Pallavi Bhushan

Romance

3  

Pallavi Bhushan

Romance

भले बुरे जे घडून गेले...

भले बुरे जे घडून गेले...

6 mins
208


"नाही नाही म्हणता आठ दिवस लागले सगळं सामान सेट करायला" सोफ्यावर बसत प्रिया बोलली.


"अगं आपल्या दोघांच्या ऑफिसच्या वेळा सांभाळून करायचं म्हणजे लागणारच एवढा वेळ....थोडी विश्रांती घे आता..." आशिष समजावणीच्या सुरात बोलला.


"उद्या मनसोक्त झोपू रविवार आहे तर.....आता स्वयंपाकाला लागते मी...." एवढं बोलून प्रिया उठली.


"सोड गं....आज बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो..." प्रिया काही बोलेपर्यंत त्याने मोबाइल घेतला,"आपल्या नवीन घरातली पहिलीच फूड ऑर्डर आहे...त्यामुळे नुसतं जेवण मागवून कसं चालेल....कुछ मीठा तो बनता है यार...." असं खट्याळपणे म्हणत त्याने ऑर्डर प्लेससुध्दा केली...."डन!!!"


"आता चहा हवा असेल ना तुला?" भुवया उडवत आणि ओठांतलं हसू दाबत प्रियाने विचारलं.


आशिषचा चेहराच खुलला ..."काय छान ओळखतेस गं तु मला....होऊन जाऊ दे एक-एक"


"अडीच वर्षं झालीत लग्नाला...तुम्हारी नस नस से वाकीब हो गयी हूं अब मैं..." प्रियासुध्दा आशिषची मजा घेऊ लागली.


जेवणानंतरची सगळी आवराआवर करून ती बेडरूममध्ये गेली तर तो तिला खुणावत होता...."झाली सगळी कामं...आता तरी वेळ आहे का माझ्यासाठी...." आशिष नाही हो....कोपऱ्यात ठेवलेला तो बॉक्स....


बेडवर बसलेल्या आशिषकडे पाहत तिला खुणावणाऱ्या कोपऱ्यातल्या बॉक्सकडे वळली ती....


"उद्या करुयात यार ते बॉक्स रिकामं" आशिषने नकारघंटा वाजवली.


"अरे जास्त वेळ नाही लागणार....तुझाच खजिना आहे...पुस्तकं...कादंबऱ्या...थेसीस....काय काय सांभाळून ठेवलंय....आज मीपण बघतेच काय काय लपवून ठेवलंय त्यात ते...." डोळे मिचकावत प्रिया बोलली


त्याने बॉक्स उचलून बेडवर ठेवला...तिने हळूहळू सामान बाहेर काढयला सुरुवात केली....एक एक कादंबरी....छावा....पानिपत....राधेय.... गंधाली....दोन ध्रुव.....अमृतवेल....


'अमृतवेल' हातात घेऊन ती म्हंटली..."अमृतवेल कितीदा वाचली तरी तेवढीच भावते मनाला....वि. स. खांडेकरांनी कित्ती सुंदर रंगवली आहेत सर्व पात्रं....यातली अलकनंदा फार आवडते मला.....तुला?? "


'अमृतवेल' म्हंटलं तसं काहीतरी चमकून गेलं आशिषच्या डोक्यात....."हां.... मला ना.... हां.... मलासुध्दा...तीच आवडते....."आशिषचं लक्षच नव्हतं बोलण्याकडे....तो तिच्या हातातलं पुस्तक घेण्याची घाई करत होता.


तेवढ्यात पुस्तकातून डबल घडीचा एक कागद पडला....प्रियाने उत्सुकतेने तो उचलला आणि उघडून पाहिला...तशी जागच्याजागी गोठुन गेली ती....


तिचा चेहरा पाहून आशिषच्या लक्षात आलं....आपल्याला जी भीती वाटत होती तेच झालं....म्हणून तिला नको म्हणत होतो बॉक्स उघडायला.... माझंच चुकलं....


प्रिया ते पत्र वाचून स्तब्ध झाली होती....तिचे डोळे भीती आणि अश्रूंनी दाटून गेले होते....हात थरथरायला लागले आणि ते पत्र तिच्या हातून गळून पडलं....


ते पत्र अडीच वर्षांपूर्वीचं होतं.... प्रियाने आशिषला लिहिलेलं.....ज्यात तिने स्पष्ट लिहिलं होतं......


आशिष

माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न तुझ्यासोबत ठरवलं आहे....माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे....घरच्यांच्या दबावाखाली येऊन मी लग्नाला होकार दिला होता....पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही....

सॉरी मला माफ कर

-प्रिया


तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले....वाहणाऱ्या अश्रूंनी तिला थेट अडीच वर्षं मागे नेलं होतं....


प्रियाने घरी आपल्या प्रियकराबद्दल सांगितलं....वडिलांच्या आधी आईनेच जोरात तिच्या मुस्काटात मारली...तिने रडून गोंधळ घातला...घरचे ऐकायला तयार नव्हते....


वडिलांनी स्थळ पहायला सुरुवात केली....पहिलंच स्थळ आशिषचं आलं...नकार देण्यासारखं आशिषमध्ये काहीच नव्हतं...पण प्रिया तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती....जबरदस्तीने तिला तयार केलं.....बैठक

पार पडली....पुढच्याच महिन्यातली तारीख काढली लग्नाची....पण प्रियाचं मन अजूनही तिच्या प्रियकरामध्येच गुंतलेलं होतं.....


लग्नाला आठ दिवस अवकाश होता....प्रियाने तिच्या प्रियकराला सांगितलं, "माझ्या घरचे ऐकणार नाहीत....आपण मंदिरात जाऊन लग्न करूया..." तो तयार झाला...


त्याच शहरात आशिषचं ऑफिस होतं....तिने एका मनुष्याकरवी आशिषच्या ऑफिसमध्ये आशिषसाठी एक पत्र पाठवलं....ज्यात तिने त्याला लग्नासाठीचा नकार आणि त्यामागचं कारण कळवलं होतं.....


दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेनुसार प्रिया शहराबाहेरच्या गणपती मंदिरात पोहचली.... तिचा प्रियकर अजून आलेला नव्हता ....तिच्या मैत्रिणीसोबत ती वाट पाहू लागली....अर्धा तास... एक तास ...दोन तास...तो आला नाही....दुपार टळून गेली तरी त्याचा पत्ता नव्हता....प्रिया काय समजायचं ते समजली...खुप पश्चात्ताप झाला तिला....तिची निवड चुकली होती...


आईवडिलांचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ लागला...मनातल्यामनात ती त्यांची माफी मागू लागली....तिला आठवलं.... "आत्तापर्यंत तर आशिषला ते पत्र मिळालं सुध्दा असेल....घरी सगळा गोंधळ झाला असेल....आशिषने लग्न मोडून टाकलं असेल.... आपल्या आईवडिलांना त्याच्या घरचे नको नको ते बोलले असतील...." प्रियाला दरदरून घाम फुटला...


ती स्वतःला बोल देऊ लागली.... "आपण असे कसे आंधळे झालो प्रेमात..... सगळं सगळं चुकलं आपलं...."


मंदिरातल्या मुर्तीसमोर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागली ती....स्वतःच्या चुकीचं प्रायश्चित्त मागू लागली देवाकडे.....


मैत्रिणीने सावरलं तिला....ती घाबरत घाबरतच घरी पोहचली...


वडिलांचा राग...आईची रडारड....पाहुण्यांच्या कशानुशा नजरा....सर्व सर्व कल्पना करत ती घरी पोहचली....तशी तिची आई ओरडली तिला...."प्रिया...अगं कुठे गेली होतीस न सांगता..... ती पार्लरवाली दोन वेळेस येऊन गेली....तुझं फेशीयल करायचं होतं ना आज...." प्रियाला काहीच कळेना...तिचे वडील आईवर लटकेच रागावले... "ओरडू नको गं तिला....चार दिवसांनी उडून जाईल ती सासरी...मग बसशील रडत तिच्या आठवणीत..." प्रियाला जरा हायसं वाटलं...."याचा अर्थ आशिषपर्यंत ते पत्र पोहचलं नाही...." तिने देवाचे आभार मानले...


प्रियाने आईवडिलांना तिच्या खोलीत बोलावून घेतलं....त्यांना सर्वकाही खरं खरं सांगितलं....आणि त्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागितली...ती रडतरडतच बोलत होती....."आईपप्पा मी हे सगळं विसरून जाणार आहे....मला देवाने एक नवीन संधी दिली आहे नवीन सुरुवात करण्यासाठी....मी भुतकाळाला विसरून जाईल..... नवीन सुरुवात करेल....सुखाने संसार करेल.....आणि तुमची मान शरमेने खाली जाईल असं पुन्हा कधी वागणार नाही ...."


त्यानंतर आजतागायत तिने त्या सर्व आठवणींना तिलांजली वाहिली होती....देवाचे आभार मानत होती की बरं झालं त्यादिवशी आशिषला ते पत्र मिळालं नाही....नाहीतर मी अशा सोन्यासारख्या माणसांना मुकले असते...


पण आज.... आज तिच्या भ्रमाचा भोपळा फुटला होता....तिचं ते पत्र आशिषला मिळालेलं होतं....


प्रिया शून्यात बघत बसली....आशिषने तिला जवळ घेतलं...ती रडून रडून विचारू लागली..."का आशिष... का तू एवढा मोठा त्याग केलास.... तुला सर्वकाही माहिती झालेलं असताना तु का तयार झालास लग्नाला....मी तुझ्यासोबत एवढी वाईट वागले तरी तु का माझा एवढ्या प्रेमाने स्वीकार केलास....???"


आशिष तिच्या केसातून हात फिरवू लागला...."ए वेडाबाई...रडू नकोस....शांत हो प्रिया.... ऐकतेस का माझं....??"


प्रियाचं रडणं थांबेना....पश्चात्ताप आणि शरमेच्या आगीने होरपळून चालली होती ती....आपल्या अश्रूंनीच हि आग शांत होईल असं वाटत असावं कदाचित तिला....


आशिष ने तिचे डोळे पुसले....तिचा हात हातात घेतला आणि तो सांगू लागला.....

"ऑफिसमध्ये असताना एका त्रयस्थ व्यक्तीने तुझं पत्र आणून दिलं मला....पत्र वाचून मी अवाक होऊन गेलो.... माझ्या पायाखालची जमीनच सरकली....काय करावं काहीच सुचेना...ऑफिसचं काम कसंबसं संपवलं....आणि घरी गेलो...आजची रात्र जाऊदे आणि उद्या सांगू घरात पत्राबद्दल...असा विचार केला मी....उलटसुलट विचारांनी डोकं भणानून गेलं होतं नुसतं ....मी ठरवलं उद्या मंदिरात जाऊ आणि देवालाच सांगू की " हे सर्व सहन करण्याची आणि त्या मुलीला माफ करण्याची शक्ती दे मला ...."


"दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला सुट्टी टाकली आणि शहराबाहेरच्या गणपती मंदिरात गेलो....मला जेंव्हा केंव्हा अस्वस्थ वाटायचं मी त्या मंदिरात जायचो.....त्या दिवशीही गेलो...तिथे मला तु दिसलीस प्रिया....तुझ्या मैत्रिणी सोबत...."


"तुझी नजर कोणालातरी शोधत होती आणि माझी नजर फक्त तुला पाहत होती...तु तुझ्या मैत्रिणीला राहून राहून विचारत होतीस...."तो का नाही आला गं अजून..... येईल ना गं तो....मला फसवणार नाही ना तो..."


तुमच्या शेजारच्या बाकावर मी बसून राहिलो....तुझ्याकडे पाहत....एक क्षणासाठी भीती वाटली होती मला की तु मला पाहशील आणि माझ्यावर आरोप करशील की मी तुझा पाठलाग करतोय....पण मला खात्री होती की तुझं माझ्याकडे लक्षच जाणार नाही....कारण डोळ्यांत प्राण आणून तु मंदिराच्या कमानीकडेच बघत होतीस ....एकटक.... तो आत्ता येईल ...तो आत्ता येईल म्हणून...."


"दुपार टळून गेली पण तो आला नाही...तु मैत्रिणीला बोलून दाखवलेली भीती खरी ठरली होती...तु रडत रडतच मंदिरात गेलीस...बाप्पाच्या मुर्तीवर डोकं ठेवून रडू लागलीस ....प्रिया... तुझ्या पश्चात्तापाच्या आणि दुःखाच्या अश्रूंनी माझ्या मनातला 'नकारा'चा निर्णय आणि तुझ्याबद्दलचा राग पार धुवून टाकला गं...त्या क्षणाला असं वाटलं....झटकन तुझ्यासमोर यावं... तुला जवळ घ्यावं आणि सांगावं....काळजी करू नकोस प्रिया....मी आहे तुझ्यासोबत....मी तुला कधीच अंतर देणार नाही....त्याने अर्ध्या वाटेवर सोडलं तसं मी तुला कधीच सोडणार नाही....विश्वास ठेव...."


"पण निर्धाराने रोखलं मी स्वतःला...कारण त्यावेळेस मी हे बोललो असतो तर तुला ती सहानुभूती वाटली असती आणि आपल्या या नात्यामध्ये तुला कायमच उपकाराखाली दबल्यासारखं वाटलं असतं...."


"तु तिथून निघून गेल्यावर मी मंदिरात गेलो....बाप्पाचं दर्शन घेतलं...आणि त्याला मागणं मागितलं...."माझा आणि प्रियाचा संसार सुखाचा आणि प्रेमाचा होऊ दे....तुझा आशीर्वाद कायम सोबत असू दे.... "


प्रिया डबडबल्या डोळ्यांनी आशिषकडे पाहतच राहिली...प्रेम....क्रुतज्ञता...पश्चात्ताप....शरम....सगळ्या सगळ्या भावनांमध्ये ती इतकी गुरफटून गेली की काय बोलावं आणि काय नाही तिला काहीच समजेना....

आशिषने पुन्हा तिला मिठीत घेतलं....तिचं रडणं अजून थांबलेलं नव्हतं....हुंदके देतच तिने विचारलं....."तुला माझी घ्रुणा नाही वाटत का....माझा राग नाही येत का...?? "


आशिषने दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला आणि म्हणाला.... "गेल्या अडीच वर्षांत मला एका क्षणासाठीही कधी असं वाटलं नाही की तु तुझ्या भुतकाळात अडकली आहेस....तु ते सर्व सोडून एक नवीन सुरुवात केलीस....माझ्यावर मनापासून प्रेम केलंस...माझ्या घरच्यांना आपलं मानलंस....मग मी का म्हणून तो भुतकाळ उकरून काढायचा....??"


तो बोलतच राहिला...."तुला माहितीये भूतकाळाला 'भूत'काळ असं का म्हणतात......कारण वर्तमान आणि भविष्यातही तो आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला छळत राहतो.....म्हणून त्याला भस्मसात केलेलंच चांगलं असतं....बरोबर ना....काय म्हणतोय मी...??"


प्रियाने होकारार्थी मान हलवली.... आशिषने ते पत्र प्रियाच्या हातात दिलं....त्याची सूचक नजर तिला कळली....तिने ते पत्र फाडून टाकले...जणूकाही भुतकाळाशी जोडला गेलेला तो शेवटचा धागाही तिने तोडून टाकला होता.....आता तिचं मन खऱ्या अर्थानं शांत झालं होतं.....


त्याने बॉक्स उचलला आणि म्हंटला...."चला झोपूया....हे नंतर आवरू आपण....आणि उद्या छान कुठेतरी फिरायला जाऊ......कुठे जायचं बोल...... "


"शहराबाहेरच्या त्या गणपती मंदिरात जायचं....??" तिचा भाबडा प्रश्न ऐकून त्याच्या डोळ्यांतून नकळत एक अश्रू ओघळला.....तिच्या ओठांनी तो अलगद टिपला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance