इतिहासाची पुनरावृत्ति
इतिहासाची पुनरावृत्ति


"इतकं सारं देण्याची काय गरज होती, उगाच वायफळ खर्च कशाला करायचा? आणि हो ती येत आहे तर म्हणावे टॅक्सी येते स्टेशनपासून." बहिणीच्या आगमनाची बातमी एेकून अश्विन कुरकुरला.
"घरात दोन-दोन गाड्या असताना टॅक्सीने का बरे येईल माझी लेक? जावई बुवांचा काही मानसन्मान आहे का नाही? उगाच तिला टोमणे एेकायला नकोत. मी स्वतः जाईन तिला घेण्यास तुला कष्ट करण्याची गरज नाही." वडील रागाने उत्तरले.
"आणि हा एवढा सारा सामानाचा खर्च कशाला? लग्नात दिलं होतं ना मग आता आणखी पैसा खर्च करण्याची काय गरज आहे?" अश्विन बहिणी व मेव्हण्याकरिता आणलेल्या भेट वस्तूंकडे बघत खोचून बोलत होता.
"तुझ्याकडून तर मागत नाही आहोत ना? पैसा माझा आहे मी आपल्या लेकीला हवं ते देईन. तुझं डोकं फिरलंय की काय अशा मूर्खासारख्या गोष्टी बोलतोयस." वडील रागाने म्हणाले.
"कधीही येऊन जाते तोंड उचलून." अश्विन म्हणाला.
"का नाही येणार या घरची लाडकी लेक आहे ती, तिला वाटेल तेव्हा येऊ शकते, वाटेल तितके दिवस राहू शकते. या घरात बरोबरीचा हक्क आहे तिचा. तुला काय झालंय असं भलतंसलतं बोलायला." वडील म्हणाले.
"मला काही झालेलं नाहीये बाबा आज मी फक्त तेच बोलतो आहे जे तुम्ही नेहमी आत्याकरिता बोलत होता. स्वतःच्या लेकीबद्दल तुम्हाला असे काही ऐकून इतके वाईट वाटत आहे पण कधी आजोबांचा विचार केलात का तुम्ही? की कधी आत्या व आजोबांच्या मानापमानाचा विचार केला का तुम्हीही?" अश्विन म्हणाला.
वडील अवाक् झाले.
"आजोबांनी कधी तुमच्यापाशी एक धेलाही मागितला नाही. ते स्वतः तुमच्यापेक्षा जास्त समर्थ होते तरीही आत्याचे घरी येणे आजोबांचे तिला काही देणे तुम्हाला कधीच पटले नाही. बरोबरीचा हक्क तर या घरावर आधी आत्याचा आहे." अश्विन खेदपूर्ण स्वरात बोलत होता.
वडिलांची मान लाजेने झुकली होती.
"तुमच्या मतलबी स्वभावामुळे आत्याने इकडे येणंच सोडून दिले होते. आजोबा ना त्यास दुःखाने खचून मरण पावले. मी जातोय स्टेशनवर. मी तुमच्यासारखा आप्पलपोट्या नाही." बोलत अश्विन कारची किल्ली घेऊन स्टेशनवर जायला निघून गेला.
वडील अश्रू पुसत आपल्या बहिणीला फोन लावू लागले. भिंतीवरील फोटो फ्रेममधील आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित स्पष्ट दिसून येत होते.