Medha Barde

Others

2  

Medha Barde

Others

"हरवलेली संध्याकाळ"

"हरवलेली संध्याकाळ"

7 mins
9.6K


नेहमीप्रमाणे संध्याकाळी क्लासच्या इथे भेटायचं ठरलेलं होतं आमचं. दिवसभराची काम उरकून हाच वेळ मिळतो जरा निवांत घालवायला.. बडबड करायला. मग कसं डोकं हलक हलक होतं. बडबड तर इतकी की, क्लासचे सर पण मजेत म्हणतात "तुम्ही दोघी फक्त बडबड करायला इथे येता."

साधारण ६ वाजले की मी तिला फोन करणार आणि ती निघाली की मी पण निघणार हा नियम. तसचं आज पण फोन केला आणि निघाले, स्टडी नोट्सची झेरॉक्स काढायला म्हणून दुकानात होते मी. मला पोचायला साधारण १५ मिनिट लागणार होती, निघाले ते थेट क्लास गाठला. तिची वाट पाहात उभी राहिले. आता मात्र जरा अस्वस्थ वाटायला लागला होता. मला पोहोचून १० मिनिट उलटून गेली होती, एव्हाना ती पोचायला हवी होती. ती सहसा माझ्या आधी पोचते. मग उगीच एकाच ठिकाणी घुटमळायला सुरुवात झाली होती माझी. माहित होतं की ती आत नाही तरी उगीच आत डोकावून पाहत होते मी. म्हणता म्हणता अर्धा तास उलटून गेला होता तरी ती पोहोचली नवती, मला काळजी वाटायला लागली, अन् ती काळजी मला शांत बसू देईना. सारखी घड्याळाकडे नजर जात होती, शेवटी मी जॅकेटच्या खिश्यातून मोबाईल काढला आणि फोन लावला, तर तिचा फोनसुध्दा लागेना. ४-५ वेळा लावला तरी तेच. शेवटपर्यंत फोन लागला नाहीच. आता मात्र खरंच माझी घालमेल सुरू झाली. काय करावं कळेना, इथून निघून रस्त्यात बघत जाव असं वाटायला लागलं होतं. मनात विचित्र विचित्र विचार यायला लागले होते. ती नीट असेल ना... कुठे काही प्रोब्लेम तर नसेल ना झाला. असे विचार धुमाकूळ घातलाय लागले होते.

आता मी गाडीपाशी जाऊन गाडी चालू करणार तेवढ्यात गेटमधून ती येताना दिसली. मला एकदम हुश्श झालं. जीव भांड्यात पडला होता. तिने जाऊन गाडी लावली आणि माझ्या दिशेने चालत यायला लागली, तेवढ्यात मी अधिरपणे तिला फटकन विचारलं, "काय ग टाईमपास कुठे भरकटत होतीस ? आणि तुझा तो फोन कुठे आहे ? इतका वेळ लागतो का ?"

तिने नीट स्कार्फ पण काढला नव्हता. तशीच माझ्यासमोर उभी राहिली आणि एकदम चिडून मला म्हणाली, "तुला काय करायचय ? कशाला फालतू प्रश्न विचारतेस ?" मुळात मला तिच्या ह्या प्रतिक्रियेची बिलकुलच अपेक्षा नव्हती, त्यामुळे काही सेकंद मी पण शांत झाले, पण ती बोलतच होती, रागाच्या भरात ती बराच बोलत होती, शेवटी म्हणाली, "मला नाही करायचा क्लास, चालले मी, सगळे डोकं फिरवण्याची काम करतात.."

मला हे कळायला मार्ग नव्हता की नक्की झाले काय ? ही स्वतः वेळेत आली नाही, म्हणून काही वेळापूर्वी माझा जीव कासावीस झाला होता हिच्या काळजीने आणि आल्यावर काही उत्तर देण्याऐवजी ही बोलतच सुटली. तिची चिडचिड ऐकून माझं पण डोकं जरा सरकलं. मी पण रागात बोलले, "जा गं... नको करू क्लास, एक प्रश्न विचारल्यावर इतकं बोलायची काहीच गरज नव्हती, जा.... कुठे जायचं तिथे जा.. कोणी अडवणार नाहीये तुला."

मीही तिच्याकडे पाठ फिरवून क्लासच्या पायऱ्यांकडे सरकले, चप्पल काढणार तेवढ्यात गाडीला सेल देऊन चालू केल्याचा आवाज आला आणि क्षणार्धात माझ्या हृदयाचा ठोका चुकला, डोळे गच्च बंद झाले, मनातल्या मनात विचार आला, "अरे यार मे चिडायला नको होतं, तिला थांबवायला हवं. मला हे समजलं की तिचं बोलणं शांत ऐकून घ्यायला हवं होतं मी." हे सगळे विचार मनात येत मी पायरीवर थबकेले.. पण मागे वळून बघेपर्यंत ती तिथून निघून गेली होती.

माझं डोकं आता अजुनच सुन्न झालं. लक्षात आलं होतं माझ्या, कितीही चिडली, कितीही बोलली, कितीही राग राग केला तरी ती माझी मैत्रीण होती.. सगळ्यात खास मैत्रीण.. आणि "this is what friends do.."

पण या घडीला माझी तीच मैत्रीण तिथून निघून गेली होती...

प्रामाणिकपणे सांगायचं तर मला काहीच सुचत नव्हतं. मुळात आम्ही दोघी चिडक्या स्वभावाच्या नाही, मग आज असं का वागलो तेच कळेना. स्वतःला शांत करत मी तिला फोन लावला.. सलग ५-६ फोन केले मी, पण तिने एकही उचलला नाही. शेवटी मेसेज केला, "सॉरी गं, मी उगीच ओरडले तुझ्यावर, तू फोन उचल, आपण बोलू ना, सांग काय झालंय, तू कुठे आहेस, मी येते तिथे.. plz निदान रिप्लाय तरी दे" पुढची ५-७ मिनिटं वाट पाहिली, मग कळून चुकलं, आपला हा वेळ वाया गेला. म्हणून ठरवलं आता शोधू कुठे गेलीय ती ते, गाडी सुरू केली, गेटपर्यंत गेले तेव्हा लक्षात आलं, शोधणार कुठे ? आपलं शहर इतकं पण छोट नाही. त्यात ह्या गल्लीतून बाहेर पडल्यावर ती डावीकडे गेली की उजवीकडे ह्याची देखील काडीची कल्पना नव्हती. मग शोधावं कुठे अन् कसं ?

एकदम वाटलं, की निदान आम्हीच नेहेमी जिथे जातो त्या ठिकाणी बघू आधी, hopefully खूप लांब नसेल गेली. क्लासच्या अगदी जवळ एक छोटंसं गार्डन होतं, तिथे गेले, पार्किंगमध्ये गाडी शोधली, दिसेनात, एकतर अजून तिथले दिवे लागायचे होते. थंडीची सुरुवात, ७ वाजून गेल्यामुळे लवकर अंधार पडायला लागला होता. म्हटलं आधी आत जाऊनच पहावं. गाडी तशीच बाजूला लावली अन् आत पळाले, पूर्ण फेरी मारली, नेहेमी ज्या चौथऱ्यावर वेळ घालवत बसायचो तिथे पण पाहिलं. त्याच गार्डनच्या आवारात गेटमधून आत शिरलं की डाव्या बाजूला जरा १५-२० पावलं गेलं की एक छोटेखानी मंदिर होतं. तिथल्याच रहिवाश्यांनी बनवलेलं. तिथेही ती नाही दिसली. ज्या वेगाने आत गेले होते, त्याच वेगाने तिथून बाहेर पण पडले. परत गाडी सुरू करून निघाले. त्याच भागात आमचा एक आवडता रस्ता आहे, कधीकधी क्लासला टप्पा देऊन आम्ही फिरायला पण जायचो. हा रस्ता म्हणजे शहराच्या जुन्या वेशीपर्यंत जाणारा, तिथे जाऊन पहावं म्हटलं. सावकाश सावकाश निघाले, खूप घाई करून चालणार नव्हतं. अक्षरशः १०-२०चा वेग होता. इतकं हळू जायची माझ्या गाडीला सवयच नाही. ५-७ किलोमीटरचा रस्ता पाहून येईपर्यंत माझा हात दुखायला लागला, पण रस्त्याच्या दुतर्फा लक्ष देत जाणं मला अधिक महत्त्वाचं होतं. पाणीपुरीची गाडी, सोड्याची गाडी, मधूनच बिल्डिंगच्या खाली असलेल्या रिकाम्या पायऱ्या... सगळीकडे माझी नजर सैरभैर फिरत होती. आत्ता कुठे तरी दिसेल, पुढे कुठेतरी असेल, असा विचार करत करत मी पूर्ण रस्त्याचा फेरा मारला होता. पण ती मला कुठेच दिसली नव्हती. अधूनमधून घड्याळ पाहणं चालूच होतं. डोकं बधीर झालं होतं. बाजार सुरू होतो तिथे बाजूला थांबले. तेवढ्यात माझा फोन वाजला होता. क्षणात हृदयाचे ठोके वाढले, फोन बाहेर काढेपर्यंत मला समजत नव्हतं आता हिच्याशी काय बोलू ? घाईघाईमधे मी स्क्रीनकडे न बघताच फोन उचलला, मी काही बोलणार तेवढ्यात समोरून कोणीतरी विचारलं, "सागर आहे का ?" मी म्हणाले, "कोण ??? कोण पाहिजे ?"

परत समोरच्यानी विचारलं, "सागर आहे का ? "

माझा असा संताप झालं काय सांगू, आधीच ही पोरगी चिडून कुठे गेलीय माहीत नाही. आसपासचा सगळा भाग बघून झाला होता, मात्र हिचा कुठेच पत्ता नव्हता आणि त्यात भर घालत Wrong नंबरचा फोन. मी त्या व्यक्तीला फटकन बोलले, "नाही हो... कोणी सागर नाही इथे आणि परत फोनही करू नका."

सारखं सारखं मला एवढंच वाटत होतं, मी तिच्याशी असं वागायला नको होतं. खरंतर मी कधीच तिला बोलत नाही, ओरडून बोलणं तर खूप लांब राहिलं. माझ्या अशा वागण्याचं मलाच कसंतरी होत होतं आणि तिला काय झालंय हे पण कळत नव्हतं. मी परत तिला कॉल लावला. ४-५ वेळा लावला, माझ्या आधीच्या कोणत्याच कॉलचा किंवा मेसेजचा एकही रिप्लाय आलेला नव्हता. 8 वाजून गेले होते. आमची घरी जायची वेळ होती ती. तेव्हा मनात आलं अजून दुसरीकडे पाहत बसण्यापेक्षा तिच्या घराजवळ जाऊन थांबू. त्याप्रमाणे मी जाऊन कॉर्नरवर थांबले. जेणेकरून ती कॉलनी मधे जाताना तरी दिसेल. मी गाडी मेन स्टॅण्डला लावून तिथेच बसून घेतलं. ८:१५ होऊन गेले होते माझी नजर नुसती फिरत होती. ही संध्याकाळची वेळ कशी गेली समजलंच नव्हतं. जसे काही, घड्याळाचे हे मधलेच काटे गळून गेले होते. हरवून गेली होती ती वेळ. माझ्या मैत्रिणीसारखीच. इतका वेळ झाला होता तरी आली नाही, म्हणून मी कॉलनीमधे जाऊन चक्कर पण मारून आले की, कदाचित ही क्लासवरून थेट घरी तर नाही गेली. आत गाडी नव्हती, परत माझ्या जागेवर येऊन थांबले, कॉल करायला लागले, but same thing repeat.. no answer.

थंडी वाढायला लागली होती, उशीर झाला होता, माझी काळजी वाढतच होती. चंद्र उगवला होता, हवेतला गारवा आता बोचायला लागला होता. तेवढ्यात, मला घरून फोन आला, मी आईला सांगितलं की, "मला अजुन २० मिनिटं लागतील, उशीर होईल इथेच क्लास मध्येच बसल्ये." खोटं बोलून मी फक्त वेळ मारून नेली. तेवढ्यात आरश्यात मला ती येताना दिसली. मी लगेच मागे वळून पाहिलं, तिचं नव्हतं लक्ष. ती तशीच आत वळून गेली. तिला सुखरूप घरी जाताना बघून माझा जीव भांड्यात पडला. मी ताबडतोब घरी निघाले, माझं डोकं विचार करून करून दुखायला लागलं होतं. घरी पोहोचत होते तेवढ्यात तिचा मेसज आला, "घरी पोचले, चिडल्याबद्दल sorry. जेवण झालं की बोलते."

मी पण जेवले आणि जरा वेळ गच्चीत गेले. शांत निवांत वेळ हवा होता मला. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागल्या. साधा विचार आला मनात, आज जवळची एक व्यक्ती अचानक गायब झाली, तर काय अवस्था झाली जीवाची. वेगळीच ओढ आहे ह्या नात्यात तरी, किती सुंदर आहे हे नातं 'मैत्री'. रक्ताच नसलं तरी मनापासून जपलं जाणारं नातं. यात खूप प्रेम आहे, काळजी आहे, हक्क आहे, चिडणं आहे, रागावणं आहे, एकमेकांना समजून घेणं आहे, एकमेकांसाठी जीव काढणं आहे... सगळं सगळं आहे यात. या नात्याचा एक वेगळा पैलू मी आज पहिल्यांदाच पाहिला होता. आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आणि देवाकडे प्रार्थना अशी की असा अनुभव परत नको मिळायला. माझी झालेली घालमेल नाही सांगू शकणार मी. संध्याकाळच्या २-२:३० तासांनी मानवी नाती अन् त्यांच्या छटा कशा असतात हे छान समजून सांगितलं होतं.

हे सगळं डोक्यात घोळत असतानाच तिचा फोन आला, म्हणाली "सॉरी..मी असं वागायला नको होतं. तू खूप फोन केलेस ना.. पण तेव्हा चिडले होते मी, घरून निघताना भांडले होते मी, पण राग तुझ्यावर निघाला. पण आता झाले शांत, नको काळजी करुस." बोलणं संपलं. घरात जायला निघाले, माझंच माझ्या लक्षात आलं, माझ्या चेहेऱ्यावर एक हास्य होतं. सगळं नीट झाल्याचं समाधान होतं. झोप पण छान लागणार होती..

पलंगात जशी पाठ टेकली तसं, झोपताना एक विचार चमकून गेला, कायम लक्षात राहील ही ह्या आजूबाजूच्या झगमगाटात, गोंधळात ही, 'हरवलेली संध्याकाळ'


Rate this content
Log in