लेणी नंबर २६.
लेणी नंबर २६.
अजिंठामधल्या त्या निवांत पहुडलेल्या बुद्धाकडे पाहून 'आनंद' एका वेगळ्याच विश्वात बुडालेला होता. म्हणजे यापुढे अलार्मचा शोध लागेल, ही अशी झोप कदाचित कुणाला मिळेल न मिळेल, यापुढील जग कसे असेल, का असेल? कुठपर्यंत असेल? आपले विचार कुठपर्यंत पोहोचतील? आपला विचार खरंच आदर्श म्हणून पुढे येईल की नाही? आपल्यानंतर या जगाचे कल्याण चिंतणारा कुणी जन्माला येईल की नाही? धर्माचा प्रचार नीट होईल की नाही? आपला विचार खरंच जगाला पटेल की नाही? असे अनेक सामान्य विचार, आनंद त्या असामान्य बुद्धाच्या पहुडलेल्या शिल्पाच्या तोंडून वदवून घेत होता. त्या सगळ्या चिंता,आपल्या महानिर्वाणाच्या प्रसंगी महान विभूती बुद्धाच्या ध्यानीमनीही नसतील कदाचित,मात्र एका डायव्हर्सिफाइड गृप ऑफ कंपनीजच्या मानद पदावर असलेल्या आनंद मोइत्राचे मन मात्र सत्ययुगात जाऊन थेट बुद्धाच्या तोंडून हे असे एक्स्पांशनचे विचार वदवून घेत होते.
आनंद मोईत्राला शिलालेख, लेणी, किल्ले, महाल अशा ऐतिहासिक ठिकाणांचे भारी वेड. १८ वर्षांच्या भ्रमणकाळात त्याने देशातील आणि जगातील अनेक ठिकाणी मिटींग्ज आणि कॉंफरेंसेसच्या निमित्ताने त्या-त्या ठिकाणी असलेली ऐतिहासिक स्थळे पाहिली. मात्र सगळं जग पालथं घालूनसुद्धा त्याच्या सगळ्यात आवडीचं ठिकाण होतं ते म्हणजे अजिंठाची लेणी, त्यातही आवडती म्हणजे लेणी नंबर २६. ‘बुद्धाचे महापरिनिर्वाण.’ ज्यात निवांत पहुडलेला गौतम बुद्ध, त्याच्या आसपास त्याचे अनुयायी, आणि त्याला मुक्तीकडे वाहणारे त्या मूर्तीखालचे त्याचे शिष्य आणि नातलग. म्हणजे इतक्या मोठ्या राजघराण्यातल्या तरूणाला इतकी शांत झोप लागू शकते या गोष्टीचे नवल आणि त्या झोपेची किंमत कळण्यासाठी आनंदचा हुद्दा पुरेसा होता. महिन्याला आठ-दहा लाख रुपये त्याच्या घरात सहज येत, तेही सगळे टॅक्सेस भरून. मात्र कंपनीचा भला मोठा कारभार सांभाळता सांभाळता रात्रीची पुरेशी झोप त्याच्या आयुष्यातून कधीच निघून गेली होती.
मग या सगळ्यातून नक्की वेळ काढून तो त्याच्या आवडत्या लेणी नंबर २६ मध्ये जात असे. जेव्हा कधी त्याची कामे औरंगाबदच्या हद्दीत असत, कामे संपवून त्याचे कंपनीच्या गाडीने अजिंठा गाठणे ठरलेलेच. ऐकायला थोडे विचित्रच वाटेल हे सगळं, मात्र त्याने आर्केऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला आर्थिक मदत करून पाच वर्षांचा त्या लेणी नंबर 26च्या देखरेखीचा खर्च उचलला होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या खात्यामधून ठराविक रक्कम वजाही होत होती. या अशा विचित्र वेडामुळे अजिंठाच्या आर्केऑलॉजिकल साइटचा ऑस्ट्रेलियन ऑफिसर त्याचा खास मित्र झाला होता. गेल्या तीन वर्षांत आनंद त्या लेणीत किमान वीस ते बावीस वेळा येऊन बसला होता. येण्याला विशेष कारण असे काही नाही. नुसते येणे, बसणे, ती मूर्ती न्याहाळणे. हसर्या चेहर्याने बुद्धाशी गप्पा मारल्याच्या आविर्भावात त्याकडे पाहणे,हलकासा एखादा स्पर्श करणे आणि निघून जाणे. बस इतकंच. इतक्या वेळा आला, मात्र कधीच फ्लॅश मारून बुद्धाला हवी असलेली शांतता त्याने भंग होऊ दिली नाही. न कधी काही खाद्यपदार्थ त्याने लेणीत नेले, न कधी एखादी बीयर त्या शांततेत ढोसली. फक्त जाऊन बसणे आणि एक प्रकारचे इंट्रोस्पेक्शनच करणे. या शिस्तीमुळेच आनंदसाठी लेणीचे दरवाजे कित्येकदा अगदी मध्यरात्रीही उघडण्यात आले होते. बुद्धालाही त्याचा सहवास आवडत होता कदाचित.
एकदा घरी रात्री उशिरा पोहोचला. फ्रेश होऊन झोपायला जात असताना बायको वसुधाने त्याला हाक मारून विचारले.”पुणे काय?” आनंदने होकार दिला. “मग नंतर अजिंठा झालंच असेल….हो ना?” वसुधाने हसत विचारले….! आनंदसुद्धा हसत होय म्हणून त्या खोलीच्या दारावर रेलून उभा राहिला. बायकोने हसत मान डोलावली आणि बोटाने तिच्या शेजारी येऊन पडण्याचा इशारा केला. आनंद तिच्या शेजारी जाऊन पडला. वसुधाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “काय हो, तुम्ही कित्येक वर्षे अजिंठाला जाताय. लग्नाच्या वेळीसुद्धा तुमच्या आईने सांगितले होते की तुम्हाला अजिंठाची फार ओढ आहे आणि त्यातही लेणी नंबर 26 ची. म्हणजे एखाद्या ठिकाणची इतकी आवड की त्याच्या देखरेखीचाही खर्च उचलावा एखाद्याने?? कधीच कारण सांगितलं नाहीत. का इतकं विशेष प्रेम तुमचं त्या लेणीवर??” आनंदला ते सर्व प्रश्न ऐकून हसू आलं आणि तो म्हणाला,” बरं आज पूर्ण एंक्वायरी होणारंच म्हणजे, हरकत नाही. मी सांगतो..” हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच वसुधा “एक मिनीट,एक मिनीट! आय वॉंट टू हीअर ऑल ऑफ दिस ओव्हर अ कॉफी प्लीझ”. आनंदचा होकार घेऊन ती कॉफी बनवायला गेली आणि 5-7 मिनिटांत परत आली.
ते दोघे कॉफी घेता घेता बोलू लागले. आनंद सांगू लागला.” वसुधा, तुला माहितीए, या जगात माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी मला कुठली जागा दाखवली असेल तर या अजिंठाची लेणी. माझी त्यांच्यासोबत केलेली एकमेव सहल. त्यांच्या मते ती त्यांची सर्वात आवडती जागा होती. त्यांना ती जागा का आवडते याचे कारण त्यांना कधी कळले नव्हते कदाचित, पण मी आजपर्यंत एक सोयीस्कर अर्थ समजून घेतलाय. त्यांनाही माझ्यासारखीच ही लेणी नंबर 26च आवडलेली होती. ते महापरिनिर्वाण शिल्प पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हसू मला कायम लक्षात राहिलय. त्यामुळेच ते शिल्प खूप काही बोलते हे मला खूप लहानपणी कळलं होतं…..”
आनंदने डोळ्यावरचा चष्मा काढून बाजूला ठेवला. त्याच्या डोळ्यात तरारलेले पाणी वसुधाला दिसले आणि ते तिने तिच्या हाताने पुसले. तिने दोन्ही हातांनी त्याचा हात धरला आणि कुशीखाली घेऊन म्हणली,”इतका त्रास होणार असेल तर नका सांगू, खरंच थांबूया!” “नाही अगं,त्रास कसला, आठवणीच तश्या आहेत. पण तुला तुझ्या नवर्याचं वेड आणि त्यामागचं कारण तर माहीत असायला हवं ना!” असं म्हणताना दोघेही हसले आणि वसुधाने हात घट्ट धरून पुन्हा कुशीत दाबत त्याच्याकडे हसंत पाहिलं आणि म्हणाली, “बरं सांगा मग, पुढे काय?” आनंद “वसुधा, बाबांनी आयुष्य काढलं कधी फटाक्यांच्या कारखान्यात, कधी सिमेंट फॅक्टरीत, तर कधी तंबाखू कारखान्यात. त्यांना कायम खोकला धरलेला असायचा. त्यांच्या जायच्या आधी 5 वर्ष तर खोकल्याने मैत्री खूप घट्ट केली होती. सततच्या त्या खोकण्यामुळे त्यांना रात्रभर झोप नसायची. शेवटच्या क्षणांत तर उबळ फारंच वाढली होती. म्हणून त्यांना पालथे झोपवले होते. मात्र त्यांची ती उबळ काही थांबेना, म्हणून मग कुणाचेच न ऐकता ते एका अंगावर झोपले. तेव्हा नकळंत त्यांचे खोकणे थांबले. त्यांच्या चेहर्यावर हसू खुलले होते. त्याक्षणी खोकल्याने बाबांची सोबत सोडली, आणि बाबांनी आमची. वसुधा, त्यांना तसे पाहून माझे मन थेट बुद्धाच्या शिल्पासमोर जाऊन थांबले होते. तो क्षण ते दोघांच्याही चेहर्यावरचे हसू आणि त्यांचे ते एका अंगावर झोपणे, तो निर्विकार चेहरा आणि…..” आनंदचा हात घट्ट धरून झोपलेल्या वसुधाचे हात गार पडल्याचे आनंदच्या लक्षात आले. त्याने तिच्या कपाळावर हात फिरवण्यासाठी तिच्या पकडीतला हात सोडवायचा प्रयत्न केला. पण पकड खूप घट्ट झालेली. तरीही त्याने तो कसाबसा सोडवला……वसुधाचे डोळे आनंदकडेच पाहत होते. मात्र त्यात जीव नव्ह्ताच…..नाडीला ठोके नव्हते…..तिची मूर्तीही तशीच बुद्धासारखीच पहुडली होती. आनंदच्या वडिलांसारखी……निष्पाप, निराकार,एक स्मित होते त्या चेहर्यात….उघडे डोळे आनंदने आपल्या हाताने मिटले.
क्रियाकर्मांनंतर आनंद थेट लेणी नंबर 26 ला पोहोचला. दिवसाचे शेवटचे काही सूर्यकिरण नेमके त्या लेणीच्या कोपर्यावर येऊन पडल्याने लेणी छान प्रकाशून गेली होती. बुद्धाच्या त्या मूर्तीसमोर आनंद मांडी घालून बसला. एकदा शिल्पाच्या चेहर्याकडे पहिले आणि त्याला अचानक वसुधा,बाबा आणि बुद्धाचे चेहरे मिसळलेले दिसले.
मात्र तिघांचेही चेहरे तसेच निकोप दिसत होते. आनंदच्या मनातही काही भाव उमटलेले दिसत नव्हते. तोही तसाच निवांत पहुडला. त्याचा चेहराही तसाच शांत आणि निष्पाप दिसला…..त्याने कुशीखाली हात घेऊन डोळे मिटले गाडीच्या डॅशबोर्डवर रेझिग्नेशन लेटर पडलेले दिसत होते.