होकार
होकार


केदार आणि काव्या नुकतेच भेटले होते. केदार खूप आधीपासून त्या कंपनीत होती. काव्या हल्लीच जॉईन झाली होती. केदार काव्याचा बडी होता. बडी म्हणजे, नवीन कोणी जॉईन झालं की त्यांना सेटल व्हायला मदत करायची, सगळ्यांची ओळख करून देणे, कंपनीचे रूल्स आणि प्रोसेसेस समजावून देणे, ट्रेनिंग्सची माहिती अँड सो ऑन.
काव्या दिसायला खूप सुंदर होती. रिसेप्शनमध्ये तिला घ्यायला गेला तेव्हा १-२ मिनिटं केदारची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटलीच नाही. छान मऊ हॅन्डशेकही केला होता केदारने तिला.
दिवस सरत होते. केदार आणि काव्याचं बऱ्यापैकी बोलणंसुद्धा व्हायचं. त्यांची मैत्री वाढत होती आणि केदारला काव्या आवडू लागली होती. पण तिला ते कळू द्यायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. ती काय बोलेल, काय विचार करेल, त्याला ते किती निभावता येईल, ह्या सगळ्याच टेन्शन होतं त्याला.
केदार लिहायचा – कविता, लेख, लघुकथा. पण सगळं इंग्लिशमध्ये.
“छान लिहितोस. कसं सुचतं” काव्याने एकदा केदारला पिंग केलं मेसेंजरवर.
“थँक्स, सुचतं बस”
“पण कठीण लिहितोस. कधी कधी काहीच कळत नाही”
“हम्म. काय लिहायचं हे ठरलेलं नसतं. सुचत जातं आणि मी लिहीत जातो” केदारचं स्पष्टीकरण.
एव्हाना केदार आणि काव्याची घट्ट मैत्री झाली होती. केदारच्या डोक्यात तिच्यासाठी बरंच काही सुचलं होतं.
“मला तुझ्यावर तुझ्याबद्दल लिहायला आवडेल” केदारने घाबरत तिला केलेला मेसेज.
“काय लिहिणार” काव्याचं उत्तर.
“आहे थोडं काही सुचलेलं डोक्यात” केदार.
“सोप्पं लिह पण. मला कळेल असं”
केदारने त्या दिवशी पहिली मराठी कविता लिहिली. ती ही प्रेम कविता. ह्याआधी तो सगळं ट्रॅजेडीक आणि ग्लुमी लिहायचा. हिम्मत करून त्याने ती कविता काव्याला पाठवली.
“छान आहे” असं काव्याचं उत्तर आलं.
तिला कविता आवडली ह्यानेच केदार खूप खुश झाला. त्या संध्याकाळची रात्र होईपर्यंत केदारने काव्याला ६ कविता पाठवल्या होत्या आणि त्या नंतर रोज किमान ३ तरी कविता तो काव्याला पाठवायचा. तिच्या फक्त “छान आहे” ह्या बरोबर ब्लश अँड किसवाले स्मायली पण येऊ लागले. किसवाली स्मायली असली की मात्र “कवितेसाठी, नॉट फॉर यु” असा एक डिस्क्लेमर असायचा. “कळलं” असा रिप्लाय करून केदार मग काव्याला चिडवायचा.
एकाच महिन्यात केदारने ५० कविता लिहिल्या आणि त्याही रोमँटिक. काव्याचं वेड लागलं होतं त्याला. अफ्फाट प्रेम करू लागला होता तिच्यावर तो.
एके दिवशी केदारने काव्याला एक कविता मेसेंजरवर पाठवली, “के, ७५ कंप्लिट” असा मेसेज करत.
“सही” ब्लश वाला स्मायली सकट काव्याचं उत्तर.
“एक पुस्तक छापून तुला गिफ्ट करेन म्हणतो”
“मला का”
“अगं तूच तर इन्स्पीरेशन आहेस ह्या कवितांचं” केदारने फायनली हिम्मत करून हिंट दिली.
“अच्छा” काव्या
“आय मीन. तूच म्हणाली होतीस ना सोप्पं लिही म्हणून इन्स्पीरेशन म्हटलं तुला”
“रिलॅक्स रे. मस्करी करतीये मी तुझी” काव्याने लाफिंग स्मायली टाकून केलेला मेसेज.
नर्वस केदारने फक्त ‘हम्म’ असा रिप्लाय केला.
“केदार, १०० कविता करून दाखव” पुन्हा काव्याचा एक मेसेज.
“काय देशील”
“तू आधी लिही तर. मग बघू” काव्याने विषय आटपून घेतला.
दोन आठवडे गेले. केदारने शंभर पलीकडे कविता केल्या होत्या.
“११२ झाल्या, काव्या”
“मग” काव्याचं चिडवणारं उत्तर.
“काही नाही. गेलीस उडत”
“काय झालं आता. राग येण्यात नाना पाटेकरचा बाप आहेस तू”
“अगं काय परक्यासारखं वागतेस यार तू. इतक्यात एखादी मुलगी प्रेमात पडली असती”
“एखादी ना. पण मी तर एकच स्पेशल आहे ना तुझी” डोळा मारणारा स्मायली सकट काव्याचा रिप्लाय.
“म्हणजे”
“म्हणजे वेडा आहेस तू. पडलीये मी. बुडालीये केदार” हा मेसेज बघताच केदारचा चेहरा अगदी गुलाबी लाल होऊन गेला, त्याला हसू आवरत नव्हतं.
योगायोगाने केदार आणि काव्या त्या दिवशी उशिरा थांबले होते ऑफिसमध्ये. ते मग एकत्र एकाच कॅबने गेले. अंधार होता, स्ट्रीट लाइट्स सोडल्या तर. हात पकडू का, असं केदारने काव्याला खुणावलं. एव्हाना केदार आणि काव्याचं नजरेतून बऱ्यापैकी बोलणं चालायचं आणि त्यांना एकमेकांचं शांत बोलणं मनातलं कळायचंही.
केदारने पुन्हा एकदा तिला खुणावलं.
“२०० कर मग देईन” असं म्हणत काव्या केदारला चिडवत खूप छान हसत केदारकडे “ठीक ए, ठीक ए, उम्म” असं बघत राहिली.