Pradip Joshi

Tragedy Classics

2  

Pradip Joshi

Tragedy Classics

बाबू शिपाई

बाबू शिपाई

5 mins
2.7K


बाबू शिपाई

बाबुराव पाटील वडगाव मधले एक खास व्यक्तिमत्व. उंच, धिप्पाड, सफारी परिधान केलेले. कपाळावर नाम ओढलेला. व्यक्तिमत्वाप्रमाणेच साजेसे वागणे. कधी कोणाला उपद्रव नाही. होता होईल तेवढी सर्वाना मदत करण्याची भूमिका. पत्नी व दोन छोट्या मुलासह गावातच एका छोट्याशा खोलीत रहायचा. शिपाई गडी त्यामुळे गरिबीचे चटके खात आयुष्य व्यतीत करणारा. गरिबी असली तरी स्वाभिमानी. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे वागणं. त्यामुळे दयानंद विद्यालयात त्याला शिपाई असला तरी आदराचे स्थान होते.

शाळा तशी मोठी होती. 20 - 25 खोल्या होत्या. गावाच्या मध्यवस्तीत इमारत होती. शाळेत त्याच्या जोडीला आणखी दोन शिपाई होते. बाबू जेष्ठ असल्याने त्याला नाईक पदाचा दर्जा होता. त्याचा शब्द सहसा कोण डावलत नसे. शिक्षक, शिक्षिका, लिपिक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह मुलामुलींनी परिसर कसा रोज फुलून जायचा.

 बाबू सकाळी लवकर शाळेत यायचा. शाळा म्हणजे जणू त्याच दुसरं घरच होत. तो घरी कमी पण शाळेत जास्त असायचा. त्याला स्वच्छतेची खूप आवड होती. मुख्याध्यापक खोली, पर्यवेक्षक खोली, शिक्षकांची खोली अगदी एखाद्या मंदिराप्रमाणे तो स्वच्छ ठेवत असे. मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या टेबलावर रोज ताजी फुले ते येण्याआधी ठेवण्याचा त्याचा जणू नियमच होता.

ही सारी व्यवस्था करून तो शाळा सुरू होण्याची वाट बघत बसायचा. येताना सफारी घालून अधिकारी असल्याच्या अविर्भावात शाळेत यायचा. टी क्लबच्या खोलीत त्याचे एक स्वतंत्र कपाट होते. त्यात शाळेचा ड्रेस असायचा. तो घालून त्याच्या दैनंदिन कामाला त्याची सुरवात व्हायची. शाळा सुटली की गडी पुन्हा सफारीत दिसायचा. 

बाबू शिपायाच एक वैशिष्टय होत. तो फार कमी बोलायचा मात्र खुणांनीच सारी कामे करायचा. त्यामुळे तो अजातशत्रू होता. त्याच्या खुणांची आता साऱ्या स्टाफला देखील सवय झाली होती. मुख्याध्यापकानी पाटील सरांना बोलवायला सांगितलं की तो शिक्षक खोलीत येऊन पाटील सर अशी हाक मारून एक बोट वर करायचा. पाटील सर समजायचे की मुख्याध्यापकानी बोलावले आहे.

पर्यवेक्षकांनी कुलकर्णी मॅडमना बोलवायला सांगितले की तो शिक्षिका खोलीबाहेर उभा राहून कुलकर्णी मॅडम अशी हाक मारून दोन बोटे दाखवायचा. कुलकर्णी मॅडम ओळखायच्या की पर्यवेक्षकांनी बोलावले आहे. 

बाबूचे आणखी एक वैशिष्ट्य होत कोणीही काम सांगितले तरी तो तितक्याच आत्मीयतेने करायचा. मुली अगदी त्यांच्या आई वडीलाप्रमाणे त्याच्याशी बोलत असत. त्यांना त्याचा आधार वाटायचं. शिपाई मामा या नावाने सर्वजण त्यास बोलवत असत. शिक्षक मिटिंगची तयारी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असे. त्यापूर्वी हॉल स्वच्छ करणे, टेबल खुर्चीची रचना करणे, टेबलाला योग्य पद्धतीने सजवणे, त्यावर फ्लॉवरपॉट ठेवणे, पाण्याचा तांब्या भांडे ठेवणे ही सारी कामे जिथल्या तिथे असत. 

मुख्याध्यापक, पर्यवेक्षक याना तंबाखूची सवय होती. त्यांना तल्लफ झाली की ते बाबूला हाक मारायचे. का बोलावले हे न सांगता बाबू ओळखायचा. हळूच टेबलाखालून तंबाखूची पुडी व चुन्याची डबी तो त्यांच्या हातात घ्यायचा . शाळेत येताना या दोन वस्तू न चुकता तो आणायचा.

मिटींग संपेपर्यंत चहाची व्यवस्था तो करीत असे. त्यात वेळेचा अपव्यव होऊ न देण्याचं त्याच तंत्र वाखाणण्या सारख होत. शाळेचा टी क्लब होता. सर्वजण त्याचे सभासद होते. दुपारच्या सुट्टीत शिक्षकांचा डबा खाऊन झाला की त्याचा चहा तयार असे. निमित्तपरत्वे कोणी कधीतरी बिस्कीट पुडे आणण्यासाठी पैसे देत असे. त्याचा चोख हिशोब तो देत असे. त्याच्याकडे टी क्लबची जबाबदारी होती. शेख सर त्याचा सारा हिशोब बघत असत. चहा, साखर पंधरा दिवसाची एकदम आणून त्याच्या ताब्यात दिली जात असे. रोजच्या रोज दूध मात्र आणण्यासाठी तो जात असे. 

साखर चहा तो एकत्र मिसळून ठेवत असे त्यामुळे येता जाता कोणालाही साखर खाता येत नसे. त्याच्या आशा अनेक युक्त्या वाखाणण्याजोग्या होत्या. सुट्टी दिवशी परीक्षा किंवा जादा तास असले तर ते संपेपर्यंत तो बाकावर बसून असे. तो रजेवर असला की साऱ्यांनाच चुकल्यासारखं वाटत असे. 

बाबूच लक्ष मात्र बारीक असायचं. कोणाच्या मुलाला नोकरी लागली, कोणाचे वैदयकीय बिल मंजूर झाल, कोण तास चुकवून शिक्षक खोलीत गप्पा मारत बसलं, कोण बाळंतपणाच्या रजेवर जाणार आहे याची सारी माहिती त्याला असायची. मुख्याध्यापक किती वाजता येणार, शाळेत येणार की मिटिंगसाठी जाणार याची खबर त्याला असायची मात्र त्याची गोपनीयता तो पाळायचा. जिल्हा परिषदेचा कोण अधिकारी आला की त्याला कस खुश करायचं याच कसब देखील त्याच्याकडे होत. शाळेतल्या शिक्षकासह पदाधिकाऱ्यांना कोणता ब्रँड लागतो हे देखील त्याला माहित होतं. 

त्याच्याकडं स्पष्टवक्तेपणा होता. चुगली चहाड्या यापासून तो चार हात लांब असे. आख्ख्या नोकरीच्या कालावधीत त्याचे कोणाशीही भांडण झालेले नव्हते. बाबू बाकड्यावर बाहेर जरी बसला असला तरी त्याचे सारे लक्ष आत असायचे. दोन साहेब एकत्र बसून एखादया शिक्षकाविषयी चर्चा करीत असले तर माणुसकी या नात्याने तो त्या शिक्षकाला सावध देखील करायचा. 

कधी कधी त्याला शिक्षकांची गम्मत करायची हुकी यायची. त्यांचे पुस्तक, डस्टर, टाचणवही विसरली असेल तर तो दडवून ठेवायचा. शाळा सुटताना मात्र त्यांना ती वस्तू नेऊन द्यायचा. शाळेत शालेय पोषण आहार होता. तांदूळ, तेलाच्या पिशव्या, कोण गुपचूप घेऊन जातो त्याकडे त्याची कायम नजर असायची. कोणीही त्याला हात लावण्याचे धाडस करीत नसे. 

पस्तीस वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर तो निवृत्त झाला. निवृत्तीनंतर देखील त्याचे शाळेत येणे जाणे होते. रोपे लावणे, झाडांना पाणी घालणे ही कामे न सांगता तो करत असे. तुटपुंज्या पेन्शनवर त्याची उपजीविका होती. त्याने पैशासाठी कधीही कोणापुढं हात पसरले न्हवते. जवळ जवळ महिनाभर तो शाळेकडे फिरकला नव्हता. एकही दिवस न चुकता शाळेत हेलपाटा घालणारा बाबू महिनाभर आला नाही म्हटल्यावर सारे शिक्षक काळजीत पडले.ते सर्वजण त्याच्या घरी गेले. पाहतात तो त्याची पत्नी बिछान्यावर पडून राहिलेली. शालेय कुटुंबातील साऱ्या वडीलधाऱ्यांना पाहताच त्याला अश्रू आवरले नाहीत. एवढा कणखर गडी पण पार खचून गेला होता. बायकोला कॅन्सर झाल्याचे त्याने हुंदके देतच सांगितले.

काळापुढे कोणाचे काही चालत नाही असे सांगून शिक्षकांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिच्या तातडीच्या ऑपरेशन साठी त्याला एक लाख रुपयांची गरज होती. मदतीचे आश्वासन देऊन सारे सहकारी शाळेत गेले. मुख्याध्यापकांनी तातडीची बैठक घेतली. त्यात प्रत्येकाने त्यास मदतीचा हात देण्याचे ठरले. प्रत्येकाने आपापल्यापरीने चेकवर रक्कम लिहून ते सर्व चेक मुख्याध्यापक यांच्या स्वाधीन केले. त्यांनी जमलेली सर्व रक्कम बाबूच्या घरी जाऊन दिली. बाबूने पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिचे प्राण वाचले. तिला जीवदान मिळाले. बाबूला भेटायला सारा स्टाफ आला. बाबूला त्यांचे ऋण कसे फेडावेत हेच समजेना. 

एक दिवस प्रार्थना होऊन शाळेचे कामकाज सुरु झाले होते. बाबू मुख्याध्यापकांच्या खोलीत आला. त्याने एक लाख रुपये त्यांच्या हातात ठेवून कृतज्ञता व्यक्त केली. बाबुने गावाकडची जमीन विकून साऱ्यांचे पैसे चुकते केले. त्याच्या प्रामाणिकपणाचा पुन्हा एकदा सर्वांनी अनुभव घेतला. शिपाई असला म्हणून काय झालं माणुसकीच्या नात्याने पुन्हा एकदा सर्वांचे डोळे पाणावले. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy