Vijay Sanap

Inspirational

3.3  

Vijay Sanap

Inspirational

गण्याचा बाप

गण्याचा बाप

5 mins
4.9K


गण्याच्या बापाची फार गरिबी. त्याला दोन बैल, दोन एकराचा तुकडा तो ही जिरायती. माय बाप दोघेही कष्ट करायचे जे मिळेल त्या दोन पैशात गुजराण करायचे गण्याही बापाला छोट्या मोठ्या कामात थोडी फार मदत करायचा.

तसं गण्याला शाळेत टाकलं होतं. पण कामाच्या अडचणी मुळं गण्या कधी गेला कधी नाही गेला. अशी तशीच गण्याची शाळा चालायची. गण्या पहाटे उठला की खुंट्याचे बैल सोडायचा व आपल्या शेताला नेऊन बांधाला चारायचा. दहा वाजता बैल बांधून गण्या घरी येई. कसा बसा जेवण करुन एक भाकर, लोणच्याची फोड पालवात बांधून घेई. दप्तर खांद्याला गुंतवून गण्या शाळेत जाई. गण्या दोन चार दिवसा आड अंघोळ करायचा. गण्याची शाळा तशी दोन किमी अंतरावर बाहेरगावी होती. गण्याचे मित्र ही तसेच होते. गेले त गेले शाळेत नाही तर निघाले बोरं खायला गण्याच्या शर्टाला कधीच बटन नसायचे. कधीही खालच्या बाजूने गाठ बांधलेली असायची. गण्याचं शिक्षण जेमतेम चौथी पर्यंत झालं. अन् गण्याला शाळेनं सोडलं. गण्याचे मायबाप रोज मोल मजूरी करायचे. कधी मजूरी मिळायची तर कधी नाही. मजुरी नाही मिळाली त्या दिवशी आपल्या शेतावर जाऊन कामधंदा करायचे.

या वर्षी दुष्काळा पायी शेतीत काहीच पिकलं नाही. उलट सावकाराच डोक्यावर कर्ज होऊन बसलं. त्याचं व्याज वाढत चाललं होतं. तसा सावकाराचा रोज तगादा होता. पुढे दिवाळीचा सण जवळ आला होता. लेक माहेराला येण्यासाठी मुऱ्हाळ्याची वाट पहात होती. कारण तिच्याही घरची परिस्थिती माहेरा पेक्षा कैक पटीने खराब होती. तिच्याही नशिबात बारोमास कष्टच होते. त्यामुळे कधी माहेराला जाईन व दोन दिवस सुख मिळेल या संधीची ती वाट पाहात होती.

बापाला चिंता लागली होती. या दुष्काळामुळे हाताला काम सुद्वा मिळत नसे. गावात दोन पैशाची मदत करणे तर दूरच, कोणी कोणाला ओळखेनासं झालं होतं. बापाच्या डोक्यात एक एक विचार घोळत होते. 'नको नको देवा हा संसार' बाप जीवाला खात होता. त्यात एक विचार डोक्यात आला. बापाने बैल विकण्याचा निर्णय घेतला. पण बापाचा जीव बैलातून निघत नव्हता. कारण लय जीव लावून लहानचं मोठं केलं होतं. पण नाही, हा विचार करुन भागणार नाही. बापानं मेखीचे बैल सोडले व बाजाराला निघाला. तसा गण्याने हंबरडा फोडला आणि बैलाच्या गळ्यात पडून रडू लागला. बापाच्याही डोळ्यालां दोन दोन धारा लागल्या. पण परिस्थिती बिकट होती. बापाचा नाईलाज होता. सावकार घरी चकरा मारत होता. मायने गण्याची समजूत काढली. बाप तसाच बैल घेऊन बाजारात गेला. बापाच्या डोळ्याचा अश्रू काही खंडत नव्हता. शेवटी नाईलाजाने आपले बैल माती मोल विकले. बाप जड पावलाने घरी आला.

दोन दिवस झाले गण्या जेवलाच नव्हता. कारण सोडबांध करणं व वैरण घालणं हे सगळं गण्याच करायचा. माय त्याला कशी-बशी समजावत होती. बापानं सावकाराचं देणं चुकतं केलं. काही उसन वारी दिली. वाण्याच्या किराणा दुकानाची चार महिन्याची उधारी बाकी होती, ती दिली. गण्याच्या बापा जवळ एक पै उरली नाही. गण्याचा बाप जसा होता तसा झाला.

गण्याच्या बापानं हापकी खाल्ली. त्या दिवसापासून गण्याच्या बापाला झोप लागेना. रात्र रात्र गण्याचा बाप विचार करायचा. संसाराचा गाडा ओढता ओढता गण्याच्या बापाच्या संसाराचे दोन्ही चाकं निखळली होती. गण्याच्या बापानं अंथरूण धरलं होतं. चार गावचे डॉक्टर आणून काही फरक पडला नाही. शेवटी गण्याच्या बापाने जगाचा निरोप घेत निघून गेला.

