Vijay Sanap

Tragedy

1.8  

Vijay Sanap

Tragedy

सावत्र आई

सावत्र आई

6 mins
15.7K


वैशाखचा महिना होता. ऊन मी म्हणत होतं. जंगलात काळं कुत्रं सुद्वा दिसत नव्हतं. उन्हाच्या झळाच्या लहर दिसत होत्या. पाण्याचा कुठे थांग पत्ता नव्हता. गाव येथून एक कोस दुर होतं. संतुबा आपल्या शेतात काम धंंदा करुन आंब्याचे राखण करत होता. घरी त्याची बायको कांता वं आई रख्माबाई दोघीच असायच्या. कांताला नववा महिना लागला होता. आई तिची देखभाल करायची. आईचा स्वभाव तसा मायाळू होता. आईला स्वत:ची मुलगी नसल्यामुळे ती कांताला आपल्या मुली प्रमाणे जीव लावायची. मला नातू व्हावा असी तिची फार इच्छा असायची. घरचा काम धंदा स्वतः तीच करायची. कांताला कुठल्याच कामाला हात लाऊ देत नव्हती. चिखल मातीचे पत्राचं घर होतं. त्यात फारच गरम होयचं. गाव तसं छोटसच होतं. गावात न शाळा न लाईट न किराणां दुकान सर्व काही बाहेरूनच आणावं लागे. तशी संतुबाला चार एकर जमीन ती ही बिना पाण्याची त्यात आंब्याचे दोन तीन झाडं. या वर्षी आंबे बऱ्यापैकी फुटले होते. त्यात शेळ्या मेंढ्यावाल्याचा ताप. येणारे जाणारे वाटसरु आणि वानराची टोळी सतत त्रास द्यायचीे. अहो खायाचे कमी पण नुकसान जास्त करायचे. एकदा का? झाडावर चढले की ह्या फांदीवरुन त्या फांदीवर नुसत्या उड्या मारायचे. सारा धिंगाणाच धिंगाणा पाच पन्नास आंबे सहज खाली पाडायचे. त्यामुळे संतुबा आपली दोन वेळची शिळी भाकरी बांधून तिथे राहतं असे. आपली बैल गाडी व दोन बकऱ्या सोबतच सांभाळायचा दिवस भर आपल्या परिसरात चारुन सोड बांध करी, उरलेल्या वेळात शेतीचे काम करी. घरी आई व बायको एकटीच असल्यामुळे त्याला फार चिंता वाटत असे. बायकोचे दिवसही भरत आले होते. तो आपला सकाळ संध्याकाळ घरी चकरा मारत होता. घरी काही असलं नसलं आणून देई कांताची ही पहिली डिलेवरी होती. त्यामुळे संतुबाला फार काळजी वाटायची. संतुबाला मुलगा व्हावा असे त्याच्या आईला फार वाटायचे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना लक्ष ठेवायला सांगून तो शेतात आंब्याचे राखण करायला जायचा. कसे बसे पंधरा दिवस गेले. रात्रीचे अडीच वाजले होते. कांताच्या पोटात दुखायला लागले. लागलीच हाती कंदील घेऊन रख्माबाई शेजाऱ्यांच्या घराकडे गेली व शेजारणीला घेऊन राजवाड्याकडे निघाली. गावाच्या खालच्या आळीला राजवाडा. तिथे मिराबाई नावाची दाईन राहात असे . ह्या दोघी जणी कंदील घेऊन मिराबाईच्या घरा जवळ गेल्या व मिराबाईला आवाज देऊ लागल्या. तोच दोन कुत्रे त्यांच्या अंगावर धाऊन आले. व जोर जोरात भुंकू लागले . रख्माबाईने मिराबाईला परत दोन आवाज दिले. मिराबाई गाड झोपेत होती. ती एकदम दचकून उठली. रख्माबाई मिराबाईला घेऊन आपल्या घरी आली. तोवर कांताला असंख्य वेदना सुरु झाल्या होत्या. कांताची सहनशिलता संपली होती. फारच वेदना होऊ लागल्या. तोच रख्माबाईने संतुबाला निरोप द्यायला शेजारच्या अण्णाला व रामभाऊला सांगीतले. लागलीच अण्णा, रामभाऊ हाती काठी अन् कंदिल घेऊन शेताच्या रस्त्याने निघाले. रस्ता नवीन होता. शिवारही त्यांच्यासाठी परखच होतं. रात्र अंधारी होती. कोठे काहीच दिसना, जाळीतून खुडखुड वाजण्याचा आवाज अधून मधून यायचा. टिटवी जोरजोरात ओरडत होती. अण्णाच्या मनात एक एक कल्पना येऊ लागली. पण ते काहीच बोलले नाही. कारण रामभाऊला काही गोष्टीचा अनुभव नव्हता. कसेतरी एकदाचे संतुबाच्या वावरात पोहचले आणि संतुबाला ही वार्ता कळवली. तोच संतुबाने आपली बैलगाडी जुपली, बकऱ्या गाडीत टाकल्या आणि तशीच बैलगाडी घराच्या दिशेने काढली. रस्ता फारच खराब होता. बैलगाडी जोराने हाकलता येत नव्हती.

तरी संतुबा जमेल तशी जोरात गाडी हकत होता. पण रस्ता काही उरकत नव्हता. कसे तरी घरी पोहचला. घरी कांताची डिलेवरी झाली होती. मुलगा झाला. परंतु कांताची तब्येत जास्त खराब होऊ लागली. काय करावे काही सुचना. जवळपास दवाखाना नव्हता. त्यासाठी तालूक्याच्या गावाला जावं लागत होतं. तोच अण्णा बोलले, "संतुबा गाडी जूप ताबडतोब. तब्येत जास्त हाय."

संतुबाचे हात पाय चालेना. त्याच्या अंगाचे थर थर कापरे होऊ लागले. कशी बशी संतूबाने गाडी जुपली व गाडीत दोन गोधड्या टाकल्या अन् अण्णा, रख्माबाई, मिराबाई, असे चौघेजण कांताला घेऊन तालुक्याला निघाले. कांता बेसुध पडली होती. संतुबा बैलगाडी जोराने हाकत होता. त्याच्या काळजाने ठाव सोडला होता. एक एक विचार मनात येऊ लागले. बाळाची तब्यत तशी ठीक होती. 'कांताचं काय? कांताविना मी जगू शकणार नाही. आपलं कसं होईल?' असे अनेक विचार संतुबाच्या मनात घोळत होते. तोच एकदाचे दवाखान्यात पोहचले. सकाळी सकाळी लोकं झोपेत होते. संतुबाने आवाज देऊन जागी केले. तसे कंपाऊंडरने गेट उघडले व विचारपुस केली. ठिक आहे. डॉक्टर यायला वेळ लागेल. हा सरकारी दवाखाना आहे. डॉक्टरची येण्याची वेळ दहाची आहे. तसा मी निरोप देतो. कांताची तब्येत जास्त झाली होती. थोड्याच वेळात डॉक्टर आले. कांताला तपासून इंजेेक्शन देऊन सलाईन चालू केले. पण वेळ जास्त झाला होता. असे डॉक्टर म्हणाले, "आपण प्रयत्न करू". शेवटी त्याचे फळ काही मिळाले नाही. जे व्हायचं तेच झालं. कांतानी शेवटचा श्वास सोडला. आणि संतुबाच्या पायाखालची जमीन हादरली. संतुबाला आकाश पाताळ एक झाले. संतुबाने जोराचा हंबरडा फोडला. संतुबाची आई रख्माबाई धाय मोकलून रडू लागली. काय करावं काही सुचना. अण्णा व मीराबाईंनी त्यांची समजूत काढून घराकडे निघाले. घरी बाळाला आईची उब हवी होती. त्याला आईचा पान्हा हवा होता. ते जोरजोरात टाहो फोडून रडत होतं. तोच संतुबाची गाडी गावाच्या जवळ आली. आणि एकच गलका झाला. भराभरा सारा गाव गोळा झाला. नातेवाईक व पाहूणे मंडळी जमा झाले . सर्व विधी पार पडला. हळू हळू चार दिवसात पाहूणे कमी कमी होत गेले. रख्माबाई संतुबाला सावरू लागली, बाळाची ही देखभाल करु लागली. बाळ तसं टवटवीत होतं. रख्माबाई त्याला बाटलीतून गाय, बकरीचं दुध पाजत असे. त्याचं नाव 'बंडू' ठेवण्यात आलं. त्याला सर्वजण बंड्या म्हणायचे. इथूनच बंड्याचा वनवास सुरु झाला. बंड्याची आजी त्याचा सांभाळ करू लागली. बंड्या लहानचा मोठा हाेऊ लागला. आजीच्या छायेखाली खेळू लागला. रख्माबाई आता फारच थकली होती. घरचा काम धंदा करणे, बंड्याला सांभाळणं तिला फार जिकरीचे होऊ लागले. फारसं दिसत नव्हतं. हात पाय ही साथ देत नव्हते. त्यामुळे ती मोठ्या हिमतीने संतुबाला म्हणाली,

"बाळा संतुबा माझं आता काही खरं नाही. आता नजर कमी झाली. हात पाय काम करत नाही. बंडू आता गल्लीनं पळाया लागलाय, तव्हा मी म्हणते तू एखादी बायको करून घे".

हे ऐकून संतुबा म्हणाला, "आई तू हे काय म्हणतेस असं कसं जमंल? नाही नाही हे मला मान्य नाही. माझ्या बंड्याचं काय होईल? हे जमणार नाही. माझ्या बंड्याला लई वनवास होईल. अशी कोणती बायको मिळेल, की ती माझ्या बंड्याला पोटच्या लेकरावाणी जीव लावंल. नाही आई, असं काही बोलू नको."

आईने गावातल्या चार शहाण्या माणसांना सांगून संतुबाला दोन गोष्टी समजून सांगण्यास सांगीतल्या, तव्हा संतुबा राजी झाला. पंरतू त्याला बंड्याची फार चिंता वाटायची. पण संतुबाचा नाइलाज झाला होता. एक दिवस होकार देताच मग त्याच्या नातेवाईकांनी सोयरीक आणली व कुठली तरी गंधर्वाची मुलगी शोधली आणि शॉटकट मध्ये कार्यक्रम उरकून घेतला.

आता संतुबाच्या संसारात नविन 'दुर्गा' नावाची बायको आली. संतूबा आपला साधाभोळा माणूस. शिक्षण वगैरे काही नव्हतं. बायको मात्र फॅशनेबल मिळाली. नट्टापट्टा करून राहू लागली. संतुबाला हे आवडत नसे. तिने नवलाईचे नऊ दिवस दाखवले. आई व बंडू सोबत काही दिवस बरी वागली. नंतर तिने हळू हळू आपले दुर्गेचे रूप धारण केले. आपल्या वागण्यात बदल करू लागली. आई व बंडूकडे लक्ष देईना. आईची बंड्याची खाण्या पिण्याची आबाळ होतं असे. आई सोबत भांडण करु लागली .

असे तसे तीन वर्ष गेले. दुर्गाला एक मुलगा, एक मुलगी झाली. बंड्या शाळेत जाऊ लागला. आईनं अंथरूण धरलं होतं. संतुबाला कामानिमित्त सतत घराबाहेर राहावं लागत असायचं. संतुबाने दुर्गाला एक दोन वेळा समजून सांण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काही परिणाम झाला नाही. आइने अन्नपाणी सोडले होते. संतुबा आईच्या गोळ्या औषधाची काळजी घेत असे. पंरतू तब्येतीने साथ दिली नाही. त्यातच आईचे निधन झाले. संतूबावर आणखी दुःखाचा डोंगर कोसळला. कसा बसा संतुबा यातून मार्ग काढू लागला. 'आता बंडूचं कसं होईल?' याची त्याला फार काळजी वाटू लागली. आई ही बंडूचा फार मोठा आधार होती. बंड्याला आता आजीविना जगण कठीण झालं होतं . येथूनच बंड्याचा खरा राम वनवास सुरू झाला.

त्याची सावत्र आई खाण्या पिण्यात दुजा भाव करू लागली. घरकाम बंड्याकडून करुन घ्यायची. लहान भाऊ सुद्वा सावत्र म्हणून मारायचा. आई इतकी खराब होती की, बंड्या सकाळी लवकर नाही उठला तर गरम सराट्याचे चटके देई. बापाला सांगितलं तर त्रास कमी होण्या ऐवजी जास्त होत असे. बंड्याला चांगला घास कधी मिळालाच नाही. ती घरात कुणाचं चालू देत नसे. संतुबा तिला फार कंटाळून गेला होता. बंड्या शिळं पाकं खाऊन दिवस काढत होता. बंड्या आता दहा वर्षाचा झाला होता. या त्रासाला तो खूपच कंटाळला होता. आता एकच निर्णय केला, 'घर सोडून निघून जाणे'. आणि एक दिवस तेच खरं ठरलं, बंड्या कोणाला ही काही न सांगता रात्रीच घर सोडून गेला, तो कधीच परत आलाच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy