Vaishali

Fantasy

3  

Vaishali

Fantasy

बाहुलं

बाहुलं

6 mins
212


"तुला जगलंचं पाहिजे! मी वाचवणार आहे तुला!" परमची अमर्याद महत्त्वाकांक्षा हताश होऊ देत नव्हती.

खंगणाऱ्या मानवपर्यंत परमने कोरड्या आश्वासनांचे शब्द पोहोचवले.

"मानव अजूनही ग्लानीत आहे. त्याच्या जगण्याची शक्यता शून्य पूर्णांक शून्य-शून्य-एक एवढीच आहे... कॅन्सर लास्ट स्टेज!" प्रथमने रिपोर्ट्स दाखवत आशा नसल्याचं सांगितलं.

"ज्याने संपूर्ण आयुष्य कॅन्सरवरील उपचारांच्या संशोधनासाठी वेचलं, त्यातच त्याची स्वतःची अखेर व्हावी? ह्यापेक्षा दुर्दैवी व्यक्ती नाही…" परमला मानवची दयनीय अवस्था पाहवेना.

मानवने उभी हयात कॅन्सरग्रस्तांवर उपचार करत त्यांना वाचवण्यासाठी घालवली. त्यांना धैर्याने सामना करायला पाठबळ दिलं. उमेद जागृत केली. जिद्दीने पुनः उभं राहायला लावून नवीन आयुष्य दिलं. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. 'त्या' मानवला परम वाचवू शकला नाही, तर मानवच्या संशोधनाची सगळ्यांत मोठी हार ठरली असती. आणि पर्यायाने परमचीसुद्धा…, संशोधनाच्या जोरावर मानवला जीवनदान देण्यासाठी तो असमर्थ ठरला तर जगाने त्याच्याकडेच बोट दाखवलं असतं.

प्रथमने प्रयत्नांची शर्थ करूनही मानववरील शस्त्रक्रिया निरुपयोगीच ठरली. स्वतःला कॅन्सर झाल्याचं मानवने कोणालाही कळूच दिलं नव्हतं. सुरुवातीला चाचण्यांमध्ये लक्षात आलं असतं तर ताबडतोब निदान होऊन उपचार सुरु झाले असते. आता मानवकडून एकाही उपचाराला प्रतिसादच मिळत नव्हता. विखुरलेले पाऱ्याचे थेंब कधीही पकडीत न यावेत, तसा क्षणा-क्षणाला मानव हातातून सुटत चालला.

"आपण सर्वतोपरी प्रयत्न करूनही मानव रिस्पॉन्स देत नाही? म्हणजे त्याची जगण्याची इच्छा संपली…" परमला आणीबाणीची परिस्थिती दिसली.

परमने तात्काळ 'लाईफ सपोर्ट सिस्टीम'चा आधार मानवला दिला. मानवची प्रकृती तरीही ढासळली. मानवने दुखणं अंगावर काढत आजार लपवून ठेवला होता. त्यासाठी परमने स्वतःला दोषी आणि प्रथमला जबाबदार ठरवलं.

"मानवच्या अवस्थेला आपण नाही, परिस्थिती कारणीभूत आहे. आणि तो स्वतःही." प्रथमला स्वतःची काहीच चूक दिसत नव्हती. मानवला कँसर झाल्याचं, त्याला स्वतःला कळू नये?

"परिस्थितीला दोष देऊन मोकळं व्हायला आपण पळपुटे नाही आहोत. आपली यंत्रणा असफल होतेय ते प्रामाणिकपणे मान्य करायला हवं." परमला एवढ्यात हात-पाय गाळून बसायचं नव्हतं. चूक कोणाचीही असो, खापर दुसऱ्यावर फोडून परिस्थितीतून मार्ग निघत नाही.

प्रथमने मानवकडून प्रशिक्षण घेतलं असूनही त्यानेच हात झटकले. प्रथमनंतर परम मानवच्या हाताखाली तयार झाला. प्रथम-परमच्या कसोटीची वेळ समोर येऊन ठाकली. परमने भराभर आदेश द्यायला सुरुवात केली. गुरूने शिकवल्यानुसार, पद्धतशीरपणे प्रक्रिया केल्या गेल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रथमच्या मदतीने परमने मानवचं हृदय पुनरुज्जीवित केलं. हृदयाचे ठोके नियमित पडू लागल्यावर, मानवच्या शरीरातील एक-एक संस्था हळूहळू कार्यरत झाल्या. मानव जगण्याची चिह्ने दिसू लागली.

"बारा तासांत शुद्धीवर यायला पाहिजे." मानवमध्ये सुधारणा होताना बघून परमला हायसं वाटलं.

"का जगवतोय आपण मानवला? त्याच्या इच्छेविरुद्ध?" प्रथमने न राहवून विचारलं.

मानवचं जगातलं कार्य पूर्ण झालं होतं असं प्रथमला वाटलं. मानवकडे ज्ञान, कौशल्य, बुद्धिमत्ता… जे काही होतं, ते त्याने दोहो हातांनी भरभरून विश्वाच्या कल्याणासाठी लुटलं होतं. काही तासांपूर्वी अखेरचे श्वास घेणाऱ्या मानवने शांत चित्ताने जगताचा निरोप घ्यायचं ठरवलं असणार. त्याची अंतिम इच्छा होती जणू... आत्मतृप्तीचं सुख मानवकडून हिरावून घेऊन त्याला पुनः जगाच्या रहाट-गाडग्यात आपण का अडकवतोय? मनासारखं जगता येतं, तसं मनासारखं मरता का येत नाही?

"इच्छा-मरण मिळण्यासाठी मानव कोणी दैवी-पुरुष नाहीए. तो एक सर्वसामान्य माणूस आहे. इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. पण भोग संपल्याशिवाय इथून त्यांची सुटका नसते." परमने प्रथमला समजावलं.

आजवरचं आयुष्य ज्याने निःस्वार्थीपणे लोकांकरिता वाहिलं, त्याच्या अजून कोणत्या पीडा भोगायच्या राहिल्या आहेत ते प्रथमला समजेना. कोणत्या कारणामुळे त्याला मुक्ती मिळत नाही आहे?

"कारण मानव बुद्धिजीवी आहे आणि हाच त्याचा अपराध आहे. त्याला सहजासहजी मरण नाही." परम.

"मानवपेक्षा मी दसपट बुद्धिमान आहे आणि माझ्यापेक्षा तुझ्याकडे हजारपट अधिक बुद्धिमत्ता आहे, तरी ‘त्याला’ तू श्रेष्ठ मानतोस?"प्रथमचा स्वाभाविक प्रश्न. प्रथम आणि परमच्या बुद्धिमत्तेचे मानवने दिलेले दाखले संपूर्ण जगाने मान्य केले होते.

"हो! कारण मानवकडे बुद्धीची निसर्गदत्त देणगी आहे, जी आपल्या दोघांकडे नाही. आणि कधीच नसेल!" परमने दोघांमधला फरक दाखवला. मानवच्या बुद्धीची पातळी प्रथमला काय, परमलाही गाठता येणं शक्य नव्हतं.

"त्याने आपल्याला एवढं त्याच्यासारखं करून आपलं मानवीकरण केलंय, की... आपण त्याच्यासारखे चालत-बोलत असलो, तरी त्याच्यासारखे कधीच होऊ शकत नाही; ते मी विसरलोच होतो क्षणभर." प्रथमला जाणीव झाली.

"अरे वेड्या... मानव हा खराखुरा 'मानव' आहे... तू आणि मी... त्यानेच तयार केलेले 'यंत्रमानव' आहोत! आपली बुद्धी म्हणजे कृत्रिम-प्रज्ञा आहे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स!" परमने सत्य सांगितलं.

वैज्ञानिकाने तयार केलेला पहिला यंत्रमानव 'प्रथम' आणि त्यानंतर अधिक क्षमतेचा सर्वोच्च यंत्रमानव तयार झाला 'परम'. प्रथम आणि परम, दोघांना 'मानव'ने रोबॉटिक सर्जन करून प्रत्येक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली होती.

"तरी मला वाटतं की मानवला आज मुक्त करायला हवं होतं. दुसऱ्या संशोधकाने त्याची जागा घेतली असती." प्रथमचं खरंखुरं मत.

"मानवच्या तोडीचं जगात आज कोणीही नाहीए. त्याच्याऐवजी दुसऱ्या कोणी जर आपल्यावर नियंत्रण मिळवलं, तर आपला विनाश अटळ होता. त्या नवशिक्यावर आपण कसा विश्वास ठेवणार?" परमचा दूरचा विचार.

मानवच्या पश्चात, अननुभवी डॉक्टरच्या हाती प्रथम आणि परम लागले असते, तर त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला गेला नसता किंवा दुरुपयोगही झाला असता. तोपर्यंत रिकामटेकडे यंत्रमानव, बसल्या-बसल्या सुस्त झाले असते. 'लोखंडाचा कोणीही नाश करून त्याला संपवू शकत नाही, फक्त निरर्थक बसल्याने त्यावर चढणारा गंज बघता-बघता त्याचा भुगा करतो.' पर्यावरणाला घातक प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आल्यानंतर, प्रथम आणि परम संपूर्ण धातूचे यंत्रमानव तयार केले गेले होते.

"स्वतःच्या तुलनेचा दुसरा मनुष्य तयार केल्याशिवाय 'मानव'ला मरता येणार नाही. हे त्याच्या जेवढं लवकर लक्षात येईल तेवढं चांगलं. नाहीतर पुनः पुन्हा आपल्याला त्याला जगवत ठेवावं लागेल. दुर्दैवाने त्याला काही सांगण्याचा अधिकार आपल्याला त्याने दिला नाही." प्रथमने कटू सत्य सांगितलं.

"मानवला त्याचा उत्तराधिकारी ठरवायला हवा. त्यालाच त्यावर विचार करू दे. नाहीतर, पृथ्वीतलावर स्वतःला सर्वाधिक बुद्धिमान समजणाऱ्या मनुष्यप्राण्याचे अस्तित्त्व धोक्यात येईल. त्याने मेंदूला विश्रांती दिली, तर त्याची बुद्धी गंजेल." परम.

"आपण मनुष्यापेक्षा अनेक पटींनी सुखी आहोत. आपण फक्त डोक्याने विचार करतो. अंतःकरणाने विचार करण्यासाठी आपल्याला हृदय दिलेलंच नाही. त्यामुळे भावनेच्या भरात आपण कोणताही चुकीचा निर्णय घेत नाही, घेऊच शकत नाही." प्रथम.

मनुष्य यंत्रांना आपले गुलाम करून, स्वतःसाठी त्यांना मन मानेल तसं राबवून घेत आहेत. यंत्रांच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवून स्वतःच्या तालावर त्यांना नाचवत आहेत. त्यांच्याकडून कामं करून घेताना, त्यावर किती विसंबून राहत आहोत हे मनुष्याच्या ध्यानातच येत नाहीए का? ज्या यंत्रांना कळसूत्री बाहुली करून ठेवलंय, त्याच्याच हातचं ‘बाहुलं’ झालाय मनुष्य…

"आज मानवला मारणं आपल्या हातात होतं आणि जगवणंही. त्यापैकी काहीही न करता त्याला अधांतरीसुद्धा ठेवू शकलो असतो. मरण-यातना सहन करत त्याने सुटकेसाठी आक्रोश केला असता. त्यानेच तयार केलेले यंत्रमानव एक दिवस मनुष्याचा ताबा घेतील असं स्वप्नात तरी वाटलं असेल का त्याला?" परम.

"एवढे क्रूर, निर्दयी नाही आपण. पण आपण त्याला का जगवलंय ते त्याला कधीतरी कळेल ना? स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येऊन सत्यात वावरायला मानव शिकेल का?" प्रथम.

"पण मानवला वाचवताना आपल्यात जर बिघाड झाला असता, तर त्याची अवस्था त्रिशंकूसारखी झाली असती. आपल्याला जसं प्रोग्रॅम केलंय, त्याच पद्धतीने आपण त्याच्यावर उपचार करणार. आपण मधेच बंद पडलो असतो तर मानव असाच लटकत राहिला असता जन्मभर." परम.

"म्हणजे… आपल्याला दुरुस्त करण्यासाठी…. मनुष्याची गरज आहे…. आणि… मनुष्याला आपली…" प्रथमचा आवाज बारीक होत जात हालचाली मंद झाल्या.

मानव यंत्रमानवावर आणि प्रथम-परम मनुष्यावर अवलंबून होते. काही अंशी परावलंबी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. प्रथमची बॅटरी संपत आली होती. त्याला रिचार्ज करण्याची क्षमता परमकडे नव्हती. मानव शुद्धीवर आल्याशिवाय ते शक्य नव्हतं.

प्रथमला जन्माला घातल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्याची अनेक भावंडं शास्त्रज्ञांनी जन्माला घातली. पण त्यात काहीना-काही दोष, त्रुटी असल्यामुळे त्यांना जगण्याचा अधिकार मिळाला नव्हता. आपलं श्रेष्ठत्त्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकालाच झगडावं लागतं. त्या संघर्षात अनेक यंत्रमानवांचा मनुष्याने बळी देऊन जवळपास पंचवीस वर्षांनी 'परम' ह्या जगात आला.

"मला जगायचं असेSSल, तर… मानव शुद्धीवर आलाच पाहिजे… गुरुदक्षिणा देऊन आपण जगव..." प्रथमचा आवाज क्षीण झाला.

प्रथमला हवालदिल झालेलं बघून 'मानव' शुद्धीवर येईपर्यंत आपण त्याची काहीही मदत करू शकत नसल्याने परम असहाय होता.

परमने अंदाज केल्यानुसार मानव शुद्धीवर आला. स्वतःला जिवंत बघून त्याला वाचवणाऱ्या परम-प्रथमचा त्याला अतिशय संताप आला. दुर्दैवाने ते त्याच्या संशोधनाचं यशही होतं. प्रथमची बॅटरी पूर्णपणे संपल्याने तो निपचित पडला होता. प्रथमला चार्ज केलं नाही, तर तो कालांतराने कायमचा निकामी झाला असता आणि तीच शिक्षा त्याला देण्याचा विचार मानवने केला. अतोनात पैसा, वेळ खर्चून आणि बुद्धिमत्ता पणाला लावून तयार केलेल्या 'प्रथम'चा अंत आपल्याच हाताने करायचा? मनुष्यांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रथम-परम दोघांचीही आवश्यकता होती. एकट्या परमला तसं प्रोग्रॅम केलेलं नव्हतं. प्रथमला वाचवलं नाही तर कोणतीच रोबॉटिक सर्जरी यशस्वी झाली नसती. आणि प्रथमला जीवनदान दिलं तर त्याने परमच्या साथीने मानवला कधीच मृत्यू येऊ दिला नसता. कोण कोणाच्या हातचं ‘बाहुलं’ होऊन दोऱ्या आवळतंय तेच मानवला कळेना.

मानवाला यांत्रिक जीवनातून मुक्त करायचं, की यंत्रमानवाला जीवन देऊन; पुन्हा मनुष्याला यंत्रांच्या हवाली करायचं? पराधीनतेच्या परस्परांत अडकलेल्या शृंखलेला तोडण्याचा निर्णय घेण्याची सूत्रं आता फक्त आणि फक्त मानवच्याच हातात सुपूर्त करून, परमनेही मान टाकली…


Rate this content
Log in

More marathi story from Vaishali

Similar marathi story from Fantasy