष झाले काम करत होते. समीर खुप हुशार आणि मेहनती म्हणून त्याचा कंपनीमधे फेमस होता. दिसायला रुबाबदार, पुणेरी ठेवणीतला चेहरा त्यात कोकणस्थी वागणं. एकंदरीत साऱ्यावरचं प्रिया फिदा होती. समीरच्या प्रत्येक गोष्टीमधे तिला इंटरेस्ट असायचा. 

    समीर स्मोकिंग झोनच्या एका कोपरयात उभा राहुन आरामात हवेवर धुराची नक्षी काढत होता. झुरक्या वर झुरके चालूच होते. एक संपली की दूसरी हे गणित चालुच होतं. समीरला या अवस्थेत पाहुन प्रिया थोडी गडबडली होती. समीर कोणत्यातरी दबावाखाली आहे हे तिने चांगलचं ओळखलं होत. थोडावेळ वाट पाहुन शेवटी ती पुढे होऊन म्हणाली, ' समीर, Is Everything Okay? Any Problem?' समीर सिगरेटच्या धुरासोबत कुठेतरी हरवला होता. तिने समीरला हलकेच धक्का दिला तेव्हा कुठे त्याची तंद्री सुटली. तिने पुन्हा त्याला विचारल,'काय रे काय झालयं नक्की तुला?' 'कुठे काय काहीच नाही. M good :)' समीर उत्तरला. त्याचा आवाजात एक प्रकारची अनामिक भीती वाटत होती. प्रियाने त्याला अजुन प्रश्न न विचारता तिच्या सोबत पुन्हा वरती नेले. 

     कामाच्या नादात आता तो थोडा सावरलेला वाटत होता. दुपारी जेवताना कॅफेमधे तो मोबाईल वरच चॅट करत होता जेवणात जास्त लक्षच नव्हतं त्याचं. प्रिया त्याला म्हणाली बास की रे किती गप्पा मारशील मुलींशी इथे आम्ही पण आहोत आमच्याशी सुद्धा चार शब्द बोललास तरी चालेल. समीर त्यावर गालतल्या गालात हसला आणि त्याने मोबाईल आत ठेवला आणि प्रियाला विचारलं, "काय मग, वीकेंडचा प्लॅन काय?" ते ऐकून प्रिया मनातल्या मनात खुष झाली. दोन मिनीट तिला काही सुचेना मग ती म्हणाली "तु म्हणशील तो!" प्रियाच्या या उत्तरावर समीरला पुन्हा हसु आलं दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या देत वेळ निभावुन नेली.

   समीर संध्याकाळी घरी जाताना नेहमीप्रमाणे कटयावर थांबला होता. प्राजक्ता येईल की नाही याची खात्री नव्हती पण तरीही तो तिची वाट पहात बसला होता. त्याला सकाळपासून जी भीती होती तेच झालं असाव कदाचित!, शेवटी प्राजक्ता आलीच नाही. बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर तो तसाच गाडीला किक मारून घरी निघाला. 

  प्राजक्ता गाडगीळ, कॉलेजात दोघही एकाच वर्षाला होते, दिसायला एकदम सुंदर, रेखीव होती. समीर आणि तिची ओळख म्हणजे एक अपघातच पण तोही सुखद!

  कॉलेजमधे दोघांचे ग्रुप वेगवेगळे, एके दिवशी कैंटीन मधे समीरचे मित्र STD खेळत होते, समीर समोर बाटली यायला आणि प्राजक्ता कैंटीन मधे यायला एक वेळ झाली. समीरच्या मित्रांनी त्याला चॅलेंज दिलं. "जा त्या समोरून येणाऱ्या मुलीची ओळख करून तीचं नाव आम्हाला येऊन सांग." समीरसुद्धा अशा गोष्टीत पटाईत होता, त्याने दोन मिनिट प्राजक्ताकडे पाहिलं कदाचित हिच्याशी कोणत्या बहाण्याने जाऊन बोलावं याचा तो अंदाज बांधत असावा. तितक्यात तिचा मैत्रिणी तिथे आल्या, समीर थोडा बुचकळ्यात पडला, जे काही त्याला करावं लागणार होतं त्यासाठी प्रेक्षकच आले होते जणू असे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते. तिच्या मैत्रिणींनी तिला हातात हात मिळवून विश केलं आणि समीरचा डोक्यात प्रकाश पडला, आज प्राजक्ताचा वाढदिवस होता. समीर जरा खुश झाला. लगेचंच कॅन्टीनमध्ये जाऊन त्याने एक पेस्टरी ऑर्डर केली, दबक्या पावलात तो हातातून ति पेस्ट्री घेऊन गेला आणि तो तिचाशी बोलणार इतक्यात त्याचा मित्रांनी बर्थडे सॉंग म्हणायला चालू केलं. "हॅप्पी बर्थडे टू यू ", "हॅप्पी बर्थडे टू यू ", "हॅप्पी बर्थडे डियर प्राजक्ता", "हॅप्पी बर्थडे टू यू". समीर थोडा वेळ बिथरलाच, आता नक्की करावं तरी काय गेल्या पावली मागे यावं तरी फजिती आणि हातातली पेस्ट्री घेऊन तिच्यासमोर जावं तरी पंचाईत. शेवटी धीर करून तो तिचा टेबलावर जाऊन बसला, तिच्या मैत्रीणीसुद्धा थोडा वेळ चकित झाल्या. पण एवढं सगळं होऊनसुद्धा प्राजक्ता मात्र निर्विकार, निःसंकोच, निरागसपणे ते एन्जॉय करत होती, तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य पाहून समीरची विकेट तिथंच पडली होती. तिने सौम्य शब्दात विचारलं कोण आपण, तुम्हाला माझा वाढदिवस कसा माहिती आणि माहित असेलही पण असं सरप्राईज देण्यामागचं कारण! एका मागोमाग प्रश्नांच्या सरबत्तीमुळे समीर गोंधळाला, "ते, मी, आपलं, तुम्ही, तुमचं..." "अहो काय, तू तू मी मी करताय?", प्राजक्ताचा पुन्हा एक नवीन प्रश्न. "मी समीर.. समीर साठे.. कॉमप्यूटर सेकंड इयर", समीर उत्तरला. " असं! बरं मग, मिस्टर समीर साठे.. माझ्या प्रश्नांच उत्तर एवढंचं? " "आम्ही STD खेळत बसलो होतो तुम्ही यायला आणि मला चॅलेंज द्यायला एकच वेळ आली, तुमच्याशी ओळख करून तुमचं नाव आम्हाला सांगायचं असं चॅलेंज मला या मित्रांनी दिलं. तुमच्या मैत्रिणी तुम्हाला विश करत होत्या तेव्हा मला कळलं की आज तुमचा वाढदिवस आहे, म्हणून त्याच निमित्ताने मी ही पेस्ट्री घेऊन तुमचाकडे तुमचं नाव विचारायला येत असताना, या माझ्या खट्याळ मित्रांनी माझी फजिती केली." समीरने खरं काय ते पुढच्या एका दमात सांगून टाकलं. "बरररररं, मी प्राजक्ता.. प्राजक्ता गाडगीळ.. सेकंड इयर मेकॅनिकल " त्याचा त्या निरागस आणि स्पष्टवक्तेपणावर प्राजक्ता भलतीच फिदा झाली. समीरही काहीसा खुश झाला होता. तो STD च चॅलेंज तर जिंकला होताच पण इथूनचं सुरु झाली होती प्राजक्तासोबतची त्याची खरी इनिंग.

  शनिवारची सकाळ, समीरचा फोन वाजला आणि तो झोपेतुन जागा झाला, प्रियाचा कॉल होता. "हॅलो, बोल. तुझं सकाळी सकाळी माझ्याकडे असं काय काम निघालं की मला कॉल करावा लागला.", समीरने प्रिया ला विचारलं.        " हे काय, विसरलास.. तुचं तर विचारलं होतंस ना? वीकएंडचा काय प्लॅन आहे.." प्रिया हिरमुसलेल्या आवाजात बोलली. "बरं मग!", समीरने नेहमीप्रमाणे अरसिकता दर्शवली. "चल उठ लवकर, आणि आवर मी येते तासाभरात आपण सिंहगडावर जाऊ, खुप भारी पावसाळी वातावरण आहे आज. ", प्रियाने केलेला प्लॅन तिने त्याला सांगितला. "ठीक आहे.", एवढं म्हणून समीरने फोन ठेवला आणि उठून तयारीला गेला.

  तासाभराने समीरचा घराची बेल वाजली, प्रियाचं असणार हे त्याला माहित होत. त्याने दरवाजा उघडला, प्रियाला आत बोलावलं. थोड्याच वेळात, समीरचा बाईकने दोघं सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागले. सारं आकाश झाकोळलेलं होत, काळ्या ढगांचं छतच टाकलंय जणू असं वाटत होतं, गार मंद वाऱ्यामुळे सारं वातावरणच बेधुंद झालं होतं. स्वारी सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचणार तेवढ्यात ढगांचा गडगडाट झाला. प्रिया त्या आवाजाला घाबरून मागे शांतपणे बसून होती, तिच्या चेहऱ्यावरची केविलवाणी भीती पाहून समीरला हसू येत होतं. स्वारी पायथ्यापर्यंत अंतर कापून किल्ल्याकडे कूच करतं असताना, एक हलकीशी पावसाची सर आली. समीरने गाडी थांबवली आणि जवळच असलेल्या झाडाखाली जाऊन तो उभा राहिला. प्रिया दोन्ही हात पसरून त्या सरीचा आनंद घेत होती आणि समीरला असं झाडाखाली उभं राहिलेलं पाहून तिला खूप हसू येत होतं. " समीर झाडावरचं पाणी अंगावर पडून तू भिजणारच आहेस, त्यापेक्षा इकडे ये बघ किती मज्जा येतेय..कसला अरसिक आहेस रे तु..", प्रिया समीरला बोलवत होती. त्याला पावसाच्या सरीत ओलाचिंब होण्यात काहीही रस नव्हता. तिच्या त्या पावसाच्या सरींबद्दलचे आकर्षण समीर एकटक बघू लागला.

  त्याला प्राजक्तासोबतचा तो पाऊस आठवला.

   

  "अशा धुंद वेळी तुझ्या पास यावे, 

   तुझ्या आसमंती ध्रुवतारा बनावे.

          हवा ही नशिली तुला ही कळावे,

          मनी काय माझ्या तुलाही वळावे.

   जसे मेघ येती काळोख करुनी

   तसे मोर हर्षती थुई थुई नाचुनी."

   

   "हे बघ, तुला आत्ताच सुचायला हवं होतं का हे सगळं?, तुझ्या या शब्दांना बळी पडून लागलाच पडायला शेवटी पाऊस", प्राजक्ता पुटपुटत, फुगून एका टेबलावर जाऊन बसली." तुला खरंच नाही का गं आवडत पाऊस!", समीरने मस्करीच्या सुरात प्राजक्ताला विचारलं. "अजून पण तुला मस्करीच सुचतेय ना, आवडत नाही असं नाही, आवडतो ना पाऊस, पण फक्त खिडकीत बसून खिडकीवर पडणाऱ्या थेंबांपुरताच, दारात उभं राहून पत्रयांवरून खाली येणाऱ्या पाघोळ्यांपुरताच, पहिल्या खेपेस मृदगन्ध देणाऱ्या सरीपुरताच.. कळलं!.. इतकाचं आवडतो मला पाऊस..", प्राजक्ताची पावसाबद्दलच्या या अपेक्षा ती समीरसमोर मांडत होती. समीर गालातल्या गालात तिच्या त्या पावसाबद्लच्या निरागस आणि निर्मळ मतांवर हसत होता आणि तिच्यामुळे त्याला ही पावसाला मुकावं लागलं, तो ही न भिजताच तिच्या सोबत बसून चहा पिऊ लागला. 

   

   थोड्या वेळाने पावसाची सर जाऊन कोवळं ऊन पडलं होतं. समीरने पुन्हा गाडी सुरु केली आणि दोघही सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागले. 

  सिंहगडावर गाडी पार्क करून समीर आणि प्रिया दोघही पुणे दरवाजातून आत गेले. "दादा, ही घ्या गुलाबाची फुलं.. पन्नास रुपयांना गुच्छ.", एक छोटासा दहा वर्षाचं लहान पोरगं गुलाबाचे गुच्छ घेऊन विकायला बसलं होतं. "नाही नको, घेऊन देऊ कोणाला रे ही फुलं...", समीरने नकारार्थी मान हलवली. "दादा घ्या की हो, यांना दया, तुम्हाला म्हणून चाळीसला देतो", ते लहान पोरगं प्रियकडे बोट दाखवून समीरला सांगू लागलं. नेहमीप्रमाणे समीरने त्यांच्याकडे कानाडोळा केला. "दे बघु मला एक गुच्छ, आणि हे घे पन्नास रुपये आणि हे घे तुला, गुलाबाचं फुल", प्रियाने घेतलेल्या गुच्छामधलं एक फुल काढून त्या पोराला दिलं. "थँक्यू ताई, एन्जॉय द ट्रिप", त्या पोराचा चेहऱ्यावरचं समाधान पाहून आणि त्याने दिलेली 'एन्जॉय द ट्रिप' ची कॉमप्लिमेंट ऐकून प्रियाला त्या पोराचं फार नवल वाटलं. "अगं प्रिया कशाला हे भलतंच.. काय करणारेस त्या एवढ्या फुलांचं? कोणाला देणारेस..", समीरने मस्करीत प्रियाला विचारलं. "कोणा दुसऱ्याला कशाला द्यायला हवेत, तू आहेस की.. तुझ्यासाठीचं तर घेतल्येत मी ", प्रिया बोलली. समीर दोन मिनिट प्रियाकडे पहातचं राहिला. "अरे असा काय बघतोयस, पहिल्यांदा पहिल्यासारखा. कधी पाहिलं नाहीस का मला". 

  समीर थोड्यावेळासाठी सारं विसरून भूतकाळात गेला होता. कॉलेजमध्ये रोज डे होता, सकाळपासून समीर प्राजक्ताला शोधत होता, कँटीन, वर्कशॉप,लॅब्स,क्लासरूम्स पालथ्या घालून झाल्या होत्या समीरच्या, कुठेच प्राजक्ता दिसत नव्हती, तिचा फोनही लागत नव्हता. समीरला सकाळपासून रेड, येल्लो असे खूप सारे रोजेस मिळाले होते, पण त्याचाकडे त्याचं फारस लक्ष नव्हतंचमुळी. संध्याकाळी चारचा आसपास कॅन्टीनमध्ये प्राजक्ता त्याला दिसली. तो सोबतच्या सगळ्या रोजेसना सांभाळत तिच्या दिशेने गेला, तिचा चेहरा काहीसा पडला होता, समीरला पाहताच तिने त्याला हात केला. समीरने तिला विचारलं,"काय प्राजक्ता, होतीस कुठे.. सकाळपासून दर्शन नाही, साधा एक फोनपण नाही केलास." "तब्येत बरी नव्हती, आणि तुला कशाला हवंय दर्शन तुझं आपलं बर चाललेय की रे!", समीरच्या हातातल्या रोजेस कडे बोट दाखवत प्राजक्ता म्हणाली. "तुझ्यासाठीचं तर सकाळपासून घेतली होती ही फुलं, हे घे..बिचारी कोमेजली आता.." हसत हसत, आपल्या हातातली सारी फुलं प्राजक्ताच्या हातात ठेवतं समीरने वेळ मारून नेली.

  "काय रे समीर, तू इतका कसा रे अरसिक.. एक तर माझ्यासाठी स्वतः फुलं घेतली नाहीत आणि आता मी दिलेली फुलं घ्यायची सोडून कुठे शून्यात बघत बसलायस", प्रियाने समीरचे केस विसकटत तक्रारीचा सूर आवळला. त्याने फुलं हातात घेतली डोळे बंद करून आपल्या नाकाशी धरली आणि एक मोठा श्वास घेतला. तो गुलाबी सुगंध, त्याचा अंगी भिनल्यासारखा त्याचा चेहरा एकदम फुलून आला. 

   तेवढ्यात त्याचा मोबाईल वर एक मेसेज आला, प्राजक्ताचाचं होता. "It's over, Why don't you understand. I have my own life and I have to live it in my own way. I have to move on. After all, Love is an Illusion"

   समीरने मोबाईल खिशात ठेवला, काही वेळ तो ढगाळलेल्या आकाशाकडे पाहू लागला. प्रियाला त्याची चलबिचल कशामुळे झाली असावी कळेना. ती समीर जवळ गेली, त्याचा हात तिने सहानुभूतीपूर्वक हातात घेतला, तितक्यात जोराची वीज चमकली आणि क्षणार्धात जोरदार विजेचा कडकडाट ऐकू आला. प्रिया दचकली, घाबरून एका क्षणाचाही विलंब न लावता प्रिया समीरला बिलगली. समीरचे हातही आपसूक तिच्या पाठीवर आले आणि त्यांने तिला घट्ट मिठीत घेतले. समीरचे डोळे पाणावले होते, प्राजक्ताच्या आठवणींने असावेत किंवा प्रियाच्या त्या मिठीत येण्याने असावेत. लगोलग जोरदार पावसाची सर आली, समीरच्या पाणावलेल्या डोळ्यांचा बांध फुटला आणि पावसाच्या पाण्यात समीरचे अश्रू एकजीव झाले. समीरने प्रियाला दूर केले, प्रिया त्याकडे आशेने एकटक पहात होती. समीर तिच्याकडे लक्ष न देता दोन्ही हात रुंद करून पावसाचा आनंद घेऊ लागला... प्राजक्ताचे ते शब्द त्याला आता बरोबर वाटू लागले असावेत, "Love is an Illusion." समीर ओलेचिंब भिजला होता, त्याने प्रियाचा हात हातात घेतला आणि दोघेही निःशब्द होऊन कल्याण दरवाजाचा दिशेने जाऊ लागले....

Accept it.. Love is an Illusion.

     



Rate this content
Log in

More marathi story from Hrushikesh Marathe

Similar marathi story from Romance