देहाच समर्पण
देहाच समर्पण
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
माझं लहानपण मावशीच्या अंगणात उमललं बहरलं. माझी आई घरोघरी धुनी भांडी करायची. बाप नालायक बेवडा होता. रोज पिऊन यायचा आणि शिवीगाळ करीत आईला बेदम मारायचा. माझी आई पण काही साधी सरळ बाई नव्हतीच मुळी. धुणीभांडी करायच्या नावाखाली मोठं मोठाल्या बंगल्यामधे धंदे करायची. नटण्या थटण्याचं वयच नव्हत तीच, तरीही महाग महाग मेकअप बॉक्स आणायची घरी, लाली पावडर लाऊन कोना कोणाच्या घरी धुनी भांडी करायची देव जाने.
माझ्या आई वडिलांच्या दहा वर्षांच्या लग्नानंतर माझा जन्म झाला. मावशी म्हणायची "तू तुझ्या सख्या बापाची नाहीसच मुळी" तेव्हा मला प्रश्न पडायचा कोण कोणत्या बांगलवाल्यानी स्पर्श केला असेल तिला जेव्हा माझा अंकुर तिच्या गर्भात उमलू लागला असेल. थोडी मोठी झाले मला नाच गाणं आवडायला लागलं. मावशीच्या घरासमोर नाच गाण्याचा क्लास चालायचा. मी लपून छपून खिडकीतून पाहायचे आणि घरी येऊन रियाझ करायचे. खूप कमी वेळात मी या कलांमधे पारंगत झाले.
बाप साला कोणीही असो आईच रूप माझ्यात उतरलं होत. तेरा-चौदाच्या वयात गोऱ्या गालांवर मुरूमानी बस्थान बसवायला सुरुवात केली होती. लिहिण्या वाचण्याच वय उलटून गेलं होत. मला नाचताना पाहून माझी आई खूप खुश व्हायची. लहानपणी कधी प्रेमान मिठी नाही मारली पण माझ्यामधे पैसे कमवायचा रस्ता शोधत होती.
एक दिवस कोना नात्यातल्या लग्नात घेऊन गेली, स्वतः पण नाचली आणि मला पण नाचवलं. त्या दिवसापासून मला लग्नामधे नाचऊन पैसे कमाऊ लागली. मी विरोध केला तर गरम तव्यावर हात पोळायची माझे. दुनियादारीची ओळख नव्हती मला, पण तरीही ती शेवटची रात्र होती माझी त्या घरातली ज्या रात्री माझ्याच बापानं माझ्या अब्रूवर हात टाकला होता. काळ्या भयाण रात्री अनवाणी पायानी धावत धावत रेल्वे स्टेशन वर पोहचले, माहित नाही कोणत्या तरी गाडीत बसले आणि इथे उतरले. सात आठ दिवस भुकेन व्याकुळ भीक मागून गुजरान करू लागले.
अशाच एका रात्री काही मवाल्यांनी माझी छेड काढली. मी जीवाचा आकांत करून ओरडू लागले पण माझा आवाज ऐकणार दूर दूरवर कोणी नव्हत. तशातच अचानक एक गाडी आली आणि त्यांनी माझी मदत केली. गाडी थांबली आणि एक म्हातारी बाई खाली उतरली. अंगा पिंडान भरलेली, लांबसडक केसांची वेणी आणि हातात काठी घेऊन. तिच्या एका आवाजात गाडी चालवणाऱ्या उस्मानन त्या 4-5 मुलांना धूळ चारली.
काही क्षणानंतर मी आक्काच्या कोठीत होते. ती म्हातारी बाई म्हणजे आक्का जी बऱ्याच वर्षांपासून या कोठीत राहते. उस्मान तिचा डावा हात. आणि हीच ती बदनाम गल्ली जिथं येऊन लोक स्वतःची अन देहाची हौस भागवतात. तिनं मला आसरा दिला, खाऊ पिऊ घातलं, माझ्यावर आक्कान कधीच जबरदस्ती केली नाही. आक्काचा कोठा खूप फेमस होता कारण आक्का तिच्या मुलींना जीवापाड जपायची, त्यांची मालकीण म्हणून नाही तर आई म्हणून काळजी घ्यायची. माझ्या सख्ख्या आईनं जितकी माझी काळजी घेतली नाही तितकं प्रेम मला आक्कान दिल, कदाचित या उपकारांच्या ओझ्यामुळ मी स्वतःच्या देहाचं समर्पण केल.
आज मला प्रश्न पडतो, माझ्या बापाचा स्पर्श मला किळसवाणा वाटला म्हणून मी घर सोडल, रस्त्यावरच्या गुंडानी माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून मी आक्काच्या कोठीवर आले आणि सरतेशेवटी उपकारापोटी दुनियेच्या बाजारात देहाच समर्पण करून टाकलं यात माझं काय चुकलं.
🌸🌸🌸🌸🌸🌸
