Meenakshi Bandre

Romance

3.5  

Meenakshi Bandre

Romance

गोष्ट एका प्रेमाची

गोष्ट एका प्रेमाची

3 mins
169


लावण्या माझी बालपणीची मैत्रीण.अाज तिच्या लग्नाचा २२वा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिच्या नवऱ्याने म्हणजे आर्यनने वाढदिवसाची जय्यत तयारी केली.तिच्या आवडत्या रंगाची पैठणी,तिला आवडणारा मोगऱ्याचा गजरा.तो प्रत्येक सणाला आणतो.आजही त्याने आठवणीने आणला होता.तिच्यासाठी त्याने गिफ्ट ही आणले .प्रत्येक वाढदिवसाच्या भेटवस्तू तिने जपून ठेवल्या आहेत. त्यानेही तिला लिहिलेल्या चिठ्ठ्या त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून जपून ठेवल्या आहेत. लग्नाआधी सारखंच आजही तो तिच्या आवडी निवडी जपतो.फिरायला जाणे,सरप्राईज देणे, तिला जे आवडते ते ते तो तिच्यासाठी करतो तीही त्याची काळजी करते. कुणाची नजर लागावी ,असेच दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण हे प्रेम यशस्वी करण्यासाठी त्या दोघांना किती पापड बेलावे लागलेत.हे मलाच माहीत. मी एकमेव साक्षीदार आहे त्यांच्या प्रेमाची.

आर्यन उंचपुरा. दिसायला साधारण पण आकर्षक व्यक्तिमत्त्व.मनमिळाऊ,मदतीला तत्पर,कुणालाही आवडेल असाच होता.त्यामुळे तो तिलाही आवडत होता.तिच्या साध्या ,सरळ रहाणीमानामुळे ती आधीपासून त्याला आवडत होती.पण मुलींच्या बाबतीत तो लाजाळू होता.मान वर करून तो मुलींशी कधी बोलला ही नसेल.त्यात तिचा स्वभाव कडक शिस्तीचा त्यामुळे तिला कधी विचारण्याची त्याची हिम्मत झाली नाही.शेवटी तिनेच त्याला तुम्ही मला खूप आवडता असे म्हणून प्रपोज केले.तिच्याही मनात आपल्याबद्दल त्याच भावना आहेत आणि ती त्या व्यक्त करते हे पाहून तो खूप खुश झाला.त्यानेही आपल्या प्रेमाची कबुली दिली.तिथूनच मग दोघांचा प्रेम प्रवास सुरू झाला.

त्यादिवशी दोघेही रात्रभर झोपलेच नाहीत. डोळ्यासमोर एकमेकांचा चेहरा सतत येत होता. ती हो म्हणाली म्हणून त्याने मित्रांना पार्टी सुद्धा दिली.त्या दिवसापासून दोघांचे एकमेकांना भेटणे सुरू झाले.गार्डन, चौपाटी, सिनेमा सगळीकडे फिरणे सुरू झाले.त्यावेळी भायखळयाला ती कामाला होती अन् राहायला शिवडीला. कामावरून सुटल्यावर तो तिला पीक अप करायला येत असे.मग ते भायखळा ते शिवडी इतके अंतर पायीच जात.एकमेकांचा सहवास मिळावा‌ म्हणून सारी धडपड. येताना हॉटेलमध्ये तिच्या आवडीचा समोसा तो तिला खायला देत असे.आजही त्याने तिची ही आवड जपली आहे. गार्डनमध्ये तासनतास दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन गप्पा मारत.अधून मधून सिनेमाला ही जात असत.शिवाजी पार्कच्या चौपाटीवर बसून त्यांनी भावी आयुष्याची स्वप्ने पाहिली.तिच्या आयुष्यात अगदी सिनेमाप्रमाणे घडत होते.ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.मग भेटीगाठी सुरू झाल्या.प्रेमाच्या आणाभाका झाल्या.आता सुरू झाला प्रेमकहाणी मध्ये ट्विस्ट.त्याचे तिच्या घरी येणे वाढले होते.त्या दोघांची जवळीक पाहून घरच्यांना त्यांच्या प्रेमाची चाहूल लागली.त्यावेळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते, फोन लँडलाईन वर यायचा.त्याने तिला शेजारी फोन केला.घरच्यांना संशय होताच.तो फोन तिच्या बहिणीने उचलला.बहिणीचाही आवाज तिच्या सारखाच होता.तिने हॅलो म्हणताच त्याने समोरून धडाधड बोलायलाच सुरुवात केली.मला आज भेटशील का?तिने विचारले कुठे? तो म्हणाला आपल्या नेहमीच्या ठिकाणी.आता नेहमीचे ठिकाण हिला काय माहित असणार? तिने पुन्हा विचारले माहिती काढून घेण्याच्या उद्देशाने.नीट ऐकू येत नसल्याचा बहाणा करून त्याच्याकडून माहिती काढून घेतली. तिची वरची जात होती, घराणे मोठे होते.अन् त्याला साधी नोकरी होती.घरी कळल्यावर साहजिकच विरोध झाला.

पण या विरोधाला न जुमानता ती आपल्या निर्णयावर ठाम होती.मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे अन् मी माझ्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेईन असे तिने निक्षून घरच्यांना सांगितले.तिच्या आईने तिच्यावर विश्वास टाकला अन् घरच्यांनी आपला हट्ट सोडला व लग्नाला परवानगी दिली.

लग्नानंतरही त्याने तिला कधीही अंतर दिले नाही की कधी माहेरची आठवण येऊ दिली नाही.नेहमी तिला समजून घेत आला आहे.तिच्या भावना जपत तिला सांभाळत आला आहे.आपल्यासाठी सगळ्या घरादाराचा त्याग करून आली याची त्याला जाणीव असून तो तिचे मन दुखवत नाही.छोट्या छोट्या गोष्टीत तिला खुश होताना पाहून त्याला आनंद होतो.त्यांच्या दोन मुली म्हणजे त्यांच्या संसारवेली वरची दोन फुले.या फुलांच्या सुगंधाने त्यांच्या सुखी संसाराची बाग दरवळते आहे.

तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान त्यांच्या यशस्वी प्रेमाची ग्वाही देत आहे.


Rate this content
Log in