STORYMIRROR

Medha Barde

Romance

4  

Medha Barde

Romance

आठवण

आठवण

6 mins
321

रमा, 


फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... 

मी अगदी तरुण असतांनाची, आमच्या गावात रोज सकाळी फुलांचा बाजार भरत असे, मी देखील वडीलां बरोबर तिथे जायचो. मॅट्रिक झालो होतो. माझ्या कुटुंबात सगळेच तसे शिकलेले, आणि अप्पांच काय विचारता, गावातल्या शाळेतले शिक्षक होते ते. शनिवार आणि रविवार ते बाजारी येत.. इतर दिवस माझे काका येत असे बाजार मांडायला. आमच्या दुकानात जवळपास ऋतूमध्ये येणारी सगळी फुलं असतं. बाजारातल्या मोठ्या २-४ दुकांनापैकी आमचं एक होतं. अप्पा शिक्षक असून देखील त्यांनी मला कधीच तू अमुक केला पाहिजे, इतके गुण मिळवले पाहिजे वगैरे सूचना केल्या नव्हत्या, त्यांना पूर्ण कल्पना होती की, शिक्षणात खूप रस नव्हता मला. काकांना मदत म्हणून मी रोज जायचो, हा व्यवसाय मनात बसला होता माझ्या. आहे त्या पेक्षा मोठी फुल शेती असावी असा मनापासून वाटायचं. रोज सकाळी, अनेक फुलं मन प्रसन्न करून टाकायची. तो फुलांचा मनमोहक सुगंध.. त्यांचं ते टवटवीत रूप.. सगळं कसं कमाल वाटायचं. सकाळच्या वेळात बाजार अन् नंतर मालाच्याच गाडीत बसून शेतावर जायचं. तिथे काय हवंय काय नकोय ते बघायचं आणि संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत घरी परत यायचं. 


२०-२१ चा झालो तर घरचे लग्नासाठी मागे लागले. त्यामुळे बाजारात सुध्दा हा विषय डोक्यात फिरत असे. पण नुसतं मुलगी बघितली आणि लग्न केलं असं करायची माझी इच्छा नव्हती. याच दरम्यान माझ्या नजरेत एक मुलगी आली. अगदी साधी, सोज्वळ, सुंदर नाही पण तरी देखणी. मी पण तर साधाच होतो. कुठे हुरपरी हवी होती मला. पण अशी मुलगी हवी होती जी मनापासून आवडेल.. आमच्या समोरच्या दुकानात ती कायम येत असे. कधी एकटी तर कधी आजी बरोबर. रोज दिसायची, २-४ साड्या होत्या, आलटून पालटून नेसायची. ती दिसली की, विचार करायचो, कधी आपल्या दुकानात आली तर..? मग, मनोमन स्वतः लाच हसायचो आणि परत कामाला लागायचो. अचानक हे झालं खरं. एक दिवस समोरच्या काकांचं दुकान उघडलं नाही, त्यामुळे ती आमच्या दुकानाकडे वळली. आजही पाहत होतो मी तिच्याकडे, पण जशी ती इकडे यायला लागली, माझ्या हृदयाची जागा बदलून ते कानात येऊन धड धड करायला लागलं. शेजारच्या गण्याला सुध्दा ऐकू जाईल इतका आवाज मला वाटतं होता. तसं गण्या माझ्याकडेच पहात होता, माझ्या मुखकमलाचा रंग पांढरा जो झाला होता. ती समोर येऊन उभी ठाकली. फुलं कितीला वगैरे चौकशी केली, आणि तिची नेहमी ची फुलं घेऊन ती निघून गेली. घेतले पैसे गण्या माझ्या हातात द्यायला लागला, पण मी काही पुतळ्याच्या भूमिकेतून बाहेर आलो नव्हतो. तसाच तिला जातांना बघत बसलो. गण्यात अन् माझ्यात वयाच फार अंतर नव्हतं. माझा मित्रच होता हो तो. मग काय, नंतर हा पठ्या, माझीच मजा घ्यायला लागला. नशीब म्हणावं, की समोरच दुकान पुढे बरेच दिवस बंद होतं. त्यामुळे ती रोज इथे यायला लागली, हळूहळू मी पण जरा तिच्याशी बोलायला लागलो, ओळख वाढली, आवडीचे विषय सारखे निघाले. मग काय, कामाव्यतिरिक्त रोज काहींना काही बोलणं होताच असे. २-४ महिने असेच निघून गेले, मला ती मनापासून आवडायला लागली होती, अन् कदाचित मी पण तिला आवडायला लागलो होतो, म्हणून तर समोरच दुकान सुरू झाला तरी ती परत तिथे कधीच गेली नाही. आता प्रश्न हा होता की, तिला कसं सांगू, तिला काय विचारू, कसं विचारू काही कळेना. इतकं नक्की कळलं होता की तिला गुलाब फार आवडतो. रोजच्या फुलांमधे गुलाबाचा गुच्छ ठरलेला असायचा.


एकदा धिर करून तिला जवळच्या नदी किनारी येशील का विचारलं, काय सांगू.. विचारतांना माझा घसा मात्र कोरडा ठाक झाला होता. नदीपात्र कोरड पडल्यागत. त्या दिवशी तर ती काहीच न बोलता निघून गेली, काळजात खोल कुठेतरी धस्स् झालं. पुढे कितीतरी वेळ मला काम सुचेना. ती काय विचार करेल माझ्या बद्दल ह्या विचारात संध्याकाळ कशी गेली कळलं नाही. रात्र झाली. आताही तेच सगळं डोक्यात. दिवे बंद आणि डोळे उघडे. सकाळ झाली, आज मात्र दुकानात जायची हिम्मत होईना. तिला कसा सामोरा जाणार होतो ते समजेना. ती येईल की नाही इथपासून प्रश्न होता, शेवटी गेलो दुकानात, तिची ठरलेली वेळ जवळ आली अन् निघून पण गेली... गण्याच्या सुध्दा लक्षात आलं. हिरमुसून गेलो होतो मी.. शांत झालो. हवं तर नाही म्हणायला तरी तिनी यावं असं वाटतं होतं. माझं तिथे बसून मन लागेना, मी गण्याला सांगितलं अन् नदी किनारी जाऊन बसलो. तिथेच जिथे तिला बोलावलं होतं. नदीचं शांत वाहणारं पाणी बघत मन शांत करायचा प्रयत्न करत होतो. 

बराच वेळ निघून गेला, वाटलं आता निघू.. मी जागचा हालणार तेवढ्यात मला कोणीतरी हाक मारली, ओळखीच्या आवाजामुळे मी लगेच वळून पाहिलं. ती रमा होती... काय बोलावं मला कळेना... 

 

मी पटकन उभा राहिलो. पहायला लागलो तिच्याकडे, थोडी रुसलेली होती, कपाळावर आठ्या, ओठांचा छोटासा चंबू, गाल हलकेच वर आलेले. जरा रडलेली असावी, डोळे पाणावलेले, किंचित लाल... तसाच तिला पहात राहिलो आणि ती अजून रागानी माझ्याकडे पहायला लागली. मिनिट दोन मिनिट असेच गेले, शेवटी ओरडली माझ्यावर..

"थोडा धीर दम नाही का तुमच्यात..? असं वागत का कोणी..? मान्य आहे मला आज यायला जरा उशीर झाला. पण हे असं वागव का? गणू भाऊ नी सांगितलं, मी काल काही बोलले नाही अन् आज वेळेत आले नाही तुम्ही उदास होऊन नदीकडे निघून गेलात. किती घाबरले माहीत आहे का..? आणि मी काय म्हणते मन उदास झालंय म्हणून हे असं वाहत्या पाण्याच्या इतक्या जवळ कोणी जाऊन बसतं का? किती तो निष्काळजी पणा.? काय करायचा विचार होता.? सांगाल का जरा.?


ती बोलतच होती, पण नंतर नंतर मला काही कळेना झालं. मी अलगद तिचा हात हातात घेतला. स्पर्श होताच ती एकदम शांत झाली, माझ्या डोळ्यात बघायला लागली, हात गार पडला तिचा. माझ्या देखील हृदयाची धडधड वाढली होती. पण तिची ती काळजी बघून आपुलकी बघून हिम्मत आली होती माझ्यात. वाटलं की, आहे कोणीतरी आपलं. आपला विचार करणार. आहे कोणीतरी ज्याचं मन उदास होतं आपल्यासाठी. कोणालातरी हुरहूर लागते आपल्यासाठी. कोणाच्या डोळ्यात पाणी तरळू शकतं आपल्यासाठी. कमाल होतं जे मनात घडत होतं. हात हातात घेत काही क्षण असेच गेले. आणि पटकन मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या. 

म्हणलं, "मला तू खूप आवडतेस. किती ते मी सांगू पण नाही शकत. पण हे नक्की वाटतं की तुझ्याबरोबर आयुष्यभर सोबत जगायला आवडेल मला. मला नाही फारशी कल्पना की तुला मी आवडतो की नाही.. पण मनातून वाटत की तू हो म्हणशील. म्हणशील ना..? 


मी गप्प झालो. भावना मांडायला माझ्याकडे अजून शब्द नव्हते. पण जे सांगणं गरजेचं होते ते मात्र सांगितल होतं. ती काहीतरी बोलेल या आशेने...तसाच तिचा हात हातात धरून शांत उभा राहिलो तिच्या कडे बघत. अन् ती पुरती गप्प. डोळ्यात डोळे घालून ती पण तशीच उभी राहिली.. माझं मन म्हणत होतं, रमे बोल ग.. काहीतरी बोल... अशी शांत नको होऊस. इच्छा तर तुझा होकार ऐकायची आहे, पण नाही म्हणायचं असेल तरी तो नकार पण ऐकेन मी. पण तू बोल... ओठ शिवलेले असले तरी, माझी नजर बोलत होती, उत्तर विचारात होती. तेवढ्यात मला जाणवलं, हातात धरलेल्या तिच्या हातांनी पकड घट्ट केली, जणू तीनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली होती. मी प्रसन्न झालेल्या डोळ्यांनीच तिला परत विचारलं, आणि होकार देत तिनी लाजून मान खाली घातली. आनंदानी वेड लागायच बाकी होतं. इतका आनंद आधी कधीच अनुभवला नव्हता. तो नदी किनारी होता म्हणून, नाहीतर तिला घट्ट मिठीत घेतलं असतं, कधीच वेगळं न होण्यासाठी. पण तो काळ वेगळं होता.. मनाला आवर घालत, दुकानाचा रस्ता धरला...


पुढे घरी सांगितलं, घरचे मनापासून आनंदले. बोलणी होऊन, सगळे कार्यक्रम होऊन, अगदी निर्विघ्नपणे लग्न पार पडलं. माझी शेती वाढली, व्यवसायात यश मिळालं. सगळ्यांच्या आशीर्वादाने इतकी वर्ष सुखाचा संसार झाला.


पण मागच्या महिन्यात माझी रमा मला कायमची सोडून गेली हो.. एकटं करून गेली. बाकी सगळं कुटुंब आहे हो, पण रमे सारखी रमाच.. तिच्या प्रेमाची, काळजीची, आपुलकीची सर कशी येणार दुसऱ्या कोणत्या नात्याला...? 

पण गेले काही दिवस तिला बरं नव्हतच. परालीसिस चा हलके २ अटॅक येऊन गेल्यापासून आजारी आजारीच असायची... थकली होती, आजाराला, औषधाला कंटाळली होती. कदाचित तिला समजलं असावं कमी वेळ उरलाय, म्हणूनच की काय, तिनी माझ्याकडे एकच मागितल होतं. म्हणाली होती मला, कितीही बरं नाही झालं तरी मला घरापासून लांब नेऊ नका. तो वेळ देखील तुम्हा बरोबर घालवायचा आहे, तुम्ही असेच आसपास थांबा... मी तसाच वागलो जसं तिला हवा होतं.

एक सांगू....

लग्न झालं तेव्हा पासून रोज मी तिला तिच्या आवडीचे गुलाबाचे एक फूल देत असे.. कधीच नियम चुकला नाही.. ज्या वेळी ती गेली, तेव्हा देखील मी गुलाब आणायलाच बाहेर पडलो होतो आणि जणूकाही ती माझ्यासाठी थांबली होती. घरी येऊन तिला जवळ जाऊन फूल दिलं अन् तिनी प्राण सोडला. ती गेली म्हणून, तिचा विचार मनातून गेला नाही, तिच्यावर असलेलं माझं प्रेम तर कमी नाही झालं, मग नियम तरी का सोडावा.. 

म्हणून, मी आजही फूल आणतो माझ्या रमेसाठी, तीची आठवण म्हणून, माझं तिच्यावर आजही तेवढंच प्रेम आहे म्हणून....



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance