.प्रमोद घाटोळ

Tragedy

3  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

अशी ही प्रेमवेडी

अशी ही प्रेमवेडी

10 mins
1.1K


काजळ लावलेल्या कुंतलांना मधातच वारा फुंकर घालत होता. तशी केसाची बट उभी राहून तिच्या कोमल तनूवर नजर मारत होती. जणू पहारेकऱ्याच्या अविर्भावाने कुणी सभोवार नसल्याची ती खात्री करत होती. शांती बागेत नीरव शांतता पसरली होती. फुलपाखरांचे रंग बागेच्या आकर्षणात अधिकच भर घालत होते. झाडामधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आकाशाचा रंग उतरल्याचा भास होत होता. अचानक टप असा आवाज आला. तशी ती दचकून भानावर आली. सावध असल्यागत भाव चेहऱ्यावर उमटवत तिने आपल्या समोरच्या चाफ्याच्या झाडावर कटाक्ष टाकला. त्याच्या शुभ्र रंगाच्या फुलाकडे पाहत चेहऱ्यावर स्मित करत खुदकन हसली. नाक मुरडत अंSSहं असा आवाज केला. तशीच कोकीळेच्या आवाजाने त्याला साद दिली. बागेतून कुहूंकुहू स्वर फुलांच्या सुगंधी अत्तरासह वाहून निघाला.


   'ये कृष्णा, तुझ्यासाठी मामीने शिदोरी पाठवली आहे. भूक लागली असेल, जेवण कर' असं म्हणत सुगरणने आपल्या सर्वांगावरून नजर फिरवली. कृष्णाची आई शेजारच्या गिरी काकूसोबत तालुक्याच्या गावी गेली होती. काकूंना बहुतेक पित्त आजाराचा त्रास होत होता. त्यामुळे औषधोपचारासाठी ती डॉक्टरांकडे गेली होती. काकूने कृष्णाच्या आईला संगतीला नेले होते. त्या गिरी काकांचा स्वभाव फार मनमिळावू होता. कृष्णाच्या कुटुंबावर त्यांची माया होती. ते घरी नसल्यामुळे कृष्णाच्या आईला काकुंनी सोबतीला नेले होते. कृष्णाची आई स्वयंपाक न करताच गेली होती. त्यामुळे त्याची शिदोरी सुगरणच्या मामीने दिली होती. गावाला लागूनच बाग असल्यामुळे सुगरण कृष्णाची शिदोरी घेऊन बागेत आली होती.


   प्रल्हाद कृष्णाचा बालपणापासूनचा मित्र होता. त्याला भेटायला तो बागेत आला होता. कृष्णा आपल्या कामात दंगून गेला होता. त्याचे कपडे माती चिखलाने भरले होते. दहावीपर्यंत शिकलेल्या कृष्णाने परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडले होते. कृष्णाला हलाखीच्या परिस्थितीमुळे लहान वयातच कामात गुंतावे लागले होते. प्रल्हादला या गोष्टीची खूप खंत वाटत होती. परंतु तो त्याच्यासाठी काही करू शकत नाही याचे त्याला दुःख होते. कारण तो सुद्धा पोरवयातच होता. प्रल्हादच्या घरची परिस्थितीसुद्धा फक्त थोडी बऱ्यापैकी होती. तो जिल्ह्याच्या ठिकाणी शिकवणी वर्ग चालवत होता. आठवड्यातून एकदा तो गावी येणे-जाणे करत होता. त्याच्या मागे बाबांनी लग्न करून घे, लग्न करून घे असा तगादाच लावला होता. आई तर लग्नासाठी हात धुवून त्याच्या मागे पडली होती. जावयांनी आसपासची दोन-तीन स्थळंसुद्धा आणली होती. सारं काही घशापर्यंत येऊन ठाकलं होतं. काय करावे, कुणाला सांगावे... त्याला कळत नव्हतं. याच विचारात प्रल्हाद कृष्णाच्यापासून थोड्या अंतरावर उभा होता.


   अचानक सुगरणची नजर प्रल्हादवर पडली. ती खूप लाजली. खरं तर प्रल्हादला सुगरण फार आवडत होती. तिचं बोलण, तिचं चालणं तो नेहमी निरखून पाहायचा. ती घराच्या शेजारीच राहत असल्यामुळे कधाकधी दोघांचं सहज बोलणं व्हायचं. तिचा स्वभाव जेवढा सुंदर होता, तेवढीच ती रूपवान होती. प्रल्हाद खिडकीचा आडोसा घेत तिच्या मोहक चेहऱ्याला टक लावून पाहायचा. कधीकधी कुणी आपल्याला पाहतील याचे भान विसरून जायचा. असाच एकदा तो सुगरणला न्याहळताना तात्यांना दिसला होता. तेव्हापासून त्याच्या लग्नाची हाकाटी त्यांनी बाबांकडे धरली होती. पोराकडे लक्ष दे सुधाकर, त्याचे पाय तुझ्या चपलेइतके झाले, असे तात्या नेहमी म्हणायचे. त्यामुळे प्रल्हादसाठी बाबांनी मुली पाहणे सुरू केले होते. आता प्रल्हाद खूपच विचारात पडला होता. आपल्या मनातील गोष्ट सांगायला तो धजत नव्हता. त्याच्या जीवाची घालमेल होत होती.


   रविवारचा दिवस असल्यामुळे सुगरणचे मामा बाजारानिमित्त बाहेरगावी गेले होते. सुगरणला प्रपोज करण्याची नामी संधी चालून आली होती. मनात क्षणाक्षणाला उठणारे प्रेमाचे तरंग आकृतीबद्ध करायचा दिवसच जणू चालून आला होता. मात्र सुगरणला आपल्या मनातील गुज सांगण्याची हिंमत प्रल्हादकडे नव्हती. उलट सुगरण फार बोलक्या स्वभावाची होती. प्रल्हाद फार अबोल आणि लाजरा होता. मुलांमध्ये उभं राहून शिकवण्याइतपत त्याची मजल होती. वयाचे भान आल्यापासून आजपर्यंत सुगरणशिवाय कुणाही मुलीकडे त्याने नजर उचलून पाहिले नव्हते. सर्वप्रथम सुगरणला अंगणात रांगोळी घालतांना त्याने पाहिले होते. तेव्हापासून तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता. तिचा गोरा वर्ण, पाणीदार डोळे, निरागस चेहरा फारच सुंदर दिसत होता. तिची चालण्याची लकब मनाला भुरळ पाडणारी होती. तिचे डुलत चालणे गजगामिनीला लाजवणारे होते. बघताबघता दिवस मावळतीला आला होता. सूर्यनारायणाचे रंग क्षितिजावर उमटले होते. थोडयाच वेळात अंधाराने मावळतीचे रंग आपल्या कवेत सामावले. रात्र झाली व अख्खा गाव रात्रीच्या गर्भात निद्रिस्त झाला.


   सकाळ झाली. मोबाईलवरचा पाच वाजताचा आलार्म वाजला. तसाच प्रल्हाद खळबळून जागा झाला. झोपेत पाहिलेलं स्वप्न त्याला आठवलं. प्रत्यक्ष सुगरण त्याच्या बिछान्यावर उशाला बसली होती. ह्ळूच तिने आपला कोमल हात त्याच्या केसातून फिरवला, तशी त्याला जाग आली. तो डोळे उघडणार तोच सुगरणने त्याच्या डोळ्यावर दोन्ही हात घट्ट झाकले. तसाच त्याने तिचा हात धरला. हा कुण्या मुलीला केलेला त्याचा पहिलाच स्पर्श होता. तिच्या कोमल हाताची ऊब त्याच्या अंगात शिरली. त्याला शिरशिरी भरली. पायाच्या नखापासून केसापर्यंत त्याला हुळहुळून आले. थंडी तापाने अंग फणफणून यावे तसा अनुभव त्यांच्या सर्वांगाला आला. तशी त्याने तिच्या हातावरची पकड अधिकच घट्ट केली. तोच एक आगळा कटाक्ष तिने त्याच्या डोळ्यावर टाकला. तसा त्याने तिच्या गुलाबी गालावर हळूवार स्पर्श केला. मोरपिसाला लाजवणाऱ्या तिच्या कांतीने तो विभोर झाला. दुसऱ्या हाताची पकड सैल करत तिला घट्ट मिठी मारली अन् त्याची शुद्ध हरवली. नुकतेच त्याला खणखणणाऱ्या अलार्ममुळे जाग आली होती.


   अंगणात मोती ऐटीत बसला होता. सगळीकडे पहाटेचा प्रकाश पसरला होता. प्रल्हादला बघताच मोती शेपूट हलवू लागला. आपले दोन्ही पाय वर करत तो त्याच्या अंगावर चढला. जणू काही तरी तो प्रल्हादला विचारत होता. त्याने काहीतरी त्याला सांगावे अशी त्याची लगबग होती. कारण लाजऱ्या प्रल्हादवर त्याचा खूप जीव होता. पण लगेच प्रल्हादने त्याला दूर सारले व तयारीला लागला. सकाळच्या पहिल्या बसने त्याला नागपूरला जायचे होते. आईसुद्धा सकाळीच उठली होती. तिने आपला कामधंदा आटोपून प्रल्हादसाठी टिफीन तयार केला होता. तोवर प्रल्हादने चुलीवरच्या तावणीतील गरम पाण्याने आंघोळ केली. तो तयार झाला. आईने त्याला चहा करून दिला. शिगोर भरलेला चहाचा कप त्याच्या हातात दिला. चहाच्या कपात डोकावताच चक्क सुगरण त्याला त्यात दिसली. तिने आपला डावा डोळा मिचकावत त्याला बाहेर बोलावले. तसाच चहाचा कप सोडून तो बाहेर जाण्यास निघाला. ते पाहून आई एकदम हबकून गेली. 'का रे पकू, काय झाले.' असा तिने आवाज दिला. तसाच प्रल्हाद काही नाही गं असं म्हणत घरात परत फिरला. त्याने कपातील चहा एका दमात रिचवला.


   बसची वाट पाहत प्रल्हाद बस स्टँडवर उभा होता. मित्रांसोबत बोलत असताना त्याचा तोल ढासळला. त्याने आपला मित्र सुनीलला आपण सुगरणवर प्रेम करत असल्याचे सांगून टाकले. आतापर्यंत मनात असलेली गोष्ट त्याने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रथमच सांगितली होती. सुनील सुगरणचा जवळचा मित्र होता. त्यामुळे काम अधिकच सोपे झाले. त्याने काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, असा विश्वास प्रल्हादला दिला. तेवढ्यात बस आली. प्रल्हादने सुनीलचा निरोप घेतला व बसमध्ये चढला. सुनीलने सुगरणला प्रल्हाद तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. ओळखीचा असणारा प्रल्हाद तिच्यावर प्रेम करतो असे तिला मनोमन माहीतच होते. प्रल्हाद आपल्यावर जिवापाड प्रेम करत असल्याचे प्रत्यक्ष ऐकून ती अधिकच आनंदी झाली. सुगरण फार सोज्ज्वळ स्वभावाची मुलगी होती. परंतु तीसुद्धा प्रल्हादकडे व्यक्त कसे व्हावे याच बुचकळ्यात पडली होती. कारण मामाच्या घरी राहणारी सुगरण समाजाप्रती सजग होती. बापाविना ती पोरकी होती. आपल्याकडे कुणी बोट उगारू नये, असे तिला वाटायचे. त्यामुळे ती आपल्या मनातील भावनेला आवर घालत होती. कधीतरी प्रल्हादकडे आपले मन मोकळे करावे असे सतत तिला वाटायचे. या संधीच्या प्रतीक्षेत अनेक दिवस निघून गेले होते. आता एकांतात भेटायचा व मनातील बोलायचा मौका अनायासेच तिला आला होता. ती फार खूश होती. प्रल्हाद केव्हा भेटतो असे तिला वाटू लागले. आता भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहचली. 


   सुगरण भाजी आणायला घराजवळच्या बागेत जात होती. तिच्या मनात प्रेमाच्या चांदण्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे चालताना वाटेत मध्येच कधी थबकत होती. तर कधी एकटीच स्मित करत होती. प्रेमाची पतंग उत्तुंग शिखरावर उडत होती. गालावर गुलाबाने लाली शिंपडली होती. डोळ्यात भावनांचे जाळे विणले होते. श्वासाच्या सुस्काऱ्यात ऊब भरली होती. मन प्रितीच्या हिंदोळ्यांवर उंचउंच झुलू लागले होते. पावलागणिक प्रतिक्षेच्या क्षणांचा हिशोब मांडताना पाने संपून गेली होती. कधीतरी पडद्यावर पाहिलेला प्रेमग्रंथ हृदयात चित्रित होत होता. त्वचेवर शहाऱ्यांनी ठाण मांडले होते. मन पहिल्या भेटीसाठी प्रेमाच्या आसमंतात निवांत जागा शोधत होते. प्रेमाश्रूंनी पापण्यांच्या कडा चिंब झाल्या होत्या. आतूरलेले मन प्रल्हादच्या अंगाअंगाला स्पर्शून निरोप देत होते... "जन्म घेतला तुझ्याचसाठी, कंच रंगल्या रेशीमगाठी... प्रल्हाद येना रे, वाट पाहते जागून पहाटी...' तोच कृष्णाने आवाज दिला. अगं ये सुगरण... तशीच ती एकदम दचकली. बागेत कधी पोहचली याचे तिला भानच उरले नव्हते. वाफ्यातील पालकाची चार-पाच रोपं उपटून तिने भाजी घेतली व घरी परतली.


   इकडे सुगरणचा होकार व तेही त्याच्यावर त्याच्याचसारखे जिवापाड प्रेम करत असल्याचे प्रल्हादला सुनीलने मोबाईलवरुन सांगितले. प्रल्हादच्या खुशीला पारावार राहिला नाही. सुगरणला केव्हा कधी भेटतो असं त्याला झालं. आता आपलं म्हणायला कुणीतरी हक्काचं माणूस असणार या विचारात तो मशगुल झाला. कारण आजपर्यंत तो सावत्र आईच्या छत्रछायेत वाढला होता. तशी त्याची आई चांगली होती. पण तरीही मात्र आपल्यातल्या आपलेपणाला मुकल्याची त्याला खंत होती. सुगरणच्या रूपाने खरा आपलं म्हणावासा, सच्च्या प्रेमाचा आधार त्याला मिळणार होता. त्यामुळे तो जाम खूश होता. आठवड्याभराच्या दगदगीनंतर तो आता गावाकडे परत येण्यास निघाला होता. डोळ्यात सुगरणचे चित्र रेखाटून तो क्षणाक्षणाला सुगरणची हालचाल मनाने टिपत होता. कधी ती हसतांना, तर कधी तात्यासोबत बोलताना, तर कधी एकटीच हसत मुरडताना त्याला ती दिसत होती. आता त्याला कशाचेच भान उरले नव्हते. तो बेभान होउन नागपूरच्या स्थानकावर उभा होता. तोच त्याला गावची बस दिसली. लगेच सीट पकडून तो आपल्या जागेवर बसला. त्याचा अबोल चेहरा प्रेमाने भिजला होता. कंडक्टरने घंटी वाजवली तशी बस सुटली. त्याच्या हृदयातीला आवर्तनाच्या वेगाने बस धावत आली व गावच्या स्टँडवर थांबली. तसा भानावर येत तो खाली उतरला व लगबगीने पाय उचलत घरी पोचला.


   तो खुर्चीमध्ये चहा पीत बसला होता. तसा घराच्या आडून सुगरणचा आवाज त्याच्या कानात पडला. प्रत्येक घोटागणिक तो तिच्या आवाजाचा कानोसा घेत होता. कपातील चहा संपताच लागलीच तो बाहेर पडला. घराच्या पुढे सुगरण त्याला दिसली. दोघांची नजरानजर झाली. आकाशात वीज चमकावी व सगळीकडे लख्ख उजेड पडावा व सगळ्यांचे डोळे दिपून जावे, असा साक्षात्कार त्याला झाला. तिच्या मुखचंद्राला पाहून तो विभोर झाला. तिचे तीक्ष्ण पाणीदार डोळे आपल्याला खुणावत आहेत यावर त्याचा विश्वासच बसेना. कशीबशी सुद घेत त्याने स्वतःला सावरले. ज्या दिशेला सुगरण चालू लागली, तो तिच्या मागेमागे चोरपावलांनी जाऊ लागला. गावाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या महादेवाच्या मंदिरालगतच्या आंब्याच्या झाडाखाली दोघे एकत्र आले. लाजऱ्या प्रल्हादने दबक्या आवाजात 'आय लव्ह यू' म्हणत सुगरणला प्रपोज केले. 'आय लव्ह यू टू' म्हणत सुगरणने त्याला साद दिली. एकमेकांच्या हातात हात देत प्रत्यक्ष प्रेमाचा स्पर्श दोघांनी अनुभवला. संधीप्रकाशाच्या साक्षीने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आजपर्यंत बापाच्या मायेवविना मामाकडे राहात असलेली सुगरण प्रल्हादच्या प्रेमात पडली. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांना मिठी मारत दोघेही प्रेमाच्या गर्तेत आकंठ बुडाले. खूप वेळ निघून गेला होता. सुगरण काळजीत पडली. मामा रागवणार तर नाही ना याची तिला भिती वाटू लागली. तिला धीर देत आडोशाला होत होत दोघेही आपापल्या घरी पोहोचले.


   म्हणतात ना... भिंतीला कान असतात, तसे झाले. दोघांच्या प्रेमाची चर्चा त्यांच्या घरापर्यंत गेली. मात्र दोघांच्याही घरचे कर्ते पुरुष हे समजदार निघाले. त्यामुळे कुठलाही विरोध न करता दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. प्रल्हाद व सुगरण दोघेही अत्यानंदी झाले. थोड्याच दिवसात मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. आता प्रल्हाद सुगरणला घेवून नागपूरला राहू लागला. दोघेही एकमेकांवर अलोट प्रेम करत होते. प्रल्हाद आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहू लागला. क्षणाचाही विरह त्यांना सहवेनासा होता. प्रल्हादला घरी येण्यास थोडा जरी वेळ झाला तरी सुगरणचा जीव कासावीस होई. तर सुगरणचा चेहरा सतत डोळ्यासमोर राहावा, असे प्रल्हादला वाटायचे. त्यामुळे तो कुठेही गेला तरी वाऱ्याच्या वेगाने घरी परत येई. प्रल्हाद कोणताही छंद नसणारा व पत्नीला प्राणप्रिय मानणारा सुंदर तरुण होता. त्यामुळे सगळे कसे अलबेल होते. संसार सुखाने चालला होता. सुगरण आपल्या संसारात फार सुखी होती.


   प्रल्हादच्या शेजारी त्याचेच गावचा, त्याचा सुशील नावाचा मित्र कुटुंबासह राहत होता. सुशीलचे व प्रल्हादचे एक दुसऱ्याचे घरी येणे-जाणे होते. दोघांची बालपणीचीच मैत्री होती. त्यामुळे दोघे एकमेकांना आपलंसं मानत. कधीकधी सोबत दोघे बाहेर जेवायला जात असे. अंडी, चिकन, मटण खातांना सुशील दारुचेही सेवन करी. प्रल्हादला मात्र दारूचा स्पर्शसुद्धा आवडत नव्हता. असेच दिवस चालले होते. आता कधीकधी सुशील प्रल्हादला दारू घेण्याचा आग्रह धरे. प्रल्हाद मात्र असे करणे सतत टाळायचा. परंतु एक दिवस सुशीलच्या अतिआग्रहास्तव प्रल्हादने दारू घेतली. त्यात त्याला फार काही वावगेसे वाटले नाही. त्यामुळे त्याला दारुची चव लागली. पुढे पुढे प्रल्हाद अधूनमधून दारू पिऊ लागला. हे सुगरणच्या लक्षात आले. परंतु आपला नवरा आपल्याला कुठलाही त्रास देत नाही, कुणालाही अबाजबा बोलत नाही. त्यामुळे त्याचा तिने बाऊ केला नाही. सगळीच माणसे पितात या सबबीखाली तिला त्याचे वेगळेपण जाणवले नाही. मात्र एक दिवस प्रल्हाद सुशीलच्या गाडीवरून पडला. त्याच्या डाव्या पायाला मामुली खरचटले व रक्त निघाले. आपल्या नवऱ्याला झालेली ईजा पाहून तिला फार गहिवरून आले. या प्रकाराने तिला खूप शॉक बसला. आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा नवरा, त्याला जर कशाने काही झाले तर काय करावे याचा विचार ती करु लागली. स्वभावाने भित्री व एकट्याने आयुष्य काढण्याच्या कल्पनेबाहेरची ती हळव्या मनाची स्त्री होती.


   सुगरणला नवऱ्याच्या आवडीनिवडीची फार फिकिर होती. प्रल्हादला आंबाडीची भाजी खूप आवडायची. सुगरणची मावशी शेजारच्या वसाहतीत राहत होती. आपली मावशी तिच्या माहेरी जात असल्याचे तिला कळले. म्हणून सुगरणने प्रल्हादच्या आवडीची आंबाडीची भाजी तिला गावावरून आणावयास सांगितले. सायंकाळी सुगरणची मावसबहिण आंबाडीची भाजी घेऊन सुगरणच्या घरी आली. अतिशय हळव्या स्वभावाच्या असणाऱ्या सुगरणने प्रल्हाद नशेत गाडीवरून पडल्याची गोष्ट तिला सांगितली. तसेच सुशीलच्या संगतीमुळे प्रल्हाद दारू प्यायला लागला, असेही तिने आपल्या बहिणीला सांगितले. भाजी देवून सोनू घरी परत जायला निघाली. तेव्हा सुगरण सोनूला म्हणते, ''पाहा सोनू, तू गेल्यावर हे मला काहीतरी म्हणतीलच. हे प्रल्हादने ऐकले. वास्तविक प्रल्हादला सुगरणला काही एक म्हणायचे नव्हते. परंतु सुगरणने असे म्हटल्यामुळे आपण सुगरणला नाहकच काहीतरी म्हणावे म्हणून, प्रल्हाद म्हणतो "का गं सुगरण.. तू माझी बदनामी करतेस का. जा मी उद्या तुला दिसणारच नाही आणि या वाक्यानेच खरा घात केला. प्रल्हादने जर आपल्या जीवाचे बरेवाईट केले तर आपण कसे जगू या विचाराने तिचे हृदय पिळवटून निघाले. आयुष्यात नवऱ्याशिवाय जगण्याची कल्पना न करणाऱ्या सुगरणने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याच्या मिठीत झोपलेली सुगरण हळूच उठली. तिने प्रल्हादला खूप खूप न्याहाळले. कल्पनेच्या विरहाग्नीत तिचा मनावरील ताबा सुटला. घरात शेतातील फवारणीसाठी आणलेल्या डब्यातील जहर तिने प्राशन केले. थोड्याच वेळात विषाने आपला अंमल दाखवला. आपल्या प्राणप्रिय नवऱ्याकडे एकटक पाहत सुगरण आकाशात उडून गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy