अनोळखी व्यक्तीचा दयाळूपणा
अनोळखी व्यक्तीचा दयाळूपणा
वेळ रात्रीच्या नऊ वाजेची. आडवळणावर माझी गाडी बंद पडली. सोबत बायको अन् दोन वर्षांची मुलगी. मागे पुढे दोन- पाच किलोमीटर अंतरावर कुठलं ना गाव ना थांबा, एवढ्या रात्री कुणी अडवून आपल्याशी काही वाईट केलं तर.......
मनात नको त्या प्रश्नांचं काहूर उठलं. पुन्हा एक प्रयत्न म्हणून गाडीला खटपट करून पाहीली पण गाडी काही चालू होत नव्हती. एकीकडे मुलीला भूक लागली होती आणि दुसरीकडे बायको चिंतेत होती. न राहून बायको बोलली "अहो, गाडी ढकलत थोडं पुढे जाऊ, एखादं हाॅटेल किंवा टपरी दिसली तर तिथं थोडंसं थांबू". बायकोचं म्हणनं पटलं अन् गाडी ढकलत निघालो...
गाडी ढकलून पुरता दमलो होतो. जवळपास दीड किलोमीटर पुढे आलो असेल पण एक चिटपाखरु ही भेटलं नाही. बायकोच्या खांद्यावर मुलगी झोपली होती अन् बायको ही आता पार थकली होती. एका वळणावर हताश होऊन थांबलो. पोटात भूक लागलेली, घोटभर पाणी ही जवळ नव्हतं. तेवढ्यात एक दुचाकी समोर येऊन थांबली. एक अनोळखी समोर दिसताच थोडा घाबरलो.आता रात्रीचे साडेदहा वाजले होते.
"भाऊ, काही मदत हवी आहे का? एवढ्या रात्री अशा ठिकाणी थांबलात म्हणून विचारलं". पण या मागचा त्याचा काय उद्देश असेल हा प्रश्न मनात घोळत होता. एखादा चोर किंवा लुबाडणारा असंच विश्वासात घेऊन धोका करतो असं या आधी ऐकलं होतं.थोडं दबक्या आवाजातच त्याला उत्तर दिलं " काही नाही गाडी खराब झालीये."
माझं उत्तर ऐकून तो लगेच निघून गेला. कदाचित मिच चुकीचा विचार केला असं वाटलं, पण वेळ ही तशीच होती काय करणार...... रात्रीचा गारवा झोंबत होता. मुलगी उठून रडू लागली. पण बायको आणि मुलीला सोडून मला कुठे जाता येत नव्हतं. आता कुणीही आलं तरी त्याच्याकडे मदत मागायची असं मनाशी ठरवलं, कारण दुसरा काही पर्याय नव्हता भलेही त्याने आपल्या परिस्थितीचा फायदा घेतला तरी चालेल.
रात्रीचे अकरा वाजले होते. पुन्हा तिच व्यक्ती दुचाकीवरून माझ्या समोर आली. यावेळी पुरता घाबरलो होतो असं वाटलं की हा नक्कीच पुढे जाऊन साथीदारांना सावध करून आला असेल आणि आता लगेच लुटमार करतो की काय?..... बायकोचा हात घट्ट पकडला, मुलीला पाठीशी घालत त्याला म्हणालो "हे पहा, तुम्ही माझ्या परीस्थितीचा फायदा घेऊन नका, तुम्ही का वापस आलात? लुबाडण्याच्या हेतूनेच ना? मी तुमच् ........ " मी पुढे काही बोलणार तोच त्याने मला थांबवलं
त्याच्या गाडीला एक पिशवी लटकलेली होती, त्याने जसा त्या पिशवीत हात घातला तशी माझी धडधड वाढू लागली जणू तो पिशवीतून चाकू काढतो की काय..... क्षणभर त्याने माझ्या मुलीकडे पाहीलं " बाळ, पाणी पिणार ? "असं म्हणत त्याने दोन पाणी बाॅटल आणि काही बिस्किटे बाहेर काढली. काय घडतय आणि काय घडणार आहे काही कळत नव्हतं...... मुलीने बिस्किटं पाहताच हात पुढे केला, मि घाबरून तिला थांबवलं. हे कदाचित त्याचं अमीष असेल असं वाटलं.
पण जसा वेळ जात राहीला तसं त्याच्या बद्दलचं मत बदलंत गेलं. त्याने एक रस्सी माझ्या गाडीला बांधली आणि पुढे पाच किलोमीटर अंतरावर एका हाॅटेल पर्यंत पोहचवतो असं विश्वासात घेऊन सांगितलं. जणू त्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात देवच भेटला असं वाटलं
का त्याला आमची दया यावी?, का त्याने पुन्हा वापस यावं? असे अनेक प्रश्न मनात आले ,पण आजही माणसातला दयाळूपणा जिवंत आहे याचं कौतुक वाटल. माझ्या कडून कवडीचीही अपेक्षा नाही या उलट " तुम्ही या हाॅटेलवर रात्रभर थांबा आणि सकाळी गाडी दुरूस्त करून घ्या " या त्यांच्या विचाराचं विषेश कौतुक वाटलं.
त्याचे हात जोडून उपकार मानले.अनोळखी व्यक्तीचा असा हा दयाळूपणा माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील
