वृक्षवल्ली आम्हां सोयरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरे
सोयरेपण पाहतांना मी तिच्यातलं भारावून गेलो होतो. चेहऱ्यावर सारीकाही आकडेमोड क्षणाक्षणाला उमटत होती. आपलं मांडतांना हसू , तर आपल्याच घरच्यांचसाठी मुग्ध वलयं. कुठे कोणता शब्दं लिहावा.. गणित जुडवतांना मला पण खूप अवघड चाललं. कारण प्रश्न नाजूक अन् तेवढाच साजूक पण आहे. कारण तिला वाईट कि बरं म्हणाव हेच मला कळलं नाही. कारण त्यासाठी विवेका सोबत सद्विवेक जागा नसावा लागतो ; अस करावयास अन् लिहावयास. तिच्या त्या अंगविक्षेपावरून तिचं प्रौढत्व मला समजत होतं. अशावेळी ती व तिच्यासाठी कोणताच निष्कर्ष लागू पळत नाही हे मला पक्के कळलं होतं.हे सारं मी माझ्या दारावरून न्याहाळत तिच्याकडे पाहत उभा होतो.
ती आपल्या गच्चीवरून आरोहा अवरोहा सह सारखी बोलत होती. डाव्या हातात मोबाईल धरुन भांडल्यागत हातवारे करत होती.पोटातल्या कळा ओठांवर आणताना तिला अनेकदा क्लेष झाल्याच मला जाणवत होत. तर कधी खरे तर कधी उगाच पाझळणारे रडू बघतांना तिचा लडीवाळ पणा अन् पोक्तपणा स्पष्ट समजून येत होता.जड जगाच आपलेपणाच जगणं फार काही सांगून जात होत. तेव्हा माणसाला विवेकानंदाची आठवण होते.परमोच्च कोटीच पराप्रेम हे चांगल्या गुरूच्या विना येणे शक्य नाही हे खरांय म्हणून.जे पाहतो, जे ऐकतो ;त्याची गुणवत्ता अन् सामाजिकता यावर माणूस आपल्या जीवनाचा पाया उभारत असतो. तयार होणारी इमारत हे त्याचे प्रतिनिधीत्व करत असते. आणि त्यावरूनच माणसाच सामान्यत्व वा असामान्यत्व ठरते .
मुळ मुद्या म्हंजे ती कुण्या घरच्याच माणसाच्या कुटाळक्या करत आहे हे मला तिच्या मोठया आवाजातील शब्दांमुळे कळलं. घरातीलं हेवेदावे मोबाईलच्या रिंगटोननं सांगण्यात ती पूर्ण बुडून गेली होती. त्यातच तिचं निर्दोषत्व सांगण्यासाठी अनेकदा ती रडक्या रिंगटोन्स मधून मधून ऐकवत होती. तर कधी रागात येवून त्वेषाने बोलत होती. जेवढी हळवी तेवढीच ताठर ललना बघताना स्त्रीच वेगळं विश्व अनुभवन्याचा हा न्याराच प्रसंग होता. मात्र ती प्रसंगावधान व चौकस होऊन बोलत होती. दारावरच्या येणाऱ्या जाणाऱ्याकडे ती लक्ष ठेऊन होती. यावरून आक्रमक होताना स्त्री सावध पण असते हे भान तिचेकडून शिकावयास मला मिळालं. खरं तर ती गरुडाक्षी होती. संवादातल्या शब्दफेकी वरून मुद्या पटविण्याच ज्ञान वारसाने तिच्यात आल्याचं दिसलं .
गावाकडच्या माणसा सोबत होणारा हा संवाद ऐकून ती त्या घरची सून असल्याच निदान झालं. तिच्या बोलण्यात हेकेखोर पणा होता. तरी मात्र ती नालायक मात्र नव्हती. पेरणीतून उगवणार बियानं ज्या जातीचं असत तीच जात अंकुराच्या रूपाने जमीनी बाहेर पडते. पण त्यावर नंतरचे सोपस्कर मालाची गुणवत्ता ठराविण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत असतात. जसा दर्जा तुम्हाला हवा तेवढी चांगली देखभाल सुध्दा गरजेची असते. इथे एकदा किर्तनात ऐकलेला एक प्रसंग मी मांडत आहे. एक साधू तिर्थयात्रेसाठी पायी जात असतो. जाताना रस्त्यात पडणाऱ्या गावात एका घरी तो भोजन करतो. जेवनानंतर ज्या वाटीने तो खिर पीतो, तिच वाटी चोरून घ्यावी असे त्याला वाटते. साधू ला प्रश्न पडतो .. कि त्याला असे का वाटावे.आयुष्यभर प्रामाणिकपणे जगल्या नंतर अचानक असे काय झाले की माझी चोरी करण्याची लालसा होत आहे. या बाबत चौकशी केल्यानंतर त्याला कळते की त्या घरचा धनी हा चोर आहे. अर्थात माणसात येणारा वर्तन बदल हा सापेक्ष असतो हे इथे नमुद करतो.
एका विवाहित स्त्रीला आपल्याच घरच्या माणसांच्या कुटाळक्या करतांना बघण्याचा हा प्रत्यक्ष अनुभव मला विचार करावयास भाग पाडत होता. मनात प्रश्नांची गर्दी झाली होती.सभ्य संस्कृतीचे अंग असणाऱ्या आमच्या बाई मध्ये हा गुण कुठून येतो. याचे खरे गमक काय?हे जाणून घेणे गरजेचे होते. यासाठी पेपर तंत्राचा वापर करणे असे काही इष्ट नाही. याचे उत्तर तुमच्या आमच्या सर्वाकडे नक्कीच आहे. पण आपण शोधनिबंधा शिवाय आंतर मनाची परीक्षा कधीच घेत नाही. स्वतःला कधी उत्तरदेयी ठरवत नाही.आणि त्यातच याचे उत्तर आपल्याला सापडते.
घर म्हणजे संस्काराचे खरे विद्यापीठ असते. आणि येथूनच माणसाच्या खऱ्या जडणघडणीला सुरुवात होते. बालवय अत्यंत संस्कारक्षम असल्याच आपण अनेक पुस्तकातून वाचत आलेलो आहे. खरी गफलत तेव्हाच घडते. आपण आपले म्हणजे एका छताखाली राहणारे रक्ताचे एवढेच शिकवीतो. कधीतरी वृक्षवल्ली आम्हां सोयरे.. परीक्षेपुरते पाठ करून घेतो. पण वृक्षाचे परोपकारी जगणे हे कधीच दुराग्रहानेही शिकवत नाही. तरूणपणा नंतर म्हातारपण येते हे कधी भावार्थाने सांगत नाही. सूनेचीच सासू होते याबाबत मूक राहतो. तुझे वडील पण सासरे होणार आहे असा क्रम लावत नाही. प्रत्येकाला मन असते, मनमिळाऊ याला म्हणतात अस उदाहरण दाखवत नाही.जे दाखवतो ते सगळं स्वार्थअभिप्रेत असणारं. देवाबाप्पा मला सुखाचं ठेव इथपर्यंतच. देवाला नवस, कोंबड,बकरु ते पण आपल्याच पुरतं. याचा सरळ परिणाम आपल्यावरच होतो याचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे सहजपणानं तुमची सून तुम्हाला कधीच आपलं मानत नाही. तुमची मुलगी तिच्या सासऱ्याला आपलं समजत नाही. सासू सूनेची होत नाही अन् सून सासूची होत नाही. म्हशीला कांदे खावू घाल्यास कांद्याचाच वास दूधाला येतो. त्यामुळेच सासूचा जाच सूनेला होतो अन् सूनेचा जाच सासूला होतो. मग यात चुकतो तो कोण??वरवंटा दुसऱ्याला बारीक करण्याच्या नादात स्वतःच फिरतो.