बालपण देगा देवा
बालपण देगा देवा


माणसाचे वय वाढते तसे सहसा त्याच्या मनाचापण विकास होतो. पर्यायाने त्याच्या वृत्ती, विचार आणि स्वप्नांची पण व्याप्ती बदलत जाते. संगत आणि सोबत ह्यांच्या परिणामामुळे जगण्याचे परिमाण बदलतात. रोज नवे विचार मनाला पंख देतात आणि ते पुढील आयुष्याच्या क्षितिजाकडे उड्डाण करते. आजुबाजूच्या विश्वाची शिकवण त्याच्या पंखात बळ फुंकते आणि त्याच्या प्रवासाला दिशा पण देते. जसा जसा प्रत्येक माणूस मुळापासून त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करतो तसा तसा त्याच्यात अजून उत्साह, उर्मी आणि उत्कंठता वाढते. मग एकदा का ते लक्ष्य गाठले की एखाद्या विसाव्याच्या क्षणी मागे वळून बघणे होते. मग लक्षात येते गवसले काही !! आणि हरवले काही !!.
श्याम मुरगुडकर, एक हुशार मुलगा. परीस्थितीने समोर उभं केलेल्या प्रत्येक आव्हानाला आपल्या बुद्धी आणि अनेक वेळा पडून, हरून परत जिंकण्याच्या चिकाटी वृत्तीने मात करत आज अमेरिकेतील बड्या कंपनीच्या बड्या हुद्द्यावर आहे. त्याचे सारे विश्व असणारे त्याचे ध्येय आज त्याला गवसले आहे. आता फक्त पुढे पुढे मार्ग क्रमित जाणे. त्याचा दिनक्रम मोठा शिस्तीचा. रोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योगासन, प्राणायाम, वेळेवर आवरून योग्य आणि पोष्टिक खाऊन, सर्वांच्या आधी ऑफिसला पोहोचणे. मन लावून काम करणे. काम करणे म्हणजे त्याचा श्वासच. वेळेत आणि वेळेवर हे म्हणजे त्याचे जगण्याचे धोरण. दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी परत फिरून येणे. घरी येणे, जेवणे आणि एखादे पुस्तक वाचत झोपी जाणे. अनेक वर्ष झाले त्याचा हा नित्यकर्म बदलला नाही. अतिशयोक्ती करायची झालीच तर शेजारी त्याचा येण्या-जाण्यावर आपली घड्याळातील वेळ बरोबर करून घेऊ लागली होती. त्याचा मित्र वर्ग फारसा किंवा नव्हताच म्हटले तरी नवल नाही. काम सोडल्यास त्याला कुठलेही व्यसन नाही, खाणे हे रोज नित्य नैमित्तिक कर्म ह्यापैकी एक मानणाऱ्या जातीतला हा प्राणी. पण काही दिवस झाले, श्याम खूप उदास होता. त्याचे रोजच्या वेगवान जीवनाला जणू ब्रेक लागला होता. त्याच्या विचारांना, वृत्तीला आणि तत्वांना तडा जावा असे काहीसे त्याला दिसले होते.
एक रात्री अचानक तो झोपेतून जागा झाला आणि त्याला समोर दिसले ते दुरवर राहिलेले त्याचे गाव, गावची वेस, त्यावरचे ते उंच आणि डेरेदार वडाचे झाड, ज्यावर उभा राहून त्याने ह्याच क्षितिजाकडे बोट दाखवत मोठ्या आत्मविश्वासाने स्वत:लाच सांगितले होते की ते जिंकायचे आहे, त्या झाडाखाली उन्हात रापत आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघणारे त्याचे सवंगडी, थोड्याच अंतरावर असणारे त्याचे छोटेसे शेकारलेले टुमदार घर आणि दारात जीव डोळ्यात आणून आपल्या एकुलत्या एक मुलाची वाट पाहणारी त्याची आई. तसेही श्यामला बालपण आणि बालपणातील आठवणी कधीच शिवल्या नाहीत, कारण खूप आधीपासून त्याचे म्हणणे होते की बालपण संपणे हे कात टाकण्यासारखे आहे. त्यातूनच पुढे प्रगती होते. पण आज त्या आठवणीमध्ये त्याला दिसला एक चेहरा, एक मित्र, एक सवंगडी, राघव, जो त्या छोट्या कळपामध्ये त्याच्यासारखाच एक होता. पण त्याचे विचार होते पूर्ण वेगळे, तो रमत होता निसर्गात. छोट्या छोट्या गोष्टीत त्याचे मन रमायचे. त्याने मोठमोठाले ध्येय कधीच ठेवले नाही. तो प्राण्यांशी, पक्ष्यांशी बोलायचा, हवेच्या तालावर नाचणाऱ्या रुईच्या कापसासारखा बागडायचा, पाण्यावरच्या प्रखर प्रकाशासारखा तरंगायचा. त्याच्या पंखात पण बळ होते पण त्याने वादळाला आव्हान देत गरुड भरारी कधीच घेतली नाही, की नशिबाला दोष देत खितपत पडणे मान्य केले नाही. त्याने ही श्यामसारखाच खूप आधी त्याचा मार्ग ओळखला होता, त्यावर पण अपार कष्ट होतेच, अनेक खड्डे होते, अनेक डोंगर उभे होते. पण हा गडी ते सारे हसत हसत आणि विनासायास पार करून जात होता. त्याउलट श्यामला मात्र कष्टांचे काटे आजपर्यंत बोचत आहेत. पण त्या रात्री झोपेतून जागे होण्याचे कारण ह्या आठवणी नव्हत्या, तर होता त्याचा तो मित्र. काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या त्याच्या ऑफिसमध्ये हा मित्र त्याला शोधत आला. रितसर अपॉईन्टमेंट घेऊन. खूप वेळ त्यांची मिटिंग झाली, नवी डील फायनल झाली. दोघेही खुष झाले. अजूनपर्यंत श्यामने राघवला ओळखले नव्हते. पण जाता जाता राघव म्हणाला श्याम तुझ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ मिळाला तर कधी तरी भेटू आणि गावाकडे जशी शर्यत लावून झाडावर चढायचो, नदीत पोहायचो, मातीत कुस्ती खेळायचो तसे काही तरी करु. बालपण पुन्हा एखादा अनुभवू. श्यामचे डोळे चमकले. इतक्या वर्षात, इतक्या शेकडो मैल दूर माझे बालपण जाणवून देणारा कोणी भेटला नाही, तर हा कोण आहे ? राघवला श्यामच्या डोळ्यातले प्रश्न दिसले आणि त्याने लगेच आपली जुनी ओळख करून दिली. राघवसुद्धा श्याम सारखाच एका मोठ्या कंपनीत होता अमेरिकेत, पण फरक एवढाच की तो त्या कंपनीचा मालक होता.
राघव निघून गेला. पण श्याम मात्र अस्वस्थच होता. त्याचे असवस्थ होण्याचे कारण होते ते म्हणजे राघवचे वागणे. तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक होता पण त्याचा डोळ्यात श्यामला दिसले ते त्याचे जिवंत बालपण, जे अजूनही तितकेच ताजे टवटवीत होते, नुकत्याच फुललेल्या फुलासारखे, त्याचे वागणे बोलणे जरी मोठ्या व्यक्तीसारखे असले तरी त्याच्यातले ते बालपण मात्र त्याला नेहमी आनंदी आणि हसतमुख ठेवत होतं. हे हसणे ते नव्हे जे एरव्ही गालावर झळकून गायब होऊन जाते. तर ते होते जे मनापासून चेहऱ्यावर येत आणि दुसऱ्यालासुद्धा तसेच हसतमुख होण्यास भाग पाडत होते. आठवून बघा आपल्या आयुष्यातला एखादा क्षण, तुम्ही तिकीट काढण्यासाठी उभे आहात, भर दुपार आहे, तुमच्या समोर एक बाई तिच्या मुलाला कडेवर घेऊन उभी आहे. ते बाळ बराच वेळ तुमच्याकडे बघत आहे आणि एक क्षण तुमची आणि त्याची नजरानजर होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक नाजूक, निरागस हसू फुलते आणि न कळत तुमचाही चेहरा खुलतो आणि तुम्हाला त्या भर उन्हात पण आनंदाचे शहारे येतात. तसेच काहीसे श्यामचे पण झाले होते. पण श्याम अस्वस्थ होता ते हे जाणून घेण्यासाठी की, जे बालपण त्याने इतके मागे सोडले होते, ज्याचा स्पर्श त्याला आजपर्यंत होत नव्हता ते एकदम कसे येऊन त्याला बिलगले ? कसे ते त्याच्यात सामावले आणि आता श्यामची घुसमट होऊ लागली की कसं मी ह्या बालपणाला माझ्यापासून दूर ठेवू ?
काही दिवसांनी तो राघवला भेटला. मनातले सगळे प्रश्न त्याने त्याचा समोर मांडले, अगदी गळ्यात पडून रडला सुद्धा. राघवला त्याच्या मनाचा ठाव लागला होता. त्याने श्यामला सावरले आणि म्हणाला, "अरे आपल्या आयुष्याचे गणित खूप सोपे असते, आपणच त्याला नको त्या गोष्टीत अडकवून क्लिष्ट बनवतो आणि नंतर त्याच्यात गुरफटून हरवून जातो. देव देताना जीवाबरोबर देतो ते बालपण, निरागस, नितळ, अगदी सकाळच्या सूर्य प्रकाशासारखे स्वच्छ. मग ते बालपण इतर मोठे घडवतात त्यांना हवे असेल तसे, मोठे होताना बालपणाला चिकटतात ते षडरिपू, जगाचे बोथट न कळणारे पण तरीही पाळावे लागणारे नियम. ह्यात गर्दीत त्या बालपणाचा हात निसटून ते कधी हरवते ते कळत नाही आणि जगाची रीत असे समजून आपणपण नेमून दिलेल्या ढोबळ मार्गावर चालू लगतो. जसे प्रसंग येतात, परिस्थिती निर्माण होते तसे ते सुगुणात्मक बालपण, निरस, राकट, ध्येयवादाने वेड्या झालेल्या तरुणपणात लुप्त होऊन जाते. थोडक्यात आयुष्याचे वयाचे प्रत्येक वळण हे जुने कात टाकून नवे वल्कल घालण्याची प्रक्रियाच आहे. जगत नियम आहे तो आणि तो कोणीही बदलू शकत नाही किंवा बदलू पण नये. पण एक गोष्ट आपल्या हातात नेहमी असते ती म्हणजे कात टाकलेल्या मातीतून काय पुढे घेऊन जायचे. मला ते खूप आधी कळले. मी माझ्या बालपणातील, निरागसपणा, नितळता, गोडवा जपून ठेवला. त्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या रूपाशी जोडले, त्यामुळे त्या वयाच्या पोक्तपणात त्यांचाही समावेश झाला आणि माझ्या बालपणाशी माझी नाळ अजूनही घट्ट जोडली गेली.
श्यामला जणू आयुष्याचे सार लक्षात आले. इतकी वर्षे जे बालपण त्याच्यामागे धावत आहे आणि तो त्यापासून दूर पळत आहे अशी त्याची जी भावना होती, ती साफ चुकीची होती. खरंतर बालपण आपल्या सावलीसारखे नेहमी आपल्या बरोबर राहते. आपण त्याच्याकडे पाठ फिरवायची की त्याला आपल्यात सामावून घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संत पण म्हणून गेले 'बालपण देगा देवा' त्याचे ही मर्म हेच आहे की ती निरागसता, ते प्रेम भाव मनात निर्माण झाल्याशिवाय जिथे दैव प्राप्ती ही होत नाही तर स्वत:चे खरे रूप तरी कसे कळेल?"