लाॅकडाऊनमध्ये काय शिकलात
लाॅकडाऊनमध्ये काय शिकलात
जगभरात कोरोनासारखा संसर्गजन्य आजार पसरला. नरेंद्र मोदी यांनी देशभरात अत्यंत नाईलाजाने देशवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाॅकडाऊन केले. मार्च अखेर त्यामुळे घरचा किराणा संपत आला होता, परंतु माझ्या पतीच्या पगाराचा ठावठिकाणा नसल्यामुळे मी जेव्हा ते मला पगार आणून द्यायचे तेव्हाच जास्त सामान भरून ठेवायची. त्यामुळे मला त्या महिन्यात किराणा मालाची चणचण जाणवली नाही.
लाॅकडॉऊनमुळे सगळे घरी असल्यामुळे मला त्यांच्या पद्धतीनेच सर्व कामे उरकावी लागली. त्यांना काही काम-धाम नसल्यामुळे ते फक्त आरामच करत होते व माझ्याकडे सारखे चहा-नाष्टा मागायचे. मला मात्र आराम मिळत नव्हता. पूर्वी सगळे कामावर गेल्यावर मी पटापट सर्व कामे उरकून आराम व लेखन वाचन करायची. आता मात्र ते सर्व जवळजवळ बंद झाले होते. यामुळे माझी चिडचिड वाढली होती. माझ्या पतीराजांच्या लक्षात आले. सारखे झोपून झोपून त्यांना कंटाळा आला होता हळूहळू ते मला घरकामात मदत करू लागले. त्यांचे बघून मुलंसुद्धा मला मदत करू लागली. यामुळे मला आराम मिळू लागला.
मला आता वेळ मिळ
त असल्यामुळे माझ्या लिखाणाला पुन्हा सुरुवात केली. माझे दुर्दैव माझा मोबाईल बंद पडला. लाॅकडाऊनमुळे जवळ जवळ महिनाभर माझा मोबाईल बंदच होता. पण माझे लिखाण मात्र चालू होते.
सगळीकडे लाॅकडाऊन असल्यामुळे आता मात्र मुले बाहेरचं खाणं-पिणं मिळत नसल्यामुळे मी घरी केलेले पदार्थ जेवण निमूटपणाने जेवत होते. तसेच ते स्वतःची कामे स्वतः करू लागले. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन ते स्वावलंबी बनले. आता माझे काम हळूहळू हलके झाले.
काही दिवसांनी लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले. आता मुले कंटाळलेली होती. ती बाहेर फिरायला जाऊ लागली व मला भाजीपाला, किराणा दूध वगैरे आणून देऊ लागली.
कोरोना अजून गेलेला नसल्यामुळे मुलांना घरीच वर्क होम मिळाले होते. आता मुलांचा वेळ कामामध्ये जाऊ लागला. दरम्यान, माझा मोबाईल पतीराजांनी दुरुस्त करून आणला. यामुळे सगळेजण आपापल्या वेळेनुसार उठून काम करून लागली, माझे पूर्वीसारखे रुटीन चालू झाले. आता माझी कोणाबद्दल तक्रार नव्हती. अशाप्रकारे लाॅकडाऊनमध्ये आम्ही एकमेकांना सांभाळून घेतले.