Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Prachi Deshpande

Others


3.5  

Prachi Deshpande

Others


नात्यांचे प्रकार

नात्यांचे प्रकार

3 mins 108 3 mins 108

नातं , प्रत्येकाचं प्रत्येकासोबत वेगळं असतं का? 

नात्याचं ‛स्वरूप’ वेगळं असतं, प्रत्येकासोबत ! 

विचार करून बघू बरं या वर ! 

    

काही व्यक्ती आयुष्यात हळुवार येऊन मनांत घर करून बसली असतात ! नकळत त्यांच्यासमवेत एक घट्ट नातं तयार झालेलं असतं, तेही कुठलेच कष्ट न घेता ; अगदी तसंच , जसं ओसाड जमिनीवर एखादं रोपटं, खत पाणी न घालता , पूर्णपणे नैसर्गिकरित्या बहरत असतं..! आणि अशांच नात्यांचा वृक्ष होतो ! आणि ही नाती कायमस्वरूपी असतात...

    

काही नाती आपण घट्ट धरायचा प्रयत्न करतो, समोरच्याची मात्र तेवढी ईच्छा नसते, आपल्या सोबत संबंध ठेवायची..! पण तरीही आपला एक मुर्खप्रयत्न चालू असतो, ते नातं टिकवायचा . माझ्या अनुभवानुसार , प्रयत्न जरूर करावा. मुळात , त्या व्यक्तीशी नातं का असावं , हे आपल्याला वाटतंय , ते कारण शोधावं !

आपला स्वार्थ?

आपलं प्रेम? 

त्याचे उपकार आहेत आपल्यावर म्हणून? 

आपलं कर्तव्य म्हणून? 

नेमकं कशासाठी? 

    

जर आपला हेतू फार निर्मळ असेल न आणि समोरच्याला किंमत नसेल , तर आपण आपली किंमत नाही समजू शकलो ! म्हणून असं नातं टिकवायच्या प्रयत्नांना मर्यादा असावी! एका मर्यादेनंतर ते वायफळ ठरतात ! 

   

या उलट, कुणीतरी आपल्याशी जोडून राहायचा वेडा प्रयत्न करीत असतो! आपण मात्र आपल्याच तंद्रीत, कधी लक्ष दिल्या जात नाही की, त्या व्यक्तीसाठी आपण एवढे महत्वाचे असू! म्हणून लक्ष ठेवावे की आपल्याकडून अशा प्रकारचे दुर्लक्ष तर होत नसावे ! मग खंत होते काही गोष्टींची, अपराधी वाटतं कधी कधी , मग कधी त्याला/तिला गरज असेल आणि आपल्याकडून तिला मदतीची अपेक्षा असतांना आपण तिथे नव्हतो का? कारण आपणही अनुभवला आहे ते रितेपण ,जेव्हा कुणीच कुणीच नसतं आपल्यासाठी ! असे नकळत अपराध सुद्धा घडत असतात, नात्यात! तेव्हा लक्ष ठेवावं...

     

आजकाल सोशल मीडिया मुळे तात्पुरती नाती तयार व्हायला वेळ लागत नाही, असा युज अँड थ्रो चा कन्सेप्ट नात्यात पण आलाय का हो? फक्त मेसेजेस आणि कंमेन्ट च्या आधारांवर तकलादू नातं तयार होतं, तेवढ्यापुरते! पण नात्यात जीवंतपणा ठेवण्यासाठी चं हे एक उत्कृष्ट माध्यम आहे, हे नाकारता येणार नाही!

        

अजून एक प्रकार असतो बरं का ! ठिगळं लावून कसं बसं बांधून ठेवलेलं नातं! तसेच जसे आपल्या फोन मध्ये काही व्हाट्सएप कॉन्टॅक्टस उगाच असतात..! काही उपयुक्तता नसते आपल्या आयुष्यात काही लोकांची, कदाचित त्यांनी दुखावलं असतं आपल्याला, कधी कुणी मुळातच आवडत नसतं...आणि अशी बरीच कारणं! पण तरीही त्या नात्याला अस्तित्व असतं , कारण आपण महत्त्व देतो! किंवा काळाबरोबर , वरच्या प्रकारातली नाती अशा नात्यात परिवर्तीत होत असावी! 

तर एकंदरीत आपण पाच प्रकारची नाती पहिली, 

१.कायमस्वरूपी

२.फक्त आपण धरून ठेवलेली

३.आपल्याकडून दुर्लक्षित झालेली

४.तात्पुरती नाती

५.ठिगळं लावून जोडून ठेवलेली

  

पहिल्या प्रकारात भरपूर लोक असतील आपल्या आयुष्यातील तर आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत, कारण कायम साथ देणारी माणसं! दुसऱ्या प्रकारच्या नात्यांच्या अस्तित्वावर आपण थोडा विचार करायला हवा, की या नात्याला खरंच अर्थ आहे का? तिसऱ्या प्रकारच्या नात्यांकडे लगेच लक्ष द्यायला हवे! चौथ्या प्रकारातले नाते काळानुरूप लुप्त होत असावे! पाचव्या प्रकारातली नाती आपल्या मनाविरुद्ध असावी!

प्रत्येक प्रकार बघतांना तुमच्या डोळ्यासमोरून किमान एक चेहरा तरी गेला असेल न?

     

आपली सगळी नाती, मैत्रीची , प्रेमाची यांपैकी एका प्रकारांत मोडत असावी! असे आकलन झाले की नाते संबंध जोडायला आणि टिकवायला बरींच मदत होते.. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न!😊


Rate this content
Log in