swati Chaudhari

Inspirational

4.3  

swati Chaudhari

Inspirational

असुरीची ऋणात मी...

असुरीची ऋणात मी...

5 mins
137


आसुरीच्या ऋणात मी... (जीवनाला सूर देणारी मुलगी)


आसुरी भेटली मला आणि जीवनाला सूर देऊन गेली. जगायचं कसं शिकवण तिने दिली.


नोंद : या कथेतील पात्रे पुर्णतः रंगवलेली आहेत. याचा माझ्या वैयक्तिक जीवनाशी काहीही संबंध नाही.


पात्रे -

१. आसुरी.


२.मी.


३.माझी मैत्रीण.

***


          आसुरी एक अशी मुलगी जिला पहिल्यांदा पाहिले आणि मी तिच्या प्रेमातच पडले. स्कर्ट-मेड़ी घातलेली, बॉयकट असलेली, डोळ्यांत भलं मोठं काजळ. तिला शोभूनही दिसत होतं ते. भारदस्त आवाज कोणालाही घाबरवेल असा. छाप पाडणारे व्यक्तिमत्व. एखाद्या नायिकेलाही मागे टाकेल असे देखणे रूप. अशी ही आसुरी मला कल्याण बस-स्थानकावर वड़ा-पावच्या गाड़ीवर वड़ा विकताना दिसली. हातात झाऱ्या, समोर कढाई आणि जमलेली भली मोठी गर्दी. त्या गर्दित तिच्या अंगाला झटणाऱ्यांची गर्दी होतीच. मी आणि आणखी काही जणही पाहत असतील हे दृश्य पण लढाई तिची, आम्ही फक्त प्रेक्षक. तिचा बापही होता सोबतीला पण शेवटी बेवडाच तो. पण आसुरी खूप बहादूर पाहता पाहता तिने स्पर्श करणाऱ्या राक्षसी वृत्तीला झाऱ्याने चटका दिला.

               मला पुढच्या प्रवासाला जायचे होते त्यामुळे मी तो प्रसंग डोळ्यांनी टिपला आणि निघाले. कधी विचारही नव्हता केला आसुरी पुन्हा भेटेल... माझे काही कामानिमित्त कल्याणमध्ये वास्तव्य झाले. मी मैत्रिणीकडे राहायचे ठरवले. ती म.न.पा. महाविद्यालयात शिक्षिका आहे. "घरी तू काय करणार बसून चल मी तुला माझी शाळा दाखवते" म्हणून तिने मला सोबत नेले.

               आम्ही शाळेत पोहोचलो. घंटा झाली, प्रार्थना झाली, वर्ग भरला. भली मोठी इमारत वर्गांना टाळे. फक्त कामापुरते दोन वर्ग चालू. दोन शिक्षक आणि वीस विद्यार्थी एवढी शाळा. पण सर्व शिस्तबद्ध. शाळेच्या भिंती माहितीने भरलेल्या मी वाचत बसले. तेवढ्यात एक मुलगी धापा टाकत छोट्या बहिणीला घेऊन "मे आय कमिंग मॅडम" मैत्रिणीने तिला काही न विचारता वर्गात घेतले. मला आठवले ही तीच मुलगी जिला मी बस स्थानकावर पाहिले होते. मैत्रिणीने सर्व विद्यार्थ्यांचा परिचय करून माझी एक अतिथी म्हणून स्वागत करून दिलं. एक शिक्षक कवयित्री असल्याचा फायदा मी या प्रसंगी करून घेतला. माझा तो दिवस खूप स्मरणीय ठरला.

                घरी  गेल्यावर मला मैत्रिणीने विद्यार्थ्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली. वीस मुलांच्या वीस दशा ऐकताना उर भरून आलं. आपण या मुलांसाठी काहीतरी करावे, असे क्षणभर वाटले. त्यातल्या त्यात आसुरीची माझी घट्ट ओळख झाली. जीवनात जशी कर्तव्यदक्ष तशीच अभ्यासातही तरबेज आहे ती. चौथी/पाचवी स्कॉलरशिप उत्तीर्ण आता सातवी वर्गात शिकणारी. बहिणीला शिकवणारी, छोट्या भावाला, बापाला संभाळणारी, आईवीणा पोरकी पोर पुन्हा मला खूप भावली.

                 आसुरीच्या आठवणी घेऊन मी नोकरीच्या ठिकाणी आले. माझी नोकरी तात्पुर्ती होती. मी सोबत शिकत होते. स्पर्धा परीक्षा देत होते. हताश, अपयशी होत होते. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होते. नव्याने शिकत होते. या उत्साहाचं रूप शेवटी निरुत्साहाने घेतले. मी जीवन संपवेल की काय असं वाटू लागले. केलाही प्रयत्न. अपयशी ठरला. संस्कार आठवले, आई-बाप आठवले, आपल्यानंतर कोणाला फरक पडेल का? फक्त जीव जाईल. प्रश्न तिथेच उत्तरही तिथेच. डोक्यात सगळा कल्लोळ असताना रिंग वाजली. समोरून मैत्रिण सांगत होती. आसुरी दहावीला पहिल्या पाच रॅंकमध्ये आली होती. काही न बोलता फ़ोन कट केला. काय करत होते मी छोट्याशा अपयशापायी जीवन संपवत होते. शिक त्या पोरीकडून काहीतरी प्रतिकुलतेतही ती आनंदी राहून यशस्वी होते. हा मार्ग चुकीचा आहे. अंतर्मनाने साद दिली. टाकला विचार तो आणि नव्या उमेदीने उभी राहिले.

               आता आसुरीने आकरावी सायन्सला ऍडमिशन घेतले होते. घरची परिस्थिती थोड़ी सुधारली होती. वडिलांचे दारुचे प्रमाण कमी झाले होते. छोटी बहीण पाचवी इयत्तेत शिकत होती. भाऊ शाळेत जाऊ लागला होता. आसुरी कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करत होती. काम करता करता पुस्तके वाचत होती. तिने ठरविले होते I P S व्हायचे. तिचं सगळं ठरलेल्या आराखड्याप्रमाणे चालू होते. तिचा दिवस नियोजित उगवत होता, मावळत होता.

               माझेही जीवन शून्यातून विश्व निर्माण करत होते. आता मी विवाहित होते. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, नवीन नोकरी सगळ्याशी तडजोड करत जीवन पुढे चालले होते. मनात कुठेतरी आपण खूप मागे आहोत असे वाटत होते. आसुरीच्या आठवणीने पुन्हा प्रेरित होऊन हार न मानायची ठरवत होते.

               आता मी ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. एक्सटर्नल ऍडमिशनही घेतले पण देवाच्या मनी काय माहित नाही. मी गर्भवती राहिले. परीक्षेची तारीख आणि प्रसुतीची तारीख एकाच महिन्यात आल्या कारणाने मला पुन्हा माझ्या स्वप्नांपासून दूर जावे लागले. मी स्वतःलाच मनात म्हणाले, वाघही उंच उड़ी घेण्यासाठी माघार घेतो. या दिवसात मला पुन्हा नोकरी सोडावी लागली.

               मी आता एक माता, गृहिणी पत्नी होते. या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता मला माझी स्वप्नंही साकारायची होती. मी वाय. सी. एम.ला द्वितीय वर्षाला ऍडमिशन घेतले. पुस्तक वाचन सुरु केले. खूप सुंदर पुस्तक त्यावेळी डॉ. मॉर्फिंचं हातात पडलं. "द सुबकॉन्शियस माइंड" वाचनानंतर जीवनच बदलले माझे. मी स्वप्नांचं व्हिजुअलायझेशन करू लागले. पाहता पाहता माझ्या एकशे एक्कावन कविता रचून झाल्या. मी ठरवलं पुस्तक वाचन सोडायचं नाही. मी शाळेत असल्यापासून वाचन करत होते. आता मी ते संग्रहित करायचं ठरवलं. संग्रहास सुरुवात करायला लागले तर माझी हजार पुस्तके वाचून झाली होती, फक्त वाचून. मी पुन्हा ती वाचायला घेतली, अर्थ समजून वाचू लागले. त्याचं सार जीवनात उतरवत जीवन जगू लागले. आता माझे साहित्यात ग्रॅजुएशन पूर्ण झाले. एक दिवस फोनची पुन्हा रिंग वाजली. तुम्हाला या-या ठिकाणी नोकरीसाठी रुजू व्हायचे आहे. या-या तारखेला. क्षणभर विश्वासच बसला नाही. केव्हा दिला होता मी हा इंटरव्ह्यू... अरे! हा तर मी लग्नाआधी दिला होता आठवले. आता देवाच्या मनात काय होते समजले. मी नोकरी जॉइन करायचं ठरवलं. मूल पण आता मोठं झालं होतं. नोकरीचा पहिलाच दिवस खूप छान स्वागत झालं माझे त्या ठिकाणी. प्रचंड मोठी शाळा. एक मोठं आवाहन समोर होतं. मी माझे सर्व कला गुण येथे दखवायचे ठरवले. माझी आणि शाळेची एक घट्ट जवाळीक निर्माण झाली. आसुरीसारखे खूप विद्यार्थी येथे होते. कोणी ऊस कामगारांची मुले, कोणी वीट-भट्टी कामगारांची. मी ठरवलं माझे जीवन आता समाजकार्याला वाहून द्यायचं. मला खूप आनंद होत होता. मी माझ्याकडचं थोडे दुसऱ्याला देवू पाहत होते.

               इकडे आसुरीची बारावी उत्तीर्ण होवून हैदराबादला ट्रेनिंगसाठी सिलेक्शन झाले होते. आज आम्ही एकमेकींपासून खूप दूर होतो. तिला मी आठवत असेल की नाही माहित नाही पण तिच्या जीवनातील संघर्षाने मला माझ्या जीवनातील अडचणीवर मात करायचं शिकवलं होतं. आज मी जे काही सुंदर जीवन जगत होते ते तिच्यामुळेच. तिला कल्पनाही नसेल तिने मला पुन्हा जीवनदान दिले होते. अशा या आसुरीच्या मी आजन्म ऋणात राहणे पसंत करेल. अशा कित्येक घटना आयुष्याला कलाटणी देणाऱ्या असतात. त्यातली माझा आसुरीसोबतचा सहवास... तिची सर्व स्वप्न पूर्ण होवो ही अपेक्षा बाळगुन मी तिच्याबद्दलचं माझं थोडं ऋण या कथेतून व्यक्त करून माझं कथालेखन संपन्न करत आहे. 

धन्यवाद!!!

                        सौ.स्वाती संदीप चौधरी.✍️

                          नवी मुंबई.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational