गोष्ट प्रेमाची
गोष्ट प्रेमाची


पक्ष्यांच्या मंजुळ स्वरात रवी राजा आपली सहस्त्ररश्मी किरणे पसरवीत धरेवर अवतरला. वातावरण प्रसन्न होते. कारण त्याला कोरोनाचे नियम पाळण्याची गरज नव्हती. पण अपर्णा शून्य नजरेने रस्त्याकडे पाहात होती आणि नेमके हे सुषमाच्या नजरेतून सुटले नाही.
अपर्णा काय झाले गं?
सुषमाच्या आवाजाने अपर्णाची तंद्री तुटली आणि सावरत हसत म्हणाली, काही नाही गं... असेच आपलं...
मोकळा रोड पाहण्याची हौस केव्हापासून जडली तुला... सुषमा.
ते जाऊ दे गं... अपर्णा
मला सांग तू काय करतेस इथे?
काही नाही गं... सहजच.
चंद्रमुखी चेहऱ्याकडे बघत सुषमा म्हणाली.
दादाच्या नावाची चंद्रकोर तुझ्या भाळावर शोभते; नजरेने घ्यायला झालेला दादा तुझ्या डोळ्यात दिसतो आहे आणि तू म्हणते काहीच नाही!
...पण ते जाऊ दे दादा कुठे आहे तो काल घरी आला होता न!
तो आत्ताच स्टेशनला गेला... अपर्णा
सारंग आणि अपर्णाचा प्रेम विवाह आणि सुषमाही मुंबईला आल्यानंतर शेजारधर्माची बहीण...
19 दिवसांनी सारंग घरी आला होता. कोरोनाच्या संकटातून मुंबईकरांना वाचविण्याचा ध्यास घेतलेला एक एस. पी.
मुंबईला बदली झाली होती क्वार्टर न मिळाल्यामुळे वरळीला एका फ्लॅटमध्ये आपला संसार थाटला होता. गोड बातमी आली होती. अशा स्थितीत अपर्णा घरी एकटी... यामुळे सारंग बैचेन असे. फोनवर भेट होतच होती पण प्रत्यक्ष आज झाली. काय बोलावे काही सुचतच नव्हतं. सारंग हॉलमध्ये सतरंजी टाकून लोटला होता आणि अपर्णा सुरक्षित अंतरावर खुर्चीत बसली होती. खूप गप्पा झाल्या. सारंग घरी आला. या सुखाने अपर्णा खुर्चीत गाढ झोपी गेली. इच्छा असूनसुद्धा सारंग पांघरूण टाकू शकत नव्हता. कारण तो कोरोनाच्या रुग्णांच्या व्यवस्थेत होता. या त्याच्या अवस्थेचं त्याला दुःख झालं. सारंगने भिंतीकडे पाहिले. तेव्हा घड्याळ आपल्या तिन्ही हातांच्या वाकुल्या दाखवत रात्रीचे दोन वाजले सांगत होते. सारंग अपर्णाकडे पाहत केव्हा झोपी गेला हे कळलेच नाही. जाग आली ती अपर्णाच्या गोड आवाजाने...
सारंग... चहा... उठ लवकर...
सारंगला एक क्षण कळलेच नाही की आपण कोविड रुग्णांच्या सेवेत आहोत ते. अपर्णाच्या गोड आवाजाने नेहमीप्रमाणे त्याची सकाळ झाली होती. पण जेव्हा अपर्णाने चहा दूर ठेवला तेव्हा परिस्थितीची जाणीव झाली. तसा तो तयारीला लागला आणि कामावर निघाला...
अपर्णा येतो गं...
सुषमा... तुझ्या वहिनीकडे लक्ष देशील गं.
हो दादा. तू चिंता करू नको...
सुषमा कामात असल्यामुळे बाहेर न येताच बोलली. सारंग घरी नसताना सुषमाच अपर्णासोबत रात्री राहात असे.
अपर्णा पाठमोऱ्या सारंगकडे पाहात उभी हो,ती ती नेमकी सुषमाला दिसली. अपर्णाच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. त्याचे कारणही तसेच होते.
आज लॉकडाऊन 4 सुरू झाले होते आणि मुंबई शहरातील स्थिती फारशी चांगली नव्हती आणि कोरोनाने मुंबई पोलिसांना बऱ्यापैकी लक्ष्य केले होते. पण सुषमाने ही तंद्री तोडून तिला गॅलरीतून घरात आणले आणि दिनक्रम सुरू झाला.
नेहमीप्रमाणे, गुड मॉर्निंग फोन आला.
अपर्णा हसून बोलली, सुधा आत्ताच तर तू घरून गेला...
तसं नाही गं... गुड मॉर्निंग म्हणायचं राहून गेलं ना...
सारंग म्हणाला...
आणि हो बहीणाबाईला सांग चांगली राहत जा. दोघी पण काळजी घ्या.
हो हो दादा तू पण काळजी घे.
मुंबई पोलिसांवर आम्हाला अभिमान आहे
फोन स्पीकरवर होता. सख्खा भाऊ नसलेली सुषमा या दादाशी बोलता बोलता गहिवरली होती. डोळे पाणावले होते आणि न कळतच सुषमा अपर्णाला बिलगली आणि म्हणाली, दादाला काही होणार नाही ना गं वहिनी...
दोघींची स्थिती काही वेगळी नव्हती
दोन दिवसांनी-
सकाळचे दहा वाजले सारंगचा फोन आला...
अपर्णा बातम्या ऐकल्या का?
नाही काय झाले? अपर्णा
आज आपले रत्नाकर मतकरी यांचं निधन झाले... सारंग
अरे कसे काय? कसे वारले सर?... अपर्णा
बहुदा कोरोनामुळे...
मतकरी सरांचे नाते होते आपले... अपर्णा
हो ना... आपण नंतर बोलू. काम आहे थोडे... सारंग मतकरीसरांच्या जाण्याने अपर्णा हळहळली...
काय झाले गं? सुषमा भाजी चिरता चिरता बोलली...
काही नाही गं आमचे मतकरी सर वारल्याचे सांगत होता. मतकरी सरांमुळेच आम्ही जुळलो होतो...
कोल्हापूर श्री अंबाबाईचं ठिकाण; पहेलवान आणि नाट्यसृष्टीशी अतूट नाते; रंकाळा तलावाशिवाय कोल्हापूर अपूर्ण राहतं.
कोल्हापूरकरसुद्धा एकदा रंकाळ्याला फेरफटका मारल्याशिवाय राहात नाही. अपर्णा कोल्हापूरचीच...
एकदा रंकाळ्याला एक भामटा सारंगच्या अंगावर धावत येऊन आदळला. सारंगने बेदम हाणला. कारण रंकाळ्यावर अभ्यासात त्याने व्यत्यय आणला होता आणि मार खाल्ल्यावर त्याने पळवलेली पर्स तिथेच ठेऊन पाळला. घरच्या मालकीण बाई आल्या आणि पर्स वाचवली म्हणून धन्यवाद ...याने सुरू झालेली ओळख पुढे कित्येक दिवस रंकाळा तलावाच्या काठावर बहरत गेली.
सारंग सरदेशमुख बीएससी करून पुढील शिक्षण घेणारा आणि नाटकाची आवड असलेला.
पण गंमत तेव्हा झाली की रत्नाकर मतकरी यांच्या नाटकासाठी निवड करताना दोघेही एकत्र आले आणि जावई माझा भलामधील उत्पल आणि रजत; असा मी असामी... पु. ल. यांच्या लिखाणाला नाट्यरूपांतर आणि दोघांची मनं जुळली ती... चार दिवस प्रेमाचे.. या नाट्य प्रयोगाच्या तालमीत दोघे एकमकांच्या प्रेमात केव्हा गुरफटले हे कोणालाच कळले नाही. दिवसागणिक ही नाजूक वीण अधिकच घट्ट होत गेली. केवळ अपर्णाला पोलीस आवडतो म्हणून सारंगने पोलीस नोकरी पत्करली.
अपर्णा काय झाले? कुठे रमलीस... सुषमाने जेवायला घेतले होते. कोरोनामुळे कोणीच अपर्णाकरिता येऊ शकत नव्हते. त्यामुळे सुषमा हीच सर्व काही होती.
काही नाही गं.. तुझ्या दादा सोबतचे जुने दिवस आठवले.
मला सांग न गं.. ए वहिनी तुझी नि दादाची प्रेम कहाणी... सुषमा
कहाणी वगैरे काही नाही गं पण ते सोनेरी दिवस सहज आठवले...
आईला मी सगळे सांगितले होते. तिने होकार पण दिला होता.
वहिनी.. दादा आणि तू. याबद्दल सांग ना काही?
काय सांगू...
नाटकाच्या तालमी करिता जातायेता नाश्ता, कॉफी घेणे. त्यात सारंगला गाडीची भारी हौस. ज्या दिवशी तालीम नसेल तेव्हा लाँग ड्राईव्हला जाणे.
त्या दिवशी तो खूप खुश होता कारण त्याच्याही आई-वडिलांनी होकार दिला होता. पावसाळ्याचे दिवस होते. आनंदाच्या भरात आम्ही खूप दूर निघून गेलो आणि परतताना आमच्या टू व्हीलरचा अपघात झाला आणि सारंगला खूप लागले. मी थोडक्यात बचावली. मुका मार होता. कसे बसे एका चारचाकीला थांबवून दवाखान्या पोहोचलो. सारंग बेशुद्ध होता डोक्यातून रक्त निघत होते. तेव्हा भलं मोठं ऑपरेशन झाले. त्याला तातडीने रक्त हवं होतं, पण उपलब्ध नव्हतं तेव्हा माझं रक्त त्याला दिलं... कारण मी o positive आहे. आमचं आता प्रेम रक्ताने रंगलं होतं.
महत्वाचं.. सारंग मला का आवडतो कारण आमच्या प्रेमात फक्त शरीराची ओढ नाही. शुद्ध प्रेम लाभलं मला.
अशा गप्पा रोजच्याच झाल्या होत्या. अशातच एक दिवस अपर्णाला काळजाचा ठोका चुकवणारा फोन आला; सारंगला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची ट्रीटमेंट सुरू झाली आहे. यामुळे अपर्णाने खाणे-पिणेच सोडले. तिची प्रकृती खालावत होती. औषधोपचार सुरू होते. परंतु काही केल्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती आणि शेजारीच सख्खे नातेवाईक मित्र मंडळ झाले होते.
आणि एक दिवस अचानक दारात सारंग उभा ठाकला. सारंग दिसताच अंथरुणाला खिळलेली अपर्णा क्षणात उठून सारंगला बिलगली आणि यांच्या प्रेमासमोर कोरोनाही हरला होता. अंबाबाई पावली होती.
सारंग एक महिन्याच्या सुटीवर आराम करण्याकरिता आला होता आणि संसाररुपी वेल पुढे फुलत जाऊन एका प्रेमाची गोष्ट यशस्वी झाली.