बाप अचानक गेल्यामुळे गण्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरातला कर्ता पुरुष गेल्या मुळे गण्या पोरका झाला होता. साऱ्या घराचा भार त्याच्यावर पडला होता. मायचं भान हरपलं होतं. माय वेड्यागत करु लागली. गण्याला काय करावे काही सुचेना त्याच्या डोक्यावर आभाळ फाटल्या गत झालं. गावचा महादू सावकार पुढे आला. धीर देत म्हणाला, "काही काळजी करु नका. परमेश्वर तुम्हाला साथ देईल. गण्याच्या कामाचं मी बघून घेईन." कसेबसे दुःखातून सावरत. हळूहळू कामाला लागले. गण्या महादू सावकाराकडे सालगडी म्हणून कामाला राहिला. महादू सावकार तसा चांगला माणूस होता. त्याने गण्याला शेतात आपल्या गोठ्यावर राहण्याचा सल्ला दिला. "खाऊन पिऊन ३०० रु साल देईन" म्हणाला. गण्याने ते मान्य केले. नियमित कामाला येऊ लागला.

गण्याची आई घरी एकटी राहू लागली. गण्याचा आपल्या आईत फार जीव होता. पण सगळी जबाबदारी अंगावर पडल्या मुळे नाईलाजास्तव आईला घरी एकटं सोडावं लागलं होतं.

गण्या आता बऱ्यापैकी शहाणा झाला होता. त्याला काही गोष्टी कळू लागल्या. महादू सावकार तसा चांगला माणूस होता. अधून मधून तो गण्याच्या आईची चौकशी करायचा. गण्या फार इमानदार मुलगा होता. तो आपले काम रोज नित्यनेमाने करत असे. कसाबसा दोन वर्षाचा काळ लोटला. गण्याची आई आता धरणीला टेकली होती. गण्याचं लग्न करून चार हात आपल्या डोळ्यासमोर करावं अशी तिची इच्छा होती. पण गण्याला पोरगी देईल कोण? घरची परिस्थिती पाहून पाहूणे दचकत होते. त्यात गण्याचं शिक्षण फारच कमी होतं. त्यामुळे आईला जास्त काळजी वाटत होती.

एक दिवस आईने महादू सावकाराकडे विषय काढला. सावकार म्हणाले, "आपल्या गावच्या बाजूला गोदी नावाचं गाव आहे. तिथे एक मुलगी आहे. तिच्या बद्धल मी चौकशी करुन बघतो. पण पोरीचा बाप फार गरीब माणूस आहे. त्याच्याकडे लग्न करायला पैसा नाही. तसा मी बोलून पहातो." एवढं बोलून सावकार निघून गेला.

चार दिवसाने सावकार घरी आला व म्हणाला, "मुलीचा बाप तयार आहे. पण मंदिरात हार घालून लग्न करावे लागेल म्हणे." गण्याच्या आईने लगेच होकार दिला. काही दिवसातच दोन्ही बाजूच्या भेटीगाठी होऊन लग्नाचा कार्यक्रम निश्चित ठरला. महादेवाच्या साक्षीने मंदिरात हार घालून लग्नाचा कार्यक्रम पार पडला.

सावकराने गण्याला राहाण्यासाठी मळ्यातच एक रुम तयार करून दिलेली होती. गण्याने आपला नवीन संसार तेथेच थाटला. आपल्या म्हताऱ्या आईला सोबत घेऊन आला. गण्याचे आईवर फारच प्रेम होते. आईला खूप जीव लावायचा. तिची सेवा करायचा. गण्याचा सुखी संसार चांगलाच फुलला होता. बायकोही फार कष्टाळू होती. गण्या बरोबर ती सावकराच्या शेतीत काम करत असे. मालक त्यांना बऱ्या पैकी पगार देत असे.

पुढे आखाडतोंड जवळ आलं होतं. शेतीचे सर्व काम आटपून गण्या पेरणीच्या तयारीला लागला होता. मिरग छाया पडली होती. दोघेे नवराबायको शेतात काम करीत होते. आभाळ गच्च भरून आलं होतं. पाऊस येण्याचा अंदाज होता. घर दूर असल्यामुळे गण्याने आपल्या बायकोला घराकडे जाण्याचा सल्ला दिला. कारण, "आई वाटबघत असेल मी थोडं काम उरकून येतो." गण्याची बायको डोक्यावर टोपलं घेऊन घराच्या दिशेने निघाली. गण्या आपल्या कामात मग्न होता. तसा ढगांचा गडगडाट आवाज सुरु झाला. सोबत वारा अन् पाऊस संगच होता. वीजा फारच चमकू लागल्या. गण्या लिंबाच्या झाडा आड थांबला होता. खूपच अंधारुन आले होते. त्यातच एक जोरात वीज कडाडली व त्याच लिंबाच्या झाडावर पडली अन् होत्याचं नव्हतं झालं. काळानं घाला घातला. गण्याचा संसार पाण्यात बुडाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational