Kiran Doiphode

Drama Romance Tragedy

3  

Kiran Doiphode

Drama Romance Tragedy

ईसाळं प्रेम...

ईसाळं प्रेम...

4 mins
11.9K


राहुल आणि अंकिता हे कॉलेजला असताना खूप चांगले मित्र. तसं यांचं मित्र सर्कलही खूप मोठं होतं. पण हळूहळू राहुल आणि अंकिताचं मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. दोघांचंही कॉलेज जीवन खूप छान प्रकारे चालू होतं. अंकिताही दिसायला देखणी नार... तिचे ते लांबलचक काळेभोर केस, ती हसताना तिच्या गालावर पडणारे ते डिंपल्स, तिचं रूप बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल, अशी ही अंकिता, बोलक्या स्वभावाची तिला शांत बसायला कधीच आडवत नसे. ती कॉलेजमध्ये आल्यास मित्रांमध्ये तिचीच जास्त बडबड असायची.


पहिले पाच ते सहा महिने यांचं प्रेम हे सुरळीतपणे चालू होतं. त्यांचं ते लपून लपून फिरणं.. लेक्चर सोडून पिक्चर पाहायला जाणं. एकाच कपात कॉफी पिणे.. फिल्ममध्ये दाखवतात ना अगदी त्याप्रकारे त्यांचं ते प्रेम.. पहिले काही महिने यांचं प्रेम खूप मस्त चालू होतं. पण यांच्यामध्ये अचानक भांडण व्हायला सुरुवात झाली. राहुल हा अंकितावर संशय घेऊ लागला. अंकिताही बडबडी असल्यामुळं मित्र कंपनीमध्ये हसून बोलणे वगैरे अंकिता करत असे. पण आत्ता ही बडबड राहुलला खपत नसे. तो कोणत्याही कारणावरून तिच्याशी भांडण करू लागला. पण त्या बिचारीला भांडणाचं कारण समजत नव्हतं.


हळूहळू राहुलने तिला तिच्या सर्व मित्रांपासून दूर केलं. प्रेमाअभावी तिने तिचे मित्र सोडले ही. कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. पण याला तिच्या प्रेमाची किंमत कळत नव्हती. मेसेजचा रिप्लाय द्यायला थोडासा उशीर झाला की हा भांडण कराला तयार असायचा. कुठं गेलती... कुठं झक मारत होती. वगैरे वगैरे शिव्याही देत होता. तरी ती सर्व त्याचं ऐकून घेत होती. घराशेजारी कोण-कोण असतं, मुलं आहेत का? त्यांच्यासमोर जायचं नाही. नेहमी अंगावर ओढणी घेऊनच काम करायचं. इथपर्यंत राहुल तिच्याशी बोलत होता. अंकिताला तो आत्ता जास्त कॉलेजही करू देत नव्हता. अंकिताचं राहणीमान आणि स्वभाव सगळंच राहुलने बदलून टाकलं होतं. भांडण झाल्यास परत राहुल तिच्याशी प्रेमाने बोलत असे, त्यामुळं अंकिता हे सगळं विसरून जात होती.


एक दिवस प्रेमाने बोलून राहुलने अंकितासमोर लग्नाचा प्रस्ताव टाकला. लग्नानंतर सुधरेल हा, असं म्हणून ती लग्नास तयार झाली. घरचे लग्नाला परवानगी देणार नाही. हे माहिती असूनदेखील ती त्याला हो बोलत असते. कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. शेवटी ती पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेते. कारण तिला माहिती होतं, घरचे आपलं लग्न होऊच देणार नाही. शेवटी ते पळून जाऊन देवळात लग्न करतात. ती पळून गेल्यामुळं तिच्या वडिलांना ऍटॅकचा झटका येतो आणि ते मरतात. राहुल त्याच्या आई-वडिलांना समजावून त्याचे आई-वडील अंकिताला कसंतरी घरात घेतात. पहिले सात ते आठ दिवस त्यांचा संसार हा सुखाचा चालला होता. तिला वाटलं आता हा खूप चांगल्याप्रकारे बदलला. पण तो बदल त्याच्यामध्ये झालाच नव्हता.


राहुलचं घर हे मंदिरासमोर होतं. त्यामुळं तिथं पहिल्यापासून नेहमी मुलं येऊन बसत होते. पण ते मुलं अंकितामुळेच तिथं बसतात. असा त्याचा संशय होता. त्यामुळं त्याने त्याच्या रूमच्या सर्व खिडक्या कायमच्या बंद करून टाकल्या होत्या आणि दरवाजा नेहमी बंद ठेवायचा असं त्याने घरच्या सगळ्यांनाच बजावलं होतं. त्याच्या या वागण्याला घरचेपण वैतागले होते. एक दिवस अंकिताही पाणी भरायला बोअरिंगवर गेली होती. तिने एक हंडा हा डोक्यावर आणि दुसरा हंडा हा कमरेत उचलून द्यासाठी तिथल्या एका मुलाला सांगितलं. तो मुलगा हंडा तिच्या कमरेत उचलून देत असताना तिकडून राहुल बघतो. अंकिता घरी आल्यावर तो तिला खूप मारतो, त्यांचं तुझं काय लफडं आहे का? असं बोलून तो खूप तिला मारत असतो. आणि याला आत्ता ईसाळी खोड लागली होती. ही कोणाशी बोली तर याचं, तिचं काही तरी चालू आहे. ते म्हणतात ना "नवरा बेवडा असावा, पण ईसाळा नसावा..." पण हा बेवडा नसून ईसाळा होता.


तिचा तो फोन नेहमी चेक करत असायचा. कोणाला एसएमएस केला, कोणाला कॉल केला. तो सर्व काही फोन तपासून पाहत असे. घरामध्ये नेहमी साडीवरच राहायचं. केस मोकळे सोडायचे नाही. हाफ ब्लाउज घालायचं नाही. तिच्या राहणीमानावर तो आता बंधनं आणत होता. त्याच्या प्रेमापायी ती सर्व काही सहन करत होती. त्याच्या प्रेमामुळं तिने तिचे आई-वडील, पूर्ण कुटुंबच सोडलं होतं. तिच्यामुळंच तिचे वडीलही वारले होते. ही त्यांच्यासाठी सर्वांना सोडून आली होती. फक्त याच्या प्रेमासाठी... पण ते पहिलं कॉलेजमधलं प्रेम आता यांच्यामध्ये थोडंदेखील राहील नव्हतं. हे एका कपात काय, लग्न झाल्यापासून एका ताटातदेखील सोबत जेवले नव्हते. आपण खूप मोठी चूक केली. असा ती विचार करत बसलेली असते. पण जाऊ द्या सासू-सासरे जीव लावतात ना, असा विचार करत ती अंघोळ करायला जाते.


अंघोळ करून आल्यावर ती तिची आवडती गुलाबी रंगाची साडी घालते. त्यावरचं ब्लाऊज हे तिला खूप आवडायचं. ते आस्तीनला कमी आणि पाठीमागून मटका गळा आणि त्याला लटकन लावलेले. तो मटका गळा आणि ते लटकन तिच्या त्या गोऱ्या पाठीला अगदी उठून दिसत होते. लांबलचक केस मोकळे सोडून ती नटून थटून त्या साडीमध्ये एखादी अप्सराच दिसत होती. तिचं ते सौदर्य पाहून तिच्या सासूने तिची नजर काढली. तोच राहुल घरी येतो. ते बघून त्याला काय करावं काय नाही काहीच समजत नाही. एवढं नटून थटून कोणाला भेटायला जाऊ लागली. असं म्हणून तो तिला खूप मारतो पण ती आता त्याच्या या ईसाळ्या खोडीला वैतागली होती. घरी निघून जावे तर आई घरात घेणार नाही. दुसरीकडे कुठं जावे म्हणून ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. गावामध्ये एक पडकी विहीर होती. ती एक चिठ्ठी लिहून विहिरीमध्ये उडी मारते. राहुल ती चिठ्ठी वाचतो आणि मोठमोठ्याने रडतो...


मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते रे... तुझी ही खोड माहिती असूनसुद्धा मी तुझ्याशी लग्नदेखील केलं. अरे वेड्या तुझ्या प्रेमाखातीर मी माझ्या जन्मदात्या वडिलांना गमावलं रे... एक दिवस तरी तू मला प्रेमानं बायको नावानी हाक देशील या आशेवर होते रे... एक दिवस तरी माझ्यासोबत एका ताटात जेवशील असं वाटत होतं रे वेड्या... एक दिवस तू गजरा आणून माझे डोळे झाकून तो माझ्या केसात लावशील असं वाटायचं रे नेहमी मला. एक दिवस तू मला प्रेमानं तुझ्या मिठीत घेशील, पण आता वाटतंय तू मला मेल्यावरच मिठीत घेशील... पण प्रेमाने मिठीत घेऊन एकदा अयय... बायको नावानी हाक मार आणि माझ्या केसात तुझ्याच हातांनी गजरा घाल, मी मेल्यावर... फक्त एक दिवस... कारण मी तुझ्यावर खर प्रेम केलंय... ईसाळ ( संशयी ) प्रेम नाही केलं... कधीच रे वेड्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama