लिमिटेड माणूस - की
लिमिटेड माणूस - की
लिमिटेड माणूस - की
"माणुसकी लिमिटेड झाली आहे " असे कुठे तरी वाचनात आले, आणि मनाला प्रश्न पडला की खरच असे झाले आहे का? मी स्वत: बद्दल चा विचार केला. मी दररोज माझ्या घराखालील मांजरांना खायला देतो, गाडी चालवताना शक्यतो पायी अथवा सायकल चालवणारे ह्यांच्या मागे होर्न नाही वाजवत. ऑफिस मध्ये माझ्या आधी माझ्या सहचारी मित्रांचा विचार करतो. घरी सर्वांना कामा मध्ये मदत करतो. भुतदयेत विश्वास ठेवतो. शक्यतो वाद होऊ नयेत, किंवा वादाचा विषय टाळतो. नात्यांमध्ये प्रेमभाव जपतो. हिच असते माणुसकी ! किंवा माणुसकीच्या गुणांपैकी काही. तुम्हाला पण खरे वाटले ना? मला पण काही दिवसांपूर्वी पर्यंत असेच वाटत होते की आयुष्यात आपण आपल्या आप्त स्वकियांबरोबर आणि त्यांच्या करिता जे काही चांगल्या मानाने वागतो, त्यांच्या भल्याचा विचार करतो, ह्यालाच माणुसकी असणे असे मानतात. पण काही दिवसांपूर्वी मी माझ्या गावी गेलो होतो. तिथल्या प्रसंगाने माझे डोळे उघडले आणि माणुसकीचे खरे दर्शन झाले. गावी जाण्याचे निमित्त काही विशेष असे नव्हते. माझे एक काम होते आणि त्याच बरोबर जुन्या मित्रांना भेटणे. माझे काम अपेक्षेपेक्षा लवकर संपले, म्हणून मी न कळवताच माझ्या मित्राच्या घरी पोहचलो. त्यांना आश्चर्य वाटले की एरवी फोन करून, परवानगी घेऊन येणारा मित्र आज अचानक कसा आला.
मला खरं म्हणजे त्यांची गंम्मत पहायची होती. बघायचं होतं की शहरात जस घडतं तसं ह्यांच्या कडे पण घडेल काय. धांदल उडेल का? काय करू? कसे करू? चे प्रश्न उभे राहतील का? कारण हाच मित्र शहरात माझ्या घरी आला होता, असाच अचानक आणि तेही सोमवारी सकाळी, त्याच्या बायका पोरांसोबत!! त्याच्या चार वर्षांच्या मुलीला मुंबई पहाण्याची इच्छा झाली होती. तो माझ्या बालपणीचा मित्र. त्याची समजूत होती की जसे गावात आपण एकमेकांकडे कधीही जाऊ शकतो तसे शहर असो कि गाव काय फरक आहे? पण त्या भोळ्या मित्राला काय माहीत शहरामध्ये गोष्ट वेगळी असते. पण सोमवारी? आणि तेही आम्ही दोघे ऑफिसला जाण्याच्या तयारीत असताना? त्याला कोणी तरी सांगितले कि स्टेशन पासून माझे घर जवळ आहे. म्हणून चालत आला तो. मी पण आत ये वगैरे म्हणायच्या आधीच, अरे तू? असा कसा न सांगता आलास असा प्रश्न विचारून बसलो. पटकन जीभच चावली आणि नंतर अरे! म्हणजे! ची बाराखडी लावून सारवासारवी केली, पण तो प्रयत्न आम्हा दोघांच्या नजरेला आणि मनाला कळला. तो म्हणाला अरे मित्रा काळजी नको करूस मी इथे राहायला नाही आलोय, फक्त तुला भेटायला आलो. इथेच जवळ हॉटेल आहे तिथेच राहणार आहे मी. त्या दिवशीचा चहा पण माझ्या घश्या खाली उतरेना. मी म्हणालो अरे इथेच रहा ना उगाच कशा हॉटेलचा खर्च? त्यावर तो मला म्हणाला, गावाकडे तुझी आई - वडलांना जी पत्र यायची, ती मीच त्यांना वाचून दाखवत असे. त्यात नेहमी न चुकता तुझे एक वाक्य असे 'येण्या आधी फोन किंवा पत्र पाठवून कळवा म्हणजे गैरसोय नको' आणि तुझी गैर सोय करण्याची माझी ईछा नाही. असे म्हणून तो निघून गेला.
त्या दिवसानंतर त्याची माझी अनेक वेळा भेट झाली. घरी येण्याचे निमंत्रण पण दिले. पण न तो आला न मी गेलो. काही वर्षांनी मी तो प्रसंग विसरलो. पण जेंव्हा कधी तो प्रसंग आठवत असे तेंव्हा मला माझ्या वागण्याचे समर्थन करावेसे वाटे. बरोबर आहॆ माझे वागणे! एखाद्या नोकरदार व्यक्तीला सकाळी तरी कोणी का त्रास द्यावा? एकतर रविवारच्या घर कामाने थकलेले शरीर, त्यात लवकर उठा, नाष्टा बनवा, जेवणाची तयारी, अंघोळ, कपडे इस्त्री करणे, मुलांचे आवरणे, त्यांना शाळेत पाठवणे, सोबत स्वत:चे आवरून वेळेवर बस गाठून ऑफिसला पोहचण्याची घाई. त्यात ऑफिसमधल्या कामाचे टेन्शन. दगदग होते, तीन त्रिकाळ जीव नुसता झिजत असतो. लोकांना काय पडले आहे त्याचे? त्यात तब्येतीचे बारा वाजले आहेत. जेवणातल्या भाजी पेक्षा गोळ्यांचा भाडीमार जास्त आहे. बर, घरी परत आल्यानंतर तरी उसंत असते का? मुलाचा गृहपाठ बघा रात्रीच्या जेवणाची तयारी, भांडी आणि परत पुढच्या दिवसाची तयरी. शहरी जीवनात अडकलेल्या माणसांची व्यथा गावाकडच्या लोकांना नाहीच कळणार. आणि माझी मित्राला काय कमी आहे. ४०-४० एकर जमीन आहे, गुरं ढोरं आहेत, ५-१० लोकांचा फौज फाटा आहे दिमतीला. त्याला आपल वाटलं असणार आपला मित्र आहे मुंबई मध्ये आपणा पण जाऊयात जीवाची मुंबई करू!! हेच सारे विचार पुन्हा मनात उफाळून येत असताना मी त्याच मित्राच्या घरी अचानक येउन ठेपलो होतो. मला दारात पाहून त्याची बायको अगदी आश्चर्यचकित झाली आणि प्रसन्न चेहऱ्याने म्हणाली या ना भावजी!! आज तुम्ही आमच्या घरी?!
मी आत आलो. त्याचा तोच चौसोपी जुना वाडा, ज्यात आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याचे आई वडील थकून निजधामी गेले होते. पण तो वाडा तसाच होता. अस म्हणतात कि घरातल्या माणसांच्यातलं सुख आणि प्रेम त्या वास्तूला सुद्धा चिरंतन बनवते. मी विचारलं, अहो वहिनी, धनी नाही दिसत तुमचे? तसं त्या म्हणाल्या अहो तिन्हिसांजेला वेळ आहे अजून. तुम्ही जेवायच्या वेळेला आले आहत अगोदर जेवून घ्या तोपर्यंत येतीलच. मला आश्र्याचा धक्काच बसला, एकतर मी न सांगता आलो, ह्या बाईने जेवणाच्या गणितात आम्हाला धरले हि नसेल पण तरीही हि बाई आनंदाने आम्हाला जेवा, विश्रांती घ्या असे म्हणते. मी राहून हा प्रश्न घश्या खाली घालत होतो की वहिनी आज राहणार आहे न? असा प्रश्न नाही का विचारणार? कदाचित त्यांनी ते गृहीतच धरले होते आणि तशी तयारी पण केली होती. आम्ही त्या माउलीच्या हातचे रुचकर जेवण जेवलो आणि एका खोलीतील पलंगावर पहुडलो. एरवी दमून भागून सुद्धा रात्री कित्येक वेळेला शांत झोप येत नाही. माझ्या बिल्डींगच्या बाविसाव्या मजल्यावरच्या टेरेस फ्ल्याट मध्ये एकटाच फेऱ्या मारत जगात असतो. हे पण लक्षात आले कि सिगारेट चे प्रमाण पण वाढले आहे. पण इथे मला दोन मिनटात शांत झोप लगली. संध्याकाळी उशीरा माझा मित्र आला. त्याने ट्रक्टर वरून उतरून, त्याने मला अक्षरश: मिठी मारली. उचलूनच घेतले त्याने मला. त्याने त्या रात्री गावातील आणखी काही मित्रांना घरी जेवण्यास बोलवले. माझी ओळख करून दिली, कि मी मोठया शहरा मध्ये एका प्रतीथयश कंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. अगदी सुदाम्याने जसे कृष्णा बद्दल सांगावे तसे तो बोलत होता आणि मी आपला आ वासून ते सारे पाहत होतो. त्या रात्री माझ्या मनातला अपराधी भाव मला झोपू देत नव्हता. मी वाड्याचा छतावर आलो. एकटक चांदण्यांकडे पाहत होतो. त्यांच्यात माझ्या बालपणी च्या आठवणी शोधत होतो. हळू ते चांदणे धुसर होऊ लगले आणि चटका बसावा तसा जागा झालो. डोळ्यांना हात लावला ! आणि आश्चर्य ! इतके दिवस हे अश्रू कुठे लपलेले होते? मुक्या भावनांचा आवाज शब्दांपेक्षा जास्त असतो. त्यांच्या नुसत्या स्पंदनाने ह्या हृदयाचे त्या हृदयाला कळते. तो माझा मित्र माझ्या मागेच येउन उभा होता. मी गडबडलो, माझा मोठ्ठा असण्याचा, सुशिक्षित असण्याचा, उच्च वर्गीय, शहरात राहत असण्याचा अहंकार मध्ये आला, आणि मी अरे झोपला नाहीस का अजुन, वगैरे बेसूर प्रश्नामागे सत्य लपवण्याचा प्रयत्न करु लगलो. सत्य हे होते की, काही वर्षांपुर्वी तो असाच माझ्या घरी आला तेंव्हा त्याला साधा चहा देताना पण मी स्वार्थी विचार करत होतो. तिथे ह्या मझ्या मित्राने मला त्याचं माणुसकीने पुरते विकत घेतले होते.
खरच शिक्षण माणसाला सुशिक्षित करतं, ध्येयवादी, बुद्धिवादी बनवतं पण शहरी जीवनातली हि लिमिटेड माणुसकी माणसाला माणसापासून दूर नेत आहे. शिक्षण माणसाला सुशिक्षित बनवतं. पण माणुसकी त्यालाच सुज्ञानी बनवतं. हेच रहस्य त्या दिवशी माझ्या मित्राबारोबर राहून मला उमगलं. आता माझ्या ही घराचे दरवाजे सर्व मित्र आप्त लोकांना सताड उघडे आहेत आणि मनाचे सुध्दा …।