Pratibha Bilgi

Others

2  

Pratibha Bilgi

Others

मळभ : कथेचे सारांश

मळभ : कथेचे सारांश

5 mins
100


मळभ, वैजयंती डांगे या लेखिकेनी लिहिलेली आणि माझ्या वाचनात आलेली एक छोटी पण अर्थपूर्ण कहानी .

कथा वाचून झाल्यावर कथेचे शीर्षक समर्पक वाटले . मळभ म्हणजे मनावरचे एक अदृश्य दडपण ! असं दडपण, जे सांगताही येत नाही आणि मनात ठेवताही येत नाही . एक अनामिक चिंता मनात थैमान घालत असते , ज्यामुळे मनावर जळमट पसरते .

असाच मळभ कथेची नायिका नीता अनुभवत असते . या कथेत प्रत्यक्षपणे दोनच पात्रे आहेत - नीता आणि तिची जीवाभावाची मैत्रीण मेधा . अप्रत्यक्ष पात्रांमध्ये नीताच्या सासरच्या मंडळींचा व तिच्या जीवनात आलेल्या रवी नावाच्या ऑनलाईन फ्रेंड चा उल्लेख आहे . कथेची सुरुवात नीता आणि मेधाच्या ऑफिसमधल्या संभाषणातून झाली आहे . या संभाषणावरून कळते की नीताच्या जीवनात काहीतरी बदल नक्कीच घडला आहे . त्यामुळे ती आजकाल खूपच आनंदात असते . ती खूप सुंदर दिसायला लागली आहे . नीता छान तयार होऊन, साडी नेसून, सगळं मॅचिंग - अगदी टिकली पासून ते थेट चपलेपर्यंत हा असा बदल मेधाला आवडला होता . गेली काही वर्षे नीताच्या जीवनातील घडामोडी पाहता हा बदल मेधाच्या चटकन लक्षात आला होता , कारण यामुळे नीता सगळ्या चिंता दूर झटकून आनंदात राहत होती .

सासरच्या मंडळींच्या वागण्याला नीता कंटाळून गेली होती . नीताचा नवरा सुद्धा तिला साथ देत नव्हता. यामुळे नीता खूप हताश झाली होती . नीता खूप हुशार, दिसायला सुंदर, गोड स्वभावाची, सर्वांना हवीहवीशी वाटणारी गुणी मुलगी होती . पण लग्नानंतर पूर्ण चित्रच पालटलं . तिच्या सासरच्यांचे, पतीचे किस्से ऐकून मेधाला अंगावर काटा यायचा. त्यांना नीताचे किंचितही कौतुक वाटायचे नाही. नीता या सर्व वागण्याला कंटाळली होती. त्यात नवराही दुर्लक्ष करायचा. दोन्ही मुले ही मोठी झाली होती. यामुळेच घरातल्यांचा विरोध पत्करून नीताने मुग्धाच्या ऑफिसमध्ये नोकरी पत्करली

दिवस सरत असतानाच अचानक नीता मध्ये झालेला बदल मेधाच्या लक्षात येत होता. नीता तासनतास फोनवर मेसेज करायची. फोनवरच बोलणही हल्ली वाढलं होतं. मेधाने कित्येकदा प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे नीताला याबद्दल विचारलं होतं, परंतु नीताने प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन ते टाळल होत आणि एकदा विचारल असता सांगितल की तिच्या कॉलेजची जुनी मैत्रीण फेसबुक वर खूप वर्षांनी भेटली आहे. तिच्या सोबतच नीता जुन्या आठवणी उगाळत असते. तेव्हाच मेधाच्या मनात कुठेतरी पाल चुकचुकली होती . काहीतरी विचित्र घडतय हे लक्षात आलं होतं.

दोन-तीन दिवसांपासून नीताला उदास बघून मेधानी विचारले असता तिच्या तोंडून कोणी पुरुषाचा उच्चार ऐकून मेधा आश्चर्यचकित झाली. पण विचारल्यावर नीताने बोलायचं टाळून दिल. मेधानेही तो विषय सोडून दिला. विचार केला की नीताला जेव्हा सांगावसं वाटेल तेव्हा ती नक्की सांगेल. त्यासाठी तिला जबरदस्ती करणे योग्य नाही. पण मेधाला सारखं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकतय.

या विषयाला जवळजवळ सहा-आठ महिने झाले असतील. नीताचे दिवस पुन्हा पहिल्यासारखेच मजेत जात होते. अशातच एक दिवस अचानक तिला रडताना पाहून मेघाला वाटले की घरात काहीतरी भांडण झाल असेल. परंतु नीताला एक सारखं रडताना पाहून मेधाने तिला शांत केल. थोडं शांत झाल्यावर नीताने मेधाला संध्याकाळी तिच्यासाठी वेळ काढायला सांगितल . नीताला मेधाशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं . संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बोलायचं ठरलं . तसेच त्या दोघी ऑफिस सुटल्यावर कॉफी डे मध्ये जायला निघाल्या. बाहेर पाऊस पडत होता. तशा दोघी कॉफी डे मध्ये पोहोचल्या व व्यवस्थित बोलता यावे म्हणून कोपऱ्यातला एक टेबल पकडून बसल्या. मेधाने दोघींसाठी कॉफी आणली, तशी नीता पुन्हा रडू लागली. यावेळी मेधाने तिला रडू दिलं.

मनसोक्त रडून झाल्यावर थोडं शांत होऊन नीता मेधाला बोलली की ती इतके दिवस मेधाशी खोटं बोलली होती . तिच्यातला बदल हा तिच्या मैत्रिणीमुळे घडला नव्हता तर दीड वर्षांपूर्वी तिची ओळख रवी नावाच्या व्यक्तीशी एका सोशल साईटवर झाली होती, त्यामुळे घडला होता . रवीच बोलणं , तिची तारीफ करणं, कौतुक करणं नीताला खूप आवडायला लागलं होतं . त्यामुळे तिने कुटुंबाची माहिती , फोटो सगळं रवी सोबत शेअर केलं होतं. हळूहळू त्यांची मैत्री इतकी वाढली की त्याचा काल्पनिक सहवास नीताला खूप आवडत गेला आणि तो सहवास तिला बेडरूम पर्यंत घेऊन गेला. सुरुवातीला नीताला अपराध्यासारखं वाटलं, परंतु रवीच्या लाडिक बोलण्यामुळे नीता हरवून गेली. हळू हळू तिच्या मनातून अपराध्याची भावनाही नष्ट होत गेली. नीताला आता घरच्यांपेक्षा रवी आपला वाटायचा . दिवस-रात्र ती त्याची स्वप्ने पहायची.

नीताच्या अशा वागण्यामागे सुद्धा एक विशिष्ट कारण होतं. लग्नानंतर सासरी येताना ती मनात खूप स्वप्न, आकांक्षा, अपेक्षा घेऊन आली होती . परंतु लग्नानंतर मात्र तिच्या स्वप्नांचा, अपेक्षांचा भंग झाला. नवरा जिवनाचा एकमात्र साथी असतो. परंतु तो सुद्धा नीताला साथ देत नव्हता. यामुळेच नीताला जेव्हा तिची मानसिक भूक भागवणारी व्यक्ती रवीच्या रूपात भेटली तेव्हा तिने त्याच्याशी बोलून आपली मानसिक घुसमट मोकळी केली . पण जेव्हा रवीचे लग्न ठरले तेव्हा त्याने नीता बरोबरचे सगळे संबंध संपुष्टात आणले. या गोष्टीचं नीताला खूप वाईट वाटलं आणि पुन्हा एकदा तिला मानसिक आघाताला सामोरं जावं लागलं .

नीताचं बोलणं ऐकल्यावर मेधाला नक्की काय घडले याची प्रचिती आली. तिने नीताला समजावलं की या सर्व आत्ताच्या काळातल्या खूप सामान्य गोष्टी आहेत. आजची तरुण पिढी मनोरंजनासाठी अशा ऑनलाइन साइट्सचा सर्रास वापर करते. नाव, परिचय लपवून, खोटं बोलून मैत्री वाढवते. कधीकधी फसवते सुद्धा. ही लोक कधीच कुणाशी निष्ठेने वागू शकत नाहीत. मग तू स्वतःला त्रास करुन का घेतेस ? नीता या प्रकरणातून सुखरूप सुटली होती, याचाच मेधाला जास्त समाधान वाटत होतं . सांत्वनाचे बोल ऐकून नीताला धीर आला. तिच्या चेहऱ्यावरच चिंतेच सावट मिटलं होतं आणि तीच्या जीवनातील मळभही दूर झालं होतं .

वैजयंतीजींनी प्रस्तुत कथेत आजच्या पिढीतील तरुणांच्या मानसिकतेचे खूपच मार्मिक वर्णन केलेले आहे. सोशल साईट्सचा जितका उपयोग होतो, तितकेच भयंकर परिणाम अनुभवावे लागतात. अशा साइट्सचा वापर खूप विचारपूर्वक करणे गरजेचे बनले आहे. नाहीतर लोक कधी कोणत्या गोष्टीचा फायदा उठवतील याची कल्पनाही करवत नाही. नीता तिच्या नकळत पणे एका अनामिक संकटातून बाहेर पडली होती जीची तिला कल्पनाही नव्हती. अशाच मानसिकरीत्या खचलेल्या व्यक्तीला जेव्हा मनावर फुंकर घालणारी व्यक्ती भेटते तेव्हा ती फायदा किंवा नुकसान बघत नाही, भावनांच्या ओघात वाहत जाते. जेव्हा त्या भावना अनावर होतात तेव्हा मनावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं आणि याचाच फायदा काही लोक उठवतात. अशावेळी व्यक्ती खूप मोठ्या संकटात सापडते व स्वतःचे नुकसान करून घेते.

लेखिकेने या कथेतून एक भयानक वास्तविकतेला वाचकांसमोर आणले आहे. आजची पिढी खूपच सहजतेने सोशल साईट्स हाताळत आहे. ही पिढी अश्या अनामिक जाळ्यात स्वतःतर अडकतेच पण दुसऱ्यांनाही अडकायला भाग पाडते. आजची पिढी भावनांना दूर सारून फक्त मनोरंजनाला प्राधान्य देते , ही खूप विचार करण्याजोगी गोष्ट आहे.

शेवटी या कथेबद्दल एवढेच सांगावेसे वाटते की ,

मळभ .............. मानव मनावरचा मानवनिर्मित एक अदृश्य सापळा !!!


Rate this content
Log in