Bhagyashree deshpande

Drama Inspirational

1.0  

Bhagyashree deshpande

Drama Inspirational

इच्छाशक्ती

इच्छाशक्ती

4 mins
619


सुजाता जरा घाईतच आपली पर्स अन हेल्मेट सांभाळत ऑफिसमधून निघाली. डोक्यात हेल्मेट घालत गाडी सुरू केली. आज नेहमीपेक्षा जरा वेगातच निघाली.


तिच्या डोळ्यांपुढे तिच्या दोन चिमुरड्या लेकींचे वाट पाहणारे चेहरे येत होते. सिग्नलवर गाडी उभी असताना तिला कधी एकदा सिग्नल सुटतो असे झाले होते. मध्येच थांबून तिने लेकींसाठी खाऊ घेतला आणि पुढे निघाली.


इतक्यात अचानक बाजूच्या गल्लीतून येणार्‍या एका गाडीने तिच्या गाडीला जोरदार धडक दिली अन् क्षणार्धात ती बाजूला फेकली गेली, आपल्या लेकींचे चेहरे डोळ्यापुढे होते तिच्या केवळ.


डोळे उघडले तेव्हा बराच वेळ तिला कळतच नव्हते की आपण कुठे आहेात, खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हायला तिला बराच वेळ लागला. बाजूलाच अरविंद तिचा नवरा बसलेला दिसला तो तिला काही तरी विचारत होता पण शब्द तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हते अन् पुन्हा तिची शुद्ध हरपली.


"आई! अगं आई ऊठ ना..." तिच्या मनूचे शब्द तिच्या कानावर पडले अन् तिने डोळे उघडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. डोळे उघडताच मनू तिला येऊन बिलगली. मनूला जवळ घ्यावे म्हणून तिने हात उचलण्याचा प्रयत्न केला पण कसले काय तिचा हातच उचलला जात नव्हता. डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वाहत होत्या.


जरा वेळाने तिला समजले की अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला मार लागल्याने तिच्या खांद्यापासून खालील सर्व भागाच्या संवेदना नष्ट झाल्या आहेत. हे ऐकून ती हॉस्पिटलची खोली तिच्याभोवती फिरू लागली अन पुन्हा तिची शुद्ध हरपली.


रात्री जाग आली तेव्हा तिच्या डोळ्यासमोर फक्त मनू आणि सोनू तिच्या दोन्ही मुलीच होत्या. माझ्या लेकींचं कसं होणार, कोण करणार त्यांचं आणि अरविंद! त्याची तर काय अवस्था झाली असेल. छताकडे एकटक नजर लावून ती विचार करत होती. डोळ्यातून एकसारख्या गंगा-यमुना वाहत होत्या. झोपेने तर कधीच नाते तोडले होते. विचार करून करून डोके फुटेल असे तिला वाटत होते. पहाटे केव्हातरी तिचा डोळा लागला.

 

महिनाभराने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये  सिस्टर सर्व करत होत्या. घरी आल्यानंतर सुजाताचे करायला बाई ठेवण्यात आली. महिना दोन महिने सासूबाई येऊन राहिल्या. अरविंददेखील ऑफिस सांभाळून मुलींचे सर्व आवरत असे सासूबाईंना जमेल तशी मदत करी. फिजिओथेरपीस्ट येऊन सुजाता कडून व्यायाम करून घेई. पण सुजाता अगदी परस्वाधीन झाली होती. तिची ती उदासी स्वतःवरच होणारी चिडचिड तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती अन् एक दिवस सासूबाईंनादेखील सासऱ्यांसाठी म्हणून दिराकडे परत जावे लागले. काही दिवस आई येऊन राहिली.


अरविंद जमेल तसे मुलींचे आवरून ऑफिसला जाई. इतर वेळी सतत तिच्याभोवती चिवचिवणाऱ्या मुली शाळेत गेल्यावर तिला सगळे घर खायला उठे. हे असे किती दिवस चालणार, विचार करून तिचे डोके फुटण्याची वेळ येई. कामवाली बाई पण काम आवरून टीव्ही बघत बसे. हळूहळू घरातील वस्तू चोरीस जायला लागल्यावर अरविंदला कामवाल्या बाईचा संशय येऊ लागला.


