" अपूर्ण Love Letter "
" अपूर्ण Love Letter "


तुझ्या त्या चेहऱ्यावरचं हसू तसंच रहावं, सदा…. असंच मला वाटते नेहमी. म्हणून मनातलं कधी ओठांवर आणलं नाही. कदाचित ते ऐकून तुझ्या चेहऱ्यावरचं smile नाहीसं झालं असतं किंवा अजूनच खुललं असतं…. आणि ते नाहीसं होणे, हे स्वयम परमेश्वरालाही रुचलं नसतं.… हा, अजून खुललं असतं तर ते किती छान … त्या उजव्या गालावर… नाही… नाही, डाव्या गालावर पडणारी खळी तर काही औरच…. त्यातून स्तुती केली तर काय खुलते खळी ती,… क्या बात !!!! … स्वर्गीय क्षण अगदी… मुळात ती खळी नाहीच, डोह आहे तो… मोहाचा डोह… कायम त्या डोहात बुडून जावे असा.
गालावरची खळी तर फक्त निमित्त मात्र, तुझ्या चेहराच किती बोलका आणि सुंदर…. इतका सुंदर चेहरा बनवणं त्या देवाला पुन्हा काही जमलं नसावं बहुतेक… चंद्र, चांदण्याची उपमा मला द्यायची नाही त्या चेहऱ्याला.… उगाचच कशाला ना. त्या चेहऱ्याची किंमत मला कमी करायची नाही. त्याला दुसरं कोणतचं नावं शोभलं नसतं. म्हणून मी "सुंदर" च नावं ठेवलं तुझं.…"सुंदर" फक्त बोललं तरी किती छान वाटते मनाला, "सुंदर… सुंदर… सुंदर"…… किती वेळा नाव घेतलं तरी मन भरत नाही… पाणीदार डोळे, केसही काळेभोर… मागे बांधलेल्या केसांपेक्षा… मोकळे केस, छानच वाटतात तुला. येत-जाणाऱ्या वाऱ्यासोबत ते डोलत असतात. कधी तुझ्या चेहऱ्यावर मुद्दाम येतात. मग हळूच तू ते केस मानेवर एका बाजूला करतेस… तो सोहळा तर देखणा अगदी… त्या क्षणाला मनात खूप काही होते… अर्थात चांगलचं… तुझ्याविषयी वाईट असं येत नाही मनात.
हा, फक्त एकदाचं आलं होतं… वाईट म्हणू शकत नाही. पण आलेलं… तू जेव्हा जीभ काढून वेडावून दाखवलंसं ना तेव्हा… हो तेव्हाच… वाटलं,असंच तुला कुठेतरी पळवून घेऊन जाऊ. या जगापासून लांब… खूप लांब, अशा ठिकाणी, जिथे कोणत्याच भावना नसाव्यात.… सुख-दुःख, ते तर खूप लांब असावं. फक्त तिथे असाव्यात आपल्या आठवणी… धुरकट असल्या तरीही चालतील, मग तिथेच एखादं छान असं टुमदार घर बांधावं… एखादी तुटकी-मुटकी झोपडीही चालेल. तुला आनंदात ठेवलं पाहिजे,बस्स… एवढंच मनात. दुःखाची सावली सुद्धा नसावी त्या संसारावर… आनंदाचं झाड असावं, आनंदाचे ढग, आनंदाची जमीन… सगळीकडेच आनंद… आभासी जग सगळं… तरीही तुझ्यासाठी निर्माण करीन मी.
एकदा पावसात भिजून आली होतीस… तेव्हा तर कळलं होतं, प्रेम काय असते ते, तेव्हापासून पाऊस मुदाम आवडायला लागला… तुझ्यामुळे पाऊस आवडायला लागला. प्रत्येक पावसात तुलाच बघतो.… अजूनही आणि पुढेही तसाच बघत राहीन… तुला रोज बघायची सवय तुच लावली आहेस ना. रोज एकतरी फोटो पाठवतेस मला… प्रत्येक फोटोत निराळीच वाटतेस.… वाटते, सगळ्या फोटोजचे फ्रेम करून घरात लावून टाकू, घराची शोभा वाढेल… पण लोकांच्या नजरा कशा टाळायच्या ना… उगाचच नजर लागली असती तुला… म्हणून मनातचं सगळे फोटो फ्रेम करून लावून दिले … अगदी खिळे ठोकून.
तसा मी एकटाच…. status : Single म्हणजे… रोज घरी येता-जाता एखादं-दुसरं "couple" तरी दिसतेच. कधी बाहेर फिरायला गेलो तरी तिथेही " प्रेमी युगुल" असतात. मॉलमध्ये गेलो तरी तिथे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना पाहतो. तेव्हा मनात वाटून जाते, आपली सुद्धा अशी कोणी "G.F." असावी. G.F. चा full-form सांगायची गरज नाही ना… तसंच वाटते नेहमी, आपल्या सोबत कोणीतरी अशीच असावी, बाईकच्या मागच्या सीटवर बसून मला घट्ट धरणारी, ट्रेनमध्ये विंडो सीटजवळ बसून हळूच, नकळत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जाणारी, समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय मोकळे सोडून बसणारी आणि माझ्या call ची वाट बघणारी.
हे बघ,… असं होतं नेहमी, तुझ्याबद्दल बोलताना… काहीच लक्षात राहत नाही… असो, आता विषय सुरु केला आहे तर सांगूनच टाकतो मनातलं… तू खूप आवडतेस मला आणि मी तुला मनापासून आवडलो पाहिजे म्हणून सतत प्रयत्न करत राहीन… मला तुझं वेडं लागलं आहे, तरी माझा श्वास तुझी गरज बनावं असं वाटते मला.… तू समोर नसताना एक अस्तित्वहीन जग निर्माण होते… तरी माझा वावर तुझं जग निर्माण करणारा असावा, असं वाटते मला.… तू भेटायला येताना नेहमी उशिरा येतेस,तशी तुझी तासनतास वाट बघायची आहे मला… आणि मी उशिरा आलो तरी तुझ्या रागावलेल्या प्रत्येक भावनांना एक छान गोड हास्य देऊन पळवायचे आहे मला.…. तू तर रोज स्वप्नात येतेस माझ्या, तरी तुझ्याकडून " स्वप्नात येतं जाऊ नकोस रे माझ्या, नीट झोप लागत नाही" असं ऐकायचं आहे मला.… रोजच्या गर्दीत, रोजचं शोधत असतो तुला… चुकून भेट झाली तर…. पण माझ्यासाठीही तू त्या गर्दीत , टाचा उंच उंच करून शोधावं असं वाटते मला.… तुझ्यावर कविता करून करून वहीची किती पानं भरून गेली, तरी तुझ्याकडून एखादी छानशी "चारोळी" ऐकायची आहे मला.
खरंच… तुझ्यासाठी मी जन्मभर वाट बघत राहीन, अगदी शेवटपर्यंत… तू कधी ना कधी येशीलच… ज्या क्षणाला तू माझ्याजवळ येशील, त्या क्षणालाच माझ्या हृदयाच्या तुरुंगात तुला डांबून ठेवीन, ते माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत…. तू कितीही विनवण्या केल्यास तरी, कोणताही वकील… साक्षात परमेश्वर वकील बनून आला तरी… त्यातून तुला मुक्तता नाही मुळीच… मी कुठेही गेलो तरी तुला सोबतच घेऊन जाईन… आणि तुझ्यासोबत कूठेही येईन , अगदी जगाच्या अंतापर्यंत… मनापासून येईन तिथे… मनात कोणतेही भाव नसताना… फक्त तुझी साथ असणंचं खूप आहे.… कधी रागावलीस कि जरा मुद्दाम घाबरेन किंवा त्या फुगलेल्या गालांना बघून हसेन… उलट उत्तर नसेल कधीही माझ्याकडून…. तुझे फोटो हे मी असे मनात फ्रेम करून ठेवले आहेत, त्यांना तसंच ठेवीन जन्मभर… तुला आवडलं तर… नाही आवडलं तर ते काढून टाकीन, खिळ्यासहित… खिळे काढताना जखमा होतील मनात, तोंडातून साधा आवाज काढणार नाही… रक्त आलं तरी… पावसाच्या प्रत्येक थेंबात तुलाच शोधत राहीन… आणि तू म्हणालीस तर तुझ्यासाठी त्या पावसालाही विसरून जाईन मी, कायमचा…. विसरून जाईन ते, कसं असतं वेडयासारखं भिजणं पावसात…. सरीवर सरी कोसळताना गरम चहाचा घोट काय भावना देतो तेही विसरून जाईन मग… सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यात हात पसरून उभं राहणं काय असते ते विसरून जाईन कायमचा…
तुला हव्या असणाऱ्या, प्रेमळ वस्तूंचा तुझ्या समोर एखादा डोंगरच उभा करीन… आणि नको असलेल्या, वाईट वस्तूंचा या जगातून समूळ नायनाट करीन तुझ्यासाठी… नृत्यात तुझ्या प्रत्येक पावलात ठेका धरीन, पाय दुखेपर्यंत…. आणि अखेर पायात त्राण नसतानाही तुला विचारीन, अजून कोणत्या गाण्यावर नाचायचे आहे का, …. कधी ऑफिसमधून, थकून-भागून आल्यानंतर," एक long drive ला जाऊया ना… " असं म्हणालीस तरी मी लगेच तयार होईन…. आणि घेऊन जाईन सुसाट अशा मोकळ्या रस्त्यावरून…. तू मागे निवांत बसून राहशील, हा… जरासा क्षीण येईल अंगात, तरी तुला माझ्याबरोबर long drive ला जायचे होते, हाच आनंद मनात भरून राहील.
रात्री झोपताना तुझ्याच चेहऱ्याकडे बघत राहीन, त्या शांत झोपलेल्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे बघत… पापणी न लवता. आणि कायमच तसा बघत राहीन… तुझे श्वास घुमत रहावे माझ्या कानात सदैव. मीच तुझ्या स्वप्नात येऊन तुला सतवावं…. झोपेतच गालावर खळी पडावी तुझ्या… आणि मी हरवून जावं, त्या आठवणीत… तुझ्या आठवणीत…. त्या धुक्यासारख्या धुरकट तरी गडद अश्या, त्यांच्याशी बोलण्याचा एक तोकडा प्रयत्न करीन, ज्यांच्यामुळे मी असा उभा राहिलो तुझ्यासमोर…. स्वतःच्या पायांवर, या जगाच्या विरुद्ध…. , त्यांनी मला कधी जखडून ठेवलं…. आणि कधी सोडून दिलं मोकळं… सैरावैरा धावणाऱ्या वाऱ्यासारखं, पूर आलेल्या पाण्यासारखं आणि उंचच उंच उडणाऱ्या पाखरासारखं… त्या आठवणी…. अभंग, अमर्याद, अविस्मरणीय… काहीशा अपूर्ण…. त्यांना तुझ्या सोबतीने पूर्ण करीन… तुटलेल्या आठवणींना जोडण्याचा प्रयत्न करीन… अगदी त्या धारदार आठवणी जमवताना हातातून रक्त ओघळू लागलं तरी… त्या आठवणी तुझ्याच होत्या आणि तुझ्याच राहतील…. फक्त मला त्याचा एक अंश बनवं…
हे Love letter…असचं अपूर्ण राहिलं… तू त्याचा स्वीकार केलास तर ते पूर्णत्वास जाईल… फक्त तू ठरवलंसं तर…. त्या गालावर पडणाऱ्या खळीच्या डोहात मला कायमचं बुडून नष्ट, नामशेष होयाचे आहे… तुझं उत्तर काहीही असो,…. माझं निस्सीम, निर्मळ प्रेम तुझ्यावर तसंच राहिलं… आणि मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन…. जळून जाईन त्या प्रेमाच्या अग्नीत…तरी प्रेम तसंच तेवत ठेवीन मनात…… कायमचं.