वाळवी
वाळवी


'निमकर उद्योगसमूहातून पतीबरोबर मुलाचीही हकालपट्टी!!!!'
ह्या बातमीबरोबरच पेपराचा चोळामोळा करण्यासाठी, तिने सगळे कप्पे धुंडाळून होती नव्हती ती सगळी रक्कम मोजली. उषाताई बसल्या जागेवरून, कानांनीच तिची धडपड बघत होत्या.
"अशी नोटांची बंडलं फेकून का वर्तमानपत्रातला मथळा झाकला जाणारे? पोलीस चौकीची पायरी चढल्यावर आणि कोठडीच्या गजांपर्यंत हात पोचल्यावर, आता मानमर्यादा उरलीच कुठे…? की ती मातीमोल होण्यापासून लपवतेस? आपलेच दात आणि आपलेच ओठ..." उषाताईंच्या पुढ्यातल्या पोथीतली पानंही मानसीला बोध देत होती!
कंपनीतील गैरव्यवहारांचे सबळ पुरावे हाती आल्यावर, मानसीनेच स्वतःच्या पती-पुत्रावर गुन्हा दाखल करण्याचं धाडस केलं. आजची ताजा खबर उद्या शिळी होईल, परवा चघळली जाईल आणि तेरवा रद्दीत जाईल… चार दिवस मीडियाला ब्रेकिंग न्यूजसाठी इंधन तिनेच पुरवलं म्हणून तिच्यावरही बिन-बोभाट ताशेरे ओढले जात होते. मग कशासाठी तिचा हा बभ्रा?
‘आईची माया आटली: उदात्त मनाने मानसीने त्यांना माफ करून पोलिसी कारवाई मागे घ्यावी; नाही तर स्त्रीच्या क्षमाशील, वात्सल्याच्या मूर्तीच्या चौकटीला ‘वाळवी’ लागत आहे…’ असा ठपका न्यूज चॅनेल्स तिच्यावर ठेवत होते. तिने मनावर ठेवलेली भलीमोठी शिळा कोणालाच दिसत नव्हती का?
नोटा आणि दागिन्यांचा डबा मानसीने उषाताईंच्या पुढ्यात आणून ठेवला.
"ह्याच्या बदल्यात का माझ्या लेकाची आणि नातवाची सुटका करणारेस?" उषाताईंच्या प्रश्नापुढे, लखलखणाऱ्या सुवर्णालंकारांची झळाळी पार फिकी पडली.
"कठीण समय येता, हेच कामी येतं..." मानसीने मनाला आवर घालत डब्याचं झाकण घट्ट बंद केलं.
"अगं, हीच वेळ आहे मानसी... पोखरून पोकळ झालेली ती चौकट मोडून काढ आता तरी! स्वतःच्याच घराला ‘वाळवी’ लावणाऱ्या मुलाला, ‘माझ्या’ न्यायालयात कधीही क्षमा नाही! ही कसर पुढच्या पिढीतही लागावी ह्यापेक्षा नामुष्की काय होणार निमकरांची?" उषाताईंनी कठोरपणे सुनावणी केली.
कीड लागलेले विचार वस्तीला आले की संपूर्ण घरा-दारासाठी विध्वंसक ठरतात!!
"माझ्या मुलाच्या कृत्यांवर पांघरूण न घालण्याचा माझा निश्चय पक्का होता… पण… पण माझे पती…? आधी तुमचा मुलगा आहे, आई… आणि मग..." मानसीला ‘ते’ ओझं एकटीने पेलायचं नव्हतं.
"गुंतवणुकीच्या नावाखाली त्याने पैसा स्वतःच्या नावे मालमत्ता करण्यासाठी वळवला आणि व्यवसायात नुकसान होत असल्याचं जाहीर केलं. अरेरे! ते लपून राहील असा भ्रम झालास कसा त्याला?" उषाताईंनी क्षणभर मान खाली घातली.
सासऱ्यांनी उभारलेल्या उद्योगाची सूत्रं, उषाताईंनी सूनेच्या हाती सोपवल्यावर, अपमानाने भडकलेल्या त्यांच्या मुलाने, पाच वर्षांनी फणा वर काढला. तेव्हा थोपवलेलं वादळ आता पुन्हा झंझावणार होतं…
उषाताईंनी पोथी मिटवून, दागिने-पैसे कपाटात बंद करून मनाचे दरवाजे लावून घेतले.
कोर्टाच्या निकालात आज ना उद्या शिक्षेची सुनावणी होणार आणि पती-पुत्राच्या जामिनासाठी मानसीने मदत न करणे, ह्या मुद्द्यावर मानवाधिकार संस्थांचे कार्यकर्ते हात धुवून मागे लागणार... मोर्चे काढणार, तिच्या विरोधात पत्रकं वाटणार... मानसीच्या मिटल्या डोळ्यांपुढे सगळी चित्रं एका मागोमाग उभी राहिली.
"मी तुझ्या ‘निर्णयाच्या’ पाठीशी आहे, मानसी! कारण प्रत्येक कर्तृत्त्ववान, धैर्यशील स्त्रीच्यामागे ती स्वतःच उभी असते!" उषाताईंनी न्याय केला.
अवघड निर्णयाच्या निमकर घराण्याची ‘जड कावड’ पुन्हा एकदा दोघींनी मिळून उचलली!