कॉफी - आठवणींची नि वचनांची
कॉफी - आठवणींची नि वचनांची


रोजच्यासारखं आजपण जास्ती कामामुळे ऑफिसमधून काही लवकर निघता आलं नाही नीलिमाला. आज त्या गोष्टीची जास्त खंत वाटत होती तिला. कारणपण तसेच होते. साधारण पाच - सहा वर्षांनंतर शाळेतली जिवाभावाची मैत्रीण अबोली भेटणार होती! शेवटी व्हाट्सअप करून सांगितलं नीलिमानी की, दुर्गा कॅफेला आठ वाजतील तिला पोहचायला. अबोलीनेपण ठीक आहे म्हणून उत्तर पाठवलं. शेवटी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पटापट काम उरकून, अबोलीला भेटण्यासाठी नीलिमा निघाली. रस्त्यात शाळा - कॉलेजच्या कितीतरी आठवणी तरळुन गेल्या तिच्या मनात. त्या नादात रिक्षा कधी दुर्गा कॅफेपाशी पोहचली तिला कळलेच नाही! रिक्षामधून उतरल्यावर मागे वळताच अबोलीने घट्ट मिठी मारली नीलिमाला. आणि दोघी नेहमीच्या पाच नं.च्या टेबलवर बसल्या. नेहमीची कोल्ड कॉफी आणि ग्रिल्ड सँडविच देण्यास सांगून, गप्पांचा खजिना उलगडला!
नीलिमा म्हणाली, 'अबोली, अगं वाटत नाही पाच - सहा वर्ष झाले आपल्याला भेटून! तुझ्या लग्नातल्या नंतर आताच भेटत आहोत! तसं फोनवर खूपदा होतंच आपलं बोलणं. पण प्रत्यक्ष नेहमीच्या कट्ट्यावर, दुर्गा कॅफेवर भेटायचं झालं! त्याने खूप आनंद होत आहे.' अबोलीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली, ती म्हटली, 'हो तर! इथे कॉफीच्या दरवाळणाऱ्या वासासोबत आपल्या कितीतरी गोड आठवणी जुळलेल्या आहेत. अगदी कॉलेजच्या छोट्या मोठ्या भांडणांपासून एकमेकींच्या पहिल्या प्रेमापर्यंत सगळंच एकमेकींना सांगायचो ना!' एवढ्यात कोल्ड कॉफी आणि सँडविच टेबलवर दिले गेले. दोघींना भेटून जितके तृप्त वाटत होते तितकेच ती आवडती कॉफी पिऊन वाटत होते. संसारात दोघीही खूप व्यस्त झाल्या होत्या. पण ती इतक्या वर्षांची भेट आणि कॉफी सोबतच्या वाफाळणाऱ्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा, यामुळे दोघींचेही मन अगदी प्रफुल्लित झाले होते. फक्त एक कॅफे, संसाराच्या रहाटगाडग्यात हरवलेल्या मैत्रीचे ऋणानुबंध पुन्हा जपण्याचे जणू एक ठिकाण झाले होते! मनसोक्त गप्पा मारून दोघींनी एकमेकींना एक वचन दिले. वर्षातून निदान दोनदा तरी वेळात वेळ काढून दुर्गा कॅफेमध्येच भेटायचे. आणि परत ताजेतवाने होऊन, जबाबदारीचे गाडे या भेटीइतकेच हलके फुलके होऊन चालवायचे!