Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Lekhak Rangari

Drama Tragedy


4  

Lekhak Rangari

Drama Tragedy


गोरख नाना

गोरख नाना

11 mins 179 11 mins 179

चोवीस तारखेला माझं गावातलं काम संपलं आणि त्या रात्री मी पंचवीस तारखेला पुण्यात माघारी येण्याचे आराखडे बांधत झोपलो. २५-०३-२०२० सकाळी सकाळीच कोरोना लॉकडाऊनची बातमी येऊन ठेपली आणि ती बातमी ऐकून माझ्या काळजात धडकी भरली. तब्बल एक महिना गावालाच राहायचं ! आणि नंतर देवाच्या कृपेने(?) त्या एका महिन्याचं रूपांतर तीन महिन्यांत झालं. मला गावाला राहायला आवडत नाही अशातला भाग नाही पण अगदी लहानपणापासूनच जर तीन-चार दिवसांच्यावर कोण्या पाहुण्याच्या घरी राहायचं म्हटलं की माझ्या जीवावर येतं. हल्ली मी फारसा गावाला जात नाही. याच वेळी तब्बल तीनेक वर्षांनी (टाळता न येण्यासारख्या) कामानिमित्त मी गावाला गेलो होतो. खरंतर तरुणपणात माझं जीवन भलतंच अरसिक होऊन गेलंय. बालपणीचा मी आणि आत्ताचा मी यांच्यामध्ये काळाने पडदा टाकलाय. गावातील सर्वांकडून मात्र मी लहानपणी वागत होतो तसंच वागायला हवं अशा अपेक्षा आहेत. माझ्या या बदललेल्या स्वभावामुळे उगीचच त्यांना अपेक्षाभंगाचे दुःख नको म्हणून मी गावाला जायचं टाळत राहतो. 


गावात अडकून पडलो तसं मग मी स्वतःला कामात झोकून दिलं. सकाळी आधी व्यायाम करायचा आणि मग आवरून रानात निघायचं, पुन्हा दुपारी थोडासा आराम केला की संध्याकाळी गायांची निगा आणि धारांची धावपळ, रात्री सर्व गुरांना चारा-पाणी आणि नंतर निद्रादेवीची आराधना. हे वेळापत्रक जपण्यामागे दोन ठळक कारणे होती. एकतर आपण 'बादशहा आपल्या घरी' आणि दुसरे कारण म्हणजे 'रानात घाम गाळण्यातला आनंद अनुभवायचा होता.' नेमकं त्याच वेळी शहरात असणारे सर्वच तरुण (कोरोनाला घाबरून) गावात परत आले होते. माझ्या वेळापत्रकातील सातत्य, कामाची पद्धत, कामाला लागत असणारा पुरेसा वेग आणि कामातील अचूकता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कष्टाला घाबरून मागे सरलो नाही. या सर्व कारणांमुळे गावातील इतर तरुणांपेक्षा मी आपसूकच लोकप्रिय झालो.


आमच्या दोन्ही रानांत त्यावेळी मका लावलेली होती. दोन्ही रानातील मका एकाच वेळी काढणीवर आली आणि मी मोडणीवर ! दोन्ही रानातली मका झोडपायला साधारण पंधरा दिवस गेले. त्यात भर म्हणूनच अधून-मधून वरच्या रानातील शेवग्याच्या शेंगा साद घालत होत्या. एकूणच काय तर सुट्टी नावाची भानगड माझ्या गावाकडील आयुष्यातून हद्दपार झाली.


अशाच एका (अ)साधारण दिवशी रानात काम निघालं. मक्याची कापणी पूर्ण झालेली होती, सर्व कणसं ताट्यांपासून वेगळी करून सरीत टाकलेली होती. आता सरीतली कणसं गोळा करून, पोत्यात भरून, रानातल्या पत्र्याच्या शेड मध्ये आणून टाकण्याचं दिव्य पार करायचं होतं. मी भरलेली पोती शेडमध्ये आणून टाकायला आणि आजी-आजोबा भरून द्यायला या हिशोबाने फारतर दोन दिवस या कामासाठी लागणारच होते. रानातली कणसं पाहता फार-फार तर साठ-सत्तर पोती भरतील असा अंदाज होता. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून मी रानात निघालो तेव्हा माझ्या आजीने म्हणजे आईने सांगितल की, ‘'अजून थोडा वेळ थांब.'’


"बस वैसं, गोरख नाना आला की जायला ईल रानात." आई म्हणाली.


"आता गोरख नाना कोण ?" असा प्रश्न मी आईला विचारला.

   

तेव्हा ती म्हणाली, "गावातला गडी हाय रं,तुला यकट्याला पोती जास्त व्हतील म्हणून सांगितलं म्याच त्याला."

   

पोती माझ्या एकट्याच्या हिशोबाने जास्त असली तरी गड्याला मदतीसाठी बोलवावी इतकीपण जास्त नव्हती. "कशाला बोलावायचं गड्याला मी होतोच की! मी एकट्यानेच टाकली असती पोती."

   

मी असं म्हटल्यावर आई म्हणाली,"पावसाचा नेम नाई बाबा,कणसं आणुन टाकली मंजी भ्या नाई."

   

"ठीक आहे." आता भर उन्हाळ्यात पाऊस येणार हे गणित माझ्या मेंदूबाहेरचं होतं. मी निवांत पुस्तक वाचत बसलो.


"अनसा आक्का, काम नाह्य का ?"

   

माझ्या समोर एक साठी ओलांडलेला आणि साधारण पासष्ठीच्या आसपासचा, उंचीने कमी आणि तब्येतीने आणखी कमी असणारा वयस्कर माणूस उभा होता.

   

आईने त्या इसमाला आवाजावरूनच ओळखलं आणि घरातूनच प्रतिसाद दिला, "यी की रं गोरख. बस वैसं,भाकर टाकुन येतेय." आणि तिने मला आजोबांना म्हणजे दादांना बोलावण्यासाठी पिटाळलं.


गोरख नानांची आणि माझी ही पहिलीच भेट. दिसायला साधारण, चेहऱ्यावर म्हणावं असं तेज नाही, रोडावलेली शरीरयष्टी, निस्तेज डोळे, डोक्यावर वारकरी टोपी आणि कपाळाला भडक गुलाल. यापलीकडे नानांचं निरीक्षण करण्याची मला काहीच गरज नव्हती. मी दादांना बोलावून आणलं आणि रानात जाण्याची तयारी केली. नानांनी त्यांचा सदरा शेडच्या डांबाला अडकवला आणि दादांची जुनी बंडी मागितली,कामात घालण्यासाठी. मुळात कामाला जाताना कामात घालण्याची कपडे सोबत घेऊन जाणे ही क्षुल्लक बाब होती. त्यानंतर दादा तंबाखू खात असताना नानांनी तंबाखू मागितली. दादांना नेहमीच मोठा विडा खाण्याची सवय आहे. त्यांनी थोडी जास्तीच तंबाखू नानांच्या तळहातावर ठेवली. मग नानांनी डांबाला अडकवलेल्या सदऱ्यातुन एक छोटी कॅरीबॅग काढली. त्यात आधीच थोडीशी तंबाखू होती,त्याच कॅरीबॅगमध्ये नानांनी तळहातावरची निम्मी तंबाखू टाकली आणि कॅरीबॅग गाठ मारुन बंडीच्या खिशात ! मला नानांची हीपण गोष्ट खटकली. मुळात आधी तंबाखू असताना दादांकडून मागण्याची गरजच नव्हती आणि जास्त झालेली तंबाखू माघारी द्यायला हवी होती. 'वय वाढत गेलं की माणसाचा स्वभाव आपोआपच विचित्र बनत जातो' या नियमाला गोरख नाना अपवाद कसे असणार ? मी काही बोलण्याच्या पात्रतेत नसल्यामुळे काहीच बोललो नाही.


रानाकडे जाताना मला नानांच्या शरीरयष्टीकडे पाहून प्रश्न पडला होता की, 'हा माणूस पोती उचलणार तरी कशी ?' पोतं खांद्यावर किंवा डोक्यावर उचलून रानातून शेडमध्ये आणायचं म्हटलं तर साधारणतः एकरभर रान तुडवायचं होतं. माझ्यासाठी अंतर फारसं नसलं तरी नानांच्या मानाने अंतर बरंच जास्त होतं आणि हे अंतर एक-दोन वेळा कापून काम भागणार नव्हतं. सुरुवातीला आई-दादांना मी आणि नानांनी पोती भरायला मदत केली. पाच-दहा पोती भरली तेव्हा आम्ही दोघांनी एक-एक पोतं शेड मध्ये आणुन टाकायला सुरुवात केली. माझी जी शंका होती ती नानांनी सुरुवातीलाच खोटी ठरवून दाखवली. एकामागोमाग एक पोतं नेऊन टाकण्याचा आम्ही दोघांनी सपाटा लावला.


मला काम अर्थातच लवकर संपवायचं होतं कारण काम संपलं की मग विश्रांतीची सुट्टी होणार होती. मी आईला सांगितलं 'पोती जास्त भर'. आईने पोत्यात कणसं जास्त-जास्त भरायला सुरुवात केली. पाच-सहा सऱ्या झाल्या की पोत्यात पुन्हा कणसं कमीच ! मी आईला विचारलं तेव्हा तिने सांगितलं, 'नानांना पोतं जड असलं की उचलत नाही म्हणून नानांनीच पोतं थोड कमी भरायला सांगितलंय.' मला वाटलं काम वाचण्यासाठी म्हणत असतील मी पुन्हा आईला पोती जास्त भरायला सांगितली. पाच-सहा सऱ्या सरल्या नाहीत तोवर आधीचाच प्रसंग पुढे आला. पोती पुन्हा कमीच ! मला मनातून नानांचा थोडासा राग आला. कामाला यायचं, हजेरी घ्यायची मग कामचुकारपणा कशासाठी करायचा ? पण नंतर मीच वेगळ्या बाजूने विचार केला की नानांना खरंच पोतं उचलत नसेल तर? आणि जर खरंच पोतं उचलत नसेल तर या वयात नानांनी काम करावं अशी कोणती मजबुरी असेल ? नाना नक्की कोणत्या संकटाचा सामना करत होते ?


मधेच कधीतरी मी पाणी पिण्यासाठी थांबलो तेव्हा नानादेखील थांबले. सहाजिकच नानांचा वेग कमी होता. नानांचं पाणी पिऊन होईपावतो मी आणखी एक सरी ओढत आणली होती. नाना नंतर पुन्हा एकदा तंबाखू खाण्यासाठी दादांजवळ जाऊन बसले. मला अजून एकदा नानांचं निरीक्षण करायचं होतं. मी पळतच त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. मानवी मानसिकता पण विचित्र गोष्ट आहे. कधी-कधी आपण अशा काही कृती करून जातो त्याचा नंतर आपल्यालाच अविश्वास वाटतो,असो. नानांनी सकाळच्याच कृतीची पुनरावृत्ती घडवून आणली निम्मी तंबाखू तोंडात आणि निम्मी कॅरीबॅगमध्ये. थोड्याच वेळात नानांच आणि माझं काम सुरू झालं.


ऊन तापायला लागलं तसा मी कामाचा वेग भरपूर वाढवला आणि नानांचा वेग संथ होत गेला. नानांवर असणाऱ्या रागातील सर्व शक्ती मी कामात जोडून टाकली. वास्तवात थोडासा राग आई-दादांवर देखील होताच. मी असताना खरच नानांना हजेरीवर बोलावण्याची गरज होती का ? शेवटची सरी राहीली त्यावेळी नानांनी त्यामानाने शेडच्या जवळ असणारी पोती उचलायला सुरुवात केली. मी विचार केला की पाच-दहा पावले वाचली तर असे कितीसं अंतर वाचणार होतं ? मला नानांचं वागणं खटकलं. मी मुद्दाम शेवटचं पोतं तसंच ठेवलं आणि बाकीची पोती अशा क्रमाने आणली की शेवटचं पोतं नानांच्या वाट्याला आलं. निवांत शेडमध्ये बसून घाम पुसत असताना मी शरमलो, पश्चातापाने दग्ध झालो. नाना समोरुन शेवटचं पोतं हळूहळू आणत असताना त्यांना पाहून मी विचार केला की शेवटचं पोतं आपण मुद्दाम ठेवणं योग्य होतं का ?


नाना आल्यावर आई म्हणाली, "बस नाना, लिमलेट करते." मग तिने मला बागेत लिंब आणायला पाठवलं.


नानांना सरबताचा पेला नेऊन दिला तेव्हा नानांनी मानेनेच धन्यवाद दर्शवला आणि सरबताचा पेला घेतला. त्यावेळी दुपारचे सव्वाबारा वाजले होते. एक पारी म्हणजे सहा तास. नानांच्या कामाची एक पारी पूर्ण व्हायला एक वाजणं आवश्यक होतं. आईने दोन-तीन दिवसांआधीच विहिरीच्या कडेचं गवत खुरपून टाकलेलं होतं, थोडासा कचरा गोळा केला होता आणि थोडंसं पाचटपण होतं. तिने नानांना ते सर्व गबाळ उचलून रानात नेऊन पेटवून टाकायला सांगितलं. नानांनी निवांत त्यांच्या वेगात सर्व कचरा रानात नेऊन टाकला, माझ्याकडून काडेपेटी घेतली आणि भर उन्हात तो कचरा पेटवण्यासाठी नानांची तारेवरची कसरत सुरू झाली.


"रामराम दादा."

   

दादांनी त्यांच्या कामातून आणि मी पुस्तकातून डोकं वर काढलं आई तिच्या कामातच होती. नवीकोरी शाईन गाडी, टापटीप कपडे, तरुणाला साजेशी केशरचना. समोर साधारण पंचविशीतला हसमुख तरूण गाडी घेऊन थांबला होता.

   

"आरं यी की समा, बस की" दादा म्हणाले. "आज इकडं कुठं?"

   

"ते पापरकरांची मोटर खराब झालीय ती बघायला आलोय." तरुणाने सांगितले. "घाई हाय पुना येतो कवातर. अनसा अक्का कुठे गेली ?"


त्याने आईचं नाव घेतलं तशी आई बाहेर आली. हसून ती म्हणाली, "समा हाय वय मी म्हणती कोण आलंय. ती काय नानापण आलाय तिकडं गबाळ पेटवतुया."

   

त्या तरुणाने तिच्या हाताच्या दिशेने पाहिलं खरं पण बागेच्या आड असल्यामुळे नाना दिसत नव्हते. त्या तरुणाने 'मी कोण ?' असा प्रश्न विचारल्यावर आई म्हणाली, "पुण्याच्या राणीचं पोरगं हाय रं. करुणामुळं आडकलंय."

   

त्याने माझ्याकडे पाहिलं तसं आम्ही तरुणांच्या डोळ्यांच्या भाषेत अभिवादन केलं आणि मग 'करमतय का ?' वगैरे साध्या प्रश्नांचा मारा झाला. तो तरुण गेला की मी आईला विचारलं, "कोण आहे हा ?"

   

"ती वय नानाचं पोरगं हाय धाकटं. समाधान आवताडे. मोटरा नीट करतंय."

   

"मला कसं काय ओळखतो", मी. 

   

"राणीमुळं वळखत्यात आण तसबी आपली भावकीच हाय लांबची."


"झालं का काम अनसा आक्का ?" नाना माझ्या शेजारी बसत आईला म्हणाले.

   

"झालं. बदल कापडं तुला बदलायची आसत्याल तर." आई.

   

त्यावर नाना म्हणाले,"आक्का चहा टाकतेस का ?" नानांच्या आवाजात आर्तता होती.

   

"बसं टाकती" असं म्हणून आई घरात निघून गेली.


नानांची भर दुपारची चहाची तलफ मला पटणारी नव्हतीच. मी यावेळी देखील शांत राहिलो. नानांनी हातपाय धुतले तोवर चहा तयार झाला. मी नानांना चहाचा पेला नेऊन दिला. चहा पिऊन झाला तसे नाना दादांसमोर येऊन बसले. 


"चला दादा येतो", नाना.

   

"किती द्यायची हाजरी बोल की, तू काय नवीन हायस का ?" दादा नानांना म्हणाले.

   

"परवा या पापरकराच्यातलं केंबाळ बांधुन-शान टाकलं आण काल बी होतो पवाराच्या वळणात हाजरीवर." थोडावेळ थांबून नाना म्हणाले, "तीनशे रुपये."


'तीनशे रुपये !' मी उडालोच. सहा तासांच्या कामाचे तीनशे रुपये ! शहरात कार्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्या माझ्यासाठी सहा तासांचे तीनशे रुपये ही गोष्ट पटणारी नव्हतीच. आता मात्र मला खरच आई-दादांचा खूप राग आला. आधीच रानातलं कडवाळ गेलेलं नव्हतं त्यामुळे सगळ्या कणसांची मका करावी लागणार होती त्यासाठी खर्च होणार होता त्यात पुन्हा हा 'अनावश्यक खर्च' कशासाठी ? दादांनी मात्र बंडीत हात घातला आणि मोजून तीनशे रुपये दिले. माझ्या मेंदूत आग लागली पण मी तोंड शिवून घेतलं. दादांनी एका शब्दाने न बोलता तीनशे रुपये दिले, अशाने तर शेतकऱ्यांपेक्षा हजेरीवर काम करणारे गडीच श्रीमंत होतील की !


"मालकीण बरी हाय का नाना ?" आईने नानांना विचारलं.

   

"तिच्या भावाकडे गेलीया आठवडा झालं. मी बी चाललुय आज तिकडंच, नाना म्हणाले."

   

"का रं नाना, का बरं ?" दादांनी नानांना विचारलं.

   

"आवो काय सांगायचं दादा पोरगं आजून बी तसंच करतय. पुना एकदा मारलं त्यानं मालकिणीला ! म्हणून घाबरून गेली भावाकडं मायेरला निघून." नाना पुढे म्हणाले, "म्हणत होती पोरानी मारून टाकलेलं बी कळायचं नाय."


माझ्या रागाची जागा उत्सुकतेने घेतली. दादा म्हणाले, "मध्याला तर कमी आलतं की,आता पुना पेतय का दारू ?"

   

नाना म्हणाले, "पाटलांनं दम दिला मागच्या येळेला म्हणून मारत नव्हतं आता पुना लागलंय यड्यावानी करायला. आपण तर किती वेळा अब्रू घालवून घ्यायची ? मेहुणा म्हणत व्हता नाना या इकडं काम बघतू, आज जाणार हाय मी बी."

   

"ईंदीमुळं यड्यावानी करतय काय रं" आई.

   

"बघकी आक्का त्या बाईपाई घरात हाणामारी करतंय. माझ्यात तर आता काय राहिलय सांग बर,पैसच मागतय सारखं. मोठ पोरगं वैतागून वायलं राहिलय. त्याचा-त्याचा संसार त्याला जड झालाय,त्याच्याकडं बी जायची पंचाईत झालीया." नाना आईला म्हणाले.

   

"जेवायचं कसं काय रं नाना ?" आई.

   

नाना थोडंसं थांबले. जणूकाही सांगावं की सांगू नये या विचारांच्या कात्रीत सापडले होते. "जिंदगीत कवा च्याचं पातेल चुलीवर ठूल नवतं बघ,पण आता पोरानं ही बी दिस दावल. भाकरी तर काय बाप्याच काम हाय वय ? भात जमतुय कसातर. मालकिन गेली तवापासून भातावरच हाय. रोगामुळे हाटेल पण उगड घावत नाय." नानांच्या आवाजातील बदल काळजाला भिडला नानांच्या डोळ्यात पाणी तरळलं. "माझं हाल हूयाला लागलंय म्हणून मी चाललुय,ह्याजी ह्याला काय गोंधळ घालायचा तो घालू दे." नाना थांबले असं वाटलं की नानांना खूप बोलायचं होतं, मोकळं व्हायचं होतं पण नानांनी शब्द मनातच धरून ठेवले. 

   

"जेवण करतूस का रं ?" आईने विचारलं. "झालाय सयपाक वाढू दी का ?"

   

"नको आता जातो घरला पुना मंग बघू जिबडं नाईतर कुणाची तर गाडी बघून जातो तालुक्याला."

   

नानांचा स्वाभिमान मला घायाळ करून गेला. भूक असताना अन्नाला नाही म्हणण्याची ताकद साठीच्या नानांमध्ये कुठून आली होती माहिती नाही. त्यानंतर बराच वेळ नाना बोलत राहिले माझ्या डोक्यात मात्र विचार पळत होते. त्यांचं बोलणं समजून घेण्याईतकी एकाग्रता मी गमावून बसलो.


"जाताना भाजीला घिऊन जा बागतनं." आई नानांना म्हणाली. 

   

नानांनी डोळे पुसले आणि डांबावरचा सदरा घालून बंडी वळचणीला टाकली आणि बागेत निघून गेले.


"काय म्हणत होते नाना ?" मी आईला विचारलं.

   

"आरं ती पोरगं आलं नवतं का मगाशी, सम्या ती मारतय रं नानाला आण नानाच्या मालकिणीला."

  

"का बरं ?" मी.

  

"गुंजाळाच्या मळाकड गावकोरला." आईने हातानी मला दाखवलं. "ईंदी नावाची बाई राहत्याय रं. त्या पोराने ठिवलय तिला. समद पैस तिलाच निऊन देतय,दारू पेतय आणि पैस दे म्हणून बापाला मारतय."

  

"घरातून बाहेर काढायचं ना मग ?" मी म्हणालो.

   

आई थोडीशी नाराज होऊन म्हणाली, "अं घरातून निघत आसतं वय पोरग. पोलिस पाटलांन दम दिला त्याला तरी बी तसच करतय आण तुला सांगती बग नानाची आबळ उठलीया समद्याला कळतय पण आपण काय बोलणार ? काल सांच्याला गावात भेटला नाना, काम बग म्हणत हुता मग त्याला यी म्हणलं उद्याच्याला !"

   

मला तर अविश्वास वाटत होता. "त्या पोराकड बघून तर चांगल वाटल पोरगं."

  

"दिसतं तसं नसतं बाबा. म्हणून म्हणते शिकून मोठं व्हा पैस कमवा. राणीनं आण आबापाहुण्यांन गरिबीतन शिकवलय रं तुम्हाला त्यांना आता चांगले दिस दावा बाबा नायतर मग हायच पुना आमच्यासारखं." आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.


मी पुन्हा एकदा त्या शाईन वाल्या तरुणाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला. खरच किती विचित्र बनत चाललय जग ! हसऱ्या मुखवट्यामागे भेसूर वास्तव दडपल जातय. शहरातदेखील खूप गोरख नाना आहेतच पण शहरात गावाकडच्या माणसांसारखी माणुसकी जपणारी माणसंच नाहीयेत. त्यामुळे शहरातल्या नानांची तळमळ कोणाला समजू शकत नाही, त्यांची मुस्कटदाबी होतच राहते. नानांची या वयातदेखील गडी म्हणून कष्ट करण्याची कारणे मला समजली, मी शरमलो. मला नानांवर राग धरणाऱ्या स्वतःचा राग येऊ लागला. खरच नानांना समजून घेण्याची पात्रता माझ्यात होती का ?


नानांनी जाण्याआधी पुन्हा एकदा दादांना तंबाखू मागितली तेव्हा मी नानांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. डोक्यावरची टोपी, कपाळावरच्या सुरकुत्या, खोलवर गेलेले डोळे, गळ्याच्या दिसणाऱ्या शीरा आणि थरथरते हात हे सर्वकाही प्रतीक होतं नानांच्या आत असणार्‍या लढवय्याचं. परिस्थितीशी झुंजत असणारा लढवय्या. मी नानांना हातानेच रामराम खुणवला, नानांनी देखील स्मितहास्याने रामराम घातलाच की ! गैरसमजाचे ढग आता सरले होते. समज बरोबरच होते खरतर मी त्यांना गैर बनवल होतं. कदाचित नानांची आणि माझी ही पहिली आणि शेवटचीच भेट होती.


विहरीकडच्या पायवाटेवरुन जाणाऱ्या नानांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मी हताशपणे पाहत होतो. मानवी भावना फारच विचित्र खेळ घडवून आणतात. अवघ्या काही तासांपूर्वीच नानांना 'पूर्ण' तीनशे रुपये द्यायला मी कचरत होतो आणि आता नानांना 'फक्त' तीनशे रुपये देऊन जाऊ देणं मला चुकीचं वाटत होतं.


Rate this content
Log in

More marathi story from Lekhak Rangari

Similar marathi story from Drama