कोरोना आणि देवदूत
कोरोना आणि देवदूत
मुलाचे स्थळ चालून आले आणि तो पोलिस असल्याचे ऐकताच लोक मुलगी द्यायला थोडे दचकतातच, का हो?प्रत्येक पोलिस निर्दयी, मद्य प्राशन करणारा,पैसे खाणारा साधारणता समाजाचा हा गैरसमजच!शंभरात एकाने केलेल्या चुकीने पूर्ण पोलीस खात्यावरच शिक्कामोर्तब केला जातो.त्याविषयी सोशल मीडिया न्यूज चॅनेल्स वर्तमानपत्र चांगलीच रंगवली जातात..आत्ताच घडलेली घटना बघाना सचिन वाझे नामक पोलिस अधिकाऱ्याने मुकेश अंबानी च्या घराबाहेर जिलेटीनची स्फोटके ठेवली होती ही न्यूज सर्वच न्यूज चैनल वर पसरली आणि सर्वच पोलिस खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.विश्वास नागरे पाटील,हेमंत करकरे,विजय सालसकर यांसारख्या पोलिस अधिकाऱ्यांचे उदाहरण का डोळ्यासमोर ठेवले जात नाही ?राजकारणी, सिनेकलाकार यांना अतिशय मानपान देणारा आणि डोक्यावर घेणारा आपला देश पण या कोरोनाच्या काळात हे सर्व आणि आपण घरातच बसून आहोत.पोलीस, सफाई कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी 24 तास ड्युटी करत आहेत.मागील एका वर्षात आमक्या राजकारण्याला कोरोना झाला तमका अभिनेता करोनाने दगावला याचे अपडेट्स आपल्याला होते पण या काळात 24 तास आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणारा पोलिस आपल्याला दिसतोय का?
मागील वर्षापासून किती पोलीस कोरोना बाधित झाले किती दगावले याची माहिती आहे का आपल्याला?जुलै २०२० पर्यंत एकटया महाराष्ट्रातच कोरोना ने १०० पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाले होते आणि ९००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी कोरोनाने बाधित झाल्याची नोंद आहे.आत्ताचा विचार केला तर तो आकडा किती असेल?ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते का? क्रूर लाठीमार करणाऱ्या आणि नागरिकांना घरात ठेवण्यासाठी ताकतीचा वापर करणारे पोलिसांचे व्हिडिओ खूपच वायरल झालेत पण भारतीय पोलिसांची मानवी बाजू देखील पाहिली गेली का? एका व्हिडिओमध्ये केरळ मधील एक पोलीस अधिकारी उत्तरेकडील राज्यातील स्थलांतरितांच्या एका गटास असे सांगताना दिसत आहे की त्यांना चिंता करण्याची काही एक गरज नाही कारण सरकार त्यांना त्यांच्या राज्यात जाई पर्यंत त्यांच्या अन्न,पाणी आणि निवारा याची काळजी घेईल पंजाबमध्येही एक अधिकारी देखील लहान मुलांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देताना दिसले, महाराष्ट्रातही काही पोलिस पथक विक्रेत्यांना छत्री वाटप करताना दिसले. "नाण्याची फक्त एकच बाजू पाहू नका".माझा कुठलाही नातेवाईक किंवा आप्त संबंधित पोलिस नाही तरीही मला पोलीस खात्याचे कौतुक करावेसे वाटते जे कार्य ते स्वतःच्या जीवावर पर्वा न करता आता बजावत आहेत."कौतुक केल्याने कोणाचे पोट भरत नाही हो पण कामावरील ताण कमी होऊन आपण करत असलेल्या चांगल्या कामाचे समाधान वाटते."
