दृष्ट
दृष्ट


हात – पाय बांधलेल्या अवस्थेत ती निश्चेष्ट पडून होती. तिला ह्या गोष्टीची कल्पनाही नव्हती की तीच अपहरण झालंय. हळूहळू जेव्हा तीने डोळे उघडले, हे जाणवू लागल कि तिच्या हातापायांची हालचाल होत नाहीये,कारन ते दोरीने आवळले गेले होते. खूप त्रास होत होता. तीच तोंड कापसाच्या बोळाने बंद करण्यात आल होत, ज्यामुळे ती काहीही बोलू शकत नव्हती. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतती हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती की ती कुठे आहे. अंधारमय कोठडी बघून तिला दरदरून घाम फुटला.
निरागस सोनू ! आई - वडिलांची लाडकी लेक चौदा वर्षांची देखणी पोर. आई - वडील तिला तळहातावरच्या फोडासारख जपायचे . शाळेतील सगळ्या कार्यक्रमांमधे सोनूचा वाटा असायचा अभ्यासातही हुशार. अगदी दृष्ट लागेल असं सगळं.
आणि शेवटी दृष्ट लागलीच ! एके दिवशी संध्याकाळी सोनू शाळेतून घरी आलीच नाही . सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पोलीसातही तक्रार नोंदवली गेली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही . सोनूचा काहीच पत्ता लागला नाही.
इकडे सोनूलाही आई – वडिलांच्या आठवणींनी रडू आवरत नव्हत. तिला लवकरात लवकर आपल्या आईच्या मिठीत आणि वडिलांच्या कुशीत परतायचं होत. परंतु त्या कोवळ्या जीवाला हे माहीत नव्हत की तीच हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
थोडया वेळानंतर त्या अंधारमय कोठडीत थोडा प्रकाश जाणवला . सोनूने हळूहळू डोळे उघडले . खूप थकल्यागत वाटत होतं . त्या अंधूक प्रकाशात तिला एक आकृती दिसली .समोर एक बाई उभी होती. खूप नटलेली – ओठांवर गडद लाली, डोळयात काजळ , केसात मोगरा माळलेला , भरजरी साडी . तिच्या मागे दोन दांडगे पहिलवान उभे होते.
जशी – जशी ती बाई सोनूच्या जवळ आली, तशी सोनू खूप बावरली. पन त्या बाईने सोनूच्या डोक्यावरून हात फिरवला . तोंडात कोंबलेला गोळा काढून फेकून दिला. हात – पाय ज्या दोरीने बांधले होते त्यातून तिला मुक्त केले. सोनूला थोड बरं वाटलं . त्या दोरीने सोनूच्या हातापायांवर वळ उठले होते. सोनू जवळ – जवळ रडकुंडिला आली होती. तीने त्या बाईला तिला सोडायची विनंती केली . हाता - पाया पडली . भीक मागितली. पन त्या बाईच्या मनाला काही पाझर फुटला नाही.
त्या बाईच नाव सुंदरा . ज्या कोठडीत सोनूला डांबून ठेवल होत , त्या कोठडीची मालकीण . कर्त्ता धर्ता. जबरदस्त दरारा होता तीचा , त्या गल्लीत . सुंदराने सोनूची किंमत मोजली होती. तिला विकत घेतल होत . आणि या गोष्टीची कल्पनाही त्या कोवळ्या जीवाला नव्हती.
सुंदराने सोनूला समजावल की आता ती या कोठडीतून बाहेर कुठेच जाऊ शकणार नाही. तिला सुंदराची गुलाम बनून राहावे लागेल आणि तिच्या प्रत्येक हुकमाची अंमलबजावणी करावी लागेल . याला दूसरा पर्याय नाही.
हे ऐकून सोनूला काय बोलाव ते कळेना . तिच्या डोळ्यांत भीती, अश्रु, माता - पिता पासून दूर झाल्याच दुख, सगळे भाव एकदाच येऊन गेले. आता तिच्यासमोर परिस्थितीशी तडजोड करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. पण या परिस्थितीशी जुळवून घेणंही सोप नव्हत . नकळतच का होईना पण सोनू सोन्याच्या पिंजरयात अडकली होती.
सोनूला स्वताला कस सजवायच, कस नटायच , ग्राहकाला कस आकर्षित करायच या गोष्टींच शिक्षण देण्यात आल . कुठे सुशिक्षित घरात वाढलेली सुसंस्कृत मुलगी आणि कुठे आज स्वत:च तन - मन ग्राहकांवर ओवाळून टाकणारी पोर ! दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता.
हळूहळू सोनूने स्वताला सावरलं. सत्यता स्वीकारली. पण आतून तिच मन तिला खायला उठायच . स्वताची घृणा वाटायची . खिन्नतेन तिला पूर्णपणे ग्रासुन टाकल होत . खरंच काय चुकी होती तिची ? कुठे चुकली होती ती ? काहीही चुक नसताना एवढी मोठी शिक्षा !
सोनू सगळया सुखाला पारखी झाली होती. आई – वडील, शिक्षण, मित्र – मैत्रिणी , नातेवाईक , तीच स्वातंत्र्य, भविष्य आणि बरंच काही.
काहीच राहिल नव्हत आता सोनूच्या आयुष्यात. मन मारुन जगत होती ती . आणि अशा जगण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. पण मरायची तिची हिम्मतही नव्हती . असं म्हणायला हरकत नाही की तिच्या मृत्यूवरसुद्धा तीचा अधिकार राहिला नव्हता.
सोनूला जेव्हाही कोठडीतला आपला पहिला दिवस आठवायचा , तेव्हा नकळत तिची नजर स्वतःच्या हाता – पायांकडे जायची . ते वळ आठवायचे जे दोरीने आवळल्यामुळे त्या दिवशी पडले होते. आणि काळानुरूप पुसलेही गेले होते. परंतु ते घाव, जे सोनूच्या हृदयावर कोरले गेले होते त्या हृदयावरच्या घावांची जखम खूप खोल होती. त्यांना भरून काढण जवळ - जवळ अशक्य होत. या घावांना कवटाळून सोनू जगत नव्हती, तर प्रत्येक क्षणी मरत होती.
फक्त एकाच आशेनी तिला आजवर जिवंत ठेवल होत की या सोन्याच्या पिंजरयातून आपल्या लेकीला मुक्त करायला आई – वडील एक ना एक दिवस नक्की येतील . ती परत आपल्या हक्काच आयुष्य जगू शकेल . तिच्या हृदयाचे घाव अंततः भरून निघतील आणि आई पुन्हा एकदा वाईट नजरेपासून तिची दृष्ट काढेल……………….