एक दिवस सुजाताला विश्वासात घेऊन अरविंदने तो कठोर निर्णय घेतला की सुजाता बरी होईपर्यंत तिला केअर सेंटरमध्ये ठेवायचे. सुजाता कधी बरे होईल ते निश्चित सांगता येणार नाही, असे डॉक्टर म्हणाले होते. सुजाताला केअर सेंटरमध्ये नेण्याची तयारी सुरू झाली. सुजाता तर गुपचुप मुली नसताना एकसारखी रडत होती अन् अरविंद तिची नजर टाळत होता. कारण त्यालाही खूप वाईट वाटत होते. पण इलाज नव्हता सुजाताचे दुखणे लवकर बरे होणारे नव्हते. तिच्या लेकींनी तर सगळे घर डोक्यावर घेतले आईला कुठे नेताय म्हणत.

  

केअर सेंटरमध्ये तिची उत्तम व्यवस्था होती. वेळेवर नाष्टा, जेवण, औषधे, डॉक्टरांची तपासणी होत होती. सुट्टीच्या दिवशी अरविंद आणि मुली येऊन भेटून जात पण इतर वेळी तिला सोनू-मनूच्या आठवणी बेचैन करीत. ‘काय हे माझे नशीब कुठुन तो काळा दिवस माझ्या आयुष्यात आला...’ असे म्हणत ती नशिबाला दोष देई.

 

एके दिवशी सकाळी आकाशवाणीवर अतिशय सुंदर प्रेरणादायी विचार तिच्या कानावर पडले अन तिने ठरवले की काही झाले तरी मी स्वतःच्या पायावर उभी राहणारच अन प्रसन्न मनाने फिजीओथेरपीस्टच्या व्यायामाला प्रतिसाद देऊ लागली. व्यायाम करण्यास सहकार्य करू लागली. केअर सेंटरच्या मुली तिला धरून चालवण्याचा प्रयत्न करत त्यावेळी तिला अतिशय वेदना होत पण आता मात्र ती सर्व न कंटाळाता सहन करत प्रतिसाद देऊ लागली.


फिजिओथेरपिस्टच्यादेखील हा बदल लक्षात आला. कारण सुजाताला दिसत होत्या त्या फक्त तिच्याकडे धावत येऊन तिला बिलगणाऱ्या सोनू आणि मनू.

 

रविवारी जेव्हा अरविंद अन मुली तिला भेटायला आल्या तेव्हा अरविंदच्यादेखील हा बदल लक्षात आल्यावाचून राहिला नाही. कारण आज ती खूप आनंदी आणि उत्साही दिसत होती. मुलींशीदेखील तिने छान गप्पा मारल्या सोनू-मनूलाही आईला आठवडाभराच्या गमती जमती सांगायच्या होत्या.


जाताना मात्र मुली हिरमुसल्या होत अन विचारत, आई तू कधी येणार घरी? या वेळी मात्र तिने मुलींना सांगितले की, लवकरच मी घरी येणार! मुलीदेखील आनंदाने 'आई घरी येणार' म्हणत उड्या मारतच घरी परतल्या. सुजाताही आज प्रसन्न मनाने झोपी गेली. येणारा सूर्य आता तिच्यासाठी नवजीवन नवा प्रकाश देणारा होता. कारण येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तिची इच्छाशक्ती वाढत होती.


आज सुजाता केअर सेंटरमधील कोणाचाही आधार न घेता वॉकर घेऊन चार पावले स्वतःहून चालली होती. आता हे नित्याचेच झाले होते. सकाळ-संध्याकाळ वॉकर घेऊन चालण्याचा ती सराव करत होती. आज जाग आल्यावर तिने समोरील भिंतीवर असलेल्या कॅलेंडरमध्ये पाहिले. आज रविवार अरविंद सोनू, मनू येणार म्हणून तिच्यात कोण उत्साह संचारला. तिने तेथील मुलींच्या मदतीने पटापट स्वतःचे आवरले. अरविंद आणि मुलींची वाट पाहू लागली जरा वेळातच मुलींचा किलबिलाट कानावर आला. आई आई करत धावतच त्या येत असलेल्या तिने खिडकीतून पाहिले अन ती कॉटवरून खाली उतरून दोन पावले चालू लागली.


दारातून सोनू-मनूने हे पाहिले आणि त्या दोघीही आनंदाश्रू ढाळतच ‘आई बरी झाली आई बरी झाली’ म्हणत आईला येऊन बिलगल्या. अरविंद आत येताच सुजाताला त्याने मिठीत घेतले. त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंनी वाट मोकळी केली. एक नवा आशेचा किरण, नवा जन्म घेऊन सुजाता अरविंद आणि मुलींसह घरी परतली जे घर कधीपासून तिची वाट पाहात होते.


Rate this content
Log in

More marathi story from Bhagyashree deshpande

Similar marathi story from Drama