बर्फी
बर्फी


एक झेंडूचं फूल, त्या बाजूला आंब्याचं पान, पुन्हा झेंडू पुन्हा पान एका ओळीत मांडून ठेवली त्यांनी. खूप छान दिसत होती माळ.
"भरपूर फुलं आहेत, आणखी एक माळ बनवूया...?" नुसत्या विचारांनी पण तो शहारला, बावरला. 'एकच माळ बनवू या', त्याचा त्यानेच निर्णय घेतला, पण दोन माळा बनविण्याच्या विचारांना कुरवाळत कुरवाळत तो माळ गुंफू लागला. पार गुंग झाला होता तो फूल-पान पुन्हा फूल ओवण्यात, तोच सावली पडली, दारात कोणीतरी आलं होतं. त्याने मान वर केली.
समोर ती... अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस, पांढरी ओढणी, कपाळावरच्या टिकलीखाली उमटवलेली हळद-कुंकवाची बोटं. नुकत्याच न्हायलेल्या कुरळ्या केसांतून पाण्याचे थेंब ड्रेसवर ओघळत होते. एक आगळा दरवळ आसमंतात दरवळत होता. त्याचं काळीज लकाकलं. अनिमिष नजरेने तो तिच्याकडे पाहत होता.
"सुई बोचेल." ती बोलली. तो किंचितसा बावरला.
"ठेव ती माळ खाली आणि सुई सतरंजीला टोचून ठेव..."
त्यानं माळ खाली ठेवली आणि तसाच उभा राहिला तिच्याकडे पाहत.
"नितांत सुंदर..." ओठ कळेल-नकळेलसं पुटपुटले...
"फराळ...." ती खोलवर त्याच्या नजरेत पाहत खट्याळ हसली.
ताटली देताना बोटांचा स्पर्श झाला आणि सर्वांगात वीज सळसळून गेली.
"तू....तू...." शब्द शब्दात अडखळले.
"नको बोलूस काही... तुझ्या अगोदर तुझे डोळे सारं काही बोलून टाकतात." ती मोकळेपणाने हसली.
त्याने सारा धीर एकवटला आणि ताटलीमधली बर्फी उचलली, हळूच तिच्या ओठांकडे नेली. तिने पटकन हात पुढे करत बर्फी धरली. त्याचा चेहरा झरकन उतरला.
"पुढे काय होणार आहे हे कळायच्या आधी तोंड पाडत जाऊ नकोस..." तिने दटावलं.
त्याचा चेहरा आणखीनच पडला.
तिने बर्फीचा तुकडा तोडला, इथे-तिथे पाहिलं.
"हं..." त्याने आपसूक तोंड उघडलं, तिने हलकेच बर्फी भरवली.
आनंदाने थुईथुई नाचणारं मन सांभाळत तो भांबावून तसाच उभा राहिला, हातात बर्फीचा तुकडा धरून. तिने त्याला हुंकारत खुणावलं, आणखी एकदा खुणावलं.. तो तसाच उभा. शेवटी तिने त्याचा हात धरून बर्फी भरवून घेतली आणि पळाली. पैंजणांचा आवाज करत घाईघाईने जाणाऱ्या तिच्याकडे तो पाहत होता, पापणी मारायचं भानही त्याला नव्हतं.
********
हॉलमध्ये तो उभा होता. पावलं वाजली.
समोर ती...
केशरी सोनेरी रंगाची पैठणी, मॅचिंग बांगड्यांनी गच्च भरलेला हात आणि टिकलीखाली उमटवलेली हळद-कुंकवाची बोटं.
अनिमिष नजरेने तो तिच्याकडे पाहत होता. दोघांच्या चेहऱ्यावर हलक्या स्मिताचा सडा पडला होता.
"नितांत सुंदर...." मनात लहरी उमटल्या. काही बोलायला म्हणून त्याचे ओठ विलग झाले. तिने पटकन त्या ओठांवर बोट ठेवलं.
"काही बोलू नकोस, इतक्या वर्षांच्या सहवासाने तुझी नजरेची भाषा पाठ होऊन गेलीय... पण आम्हाला बाई असं नजरेने बोलता येत नाही, शब्दच वापरायला लागतात." ती मिश्कील हसली.
"खूप खूप खूप मस्त दिसत आहेस..."
त्याची नजर खळखळून हसली. तिच्या हातातल्या डिशमधला बर्फीचा तुकडा त्याने उचलला. नकळत तिने तोंड उघडलं आणि चिमणीच्या दातांनी बर्फीचा तुकडा तोडला. दातातला तुकडा त्याला भरवला. तो भारावून तिच्याकडे पाहत होता.
तिने त्याला हुंकारत खुणावलं, आणखी एकदा खुणावलं.. तो तसाच उभा. शेवटी तिने त्याचा हात धरून बर्फी भरवून घेतली.
बर्फीचा गोडवा फक्त त्यातल्या साखरेमुळे असतो असं थोडंच आहे!