गंध
गंध


पावसाने शिंपडलेल्या जलधारानी धरतीच अंग अंग मोहरून गेलंय, तिच्या मातीतून दरवळणारा तो सुगंध त्या मोहक प्राजक्ताला ही कशी भुरळ पडतोय पहा ! झाडावरून अलगद सर्व फुले तिच्यावर सांडत तो प्राजक्त आपल्या प्रेमाची कबुली देतोय, त्याची फुल ही कशी अगदी तिच्याच सुगंधात तल्लीन झाली आहेत, पण हे सर्व पाहून एरव्ही तठस्त वाटणारा हा गुलमोहर बघ कशा इर्षेने पेटलाय नुसता. आपल्या गडद केसरी रंगाच्या रागाने जणू काही तो वृक्ष लालबुंद झालाय. पण अलगत तोही शिंपडतोय त्याच्या लाल केसरी फुलांच्या रंगाचा सडा त्या भिजलेल्या भूमीवर. पण तिच्यावर सर्वस्व झोकून दिलेला प्राजक्त जराही पाहत नाही ह्या गुलमोहराकडे, तो झालाय फक्त त्या मृदुगंधात रममाण, त्याचं अस्तित्व ही आता त्या मातीत मिसळून एक सुगंधाच अद्भुत रसायन जन्माला येतंय बघ !
मी ही अशीच तुझ्या आयुष्यात त्या प्राजक्त फुलासारखी दरवळत राहीन, I promise, आदिती हे सर्व अलंकारिक वर्णन प्रणवला सांगत होती. तिचा छंदच होता अलंकारिक भाषेत बोलण्याचा आणि निसर्गाची वैखरी सांगण्याचा. त्यालाही ते आवडायचं. तोही तिच्या त्या बोलण्यात गुंतून जायचा. दोघंच मेतकूट कॉलेज मधेच जमल होत, तिला प्राजक्त खूप आवडायचा म्हणून तिने त्याला प्राजक्ताच झाड गिफ्ट केलं होतं. तो खोडकर पणे म्हणालाही, "वा ! वाढदिवस माझा पण गिफ्ट तुझ्या आवडीचं." ती म्हणाली "हो तसं समज हवं तर, नाही तरी पुढच्या महिन्यात मी येणार आहे तुझ्या घरी कायमची राहायला आणि तेव्हा हा प्राजक्त रोज फुलांचा सडा घालील आपल्या अंगणात आणि तू माझ्यासाठी वेचून आणत जा ती फुल." मग तो ही लाडिकपणे म्हणाला, "जो हुकूम मेरे आका ",
पण दोन दिवसांनी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मोबाईल कनेक्टिव्हिटी गेली. सगळं अंधारून आलं. काही वेळाने सर्व लाईट्स ही गेल्या. पावसात वाहनं ठप्प झाली. लोक मानेपर्यंत साचलेल्या पाण्यातून मार्ग काढून चालत होती आणि आदितीही रस्त्यात कुठे तरी अडकली होती. पण फोन बंद झाल्यामुळे तो तिला संपर्क करू शकत नव्हता. शेवटचा संपर्क झाला तेव्हा ती ऑफिसमधेच होती. काल सकाळपासून बरसणाऱ्या प्रचंड रौद्र सरी आताशा थांबल्या होत्या. रवीराजाने कितीतरी वेळाने दर्शन देऊन धरा सोनेरी केली होती. तो उठून अंगणात आला. प्राजक्ताचं झाड सुरक्षित होतं. त्या पावसातही त्याला काही झालं नव्हतं. प्रणव तो पारिजात पाहून सुखावला आणि मनात विचार केला, ह्या इतक्या पावसातही आदितीने ह्या झाडाचाच विचार केला असणार. आली असेल एव्हाना ती घरी. असं म्हणून सहज त्याचं लक्ष खाली पडलेल्या प्राजक्त फुलांच्या सड्याकडे गेलं. ही फुलच तिच्यासाठी ओंजळीत भरून घेऊन जावीत हा विचार करून त्याने फुलं वेचायला सुरुवात केली. फुलांनी ओंजळ भरून गेली आणि पावलं अदितीच्या घराकडे निघाली, अतिउत्साहात तिच्या घराजवळ पोहचला होता, पण घराभोवती गर्दी दिसली. काय झालं म्हणून त्याने पावलांचा वेग वाढवला आणि लगबगीने तिथे पोहचला.
तिचं मृत शरीर फक्त त्याच्यासाठीच तात्कळत ठेवलं होतं. आदल्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने तिचा बळी घेतला होता. एका झाकण नसलेल्या गटारात तिचा पाय अडकून तिचा देह त्यात बुडाला. जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा तो मृतदेह त्या गटारात अडकलेला काही माणसांना मिळाला होता. तो हे सारं ऐकून आणि पाहून जागीच खिळून राहिला, फुलांनी भरलेली प्राजक्ताची ओंजळ तिच्या पार्थिवावर रिती केली आणि डोळ्यातले अश्रू तसेच गोठवून तिथून कुणाशीही न बोलता निघाला.
अचानक विजांचा कडकडाट झाला आणि त्याचे भूतकाळात बंद डोळ्यांनी डोकावणारे मन भानावर आले. तो तसाच हताश होऊन त्याच गुलमोहराच्या बुंध्याजवळ बसला होता. आदितीच्या आठवणीत हरवला होता. मनात विचार करू लागला आजचा पाऊस तिचीच आठवण घेऊन आलाय. तिला ही खूप आवडायचं पावसात भिजायला. त्यात धुंद होऊन नाचायला. पण ह्या प्रचंड कोसळणाऱ्या पावसाने तिला कायमच माझ्या पासून दूर केलं. बहुतेक माझ्या प्रेमापेक्षा पावसाचंच तिच्यावर अधिक प्रेम होतं आणि तो भरलेल्या डोळ्यांनी मिस्कीलपणे हसला. सगळ्या आठवणी काल घडल्यासारख्या आठवत होत्या त्याला. डोळ्यातून आसवांना ही बऱ्याच दिवसांनी बाहेरची वाट सापडली होती आणि गुलमोहर त्यांच्याकडे शांत स्तब्धपणे पहात होता. गुलमोहर त्याला त्याच्या मनातलं गुपित सांगू पाहत होता. पण तो काही ते ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता.
मग खोडकर वाऱ्याने मध्यस्ती करायची ठरवली आणि उनाड सैरावैरा वाहू लागला. वाहता वाहता शेजारच्या परिजातकाची ती मृदुगंधाशी लगट करणारी फुलं हळूच त्याने त्याच्या पायाशी आणून ठेवली आणि तिथल्या तिथेच वारा घोळू लागला. ती फुल ही आता त्याच्या पायाशीच रुंजी घालत होती. पावलांना फुलांचा नाजूक स्पर्श होत होता.
मधेच तो खोडकर वारा वाहताना ते प्राजक्ताच मृदुगंधाशी एकरूप झालेलं अद्भुत रसायन त्याच्याबरोबर घेऊन आला. पारिजात मग नकळत मातीच्या गंधासह त्याच्या हृदयाचा ठाव घेऊ लागला. ती फुल त्यांनी हातात घेतली. शांत होऊन डोळे मिटले. आदिती त्याच्या समोरच होती. तेच निखळ हास्य तिच्या चेहऱ्यावर होतं. त्याच्या हातातली फुल पाहून आदिती सुखावली, म्हणाली "माझ्याचसाठी आणलीस ना ही फुलं ! दे इथे" असं म्हणून तिने प्रणवकडून ती फुलं घेतली आणि आनंदाने डोळे मिटले त्या फुलांच्या गंधात क्षणमात्र सगळं हरवून गेलं आणि प्रणव हरवला तिच्या त्या चेहऱ्यावरच्या आनंद भावावर. त्याला आता त्याचं अस्तित्वच राहील नव्हतं. तो फक्त आदितीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. आदिती म्हणाली, "घे ही फुलं, अगदी सुकली तरी जपून ठेव, त्यात मी आहे, तू आहेस आणि आपल्या गंधित आठवणी."
धो धो पाऊस आता त्या गुलमोहराच्या जाळीदार छत्रीतून प्रणववर सरींचा अभिषेक करू लागला. त्या सरींचे ओघळ, मातीचा गंध आणि प्राजक्ताचा तो दरवळणारा सुवास आता त्याचं तनमन व्यापून उरला होता. तो ह्या सर्वात कुठेतरी हरवून गेला होता. पण त्याने आता स्वतःला शोधणं बंद केलं होतं. कारण त्याचं अस्तित्वच मुळी तिच्या प्रेमात होतं आणि ती त्याला सापडली होती. अनंतात विलीन झालेली आदिती, त्याला प्राजक्त फुलांच्या गंधात सापडली होती. गुलमोहर ही आता तो अंतरातला प्रेमाचा सोहळा पाहून मुग्ध झाला होता. ज्या पावसाने त्यांची ताटातूट केली होती, त्यानेच प्रणवला आदीतीच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. गुलमोहरही खुश होऊन आपल्या केसरी फुलांचा त्यावर वर्षाव करू लागला. बहुतेक अदितीच्या अस्तित्वाचं गुपितच त्याला सांगायचं होत. पुन्हा एकदा विद्युल्लता मेघ गर्जनेसह आसमंतात चमकली आणि त्याची प्रेमात विरून गेलेली समाधी भंग पावली. त्याने हळूच बंद मूठ उघडली. त्या मुठीत असलेली ती दोन फुलं त्याच्या हातच्या उष्णतेने कोमेजलेली दिसली पण तरी ती फुलं त्यांचा तो गंध त्याच्या तळहातावर ठेऊन गेली होती. अगदी तसचं जसं आदिती आपलं अस्तित्व त्या फुलांना देऊन गेली होती,
प्रणवने पुन्हा मूठ बंद केली. उठून गुलमोहराकडे पाहीलं आणि त्याला कडकडून मिठी मारली. मग दोन्ही हात पसरवून बरसणाऱ्या सरींना कवेत घेतलं. ती फुल खिशात ठेवली आणि आदितीसह आपल्या घरी जाण्यासाठी निघाला.