माझे शिक्षक
माझे शिक्षक
वयाच्या चौथ्या वर्षी आपण आपल्या पालकांचा हात सोडून शालेय जीवनात पाऊल टाकतो. आई-वडिलांप्रमाणेच आपल्याला घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे शिक्षकांचा. एखादी चुकीची गोष्ट केली की त्यासाठी शाळेला आणि अनायासे शिक्षकांना जबाबदार धरलं जातं. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन केवळ ज्ञान देऊन समृद्ध करीत नाहीत तर त्यांना आयुष्य कसे जगावे, याबाबतही मोलाचं मार्गदर्शन करत असतात. बोबडं बोलायला लागल्यापासून ते नोकरीला लागेपर्यंतच्या प्रवासात शिक्षक आपल्याला घडवत असतात. म्हणूनच प्रत्येकाच्या मनात शिक्षकांविषयी आदरयुक्त प्रेमाची भावना असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा शिक्षक असतो, जो विद्यार्थ्याच्या मनात कायमचं आदराचं स्थान पक्क करतो.
माझे प्राथमिक शिक्षण वाशीनगर येथील सरकारी हायस्कूलात झाले. इथे विमल नाईक आम्हाला शारीरिक शिक्षणाचे धडे द्यायच्या. त्यांचे माझ्या आयुष्यातले स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते पुस्तकी शिक्षणाइतकेच शारीरिक शिक्षणाला महत्त्व आहे. त्यांनी आम्हाला घडविताना आपले सर्वस्व पणाला लावले आहे. त्यांनी आमच्यावर आईप्रमाणेच प्रेम केले. आपल्या शांत सुस्वभावाने त्या सर्व मुलांना आपल्याशा वाटत. त्यांनी फक्त शिक्षणच नव्हे तर संस्कारांचे धडे ही आम्हाला दिले आहेत. आपल्याकडे कितीतरी उच्च शिक्षण असले तरी जीवन संस्कारांशिवाय व्यर्थ आहे असे त्या नेहमी आम्हाला सांगत. त्या आपल्या विषयापुरतेच शिक्षण न देता आमचा परिपूर्ण विकास होण्यास आम्हाला मदत करत असत. शिस्तीच्या बाबतीत त्या कठोर होत्या. गृहपाठ न करणे, अव्यवस्थितपणा, शाळेत उशीरा येणेे त्यांना अजिबात आवडत नसे. तसेच खाण्याच्या बाबतीत समतोल आहाराबाबात त्या पूर्ण जागरूक असत. माझ्या आयुष्यात व्यायामाचे स्थान त्यांच्यामुळे पक्के झाले.
खेळाकडेही माझे झुकते माप त्यांच्यामुळेच झाले. मुलांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना त्यातील सराव संधी मिळवून देणे ही त्यांची जिद्द असायची. शिक्षक वेळेच्या बाबतीत कठोर असल्याने आम्ही मुलं वेळेचे महत्त्व जाणून घेऊ शकलो. कोणत्या गोष्टीला किती वेळ आणि किती महत्त्व द्यायचे याचे ज्ञान त्यांनी आम्हाला दिले. माझ्या आयुष्यातील राष्ट्रीय स्तरांवरील खेळाची सुरुवात त्यांच्यामुळेच झाली. त्यांनी आम्हाला राष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या संघाच्या निवडणुकीत पाठवले, आमची निवडही झाली आणि बक्षिसे ही आम्ही जिंकली. विमल टीचरला आमचा खो-खो चा संघ तयार करायचा होता. पण आमच्या शाळेत खेळाचे फारसे सामान नव्हते. खो-खो साठी लागणारे खांबे नव्हते त्यामुळे त्या निराश झाल्या नाहीत. त्यांनी एका झाडाच्या फांद्या कापून दोन खांबे तयार केले आणि आम्हाला खो खो शिकवला. शाळा सुटल्यानंतरही उन्हात राहून आमचा खोखोचा सराव करुन घेत. त्यांच्या मेहनतीमुळेच आमच्या शाळेच्या संघाला राज्यपातळीवरील विजेतेपद प्राप्त झाले. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीला घाबरुन न जाता कसे सामोरे जायचे हे ही आम्हा मुलांना समजले.
खेळाबरोबर मी माझी दहावीची परिक्षाही दिली आणि विशेष श्रेणीत पास झाले. दहावी पास झाल्यानंतर मी फोंडा येथील कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. या विद्यालयात प्रवेश घेतल्याने मला आणखी एका शिक्षकाचे खूप मोलाचे मार्गदर्शन झाले ते म्हणजे कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक लूईस वाज. त्यांनी सुद्धा शारीरिक शिक्षणाचे खूप चांगले मार्गदर्शन केले. सरांना राज्यस्तरीय उत्कृष्ट क्रीडा शिक्षक हे बक्षिस प्राप्त झाले कारण ते त्याचे हक्कदार होते. विद्यालयाला स्वतःचे मैदान नसूनसुद्धा फोंडा येथील स्पोटर्स कॉम्पलेक्स किंवा सोयीस्कर ठिकाणी खेळांचे सराव घेत. ते आपले काम उत्तम प्रकारे पार पाडत. आपला पूर्ण दिवस मैदानावर घालवत. केवळ मुलांच्या खेळातील विकासातच नाही तर त्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विकासासाठी मदत करत. आम्हा मुलांवर त्यांच्या वैशिष्ट्यांचा, वृतीचा, विचारांचा विशेष प्रभाव आहे. ते शिक्षक म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा महान आहे. त्यांनी केवळ मला खेळातच नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा प्रोत्साहन दिले. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरांवर आम्हाला खूप बक्षिसे विद्यालयाला मिळाली आहे. त्यांनी आपले आयुष्य खेळाला आणि विद्यार्थ्यांसाठी खर्ची घातले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजपर्यंत जी काही बक्षीसं मी जिंकू शकले त्यात त्यांचा मोलाचा हात आहे. अभ्यासातही मिळणार्या यशावर त्यांचे पूर्ण लक्ष असायचे, त्यामुळे अभ्यास व माझी आवड यात मी समतोल राखू शकले. बारावीत प्रथम श्रेणी मिळवून आता पुढच्या शिक्षणासाठीही त्यांनी मला मार्गदर्शन दिले.
मी नेहमी प्रार्थना करेन की असे शिक्षक सर्व मुलांना लाभोत. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व शिक्षकांची मी ऋणी आहे.