STORYMIRROR

HEMANT NAIK

Others

3  

HEMANT NAIK

Others

दिन दिन दिवाळी!!!

दिन दिन दिवाळी!!!

7 mins
185


रविवार १२.१०.२३

✍️हेमंत नाईक


अभ्यंगस्नान केले... मस्त वाटले.. पण लहानपणीची ती थंडी नाही.. बालपणी एकमेकांच्या स्नानाच्या वेळी फोडलेली लवंगी फाटक्याची लड, फुलबाज्या नाहीत .. पहाटे उडणाऱ्या फटाक्यांचा आवाजही खूप कमी झाला आहे . पत्नीने तेल उटणे लावून औक्षण केले हेही नसे थोडके ..


"आज माझ्या घरी ही दिवाळी

सप्तरंगात न्हावून आली

आज माझ्या घरी ही दिवाळी!!"


अष्टविनायक चित्रपटातील मधील अप्रतिम गाण्यांपैकी एक, सचिन आणि वंदना पंडित यांचे वर चित्रित झालेलं दिवाळीचे हे सुंदर गीत सर्वांनाच लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची आठवण देते.पहिल्या पाडव्याला पतीने दिलेली भेट आणि जावयाचे दिवाळीला सासरी झालेले कौतुक अविस्मरणीय असतें.


आज मी मात्र अजून थोडे मागे जाऊन बालपणी अनुभवलेल्या दिवाळीबद्दल लिहिणार आहे.


दिवाळीला आप्ताची गर्दी

आतषबाजी गप्पाची चाले

भरपूर पूर आनंदाला येई

बालपणीचे क्षण आठवणीचे

सरले ते दिन , नवंदिन आले 


लाडू करंज्या शंकरपाळी

सर्वंच होती घरी बनवली

आता तयार फराळाचे डब्बे 

खाण्यास फार कमी ते उरले

सरले ते दिन , नवंदिन आले 


मिणमिणत्या सुंदर पणत्या

पिवळ्या गर्द झेंडूच्या माळा

घरोघरी बाल बांधती किल्ले 

आज तयास सर्वं ते विसरले

सरले ते दिन , नवंदिन आले 


पर्यटनाची ओढ ती न्यारी 

आकाशकंदील विझवूनी 

पर्यटना दिवाळीस निघाले

घराला मोठे कुलूप लागले

सरले ते दिन , नवंदिन आले  


दिवाळी अंकांची ती दिवाळी

वाचण्याची होती मेजवानी

चढाओढ चाले वाचण्याची

तेही ओ टी टी, टिव्हीने ग्रासले

सरले ते दिन , नवंदिन आले 


वाचनालयात खूप होती गर्दी

पुस्तकंमासिक नवनवी ती 

आज मात्र ती ओस पडली

वाचनसंस्कृती पडली मागे

सरले ते दिन , नवंदिन आले 


जीवनी संपन्नता वाढली 

रोज दिवाळी सुरु जाहली

नित्य कपडे, रोज मिठाई

नाही उरली कुठे नवलाई

सरले ते दिन , नवंदिन आले


गेल्या पन्नास वर्षात आपल्या देशात संपत्तीक स्थिती चांगली झाली आहे त्यामुळे त्यावेळी फक्त्त सणासुदीला होणारी खरेदी, गोडधोड पदार्थ आता केव्हाही आणि नित्य होत असतात. त्याच्यातली अर्थता कमी झाली आहे....पूर्वी जेव्हा गरिबी होती तेव्हा कपड्याचे फटाक्यांचे महत्त्व, आता पैसा भरपूर आहे सगळं रोजच मिळतं त्यामुळे रोजच दिवाळी त्यामुळे दिवाळीचा अप्रूप कमी झालय कदाचित....


आज घेऊन येतोय दिवाळीच्या काही जुन्या आठवणीची आतषबाजी...


दिवाळी सुगीचे दिन सरल्यावर सर्वत्र साजरा होणारा आणि आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा सण.. त्यावेळी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी एकत्र जमून एका ठिकाणी दिवाळी साजरी करायची पद्धत. बर, दोन तिनं काका,काकू, दोन आत्या आणि अनेक भावंड आजी आजोबा असे जवळपास पंधरा वीस जणांचे मोठे कुटुंब ठिकठिकाणी असायचे ... कोणी नोकरीला बाहेरगावी असला तरी दिवाळीसाठी सर्वं गावी एकत्रित साजरी करायचेत दिवाळी!!


पूर्वी विद्युत लाईटींग कुठेच नसायची. आमच्या गल्लीत बहुतेक घर , समोर बाल्कनी असलेले.. दोन मजली.. आणि प्रत्येक घरासमोर सर्वांनी सोडललेली दहा फुटाची ओपन स्पेस आणि समोर कंपाऊंड... वर मालक आणि खाली कुटुंबाचेच सदस्य असलेले भाडेकरू रहायचेत. बाल्कनी आणि कंपाऊंड वर दोन तिनं फुटावर ठेवलेल्या मंद तेवणाऱ्या पणत्या..बांबूचे कामट्या आणि जिलेटिन पेपरचे घरीच तयार केलेले आकाश कंदील आणि या कंदीलातही पणती ठेवण्यासाठी केलेली जागा असायची.घरोघरी अंगणात काढलेल्या सुंदर भल्यामोठ्या सुंदर रंगसंगती असणाऱ्या सर्वांनी मिळून काढलेल्या रांगोळ्याआणि प्रत्येक वाडयात बालचमुंनी मोठ्यांची मदत घेऊन कोपऱ्यात बनवलेले अप्रतिम किल्ले!!  असे हेj सोज्वळ सुंदर गल्लीचे चित्र अजूनही डोळ्यापुढे आहे , आता बरेच घर रिकामी असल्याने आणि काळही बदलल्याने ते चित्र आता नाही.


चायनीज लाइटिंग च्या प्लास्टिकच्या पणत्या खऱ्या पणत्याची जागा नक्कीच घेऊ शकत नाही.आताच्या भडक लाइटिंग माळा आणि शांत मंद तेवणाऱ्या रांगेतील पणत्या यांची तुलनाचं होऊ शकत नाही. साईबाबाच्या एका चमत्कारात त्यांनी दिवाळीत पाण्यावर पणत्या लावल्या होत्या. पाण्यावर एलईडीचा दिवा लागणाऱ्या प्लास्टिकच्या पणत्या देखील या वर्षी मार्केटमध्ये आल्या आहेत.पणतीमध्ये बटणाचे काम पाणी करते. कारण पाण्यातून विद्युत प्रवाह सहज वाहू शकतो. म्हणजेच पणतीच्या वर दिसणाऱ्या त्या दोन धातूच्या पट्ट्यांचा विद्युत प्रवाह एकमेकांना जोडण्याचे काम आपण ओतलेले पाणी करते. जसे आपण त्यातील पाणी ओतून देतो तसा तो ‘एलईडी’ बल्ब विझून जातो.


दिवाळीच्या या मंद पवित्र तेवणाऱ्या पणतीची सर मात्र कशालाच नाही.!!


तेवणारी ती पणती

लवलवे हवेत ज्योत 

जिवंत तिचं अस्तित्व

दिवाळीत दर्शविते..


गृहलक्ष्मी नटूनथटून 

तबकात पेटवे पणत्या

हळद कुंकू त्यां वाहूनी 

अवघे घर ती सजवते..


जिलेटिन पेपराचा

कंदील अष्टकोनी

बनला तो घरोघरी

प्रवेशद्वारी टांगतसे ..


उजेड तो देऊनी

अंधःकार सारुनी

ज्योत पणतीची

लक्ष्मीस साद घालते ..


भलीमोठी रांगोळी 

रंग भरले सप्तरंगी

भरले मिळून सर्वांनी

एकत्र आज आले..


घर दिवाळीत सजीव 

झेंडूमाळानी सजते

पणतीच्या रोषणाईत

हसतांना मज दिसते..


सण हा सर्वात मोठा

काळानुरूप जरी वेगळा

ना आनंदा कधी तोटा

घरोघरी आनंद नांदे.. 


आज "हम दो और हमारा एक!" या व्यावहारिक विचारसरणीने काका, मामा,मावशी,आत्या आदी नाते कळत नकळत नष्ट होत आहेत. त्यामुळे जुने असलेले भरगच्च आप्त असलेले दिवाळीचे तसें स्वरूप पुढे कदापि शक्य नसले तरी दिवाळीचे महात्म्य तेवढेच आहे.. साजरा करण्याचे फक्त्त स्वरूप बदलले आहे.


त्यावेळी फटाक्याची आतशबाजी करताना आपटबार एका लोखंडी खोबणीत दारू भरून वर सळई लावून जमिनीवर आपटल्यावर येणारा कानठळ्या बसावणारा आवाज काळाच्या ओघात पडद्याआड गेला आहे. घरोघरी फराळासाठी जाणे आणि

 "काकू, तुमच्याकडची चकली एकदम कडक!!"

असे कौतुकाने म्हणणेही मागे पडले कारण आता चकल्या सर्वाकडे एकाच प्रसिद्ध ठिकाणाहून विकत घेतल्या जातात त्यामुळे सारख्याच असतात सर्वांकडे.लहानपणी एका दिवाळी अंकात एका सुंदर व्यन्ग चित्र अजूनही स्मरणात आहे फराळाचा लाडू रेल्वेरुळावर ठेवून तो तुटण्यासाठी एक गृहस्थ येणाऱ्या गाडीची वाट पहात बसलेला..ही अतिशयोक्ती असली तरी फराळ क्वचित बिघडतही असत . मऊ पडलेलं शेव.. चकल्या झाल्या की "मोहन कमी पडलय! " हा बायकांचा डायलॉग कधीच कळला नव्हता.. तेलास मोहन हा समानार्थी शब्द आहे हा कालांतराने शोध लागला.एका मित्राकडे तर सातत्याने तीस वर्षे नरक चतुर्दशीचाचा पहिला सकाळचा गल्लीतील सर्वं मित्रमंडळीचा एकत्रित फराळ अगदी तो पुण्यास शिफ्ट होई पर्यंत कायम आरक्षित होता.


फटाके विकत घेण्यास आजोबा सोबत आठ नातवंडाची फौज जात असू.. घरी आल्यावर सर्वांत त्याची सारखी वाटणी होत असे.. चौथी पाचवीत असताना उदबत्तीने सुतळी बॉम्ब चे टाइम बॉम्ब करायचे तंत्र अवगत झाले होते. सुतळी बॉम्बच्या वातीला किचित मोठी उदबत्ती लावून केलेला टाइम बॉम्ब उदबत्ती पेटवल्यावर काही वेळाने उदबत्तीचा जळत जळत वातीला स्पर्श झाला की वाट पेटून तो फुटायचा... हीच कल्पना घेऊन एकदा आम्ही मित्रांनी एकदा, हवेत उंच जाणारे गॅसचे दोन तिनं फुगे एकत्र बांधून तो हवेत उडवून उंच हवेत बॉम्ब फोडण्याची आमची कल्पना होती. त्याप्रमाणे एक इंच उदबती जाळायला दीड मिनटं लागतात हा हिशोब करून फटाक्याच्या वातीला वाती पेक्षा एक इंच मोठी उदबत्ती लावून ती पेटवून सुतळी बॉम्ब गॅसच्या फुग्याला बांधून गच्चीवरून हवेत सोडला खरा ... पण गणित चुकले तो उंच उंच जाता जाता सुतळी बॉम्बच्या वजनाने हळूहळू खाली येऊ लागला.. आणि तिनं चार घर सोडून असलेल्या एका मित्राच्या टॉयलेटच्या खिडकीजवळ त्याचा मोठा स्फोट होताच घाबरून लागलीच बाहेर आलेले त्याचे काका... आणि आमचा हा फसलेला प्रयोग..अजूनही चांगलाच लक्षात आहे.

कुणी असा उपद्याप केला? हे सुदैवाने इतर कुणासही कळलं नव्हतं.


गॅलरीतून पणतीच्या ज्योतीवर लवंगी फटका पेटवून खाली फेकताना आणि त्याच वेळी नेमका खाली राहणारा मित्र अचानक बाहेर आल्याने त्याचे कानाच्या पाळी जवळ फुटला होता... त्यावेळी सुदैवाने त्यास जास्त इजा झाली नसली तरी या बद्दल माझे सर्वं फटाके जप्त करून त्या वर्षी फटाके न फोडण्याची मला मिळालेली शिक्षा लक्षात आहे.


"फटाके म्हणजेच दिवाळी असे लहानपणी वाटे." 


दिवाळीत फुलबाजी

रंगीत उडे तडतडी

कुंडी भुईचक्र शोभेची

आकर्षण दिवाळीचे


हजार फटाक्याची माळ

दणक्यात लक्ष्मीचे पूजन

रॉकेट बाण उंच उंच 

नभी आतशबाजी होतसे


टिकल्यांच्या माळेने

सज्ज झाली बंदूक

चोरपोलीस बालखेळ

पात्र जरी ते बदलले


नागाच्या त्या गोळ्या

रंगीत पेटती काड्या 

पेटवता काळा नाग

भूमितुनी प्रगटतसे..


हातचक्र गोलगोल

जणू ते चक्र सुदर्शन

उधळे रंगीत प्रकाश

अंधार तो दूर जाहला..


फटाक्याची आगगाडी

दोरीवर सरळ घावणारी..

जाण्या येण्याची ती वारी

ती इतिहासात गेली.. 


टॉर्च आणि वायर लांब 

मॅग्नेशियम हो त्यात

पेटवता लख्ख प्रकाश 

डोळे ते दीपले तेजाने..


मध्यरात्री सुतळी बॉम्ब

फोडती काही ते द्वाड

निद्रेचा करुनी नाश

संतोष अघोरीं उगा असे .. 


एकसष्ठ वर्षाची दीपमाळ

राहो अखंड तेवत

आनंदाचे जपा क्षण

तेच फक्त्त उपयोगी...


एक नंबर शाळेच्या ग्राउंड वरचा क्रिकेटचा सामना वर्षातून एकदा दिवाळीस रंगायचा अगदी भारत पाकिस्थान या सामन्या इतकी रंगत असायची... बहुदा आम्हीच जिंकायचो. धर्म वेगळे असले तरी एकमेकांबद्दल कायम जिव्हाळा होता व आहे.


लगोरी हा कालबाह्य झालेला खेळ दिवाळीत गल्लीत दुपारी आवर्जून खेळला जायचा. जवळपास १५ ते २० जण असायचेत. खूप मजा असायची.


दिवाळी वरूनच दिवाळ हा शब्द आलाअसावा.. व्यापारी पूर्वी वर्षाचे सर्वं देण्याघेण्याचे हिशोब दिवाळीत पूर्ण करत असल्याने दिवाळी पर्यंत व्यापारी वर्ष असे. घरासमोर दिवा उलटा ठेवून पैसे देण्याची असमर्थता सांगणे म्हणजे दिवाळ काढणं. पण एका व्यापारी कुटुंबातील मित्राकडून, "अरे उसने चार बार दिवाला निकाला है बहोत मालदार असामी है l " असा कोड्यात टाकणार संभाषण कानी पडल्यावर, "दिवाळ काढणं चांगलं की वाईट? " हा प्रश्न तेव्हा बालमनाला पडला होता.


दिवाळी अंक दिवाळी चे प्रमुख अंग होते..दीडशे वर्षे जुन्या सार्वजनिक वाचनालयात धनतेरस पासून लालना,माहेर, आवाज,किस्त्रीम, जत्रा, आवाज आदि अनेक दिवाळी अंकाचे वाटप सुरु व्हावयाचे. आठ दिवसापूर्वी आईसाठी दिवाळी अंकाची वर्गणी देण्यास गेलो असताना इंटरनेट, व्हाट्सअप,टी व्ही, ओटीटी च्या जमान्यात वाचक कमी उरल्या मुळे दिवाळी अंक मागवणे बंद झाल्याचे कळले. कधी काळी गर्दीने फुलणारी लायब्ररी ओस पडली आहे. दिवाळी अंक प्रकाशन संख्याही रोडावली आहे. माझ्या सारखे आजीवन सदस्य आहेत पण तरुण मंडळी सर्वं गायब झालेली असे विदारक रया गेलेले चित्र वाचनालायचे झाले आहे. "अलेक्सा,. अमूक अमुक दिवाळी अंक वाच." असा आधुनिक काळ जवळ आलेला दिसतोय.असो.


दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज...सर्वं भावंड एकत्र जमल्याने भाऊबीजेला सर्वं भाऊबीजेचा ओवाळण्याचा कार्यक्रम तासभर चालायचा.. बहिणींना मिळणारी ओवाळणी पाहून मलाही द्या असा पहिलीत केलेला मी केलेला हट्ट आणि मग या हट्टाचे आजोबाकडून मिळालेले पाच रुपये आणि आईने काढलेल्या समजूतीनंतर मला भाऊबीजेचे महत्व कळले. 

काळा बरोबर आपल्या भुमिका ही बदलतात.

यंदा दिवाळीत दोन नातवाबरोबर हा आजोबा दिवाळीत फटाके कसे फोडायचे हे त्यांना शिकवतो आहे. आजीने नातवांसाठी घरीच फराळ तयार केला आहे. आजोबाला मात्र, " दिवाळीचा फराळ लिमिटमध्येच घ्या नाहीतर सकाळी फिरण्याचा उपयोग नाही. " असा नेहमीचाच सौं कडून सल्ला न ऐकण्यासाठीच दिला गेलेला आहे.. मी मात्र परत लहान होऊन नातवंडा बरोबर परत बालपण एन्जॉय करतोय.

"मनात समाधानाचा आकाशकंदील आणि सात्विकतेचा दीप पेटवता आला तर रोजच सुखाची दिवाळी लख्ख उजळून निघेल आणि फटाक्याच्या आतषबाजीसारखा आनंदास महापूर येईल."

पण सण वार रीती रिवाज परंपरा ह्या आपणच जपायला हव्यात.. पुढच्या पिढीला ट्रान्सफर करायला हव्यात.... त्यामुळे चला आणि उत्साहाने दिवाळी साजरी करूया.  

दिवाळीच्या प्रत्येकाच्या गोड आठवणी असतीलच .. त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात .

या दिवाळीत गोड आठवणी अजून समृद्ध व्हाव्यात, सर्वांना सुखी, आरोग्यदायी, भरभराटीच्या जीवनासाठी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन लिहिणं थांबवतो.


Rate this content
Log in