Ajay Chavhan

Drama Inspirational

3.0  

Ajay Chavhan

Drama Inspirational

जयंती बाबासाहेबांची...

जयंती बाबासाहेबांची...

4 mins
607


१४ एप्रिलची अर्थातच बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी जल्लोषात चालू होती. गावातील सगळी मुलं १० एप्रिल रोजी कट्रट्यावर जमा झालीत आणि बाबासाहेबांच्या जयंती निमित्त काय काय करायचे याचे बेत आखू लागले. सगळ्यांनी मिळून ठरवले की यंदाची जयंती डी.जे. लावून धुमधडाक्यात काढायची, याच्यासाठी वर्गणी जमा करायला आणि सगळ्यांनी यात सहभागी व्हायला तयार झाले व वर्गणी मागण्यासाठी गावात फिरू लागले.


सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या मिळकतीनुसार मिरवणुकीसाठी वर्गणी दिली पण रमश्या मामा आणखी राहिलाच होता. त्यांना माहीत होते की हा व्यक्ती काही केल्या आपल्याला वर्गणी देणार नाही म्हणून त्यांनी रमश्या मामाला वर्गणी मागितली नव्हती, पण बब्लुनं यंदा त्यांना वर्गणी मागायचीच आणि काही केल्या त्यांच्याकडून ती घ्यायचीच, असे मनोमन ठरवले होते. म्हणून त्याने मुलांना वर्गणी मागणाऱ्या आपल्या साथीदारांना म्हटले.


"काय गळ्याहो... तुम्हाले वाट्टे काय रमश्या मामा वर्गणी देयन म्हणून?"

त्यावर अन्या म्हणाला...

"अबे मॅड झाला का लेका तू...? कोण मांगण त्यायले पैसे...? तुले तं माहीत हाये कसा हाय तं तो... चाल बस झालं होते एवढ्यात... मागू नका रे ब्वा त्यायले लय खडूस हाय तो."

अन्याने असे म्हटल्याबरोबर नुकताच गावात आलेला मन्या त्यांना म्हणाला,

"काई म्हणता का बे... कोण नाई देयन बाबासाहेबासाठी वर्गणी...? काई म्हणतं का... चला जाऊ, तेवढेच कामी येयन आपल्याले.डी.जे.ले, फटाक्याले, गुलाल, फुलं यायले काय कमी खर्च लागते का... अन यातूनच आपल्याले खा-प्याची सोय करा लागन नं का घरून पैसे भरता? चला जाऊ काय रमश्या मामा काय म्हणतो ते तं पाहू."

"नाई बे लेका... तो लयच कंजूस हाय... नाई देणार तो वर्गणी. बिनकामी जाऊन अपमान करून घेऊ नका. एवढेच तं बस हाय आपल्याले पैसे... चला आणखी लय तयारी करा लागते..." मन्याचं ऐकून पवण्या म्हणाला.


गण्या मात्र त्यांचे चाललेले संभाषण गुपचूप ऐकतच होता. त्यांचे बोलणे झाल्यावर तो म्हणाला, "अरे... आपण बाबासाहेबांच्या नावावर वर्गणी मागून राह्यलो, कोण्या मातीच्या मुर्तीसाठी नाई... देयनच तो याच्यासाठी वर्गणी... चला या माह्या मांग, आपण पाहूच काय म्हणतो तं मामा."

गण्या त्यांचा ग्रुप लिडर होता म्हणून कोणीही काहीच न बोलता त्याच्यामागे रमश्या मामाच्या घरी गेले आणि,

"रमश्या मामा... ओ... रमश्या मामा... हायेस का घरी?"असे म्हणत दरवाजाची कडी वाजवू लागले.

"हो... आलो बे... काय काम हाय...? कायच्यासाठी आले ब्वा तुम्ही सगये गुरुप मीयुन?"


दरवाज्याची कडी उघडून मामांनी त्यांना विचारले व सर्वांना आत घेतले. मामांनी सगळ्यांचे छानपैकी स्वागत करून चहापाणी व फराळाचंसुद्धा विचारलं व सगळ्यांची मस्त मैफिल जमली व एकमेकांची ते मस्करी करू लागले.एवढ्यात गण्या मुख्य मुद्द्यावर आला व तो मामला म्हणाला.

"मामा... वर्गणी पाह्यजे होती तुमच्याकुन जयंतीसाठी... किती द्याल तुम्ही?"

"कुठल्या जयंतीसाठी रे."

मामांनी विचारले.

"बाबासाहेबांच्या... आम्ही यंदा बाबासाहेबांची जयंती छानपैकी डी.जे. लावून, फटाक्याच्या आतिषबाजीत काढाचं म्हून ठरवलं हावोत, त्यासाठी तुमच्याकून काही मदत पाह्यजे होती ब्वा... सांगा किती देता तं तुम्ही."

"म्या देणार नाई ब्वा अशा कामासाठी वर्गणी... वाटल्यास तुम्ही त्या दिवशी गुणवंत मुलं, गरीब, होतकरू विद्यार्थी यांचा सत्कार करून त्याइले जर पुढच्या शिक्षणासाठी मदत करसान तं हजारच काय... म्या ५ हजार रुपये द्याले तयार हावो... पण डी. जे. मिरवणूक काढाले पैसे नाई ब्वा माह्याजवळ." मामा बोलला.


"काऊन हो... काय गलत करून राह्यलो आम्ही... यानं मस्तपैकी आपल्या गावात करमणूक होयन... गावातले लोकं एक दिवस तं खुश होयन... तुम्हाले ते पण पाहावं वाटत नाई का..." गण्यानं लगेच मामाला प्रतिप्रश्न केला.

त्यावर मामा म्हणाले,

"अरे... एका दिवसाची खुशी पाह्यता की, तुम्हाले रोज खुश पाहाचं हाय गावातल्या लोकायले?"

"हो..." सगळ्यांनी मोठ्याने आवाज दिला.

"तं मंग डी.जे. गिजे बंद करा अन या वर्गणीतून जेवढे पैसे जमा होयन, तेवढ्या पैशातून गरीब लोकायच्या पोरा, पोरीले पुस्तकं, कपडे-लत्ते घेऊन द्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करा... यातच खरी जयंती साजरी होयन बाबासाहेबांची... काय फायदा हाय रे त्या मिरवणुकीचं? अर्धे-निर्धे लोकं त्यात दारू पिऊन राह्यते. थोडा धक्का लागला की सहन होत नाई त्यायले... जरा, जराश्या गोष्टीवर भांडणं करतात. असंच भांडणं होत असंन तं खरंच बाबासाहेबाले लय चांगलं वाटत असंन का? बाबासाहेबानं आपल्याले काय कराचं शिकवलं अन, आपण काय करून राह्यलो... शोभते का हे आपल्याले...? तुम्हीच सांगा," मामांनी त्यांना विचारले.


रमश्या मामांचं बोलणं सगळ्याला पटलं आणि ते खरोखरच आपल्या या अशा वागण्यामुळे लज्जित होऊ लागले आणि म्हणाले, "बरोबर हाय मामा तुमचं... खरंच चुकलो आम्ही... माफ करा आम्हाले. आता आम्ही तुम्ही सांगसान तसंच करू. यातच आमचा अन गाववाल्याईचा फायदा हाय. आपल्या वर्गणीतून एक जरी पोरगा शिकून मोठा झाला तं बाबासाहेबांची खरी जयंती साजरी झाली असं म्हणाले काही हरकत नाई."

"हं... आता कसं हुशार पोरावाणी बोलून राह्यले... हे घ्या ५ हजार रुपये. मस्तपैकी गरीब, होतकरू पोराची यादी तयार करा आणि जयंतीच्या दिवशी त्यांचा सत्कार करा.... चला तर मंग बाबासाहेबांच्या जयंती निमित्त्य पुन्हा बाबासाहेब घडवासाठी हातभार लावू."


रमश्या मामांनी ग्रुप लिडरच्या हातात ५ हजार रुपये दिले व ते सुद्धा गरीब, होतकरू मुलांची यादी बनवायला त्यांना मदत करू लागले. यादी बनवून झाल्यानंतर १४ एप्रिलला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून व बाबासाहेबांच्या विचाराला आठवून त्यांची खरी जयंती साजरी करण्यात आली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama