एक सुंदर संगीतमय प्रवास
एक सुंदर संगीतमय प्रवास
एक सुंदर संगीतमय प्रवास!!!
काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी मुलीला भेटण्यासाठी कात्रज येथील डेंटल कॉलेज ला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनं वर रिक्षा थांबवली...
पांढरा शुभ्र कुर्ता पांढरा पायजमा,घारे डोळे पांढरीशुभ्र धाडी आणि नियमितपणे पाच वेळा नमाज अदा केल्यावर कपाळावर ठळकपणे उठू दिसणारा काळसर गर्द ठिपका आणि डोक्यावर नमाजाच्या वेळी घालतात तशी टोपी..वय साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास..अशा रिक्षा चालकाने बाहेर मान काढली आणि शुद्ध मराठीत विचारले,"साहेब कुठं जाणार? ओलाच्या भानगडीत पडू नका, मी मिटर प्रमाणे नेईल ओला पेक्षा रिक्षा भाडे कमी लागेल.चलताय न ?"
लागलीच माझी ब्रिफकेस ठेवून मी आत बसलो त्याने लागलीच रिक्षा सुरु केली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
"काय साहेब कुठून आलात? तुमच्या बरोबर गप्पा मारल्यात तर चालेल ना? काय आहे बघा, मला सतत बोलायची सवय असल्याने गुपचूप बसवत नाही."
मी मनात म्हणल,अर्धा पाऊण तास लागेल पोहचायला, तेवढाच टाइम पास आणि श्रोता होण्याची चांगलीच सवय असल्याने सांगितलं तुम्ही बोला बिनधास्त, ऐकतोय मी!!
"साहेब, मी मुसलमान माझ्या तोंडून शुद्ध पुणेरी मराठी ऐकून आश्चर्य वाटत असेल ना.. पण या पुण्याच्या पाण्याचीच जादू आहे, इथे मराठीवर प्रेम करणारी, मराठी नाटक, संगीत ऐकणारी आम्हीही मंडळी आहोत. मी वसंतराव, भीमसेनजी, बाबूजी अशा अनेक नामवंत गायकांना साक्षात समोर बसून ऐकलंय. काय सूर लावायचेत मी त्या सुरात स्वतः च हरवून जात होतो..अजूनही ते प्रसंग डोळ्यापुढे आहे साहेब."
"अरे व्वा! नशीबवान आहात तुम्ही."
"साहेब तुम्हाला गाणं आवडत आवडत का?"
"गाता येई नाही..पण ऐकायला आवडत.तानसेन नसलो तरी कानसेन नक्की आहे."
"मी गाणे म्हणल तर चालेल का?"
"चालेल काय.. पळेल सुद्धा!!"मी उगीचच पी. जे. मारला.
त्याने तो स्व.वसंतराव देशपांडे, कुमार गधर्व,भीमसेन जोशी या सर्वं शास्त्रीय गायकांचा चाहता होता.
"साहेब स्व. वसंतरावांचे कट्यार दहा वेळा बालगंधर्वला प्रत्यक्ष बघितलं आहे "
वसंत रावांच्या कट्यार मधील अप्रतिम गीत, लागी कलेजवा कटार हे गीत अत्यंत सुरात गायला सुरुवात केली गाड्याचे वाजणारे कर्कश्ष हॉर्न त्यांच्या संगतीला असले तरी त्याच्या गाण्यात कोणताही व्यत्यय येत नव्हता.. अगदी एकदोन ठिकाणी स्टॉप वर थांबल्यावर सुध्दा तो विचलित होत नव्हता... बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्याच्या कानावर ही तान पडल्यावर, ते ही आश्चर्यचकीत होऊन दाद देत होते.
मी ही त्याच्या गायकीवर खुश होतो नकळत गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या. "बहोत खूब..खान साब" असे माझे शब्द कानावर पडल्यावर त्याने मागे वळून पहिले हसत म्हणाला, "साहेब ही दाद आम्हासाठी लाखमोलाची असतें.
साहेब, पुण्यात नेते कुणी लक्ष देत नाही वाटेत खूप खड्डे असल्याने हळू चालवतो आहे.... साहेब, वाटेवरून वसंतरावांचे जीवनाचे मर्म सांगणारे गीत आठवले म्हणू का? " मी इर्शाद म्हणालो. तो मुस्लीम असून असखलीत मराठीत बोलत होता आणि नकळत त्याच्या उर्दूचे शब्द माझ्या ओठी येत होते.
आणि त्यांने, "वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुलांफुलात चाललो " हे गीत सुरु केले जणू तो त्याचीच जीवनकथा सांगतो असे मला वाटतं होते.
"कला खूप ठिकाणी अधिवास करत असतें पण तिला योग्य सन्मान मिळेलच अस होत नाही... हेच खरे!"
गाण्याची सुंदर कला अवगत असून ही सत्तरीला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी उदरभराणासाठी रिक्षा चालवतो आहे. खरंच विदारक चित्र होते ते..
अजून दोन गीत आणि किस्से त्याने सांगितले आणि हो त्यातले एक गीत चक्क गीत रामायणातले होते "स्वयं श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती "
आणि हे गीत गातांना त्याच्या गीतात स्व.बाबूजी गायचे तेवढेच स्वच्छ उच्चार आणि भक्ती ओतप्रोत भरली होती.
कलाकारांना कोणाताही धर्म नसतो..कला चा हाच धर्म मानून ते साधना करत असतात.
बघता बघता लक्ष्मीनारायण चित्रपटगृह आले, मला वेळा कसा गेला ते कळलंच नाही, तो म्हणाला, "साहेब तुम्ही पण दर्दी दिसताय आता शेवटचं गाणं म्हणतो भैरवी आहे."
भैरवी, हा शब्द कानावर पडल्यावर मला धक्काचं बसला... एकदरीत त्याने खूप गाण्याच्या मेहफिल ऐकल्या असाव्यात... कुणीही गुरु नसलेला एकलव्य समोर बसून गात होतो.. व्यावसायिक गायक जरी तो झाला नव्हता तरी अशा चालू रिक्षातील संगीत मेहफिली असंख्य त्याने रंगावल्या होत्या.. आणि मग शेवटी त्याने "सजल नयन नीत धार बरसती " ही पंडित अजित कडकडे यांनी आमच्या गल्लीतील लोकमान्य गणेशोत्सवात कार्यक्रमाची सांगता करताना गायलेली भैरवी धीर गंभीर होऊन गायला सुरुवात केली. सोबत संगीताचा साज नव्हता तरी शुद्ध स्वरांची बरसात होत होती, साक्षात सरस्वती जिव्हेवर होती.शेवटची तान घेतली तेव्हा आम्ही भारतीय विद्यापीठा च्या कमानीतून आत प्रवेश करत होतो.
हॉस्टेल वर पोहचताच त्याने ब्रेक दाबला. मी त्याचे रिक्षा भाडे दिले.
गाणे कसे वाटले साहेब?
छान गायलास तू.
मी नकळत पाकिटातून दोनशे रुपये दिले. तो पैसे घेत नव्हता, मी म्हणालो, "ही तुझ्या गायकीची बिदगी समजून घे... खूप उत्तम गायलास तू."
"चीज होणे, म्हणजे काय असते.. हे त्याच्या गायन कलेला माहितीच नव्हते....तरी आनंद म्हणजे काय? आणि कसा मिळावायचा? हे ज्ञात असलेला तो आसामी नकळत सर्वांसाठी निरपेक्षतेने आनंद उधळत होता. "
