अक्षरांशी संवाद
अक्षरांशी संवाद


काल चुलत बहिणीला अभ्यासाला घेऊन बसले आणि तिचे अक्षरं बघून, शुद्धलेखनाचा सल्ला तिला दिला! तेव्हा चार ओळी मी पण तिला लिहून दाखवल्या. ती म्हणाली , “आता किती छान लिहीलं ग ताई तू, मग हे तुझ्या रजिस्टर मध्ये काय ग अशी अक्षरे ?” तिने म्हटल्यावर मला ही जाणवले, खरंच आहे ! अक्षरं छान नीटनेटकी आली आहेत ! कारण, मनापासून लिहिली होती ती ! तशी माझी अक्षरे गोल-गुळगुळीत ....! पण , मग हे सुद्धा वाटलं की मला हे आजच का जाणवतेय? तेव्हा आवाज आला,“अगं, तुला वेळ कुठे मिळाला आहे , आणि तू कुठे वेळ काढला आहे , शांत बसून एकाग्रतेने कोऱ्या पानावर त्या शाईची चमक बघत अक्षरं गिरवण्याचा ? अभ्यास करताना फक्त भराभर तुझं ज्ञान शब्दांत बांधून हवे तसे अक्षरं कागदावर गिरवले की झालं तुझं ! ”
माझे अक्षरं माझ्याशी बोलू लागलेत ! आणि मला ते पटलं देखील की खूपच घाई होत आहे ! माझ्याच अक्षरांचं सौन्दर्य जणू मी हिरावून घेतलं !
त्याच क्षणी जाऊन शाळेची एखादी वही, काही लेख कवितांचा कागद , माझ्या नोट्स सगळं जमा केलं आणि जरा संवाद साधला सर्वांसोबत !
शाळेत असतांना मोठमोठी गोल गोल अक्षरं पाहून खूप हसू आलं ! पण लहानपणी कसे आपण बिनधास्त होतो ते त्या लिखाणात जाणवत होतं ! स्पष्ट आणि ठळक !! आणि तेवढ्याच ठळक चुका सुद्धा त्या अक्षरांत , पण भीती नव्हती चुकांची ...
नंतर शिक्षकांचा ओरडा खात खात, “अगं किती मोठी ती अक्षरं त
ुझी , रेखीव आहेत पण जरा लहान काढ सुंदर दिसतील.” आणि मी पण ते ऐकलं ! हळूहळू बदल होत कॉलेज मध्ये असतांना ती रेखीव, सुटसुटीत आणि आकर्षक झाली होती !!!!
ते बघून असं वाटलं की माझ्या स्वभावाचे त्या लिखाणात प्रतिबिंब दिसते आहे !!! असेल का असं ? ज्यांची अगदी मोजून मापून काढलेली अक्षरे ते शिस्तबद्ध, ज्यांची अक्षरे थोडी मोठी आणि त्या अक्षरांना हेलकावे, असे असणारे लोक मुक्तछंद ! असा एक अंदाज आणि थोडं निरीक्षण !!!
तर, असा सगळा स्वतः च्या अक्षरांचा बदल मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनुभवला ! मग लक्षात आलं की अभ्यासाचा वाढलेला भार, स्पर्धेचं युग, यात माझ्या अक्षरांना मी असं धावायला लावलं की त्यांचं सौन्दर्य कमी होत गेलं ! जो आल्हाददायक अनुभव त्या अक्षरांना डोळ्यात साठवून मिळायचा , तीच अक्षरे आज डोळ्याखालून घालणं कठीण होत होतं ! आणि जी अक्षरे मलाच भावली नाहीत , ती उद्या वाचकांना, परीक्षकांना कशी भावणार ????
एकच वाक्य ठराविक जणांनी लिहिलं तरी वेगवेगळी अक्षरे वाचकांवर वेगवेगळा प्रभाव पाडतात ! म्हणून, त्या अक्षरांचे सौन्दर्य , त्याची सुबकता , ठळकपणा हे आपल्याच व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असतं हे मला लक्षांत आले !
आणि आज जशी तल्लीन होऊन लिहायला बसले, त्याच श्रद्धेने मी माझी लेखणी रोज धरेल आणि रोज माझ्या अक्षरांच्या प्रेमात नव्याने पडेल असे मी ठरवले !!