Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

पावसाला पत्र

पावसाला पत्र

3 mins
143


प्रिय अवखळ पावसा ,

खूप दिवसांपासून तुला पत्र लिहिण्याच मनात होत आणि बघ , आज हा योग जुळून आला .

पत्र लिहिण्यास कारण की तुझ्यावाचुन आमच एक पानही हलत नाही , हे तुला माहीत आहे . म्हणून तू आम्हाला असा सतवतोस ना ? मला तुझ्या रागवण्यावर बिलकूल राग येत नाहीए . तुझ बरोबरच आहे . आम्ही पर्यावरणाचा नाश करतोय , या गोष्टीची शिक्षा तर मिळालीच पाहिजे . नाहीतर तू कशाला आमच्यावर नाराज होशील ? आम्ही केलेल्या चुकांना माफी विचारून मी तुला गैर ठरवण्याचा प्रयत्न बिलकूल करणार नाही . त्या बदल्यात मी तुला माझ मनोगत सांगणार आहे . मग तूच ठरव काय करायचं ते ?

हे पावसा , तुला माहीत आहे की नद्या , नाली , तळी , सरोवरे तुडुंब भरतात तेव्हाच सगळ्यांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो . रान बहरत , शेतीवाडी फुलते . शेतकऱ्यांना दिलासा मिळतो . प्रत्येक प्राणी सुखावतो . पण तुझ्या रागामुळे सगळ गणितच विस्कटत आणि काही ठिकाणी अतिवृष्टीच संकट ओढवत तर काही ठिकाणी चक्क दुष्काळाचा सामना करावा लागतो .

अरे पावसा , तुझा राग थोडा कमी कर . जिथे पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा झाला आहे तिथ बरसण थांबव आणि जिथे जमीन उष्णतेने तापून दुभंगून जात आहे अशा ठिकाणी पडून धरतीमातेला थंड कर . तिथल्याही लोकांना , वन्यसृष्टिला , प्राणी -पक्षांना तुझ्या सहवासाने तृप्त कर .

आम्हीही आता पर्यावरण संतुलनासाठी काम करत आहोत . झाडे लावत आहोत . झाडे जगवत आहोत . लोकांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करत आहोत . प्रतिसादही चांगला मिळत आहे . पण हा बदलाव यायला थोडा वेळ लागेल .तेव्हा , तेवढा वेळ आम्हाला दे . आम्हाला आमच्या चुका सुधारण्याची संधी दे . जे पर्यावरणीय असंतुलन या धरतीवर तांडव घालतय , जेणे करून त्यावर आळा बसवण्यास मदत होईल .

ऐक ना पावसा , तुझ्या हलक्या सरी अंगावर घेत मस्तीत गानी गुणगुणत लोक आपल दुःख विसरून जातात तेव्हा तुलाही स्वतःचा अभिमान वाटत असेलच ना ! तुझ अस्तित्वच किती मनमोहक असत . पावसाळा म्हटला की गरम पकोडे आणि उफाळणारा चहा हे समीकरण कधीच चुकत नाही . एवढंच नाही तर रंगबिरंगी छत्र्या , रेनकोट , गमबूट या सगळ्या वस्तू तुझ्या आगमनाची चाहूल आधीच करून देतात .तुझ्या स्वागताची तयारी इथूनच सुरू होते .

पावसा , तू काही एकटा येत नाहीस . येताना तुझ्याबरोबर श्रावणाला आणि गणपतीबाप्पालाही घेऊन येतोस . गणपतीबाप्पाच्या आवाहनाला आणि विसर्जनाला आवर्जून हजेरी लावतोस , तेही चक्क विजेच्या साथीने ! किती आनंदाचे क्षण तू आम्हाला देऊन जातोस .

हे बघ पावसा , तू सगळ्या ऋतुंचा राजा आहेस म्हणून जास्त भाव खायची गरज नाही . मला जे सांगायचं होत ते मी या पत्राद्वारे कळवलं आहे . आता पुढे काय करायचं हे तुलाच ठरवायचं आहे . पण प्रत्येक वेळी मनमानी करायलाच पाहिजे अस नाही .

परत लवकर भेटायला ये . तुझ्याशी अजून खूप गप्पा मारायच्यात . पण आता पत्राला विराम देते . जेव्हा परत भेटायला येशील तेव्हा आणखीन सविस्तर बोलू .

तुझ्याच प्रतीक्षेत

एक सखी .



Rate this content
Log in