बालपण भेटीस येते.
बालपण भेटीस येते.
सुशांत दर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जात होता तसा यावेळी आला नव्हता. यावेळेस गावी जाण्याचे कारण कोरोनाचे वाढते प्रमाण होते. त्याला गावच्या वेशीवर असणाऱ्या महाविद्यालयात कॉरंटाईन करण्यात आले होते. तो सहकुटुंब गावच्या शाळेत राहात होता. एक दिवस सहज त्याचे खिडकीतून बाहेर लक्ष गेले. समोर त्यांचा भिंती पडलेला भव्य निरागस वाडा त्याकडे पाहत होता.त्याला सर्व लहानपणीचे दिवस आठवू लागले.
भव्य दिमाखदार कौलारू वाडा. समोर मोठी पढवी, झोपाळा, मध्ये तुळशीवृंदावन सुंदर रांगोळी, मुलांचा धिंगाणा सारे चित्रं त्याच्यापुढे उभे राहिले.आज सारेजण रानामध्ये विभक्त कुटुंबपद्धतीत राहत होते.अपपसातली माणुसकी,आपुलकी थोडी कमी झाली होती.
या वाड्यात गोकुळ नांदत होते म्हणायला हरकत नाही.आजी-आजोबा त्यांचे तीन भाऊ,त्या तीन भावांची चार -चार मुले, त्यांच्या सुना अगदी परतूंडे म्हणजे आम्ही. असे एकूण ५०-५५ जणांचा गोतावळा. कुठलीही तक्रार न करता मिळून मिसळून राहत होते. आजोबा सरपंच असल्याने गावात एक वेगळाच वट होता.आम्हा मुलांचा तर खूप कल्ला असायचा. विशेष सर्व लाड करत. उन्हाळा,दिवाळी,रविवार यांची तर आम्ही आतुरतेने वाट पाहत. रविवारी पोहणे, वेगवेगळे मैदानी खेळ खेळणे. दिवाळीत फराळ, फटाके, भाऊबीजेला येणारी आत्या सारे खूप अप्रूप होते. उन्हाळ्यात झाडावर चडून, दगडे मारून पाड खाण्याची वेगळीच मज्जा. खोलीभर अढीला लावलेले आंबे चोरून खाताना काहीतरी खास केल्याचा आनंद. मार खातानाही वेगळीच मज्जा. कधी कोणी मारले म्हणून राग नाही आला. टीव्ही हा तर एकदा दुर्मिळ प्राण्यागत भासे. आमचा वाडा त्यावेळी टीव्ही असल्यामुळे एखादे थेटरच वाटे. जय हनुमान,श्रीकृष्ण, रामायण,महाभारत लागले की,सर्व गाव ओस पडे. सर्वांची धाव आमच्या घराकडे असे.
एकाच घरात पाच-पंचवीस मुले असल्यामुळे कधी दुसऱ्या मुलांवर खेळासाठी अवलंबून राहावे लागले नव्हते. खेळी मेळीत आम्ही अभ्यासही तेवढ्याच उत्साहात करत होतो. पोहण्याची कला खूप लहानपणापासून येत. यातही मला फारसे पोहता येत नव्हते. तेव्हा पोहण्यात पारंगत असणारे माझे चुलत भाऊ मला वरूनच विहिरीत टाकत. खाली मला दोन-चार जण झेलत.माझ्या नाकातोंडात पाणी जात ते सर्व हसत पण त्यांच्या हासण्यानेच मी पोहायला शिकलो. खो-खो,कबड्डी यातही पारंगत होतो.वाड्याशेजारी मळगंगा देवीचे मंदिर असल्याकारणाने रोज पहाटे पाचला काकडआरतीला उठणे, सूर्यनमस्कार ठरलेले होते. कॅरम,चेस,सापशिडी यातही आमचा हात कोणंच धरणारे नव्हते.आंब्याच्या कोया, बांगड्याच्या काचा, टिपरी याही आम्हाला खेळायला पुरत. महागड्या खेळण्याची गरज नसे. चोर,पोलीस,लपंडाव यात आम्ही सारे गाव धुंडाळी.गावची लोक आम्हाला वैतागून जात. एकदा तर आम्ही रानात सर्वात मोठ्या सुर्यफुलाला जो आधी पकडेल तो विजेता अशी शर्यत लावली. माझ्या चुलत भावाने ती जिंकलीही पण त्यानंतर आमची रडावे की हसावे अशी तर्हा झाली. त्या फुलावर मधमाशीने पोळे होते. त्याने माझ्या भावाला पूर्ण घेरले होते.तो पूर्ण लालेलाल झाला होता.त्याला नंतर रॉकेलची अंघोळ, घरच्यांचा ओरडा वगैरे प्रकार नंतर झाले ते वेगळेच.आंधळी कोशंबीर,लंगडी पळापळ खेळताना आम्ही कित्येकदा गटारातही पडत, एकमेकांवर हसत आमचे बालपण कुठे भुर्रकन उडाले कळालेच नाही.आजच्या शहरीकरणामध्ये मुले हे सर्व खेळ विसरून गेले आहेत याची मला जाणीव झाली. मोबाईल,टीव्ही, इंटरनेटच्या आती वापराने भावी रोबोट तयार होत आहेत असेच क्षणभर वाटले.
मी या भूतकाळातून थोडा बाहेर आलो तर समोर ग्रामपंचायतीत माझा चुलत भाऊ कसले तरी लेटर जमा करताना दिसला. त्यात लिहिले होते,आमचे घर मोठे असल्या कारणाने आम्ही या कुटुंबास आमच्या घराच्या एका खोलीत कॉरंटाईन करू. त्याला पाहून मला जाणवले दूर असलो तरी आमच्यात पूर्वीचा ओलावा कुठेतरी टिकून होता.आज सहा महिने झाली मी गावच्या घरीच होतो. मस्त हसत-खेळत होतो. काहीतरी सापडल्याचा आनंद होता. इतक्या दिवसाची धावपळ पळापळ कुठेतरी थांबली होती. दिवस दहा वर्षे मागे गेल्यासारखे भासत होते. प्रगती प्रगती म्हणजे काय असते.आज या कोरोनाच्या काळातही मी आनंदात आपल्या घरच्यांसोबत राहून मी एक कप चहा फुरक्या मारत पीत होतो. मुलाबाळांसोबत पुन्हा बालपण जगत होतो.
★तात्पर्य:- दुसऱ्याला हसता हसता आपल्याला हसवायला शिकवते ते बालपण असते.
