The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Ravina sonawane

Drama Romance

3.2  

Ravina sonawane

Drama Romance

अपूर्ण तरी परिपूर्ण प्रेम

अपूर्ण तरी परिपूर्ण प्रेम

4 mins
397


सकाळचे सहा वाजले होते. अतिशय सुंदर अशी मंगेशकरांची रचना, "मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो..." रेडीओवर चालू होती. अर्थात इतक्या सकाळी उठून सगळ्यांचा स्वयंपाक, बाकी घरातली कामे करायला काहीतरी प्रेरणा हवी म्हणून रचनाला रेडिओची सोबत. नेहमीप्रमाणे रचना कुकरची शेवटची शिट्टी होताच गॅस बंद करून स्वतःची तयारी करायला जाणार एवढ्यात अनिरुद्धच्या फोनची शिट्टी अर्थात अलार्म नको त्या वेळी वाजला. एवढ्या कर्कश आवाजाने न उठणारा तिचा नवरा अनिरुद्ध. शेवटी तिनेच जाऊन अलार्म बंद केला आणि बराच वेळ घालवून त्याला कसं तरी बेडवर बसतं केलं. त्यानंतर अन्विताला शाळेसाठी उठवून, ती ऑफिसच्या तयारीला लागली. तिचं असं रूटीन बघून तिची आई नेहमीच म्हणायची, ”कसं काय सांभाळतेस सगळं? दुसऱ्याच्या मुलीला इतका जीव लावायला काळीज खूप मोठं असावं लागतं.” सांगते, तिच्या म्हणण्याचा अर्थ, रचना अनिरुद्धची दुसरी पत्नी, सीमा अनिरुद्धची पहिली पत्नी. अन्विता त्या दोघांची मुलगी. अचानक कॅन्सरमुळे सीमा गेली. रचना आणि अनिरुद्ध चांगले मित्र होते. त्याला या दुःखातून सावरण्यात आणि त्याच्या सोबत वेळ घालवण्यात ते कधी खूप जवळ आले त्यांनाच कळले नाही. अन्वितानेही तिला आई म्हणून स्वीकारले. असो, तसेच घाईत नाश्ता संपवून ते सर्वजण बाहेर पडले.


ऑफिसचे काम आटोपून ती घरी आली. घरात शिरताच तिची नजर घरभर पसरलेल्या फोटोंवर गेली. तिने जरा ओरडूनच अन्विताला विचारले, "कसला हा एवढा पसारा?" तिकडून अतिउत्साही आवाजात उत्तर आले, "बाबांचा वाढदिवस येतोय ना मग कोलाज बनवतेय." तिचा उत्साह बघून रचनाचा राग आपोआपच शांत झाला. आज पाव-भाजीचा बेत ठरला होता. भाज्या कुकरला लावून ती अन्विताकडे वळली. तिने कधीही न पाहिलेले बरेच फोटो त्यामध्ये होते. ते फोटो अन्विताच्या लहानपणीचे, तिच्या आई-बाबांबरोबरचे. अन्विता रचनाला प्रत्येक फोटोची बाबांकडून ऐकलेली गोष्ट, तेव्हाच्या घटना सांगत होती. प्रत्येक फोटोमध्ये जणू एक नवीनच अनिरुद्ध असल्याचं रचनाला जाणवू लागलं. इतक्या दिवसात तिने कधीच त्याला असं बघितलं नव्हतं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. अनिरुद्ध असावा असे वाटल्याने अन्विताने पटकन फोटो लपवून दार उघडले. रचनानेही किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे तो किचनच्या दरवाजात येऊन तिला म्हणाला, "आलोच फ्रेश होऊन." त्यांची जेवणं झाली. अन्विता झोपूनही गेली. 


रचनाच्या डोक्यातून फोटोंमधला अनि मात्र जात नव्हता. तिच्या मनाची चलबिचल अनिरुद्धने जेवणाच्या टेबलावरच हेरली होती. सहज म्हणून दोघे बाल्कनीत बसले होते. आता मात्र तिला राहवले नाही. तिने विचारले, "तुझी आणि सीमाची अधुरी प्रेमकहाणी काय होती नेमकी?"


तो थोडा दचकला, "आज अचानक हा प्रश्न?"


ती उत्तरली, "सहजच."


त्याने सांगायला सुरुवात केली, "आम्ही एकाच कॉलेजात शिकायचो. ती खूपच धाडसी, महत्वाकांक्षी होती. लग्नासाठीही तिनेच मला विचारलं." आता अनिरुद्ध तोच फोटोमधला आहे असं तिला वाटायला लागलं होतं. तो अगदी त्या काळात रममाण होऊन बोलतच होता, "मला चांगली नोकरी मिळाली. घरच्यांनी थोडा विरोध केला पण सीमाच्या जिद्दीपुढे त्यांनीही हात टेकले. त्या काही वर्षातच आयुष्यभराचे प्लॅनिंग करून ठेवले होते. मला अजूनही आठवतं, जेव्हा सीमा प्रेग्नन्ट होती तेव्हा आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो. तासनतास गप्पा मारायचो. आयुष्याचा तो काळ आठवला की वाटतं सीमाशिवाय मी जिवंत कसा? पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. सीमा नेहमी म्हणायची तिला तिच्या मुलीला खूप छान घडवायचं आहे. पण अन्विता अगदी चार वर्षांची असताना सीमाला कॅन्सर झाला. आमची सगळी दुनियाच संपून गेलीये असं वाटायचं. पण ती मात्र कधीच खचली नाही. कधी-कधी अन्वितासाठी हळवी व्हायची. तिला अन्विताच्या बालपणावर स्वतःच्या आजाराचे सावट येऊ द्यायचे नव्हते म्हणून अन्विताला आजीकडे ठेवलं. ती गेल्यावरही मला जगायला कारण हवं होतं म्हणून अन्विताला इकडे घेऊन आलो. त्या परिस्थितीत फक्त सीमाच्या आठवणींमध्ये जगायला शिकलो होतो. अशावेळी तू आयुष्यात आलीस. सीमा नेहमी म्हणायची मी गेल्यावर अन्विताला माझी आठवण येऊ देऊ नकोस. मला नेहमी वाटायचं हे कसं शक्य आहे? पण तू करून दाखवलेस. आम्हाला अन्विताला जसे घडवायचे होते तसेच तू घडवलेस." अनिरुद्धच्या बोलण्यात तिला स्वतःविषयी प्रेम जाणवत होतं.


तिने पुन्हा न राहून विचारलं, "तुला नाही येत का सीमाची आठवण?"


तो म्हणाला, "अर्थात मी तिला कधीच विसरू शकणार नाही. किंबहुना तिची माझ्या आयुष्यातली जागा कोणीच घेऊ शकणार नाही. रचना कसं असतं ना, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक जागा असते. ती कधीच कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या फोटोंमधला अवखळ अनिरुद्ध सीमाचा होता. आज इथे समजूतदारपणे गप्पा करणारा अनिरुद्ध तुझा आहे." रचना थोडीशी गोंधळून गेली. याला कसं कळलं फोटोंबद्दल? तेवढ्यात तोच म्हणाला, "मी ते लपवलेले फोटो पाहिले आणि तुझ्या चेहऱ्यावरचे भावही." पण आज अनिरुद्धची प्रेमकथा ऐकून रचनाला एक गोष्ट जाणवली. आज सीमा हयात नाही पण त्यांची प्रेमकथा अधुरी नाही. आज तो रचनाबरोबर असूनसुद्धा सीमात सामावलेला होता. रचनाला प्रेमाचा खरा अर्थ उमगला,

“एकत्र राहणं म्हणजे प्रेम नाही तर

आयुष्यभराची सोबत म्हणजे प्रेम

स्वतःसाठी जगणं म्हणजे प्रेम नाही तर

दुसऱ्याच्या सुखासाठी मरूनही जिवंत राहणं म्हणजे प्रेम

नियतीपुढे हात टेकवून साथ सोडणं म्हणजे प्रेम नाही तर,

सोबत राहून नियतीशी दोन हात करणं म्हणजे प्रेम"


Rate this content
Log in

More marathi story from Ravina sonawane

Similar marathi story from Drama