Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Swamini Chougule

Drama Romance


3  

Swamini Chougule

Drama Romance


दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट

दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट

18 mins 459 18 mins 459

   आज श्वेताचा टिपिकल कांदेपोह्याचा कार्यक्रम होता. पण म्हणावा तसा उत्साह तिच्या वागण्यात दिसत नव्हता. तिची आईच बळे-बळे तिला ही साडी नेस असा मेकअप कर म्हणून मागे लागली होती. श्वेताने मात्र आईकडे साफ दुर्लक्ष करत एक साधीशी साडी नेसली.

 

    श्वेता पस्तीस वर्षांची गोरी, नाकी-डोळी नीटस जराशी वयोमानानुसार भरलेल्या अंगाची घटस्फोटीत मुलगी. तिला सांगलीतीला एका घटस्फोटीत मुलाचे स्थळ सांगून आले होते. मुलगा अनुदानित शाळेत शिक्षक होता. श्वेता ही तशी बी.ए. डी.एड होती. पण नोकरीला मात्र नव्हती आणि तिला आता नोकरी करण्यात इंटरेस्ट ही नव्हता.


      मुलाकडची मंडळी आली सुशांत शेलार मुलाचं नाव होतं. तो ही गोरगोमटा धिप्पाड शरीर यष्टीचा मुलगा वय पस्तीसच. जुजबी विचारपूस झाली आणि श्वेता बाहेर आली. सुशांतने तिला नजर वर करून नीट पाहिले ही नाही आणि श्वेताने ही त्याला पाहण्याची तसदी घेतली नाही. सुशांतच्या आई बोलल्या.


सुशांतच्या आई,“ दोघांना काही बोलायचे असेल तर बोलू द्या एकांतात.”


श्वेताचे वडील,“ हो का नाही शेवटी संसार त्यांना करायचा आहे” 


   हो- नाही करत गच्चीवर पाठवले दोघांना ही! दिवस मावळतीला आला होता. मस्त गार वारा सुटला होता उन्हाळ्याचे दिवस असल्याने गार वाऱ्याचे झोत मनाला आणि शरीराला सुखावत होते. श्वेता आणि सुशांत मात्र खुर्चीवर अवघडून बसले होते. काय बोलावे ते दोघांना ही सुचत नव्हते. शेवटी श्वेताने बोलायला सुरुवात केली.


श्वेता, “ माझ्या विषयी तुम्हाला सगळे काकांनी सांगीतलेच असेल तरी काही गोष्टी मला क्लेअर कराव्याशा वाटतात. मी स्पष्टच बोलते. मी एक स्वतंत्र विचारांची व कोणत्याही गोष्ट घेताना प्राईज टॅग न पहाणारी,दोन-तीन महिन्यातून पार्ललला जाणारी व कोणाचा ही शिरजोर सहन न करणारी फटकळ मुलगी आहे आणि हो व्यसनी माणसांचा मला तिटकारा आहे. जर तुम्हाला कोणतेही व्यसन असेल तर ते आत्ताच सांगा” तिच्या बोलण्यात कडूपणा स्पष्ट जाणवत होता. तिच्या कटू अनुभवातून तो आला असेल कदाचित.ती खाली मान घालून बोलत होती.


   हे ऐकून सुशांत तिला निरखून पाहत उत्तरला.

सुशांत, “ मला एक व्यसन आहे ते म्हणजे पुस्तके वाचण्याचे दुसरे कोणतेच व्यसन मी करत नाही आणि हो मला वाटत प्रत्येक माणसाने स्वतंत्र विचारच असावं आणि प्राइज टॅगच म्हणाल तर ते मी ही पाहत नाही.” असं म्हणून तो निघून गेला.


    श्वेताला वाटले याला आपल्या स्पष्ट बोलण्याचा राग आला. हा आपल्याला नकार देणार हे तिने गृहीत धरले होते. मंडळी निरोप देतो अस म्हणून निघून गेली.


     श्वेता चव्हाण हुशार व सुंदर मुलगी. मस्त पंचकोनी कुटुंबात वाढलेली. एक बहीण व एक भाऊ; बहीण स्वतःच्या संसारात रमलेली भाऊ लहान होता. तिचे वडील शासकीय अधिकारी त्या मुळे कोणतीच गोष्ट कमी पडली नाही कधी तिला! लग्न करताना घरदार मुलगा सगळं पाहून तिच्या वडिलांनी तीच लग्न मोठ्या थाटात करून दिल. पण नवरा पक्का व्यसनी आणि जुगारी निघला. खोटे बोलण्यात तर त्याची पी.एच.डी., रोज दारू पिणे व जुगार खेळणे हे त्याचे ठरलेले. जेंव्हा श्वेताला हे सगळे कळले तेंव्हा अवघ्या चार महिन्यात तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. या चार महिन्यात त्याने श्वेताला रुपया दिला नाही उलट श्वेताच्या आई-वडिलांनी श्वेताला पैसे ,हवे- नको पाहिले. त्याला बायको नको होती तर श्वेताच्या रुपात त्याचा संसार चालवणारी व त्याच्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन हवी होती.


  श्वेताने कोर्टात केस घातली कोर्टाच्या वर्ष भर पायऱ्या झिजवून त्याच्या कडून नुकसान भरपाई मिळवली अर्थात यात तिला तिच्या आई- वडीलांनी साथ दिली. आता श्वेताला दुसरे लग्न करण्यात रस नव्हता पण आई-वडिलांना व भावाला ती किती दिवस त्रास देणार होती. तिची काळजी आई-वडिलांना लागून राहिली होती. श्वेताच्या आईचा तिच्यावर जीव होता पण ती चिडली की श्वेताला सगळे तारतम्य सोडून बोलत असे आणि आईचे शब्द तिच्या जिव्हारी लागत. त्यातूनच बी.पी आणि थायरॉईड सारखे मानसिक टेन्शन मुळे होणारे विकार तिला जडले होते.श्वेता या घटने मुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसली होती. ती घरा बाहेर ही जास्त पडत नसे. या दुःखत तिला विरंगुळा व साथ ही तीच्या लेखणीची होती. ती सुंदर कविता व कथा लिहित असे व ऑनलाईन टाकत असे. श्वेताने दुसऱ्या लग्नाची तडजोड करण्याचा निर्णय घेतला होता.


     पण आज सुशांतशी जे ती वागली होती त्या मुळे श्वेताने त्याचा नकार गृहीत धरला होता. पण प्रत्यक्ष घडले भलतेच दोन दिवसांत सुशांतचा तिला होकार आला. मग काय श्वेता व सुशांतचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. श्वेता मात्र आतून खूप घाबरली होती.कारण पहिल्या लग्नाचा कटू अनुभव गाठीशी होता तिच्या; ती सोलापूर हुन सांगलीत सासरी आली.


   खरं तर पहिल्या लग्नाने केलेले वरमी घाव अजून ती विसरली नव्हती. ती अजून ही त्या धक्क्यातून बाहेरच पडली नव्हती. आणि आता ती दुसऱ्या लग्नाला सामोरी जात होती. सगळे सोपस्कार पार पडले आणि या नात्याला श्वेता आणि सुशांतवर खरा अर्थ देण्याची वेळ आली. श्वेताला दूध घेऊन सुशांतच्या रूम मध्ये पाठवण्यात आले. श्वेताचे मन मात्र या नात्यात पुढे जायला तयार नव्हते. सुशांतने दूध घेतले व तो बोलू लागला.


सुशांत,“ हे बघ श्वेता माझी अवस्था ही तुझ्या पेक्षा वेगळी नाही. मी ही अजून मनाने हे नाते पुढे घेऊन जाण्यासाठी तयार नाही तर तू आणि मी मनाने जोवर तयार होत नाही तो पर्यंत आपण थांबू!” तो असं बोलला व खाली चटई अंथरून झोपला श्वेताच्या उत्तराची वाट न पाहताच कदाचित त्याने तिच्या मनाची होणारी तगमग हेरली होती व तो ही अजून त्याच्या पहिल्या नात्यातून मिळालेले चटके विसरला नव्हता.


  श्वेताने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. ती महिन्या भरातच सुशांतच्या घरात रूळली. तिची व सुशांतच्या आईची चांगलीच गट्टी जमली.सुशांतच्या बाबाशी ही तिचे चांगलेच जमत होते. पण सुशांत आणि तिच्या मधला संकोच मात्र कमी होत नव्हता. दोघे ही जेवढ्यास – तेवढेच बोलत असत. सुशांत ही तिच्याशी फटकून वागत असे. पण ती त्याची कामे अबोलपणे करू लागली होती. जसे त्याचे कपडे काढून ठेवणे ,रुमाल ,टॉवेल , त्याचा डबा हातात देणे सगळं पण अबोलपणे .


    एक दिवस सुशांत शाळेतून घरी आला. फ्रेश होऊन चहा घेतला व श्वेताला शोधू लागला ती बेडरूममध्ये कपडे आवारात होती. तो येऊन बोलू लागला.

सुशांत,“ श्वेता, हे घे पाच हजार तुला महिन्याला मी खर्चासाठी देत जाईन.आईला घेऊन जाऊन तुला काय हवं ते घेऊन ये आणि हो पार्लरमध्ये ही जा!” असं म्हणून त्याने पैसे तिच्या हातात ठेवले.

   ती मात्र सुशांतकडे पाहतच राहिली.ते पाहून सुशांत म्हणाला

सुशांत,“ असं का पाहते आहेस माझ्याकडे तूच तर लग्ना अगोदर म्हणाली होतीस ना की मला पैसे लागतात आणि अजून लागले तर मग !” तो अगदी सहजपणे म्हणाला. 


   श्वेता मात्र डोळ्यात पाणी आणून बोलू लागली. 

श्वेता,“ I am sorry ” ती अपराधीपणे म्हणाली.


सुशांत, “ कशा साठी sorry!” तो आश्चर्याने तिला पाहत म्हणाला.


श्वेता,“ मी तुम्हाला त्या दिवशी तस बोलायला नको होतं. खरं तर मला आलेल्या कटू अनुभवाचा तो परिपाक होता.जेंव्हा माझं पहिलं लग्न झालं तेव्हा प्रत्येक मुली प्रमाणे मी ही खूप सारी स्वप्ने उराशी बाळगून सासरी गेले.पण तिथे माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. तो व्यसनी त्याने मला चार महिन्यात रुपाया ही दिला नाही ना माझ्या कोणत्या गरजा पूर्ण केल्या आईनेच मला सगळे पुरवले त्या दिवसात पण मला आई कडे पैसे मागण्याची लाज वाटायची पण पर्याय नव्हता माझ्याकडे! त्याला बायको नाही तर माझ्या रुपात पैसे कमावणारी मशीन हवी होती. म्हणून तो नोकरी कर म्हणून मागे लागला कारण त्याला त्याच्या व्यसनांमध्ये माझा व्यत्यय नको होता.म्हणूनच अवघ्या चार महिन्यात मी त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हे पैसे घ्या मला नको आहेत.” ती खाली मान घालून म्हणाली.


सुशांत,“ खरं तर तुझा स्पष्टवक्तेपणा भावाला मला म्हणूनच मी लग्नाला होकार दिला.      राहू देत ते पैसे तुझ्या कडेच अपेक्षा भंगाचे दुःख मी अनुभवले आहे. त्यामुळे मी समजू शकतो. मी ही त्या दुःखातून गेलो आहे. मंजिरीला मी पाहायला गेलो आणि तिच्या सौंदर्यावर भाळलो. पण लग्न झाले आणि तिचा स्वभाव खटकू लागला तिला नवरा नाही तर एक असा पुरुष हवा होता जो तिच्या सगळ्या गरजा भागवेल.प्रेम,आपुलकी, जिव्हाळा या भावना तिच्या खिसगणतीतही नव्हत्या. तिला कोणाची ही जबाबदारी नको होती. मी खूप प्रयत्न केला तिला समजून घेण्याचा पण नाही जमलं. तिने पुढे जाऊन आई-बाबांपासून वेगळं राहा असा हट्ट धरला. मी एकटाच मुलगा वनिता माझी बहीण तिच्या संसारात रमलेली मग आई-बाबांना कोण पाहणार मग लग्ना नंतर एक वर्षातच घेतला घटस्फोटाचा निर्णय! नाही म्हणायला तिने केला आकांड तांडव पण मी ठाम राहिलो आणि घेतला घटस्फोट!” सुशांतने ही त्याच मन मोकळं केलं श्वेता समोर.


       दोघांना ही आता हलकं वाटत होतं. त्यांच्या दुखऱ्या मनावर जणू फुंकरच घालत होते ते दोघे समदु:खी जीव. श्वेताने न राहून विचारलेच

श्वेता,“ माझ्या पेक्षा सुंदर होती मंजिरी?” तिने मान न वर करता त्याला तिरकस पाहत विचारले.


सुशांत,“ हो ” तो अभावितपणे म्हणाला. पण त्याच्या लक्षात आले की तो त्याच्या पहिल्या बायकोची स्तुति दुसऱ्या बायको समोर करतोय.म्हणून त्याने जीभ चावली व म्हणाला.

सुशांत,“ म्हणजे तसचं काही नाही” तो चाचरत म्हणाला.

श्वेता,“ its ok I can understand. बरं आपण एकमेकांची दुःखे वाटून घ्यायला मित्र तर बनूच शकतो ना?” तिने त्याच्याकडे पाहत विचारले.

सुशांत,“ हो का नाही!” तो गोड हसून म्हणाला आणि श्वेताची विकेट तिथेच गेली.

  श्वेताला खरं तर आश्चर्य या गोष्टीच वाटत होत की इतक्या रांगड्या शरीरात इतका संवेदनशील माणूस लपला आहे. 


   श्वेता आणि सुशांतच्या लग्नाला आता तीन महिने होत आले होते. आता त्याचा अवघडलेपण मैत्रीच्या नात्या मुळे थोडे कमी झाले होते.

     श्वेता मात्र सुशांतच्या प्रेमात हळूहळू पडू लागली होती पण सुशांत मात्र मैत्री पलीकडे अजून सरकला नव्हता. स्त्रीला देवाने मूळ पणे जीवनातील बदल स्वीकारण्याची कुवत जरा जास्तच दिली आहे म्हणून तर ती तांदळाच्या रोपा प्रमाणे मूळ मातीतून उपटून दुसरीकडे लावली तरी बहरते पण पुरुष मात्र त्याच्या जीवनातील बदल लवकर नाही स्वीकारत तसेच काहीसे सुशांतचे होते.


      एक दिवस सुशांत शाळेत गेला असता ऑफ पिरेड मध्ये त्याच्या सहकारी कुलकर्णी मॅडम व त्याच्या गप्पा चालल्या असता. कुलकर्णी मॅडम बोलू लागल्या.


मॅडम कुलकर्णी, “ शेलार सर खूप लकी आहात हो तुम्ही नाही तर श्वेता सारखी गुणी बायको दुसऱ्या लग्नातून मिळायला नशीब लागत हो! श्वेता सुगरण तर आहेच खूप सुग्रास जेवण बनवते चाखतो ना आम्ही रोज तिच्या हाताची चव तुमच्या डब्यातून पण त्या ही पेक्षा ती उत्तम लेखिका आहे काय कविता करते काय कथा लिहिते तिने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे अहो तिच्या कथा आणि कविता वाचून लोक वेडे होतायत!” त्या कौतुकाने बोलत होत्या.


सुशांत,“ काय? तुमचा काही तरी गैरसमज होतोय मॅडम श्वेता आणि लेखिका!” तो आश्चर्याने म्हणाला.


मॅडम कुलकर्णी,“ काय थट्टा करताय का सर माझी अहो हे पहा महाश्वेता या नावाने ती लिहिते सोशल मीडियावर तिचाच फोटो आहे ना हा!”त्या मोबाईल दाखवत म्हणाल्या.


      सुशांतने मोबाई घेतला आणि पाहीलं तर खरच श्वेताचा फोटो व तिने लिहलेले साहित्य त्याला महाश्वेता या नावाने दिसत होते. त्याने त्याचा मोबाईल काढला तिचे सगळे साहित्य तो पाहू लागला. त्याच्या साठी हा मोठा आश्चर्यकारक धक्का होता.


    संध्याकाळी तो शाळेतून घरी आला. फ्रेश होऊन आला तो पर्यंत श्वेता चहा घेऊन आली होती. तिने टीपॉयवर चहा ठेवला व ती निघाली तर सुशांतने तिला थांबवून घेतले व तो बोलू लागला.


सुशांत,“ थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे? तो म्हणाला.


श्वेता,“बोला!” ती थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली.


सुशांत,“ तू कविता, कथा लिहतेस सोशल मीडियावर?” तो तिला पाहत म्हणाला.


श्वेता,“ हो लिहिते ना!” ती म्हणाली.


सुशांत,“मग मला सांगावस नाही वाटलं तुला? आज कुलकर्णी मॅडम म्हणाल्या तेंव्हा कळलं मला” तो जरा जोरात म्हणाला.


   श्वेता मात्र डिफेन्सीव्ह मोड मध्ये येऊन भांडणाच्या तयारीने म्हणाली.


श्वेता,“ हो लिहिते ना आणि त्यात काय सांगायचे मी तुम्हाला आधी सांगितले आहे आणि आता ही सांगते मी स्वतंत्र विचारांची व्यक्ती आहे तेव्हा....” ती तावातावाने बोलत होती तिला मध्येच थांबवत सुशांत म्हणाला.


सुशांत,“ हो हो माहीत आहे मला पण मी तर तुझ्या लिखाणाचा फॅन झालो ना!” तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला.


श्वेता,“काय?” ती बुचकळ्यात पडून म्हणाली.


सुशांत,“ हो ना काय भन्नाट कथा आणि कविता आहेत ग ! मी आज दोन-तीन वाचल्या आहेत. तुला सुचते कसे ग हे सगळे?” तो कौतुकाने म्हणाला.


 श्वेता,“ उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला! मी आपलं असच लिहिते टाईम पास म्हणून!” ती हसत म्हणाली.खरं तर सुशांतच्या या बोलण्याने ती सुखावली होती तिच्या लेखनाचे कौतुक कोणी करणे तिला नवीन नव्हते पण घरातल्या कोणी आणि खास करून नवऱ्याने तिचे कौतुक करणे तिच्या साठी खास होते.


सुशांत,“ खरंच बोलतोय मी तुझं आमच्या शाळेतील कुलकर्णी मॅडम फार कौतुक करत होत्या. तू एखाद्या नदी सारखी गूढ आहेस जितकं खोल जावं तितकी नवीन उमगत जातेस. सुग्रास जेवण तयार करतेस आणि त्या पेक्षा सुंदर लिहतेस अजून किती गुण आहेत तुझ्यात काय माहीत खरच तो माणूस कर्म दरिद्री होता तुला त्याने गमावले आणि I am lucky man ... ” तो पुढचे शब्द संकोचून तोंडातच पुटपुटला.


    पण श्वेताने ते ऐकले व ती शहारली.सुशांत पुढे बोलू लागला.

सुशांत,“चल माझ्या बरोबर” त्याने सहजच तिचा हात धरला त्याच्या स्पर्शाने ती मोहरली.


श्वेता,“ कुठे” ती लाजतच म्हणाली पण सुशांतचे तिच्या कडे लक्ष नव्हते.


सुशांत,“ चल तर” म्हणून त्याने तिला हात धरून गच्चीवर नेले  


तिथे एक छोटीशी रूम होती.त्या रूमचे कुलूप त्याने काढले. असं वाटत होतं की ती रूम बरीच वर्षे झाली उघडली गेली नाही. सगळी कडे धूळ व मोठाली तीन कपाटे होती. प्रत्येक कपाटात बरीचशी पुस्तके होती. दोघे ही आत गेले. सुशांत म्हणाला.


सुशांत,“ तुला मी म्हणाल होत ना मला वाचनाचे व्यसन आहे तर माझ्या व्यसनाधीन तेचा हा पुरावा.


   श्वेता ती पुस्तके पाहून. अधाशीपणे ती पुस्तके काढून- काढून पाहू व ठेवू लागली. सुशांत लांब उभे राहून तिला कौतुकाने पाहत उभा होता.श्वेताने एक पुस्तक हेरून काढले. ते होते ययाती.  


सुशांत,“ तर तुला ही आवडतात पुस्तके वाचायला?” तो म्हणाला.


श्वेता,“आवडतात! वेडी आहे मी”ती उत्साहाने म्हणाली.


सुशांत,“ आवडता लेखक कोण मग?” तो म्हणाला.


श्वेता,“मराठी म्हणाल तर रणजित देसाई पण मला शेक्सपिअर खूप भावतो म्हणूनच तर मी इंग्लिश लिटरेचर मधून बी.ए.केलं” ती म्हणाली.


सुशांत,“ बाप रे शेक्सपिअर!” तो कपाळावर आठ्या आणत म्हणाला.


श्वेता,“ वाचून तर पहा त्याचे ड्रामे माणूस वेडा होतो. अथेल्लो मधली कुरूप अथेल्लोवर जीवापाड प्रेम करणारी सुंदर डेस्टिमोना! रोमियो- ज्युलियट, द मर्चन्ड ऑफ व्हेनिस मधला जीवाला जीव देणारा मित्र काय आणि किती सांगावे शेक्सपिअर बद्दल I love his writing.माझ्याकडे पुस्तके आहेत पण शेक्सपिअरचे ड्रामे तुमच्यासाठी मी सोलापूरला गेल्यावर घेऊन येईन” ती भरभरून बोलत होती.


सुशांत,“ तुझं इंग्रजी चांगलं आहे म्हणा मी ऐकलंय तू बोलताना तुझ्या बहि‍णी बरोबर किती फ्लूएंटली बोलतेस तू! तुम्ही इंग्लिश लिटरेचर वाले आणि आम्ही इंग्लिशमध्ये काटावर पास होणारे! मला मराठीच बरं आपलं शेक्सपिअर हे प्रकरण आमच्यासाठी डोक्याच्या बाहेरचे तुझ्याच नजरेतून शेक्सपिअर जाणून घ्यायला आवडेल मला!” तो तिला पाहत म्हणाला.


श्वेता,“ काही तरीच काय तुम्ही तर एम.ए.बी.एड आहात की माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आणि माझं इंग्लिश तुम्ही कधी ऐकलं?” प्रश्नार्थक नजरेने विचारले.


सुशांत,“ हो असेल माझ्याकडे एखादी डिग्री तुझ्या पेक्षा जास्त पण तू हुशार आहेस माझ्या पेक्षा! आणि तुझ्या बहीण आणि मैत्रिणींना इंग्लिशमध्ये बोलत असतेस ना अधून मधून ते येता जाता ऐकलं आहे मी!” तो म्हणाला.


श्वेता,“ बरं बरं बास झाली स्तुति माझी एवढी ही हुशार नाही मी नाही तर आता पर्यंत नोकरीला लागले नसते का?” ती हसत म्हणाली. पण सुशांतने केलेल्या तिच्या स्तुति मुळे ती खूप सुखावली होती.


सुशांत,“ नोकरीसाठी तूच प्रयत्न केले नसशील पुरेशे नाही तुझ्या सारख्या हुशार मुलीला नोकरी काय लगेच मिळेल. बरं चल आता लवकर नाही तर आई म्हणेल माझ्या सुनेला ही वेडे केले याने” असं म्हणून तो हसला आणि त्याच्या हसण्यात श्वेता ही सामील झाली.


   खालून हसण्याचा आवाज ऐकून सुशांतचे आई- बाबा मात्र सुखावले कारण पहिले लग्न मोडले हे सुशांतच्या खूप जिव्हारी लागले होते. कित्येक वर्षे झाली तो वर पुस्तकांकडे डोकावला ही नव्हता. पण आज श्वेतामुळे तो खुष दिसत होता. 


     दोन- तीन दिवस असेच गेले सुशांत श्वेताशी अजून मन मोकळे बोलू लागला होता पण श्वेताला अपेक्षित प्रेम मात्र अजून त्याच्या डोळ्यात तिला दिसत नव्हते.एक दिवस रात्री सुजयचा म्हणजेच श्वेताच्या लहान भावाचा फोन आला. सुजय फोनवर बोलत होता.


सुजय,“ दि आईला खूप बरे नाही डॉक्टरांनी तिला उद्या ऍडमिट करायला सांगितले आहे. तू उद्या येतीस का कारण शुभ्रा दिला( श्वेताची बहीण) ही तिची सासू आजारी असल्याने यायला नाही जमणार!” तो म्हणाला.


श्वेता,“ ठीक आहे;मी सुशांतला आणि आईला विचारून तुला कळवते” ती म्हणाली.


    सुशांत पेपर तपासात हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला.

सुशांत,“ वेडी आहेस का तू? विचारून सांगते काय? सरळ सांगायचे ना येते म्हणून सुजय अजून लहान आहे शुभ्राला नाही जमणार मग तुला जावेच लागणार ना तुझ्या ही आईच आहेत ना त्या मग मी उद्या तुला ट्राव्हल्सला बसवून देतो मी ही आलो असतो पण दहावीचे पेपर तपासण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नाही जमणार मला!” तो म्हणाला.


श्वेता,“ पण आईंना तर विचारले पाहिजे!” ती म्हणाली.


सुशांत,“ नाही म्हणणार आहे का ती? मी सांगेन तिला तू बॅग भर!” तो म्हणाला.


     श्वेताने बॅग भरली. सकाळी सुशांतच्या आईला सुशांतने सगळे सांगितले. त्यांनी ही जा व आईला चांगले बरे वाटल्यावरच ये असे सांगितले. सुशांत तिला बस मध्ये बसवायला आला त्याने पाणी बॉटल्स, खाण्यासाठी काही आणि पैसे श्वेताला दिले व तो बोलू लागला.


सुशांत,“ हे बघ श्वेता एकटीच जाते आहेस प्रवासात कोणाचे ही दिलेले काही खाऊ नकोस आणि जेवणाचा डबा दिलाय तुला तो खा आणि गेल्यावर फोन कर” तो या सगळ्या सूचना देत होता आणि श्वेता त्याच्याकडे पाहून हसत होती.


श्वेता,“ लहान आहे का मी हे सगळं सांगायला आणि सहा तासात पोहचेन मी आणि सुजय येतोय मला घेऊन जायला स्टँडवर तुम्हीं जा उशीर होईल तुम्हाला शाळेत जायला.” ती त्याला पाहून हसत म्हणाली.


सुशांत,“ हसायला काय झालं काळजी वाटते म्हणून सांगतोय ना!; हल्ली काय काय ऐकायला मिळतेय आणि जाईन मी शाळेत आईला जर कळले ना की मी तुला बस मध्ये बसवून लगेच आलो तर चिडले ती माझ्यावर” तो आईचे कारण देत होता खरं पण श्वेताला सोडून जायला त्याची पावले मात्र उचत नव्हती.


     बस सुरू झाली. सुशांत तिथेच उभा होता. श्वेताला मात्र त्याचे डोळे उगीचच पाणावल्या सारखे दिसले.श्वेता गेली माहेरी सोलापूरला आणि इकडे सुशांतला मात्र तिची कमतरता जाणवू लागली. तिचं त्याची सर्व कामे अबोलपणे करणे. तिचे हसणे, तिने केलेले जेवण त्याला श्वेताची आठवण पदोपदी येऊ लागली. गेल्या तीन महिन्यात श्वेता कुठेही इतके दिवस त्याला सोडून गेली नव्हती. त्यामुळे सुशांतला तिच्या असण्याची सवय झाली होती. शाळेत जाताना तीच हसत मुखाने बाय करण. शाळेतून आल्यावर तीच चहा आणून देणं. तीच रात्र रात्र झपाटल्या सारखं बेडवर बसून पुस्तक वाचन किंवा काही लिहलेला त्याला ऐकवणे. तिने त्याच्यासाठी बनवलेले पदार्थ,तिच्या एक ना अनेक आठवणी त्याला रोज सतावू लागल्या त्याच्या हे लक्षात आले की तो तिच्या शिवाय राहू शकत नाही. त्याच प्रेम जडलेय श्वेतावर याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. नाही म्हणायला सुशांत तिला दिवसातून दोन- तीन फोन व मेसेजवर ही बोलणे होत असे पण तिच्या सहवासाची सर त्यात नव्हती. श्वेताच्या आईची तब्येत पंधरा दिवसांनी सुधारली.


   श्वेता उद्या घरी येणार होती. सकाळीच ती सुशांतने बुक केलेल्या कोंडूस्कर ट्राव्हल्समध्ये बसणार होती. सुशांत ती येणार म्हणून भलताच खुष होता. आज रविवार असल्याने तो घरीच होता. ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोहचेल असा अंदाज होता त्याचा; साडेतीन वाजले आणि तो श्वेताला घेऊन येण्यासाठी निघण्याच्या तयारीत होता. बाबा टी.व्हीवर न्यूज पाहत होतो. एक ब्रेकींग न्यूस फ्लॅश होऊ लागली.सोलापूर वरून येणाऱ्या कोंडूस्कर बसला मिरज जवळ अपघात झाला. त्यात दहा जण मृत,पंचवीस लोक गंभीर जखमी आणि बाकी किरकोळ जखमी व त्या लोकांना मिरज मधील मिशन हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे अशी माहिती न्यूज मध्ये दिली जात होती. सगळे घाबरले होते. कारण त्याच बसने श्वेता येणार होती. सुशांतने श्वेताला फोन लावला पण तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. सुजयचा ही फोन स्विच ऑफ लागत होता. श्वेताच्या घरी फोन केला तर तिच्या बाबांनी फोन उचलला व त्यांनी सांगितले श्वेता तेथून केव्हांच निघाली आहे. हे ऐकून सुशांत पुरता घाबरा. त्याने मित्राला फोन करून त्याला घेऊन मिरज गाठले.


         सुशांत व त्याचा मित्र अपघातातील जखमींची लिस्ट पाहत होते पण त्यांना श्वेताचे नाव मात्र त्यात दिसत नव्हते. सुशांतने हॉस्पिटलमधील सर्व जखमींना ठेवलेले वार्ड,I.C.U वार्ड शोधला पण श्वेता मात्र कोठेच सापडत नव्हता. सुशांतच्या मात्र जीव थाऱ्यावर नव्हता. आता एकच जागा राहिली होती श्वेताल शोधण्याची ती म्हणजे मृतांमध्ये पण सुशांतचे मन मात्र तिकडे जायला धजावत नव्हते. श्वेता आपल्या बरोबर नसणार किंवा आपण श्वेताला कायमचे गमावले हा विचारच त्याला सहन होत नव्हता. त्याने आत्ता पर्यंत धरून ठेवलेला धीर आता सुटला व तो मित्राला मिठी मारून रडू लागला. त्याने सुशांतला धीर दिला व तो स्वतः जाऊन मृतकांची लिस्ट पाहून आला.जेंव्हा सुशांतला हे कळले की तिथे श्वेताचे नाव नाही तेंव्हा त्याला हाय से वाटले पण श्वेता गेली कुठे हा प्रश्न होता व चुकून ती अपघाताच्या ठिकाणी राहिली नाही ना ही भीती त्याला वाटू लागली. पण त्याने कोंडूस्कर मध्ये फोन करून एकदा चौकशी करावी असे ठरवले. चौकशी अंती तेंव्हा त्याला कळले की श्वेता त्या बसमध्ये बसलीच नाही. हे सगळं होऊ पर्यंत संध्याकाळच्या सात वाजल्या होत्या .तो पर्यंत सुशांतच्या बाबांचा फोन आला सुशांतने फोन उचलला.बाबा बोलत होते.


बाबा,“ अरे सुशांत श्वेता...” ते पुढे बोलणार तर सुशांत त्यांचं काही ही न ऐकून घेता रडत बोलू लागला.


सुशांत,“ बाबा श्वेता नाही सापडत. ती कुठे असेल मला तिची खूप काळजी वाटते आहे.मला तिला नाही गमवायचं! ” तो रडत बोलत होता.


बाबा,“ रडणं आधी बंद कर! श्वेता आत्ताच घरी पोहचली आहे. ती सुखरूप!”ते म्हणाले.


सुशांत,“ काय? कशी” तो डोळे पुसत म्हणाला.


बाबा,“ तुला सगळं फोन वरच सांगू का? घरी ये!” ते म्हणाले”


     सुशांतला तो केव्हा एकदा श्वेताला पाहतोय असे झाले होते. तो घरी पोहचला. तर त्याचे आई- बाबा व श्वेता त्याचीच वाट पाहत हॉल मध्ये बसले होते. त्याला पाहून ते उठून उभारले. सुशांत श्वेता जवळ गेला व त्याने तिला मिठी मारली. तो बराच वेळ तिला मिठी मारून रडत होता. श्वेता मात्र पुतळ्या सारखी उभी होती आणि सुशांतचे आई- बाबा त्याला असे पाहून अश्रूयुक्त डोळ्यांनी हसत होते. सुशांतच्या भावनांचा आवेग ओसरला तेंव्हा तो भानावर आला. त्याने श्वेताला दूर केले व तो रागाने बेडरूम मध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग श्वेता रूम मध्ये गेली. तर सुशांत बेडवर तोंड फुगवून बसला होता. पण त्याच्या डोळ्यातून मात्र पाणी वाहतच होते.


      श्वेता त्याच्या शेजारी जाऊन बसली व बोलू लागली.

श्वेता,“ इतकं रडायला तुम्हाला काय झाले?” ती त्याला पाहत म्हणाली.


सुशांत,“ तुझा मोबाईल कुठ आहे?” तो तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला.


श्वेता,“ मोबाईल चार्ज करायचा विसरले मी त्यामुळे तो स्विच ऑफ झालाय” पारा खूप चढला आहे हे एकूणच तिच्या लक्षात आले.


सुशांत,“ हो का? वेंधळे पनाची ही हद्द असते.आणि सुजयचा,! का त्याचे ही चार्जिंग संपले होते?” तो तिला रागानेच म्हणाला.


श्वेता,“ नाही आज त्याचे प्रॅक्टिकल असते त्यामुळे त्याचा मोबाईल दिवस भर बंद असतो.”ती हळू आवाजात खाली मान घालून म्हणाली.


सुशांत,“ हो तुम्ही दोघे भाऊ- बहीण हुशार आहात बाकी आम्ही काय मूर्खच ना!” तो रागानेच म्हणाला.


श्वेता,“ पण झाले काय एवढे रागवायला आणि रडून डोळे सुजवायला, आणि आल्यावर मिठी कशाला मारली मला! किती ओकवर्ड झालं मला आई- बाबां समोर!” ती उठून त्याच्या समोर उभी राहून आता तावातावाने बोलू लागली होती.


  ते पाहून सुशांतच्या लक्षात आले की हिला तर काहीच माहीत नाही आणि आई- बाबांना ही हिला काही सांगायला वेळच मिळाला नाही. ती त्याच्या समोर उभा राहून हातवारे करून बोलत होती. तो उठला आणि तिच्या ओठांवर हात ठेवला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला.


सुशांत,“ I love you!” असं म्हणून त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला.


श्वेता,“ काय?” ती आश्चर्याने म्हणाली.


सुशांत,“ ऐकू कमी येत का तुला? बरं तू कशी आलीस आज!” त्याने विचारले.


श्वेता,“ तुम्ही ज्या बसच तिकीट बुक केलं होतं ना ती बस घरी वेळ झाल्यामुळे चुकली माझी, मग काय सुजयने दुसऱ्या बसचे तिकीट काढून दिले आणि मला त्या बस मध्ये बसवले. त्याला ही उशीर झाला होता कॉलेजला जायला मग तो डायरेक्ट कॉलेजला गेला. मी त्याला सांगीतले होत तुम्हाला फोन करून सांगायला विसरला वाटत तो! बसच्या तिकिटाचे पैसे माझ्या चुकी मुळे फुकट गेले.” ती बोलत होती.


सुशांत,“ बरं झालं” तो मोठा निश्वास सोडत म्हणाला.


श्वेता,“ आज झालाय काय तुम्हाला काय वेड्यासारखे बडबडताय,मिठ्या काय मारताय माझ्या कानात काय म्हणालात?उद्या कृपामाईला जाऊ या का?” ती त्याच्या कडे पाहत मिष्कीलपणे म्हणाली.


     हे ऐकून सुशांत तिच्या जवळ जवळ जात होता व श्वेता त्याच्या पासून मागे मागे सरकत होती. शेवटी ती कपाटाला थबकली आणि सुशांत कपटावर हात टेकून तिच्या अगदी जवळ जात बोलू लागला.


सुशांत,“ तुला खरंच कळलं नाही मी काय म्हणालो ते! का वेड्याचा सोंग आणून पेढ गावला जातेस! इथं मागील चार तासापासून माझा जीव जायची वेळ आली आणि तुला थट्टा सुचतेय!” तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. 


   पण श्वेता मात्र सुशांतच्या अशा वागण्याने लाजून खाली मान घालून उभी होती.ती पूर्ण गांगरून गेली होती. कारण तिला माहीतच नव्हतं की काय घडलं आहे.श्वेता त्याच्या पासून नजर चोरत म्हणाली.

श्वेता,“ काय झालं आहे सांगाल का?” ती त्याच्या पासून स्वतःला सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत म्हणाली.


सुशांतने तिचा हात धरला व तिला बेडवर बसवून स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसून बोलू लागला.


सुशांत,“ आज तू ज्या बसने येणार होती. जी बस तुझी सुदैवाने चुकली ना!त्या बसचा मिरज जवळ खूप मोठा अपघात झाला आणि मला वाटले की तू त्या बस मध्ये होतीस म्हणून मी तुला शोधायला मिरज गाठले कारण अपघात ग्रस्त लोक तिथे आणले होते. या चार तासात मी काय अनुभवले हे तुला शब्दात सांगता नाही येणार!” असे म्हणून तो तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला.


श्वेता,“ असं झालं तर! बरं असते मी त्या बस मध्ये तरी काय एवढा फरक पडला असता शेवटी ज्याला जेंव्हा मारायचे तेंव्हा तो मरणारच आहे” ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.

सुशांत,“ थोबाड फोडीन तुझे परत असं काय म्हणालीस तर!” तो उठून उभा राहत म्हणाला.


श्वेता,“ अरे वा! मी बरी फोडू देईन माझं थोबाड आणि मघाशी काय म्हणालात कानात?” ती उभारून म्हणाली.


सुशांत,“ का ऐकू नाही आलं का?” तो तिला पाहत म्हणाला.


श्वेता,“ नाही ना जरा मोठ्याने म्हणालात तर बरं होईल” ती कानात बोट घालून ते हलवत मिष्कीलपणे म्हणाली.


सुशांत,“ हो का बरं मग नीट ऐक हो! I love you!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

  श्वेताने मात्र हे ऐकून त्याला मिठी मारली व लगेच बाजूला झाली. त्याचे डोळे तिच्या ओढणीने पुसले व त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.

    आणि ती रूम मधून निघून गेली. किचन मध्ये सुशांतच्या आई जेवण बनवत होत्या. त्या तिला आराम कर थकून आलीस अस म्हणत असताना ही श्वेताने त्यांना मदत केली. जेवायच्या वेळी सुशांतचे सगळे लक्ष श्वेताकडेच होते. सुशांत रूम मध्ये निघून गेला तरी श्वेता मात्र सगळं आवरून रूम मध्ये गेली. 

     तिला रूम मध्ये येताना पाहून सुशांतने ती आत आली की दार लावून घेतले व तिला मागून मिठी मारली. तो तिला म्हणाला.

सुशांत,“ माझे उत्तर न देताच निघून गेलीस” तो म्हणाला.


श्वेता,“ मला वाटते ते तर तुम्हाला मघाशीच मिळाले आहे” ती स्वतः ला सोडवून घेत म्हणाली.


सुशांत,“ ते तुझ्या तोंडून ऐकायचे आहे मला!”


श्वेता,“ ठीक आहे I love you sushant” असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली.

    आणि येथेच दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट सुफल संपूर्ण झाली. मला वाटते एकदा संसार मोडल्यावर दुसर्‍यांदा तो तडजोड म्हणून जरी थाटला तरी सहवासाने प्रेम फुलते. प्रत्येकाला दुसरा चान्स हा मिळायलाच हवा ना जगण्याचा!


   तर कशी वाटली गोष्ट जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा पण माझ्या नावा सहित आणि कमेंट करायला विसरू नका.

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)


Rate this content
Log in

More marathi story from Swamini Chougule

Similar marathi story from Drama