आकाशातला तारा
आकाशातला तारा
"आई गं, आपण यंदा दिवाळी नाही साजरी करायची? "
रडवेल्या सहा वर्षाच्या अनुजाने आपल्या आईला मिठी मारत विचारले आणि तिच्या पेक्षा थोडासा मोठा, दहा वर्षाच्या अर्णवने आईकडे अपेक्षेने पाहात डोळे पुसले.
अनघाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले.नुकताच चार महिन्यांपूर्वी मुलांचा लाडका डॅड लेफ्टनंट कर्नल अमोल देशपांडे काश्मीर खो-यातील आतंकवादी हल्ल्याचा प्रतिकार करताना धारातिर्थी पडला होता. आर्मीतील कॅडेट्सना तिथल्या बर्फाळ प्रदेशात शत्रूचा सामना कसा करायचा ह्याचे डावपेच शिकवणारे सैनिकांचे लाडके लेफ्टनंट कर्नल अमोल देशपांडे ह्यांच्या ट्रेनिंग छावणीवर अतिरेक्यांनी बाॅम्बहल्ले केले आणि त्यांच्याशी झुंजारपणे लढताना अमोल सरांना वीरगती प्राप्त झाली. अमोलचे पार्थिव शरीर तिरंगी झेंड्यामध्ये लपेटून आलेले पाहून अनघा स्वतःही हादरली होती. पण त्या वेळेसही तिला स्वतःच्या भावनांना आवर घालून आपल्या दोन बाळांना आणि त्याही पेक्षा हतबल झालेल्या अमोलच्या आई-बाबांना सावरणे आवश्यक होते. वीरपत्नी म्हणून सत्कार झाला तेव्हाही आपल्या डोळ्यातले पाणी लपवत अनघा अमोलच्या कर्तृत्वाच्या कहाण्या ऐकत मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत राहिली.
अमोलच्या आईला अमोलचे सैन्यात भरती होणे फारसे मान्य नव्हते. त्यांचे एकुलते एक अपत्य आणि त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा म्हणून त्यांना अमोलचा खूप अभिमान होता. पण अमोलचे बाबा मात्र त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त्यांनी सांगितले, " ज्यांचे मुलगे परदेशात शिकायला किंवा नोकरीसाठी जातात, ते राहतातच ना आपल्या मुलांना सोडून इथे एकटेच? मग आपला लेक तर इथे भारतातच राहून मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा धरतो आहे, त्यात गैर काय आहे? होऊदे त्याला बलवान, शक्तिमान! आपल्या कुटुंबाबरोबर तो देशाचेही रक्षण करायला सज्ज झाला, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक होण्यापेक्षा मला त्याचा हा निर्णय जास्ती आवडेल." मुलाची इच्छा आणि पतीचे विचार ऐकून अमोलच्या आईनेही मन घट्ट करून अमोलला सैन्यात जाण्याची अनुमती दिली होती.
बाबांच्या नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या अमोलचे शिक्षण मुंबईतील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये पार पडले होते. लहानपणापासून त्याला स्पोर्टस् व व्यायामाची अतिशय आवड होती.काॅलेजच्या स्पोर्टस् क्लबचा सेक्रेटरी असलेला अमोल आणि स्पोर्टस् पेक्षा नृत्य - नाट्य वगैरे कलाप्रकारांची अधिक आवड असलेली अनघा , असे परस्परविरोधी आवडी असलेले हे दोन तरुण जीव एकमेकांच्या हृदयात कधी शिरले , हे कोडे त्या दोघांनाही उमगले नाही. मात्र जेव्हा जाणवले, तोपर्यंत हे प्रीतीमध्ये रुपांतरीत झालेले भावबंध अतूट नातं निर्माण करून स्थिर झाले होते. दोघांच्याही घरच्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली, तोपर्यंत ह्यांच्या नात्यामधली वीण घट्ट विणली गेली होती. आणि सुदैवाने दोघांनाही ह्या साठी घरचा काहीच विरोध नव्हता. अट हीच होती की "आपापले शिक्षण आणि करिअर करण्यात कुठेही कमी पडता कामा नये. ते सर्व व्यवस्थित पार पडले की आम्हीच आपण होऊन लग्नगाठ बांधून देऊ." अमोल आणि अनघा दोघेही समंजस होते आणि आपल्या करिअरला महत्त्व देणारे होते. त्यांनी हे घरच्यांचे चॅलेंज हसत हसत स्वीकारले आणि आपल्या प्रेमाच्या साथीनेच व्यक्तिमत्वही फुलवत राहिले.
काॅलेजच्या अखेरच्या वर्षी एन् सी सीचा बेस्ट कॅडेट पुरस्कार प्राप्त केल्यावर अमोलने सैन्यात भरती होण्याचा ध्यास घेतला होता. अमोलच्या आईला ही गोष्ट पचवणे कठीण होते. अमोलने लग्न करून संसारात स्थिर व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. उलट अमोलच्या हे लक्षात आले की आपण आपल्या बरोबर अनघाचे आयुष्य पणाला लावू शकत नाही. मी जर देशसेवेसाठी संसाराचे पाश तोडायला तयार आहे, तर मला अनघाला माझ्या पाशातून मुक्त करायलाच हवे. पण अनघा दृढनिश्चयाने त्याच्या बरोबर संसार करण्याची स्वप्ने रंगवत, त्याची प्रतिक्षा करत थांबण्याचा निर्णय घेऊन मोकळी झाली होती. अखेर अमोलची तीव्र इच्छा आणि अनघाची साथ ह्यांचा विजय झाला आणि अमोल आपल्या कुटंबियांचा निरोप घेऊन त्याच्या पहिल्या पोस्टिंगसाठी इंफाळ येथे रवाना झाला.
आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अनघा आपल्याच काॅलेजमध्ये लेक्चरर बनली. अमोलच्या बाबांनी सेवानिवृत्तीनंतर गावाकडच्या घरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमोलने आपल्या वचनाप्रमाणे नोकरीत पाच वर्षे स्थिरस्थावर झाल्यावर अनघा बरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. दोन्ही कुटुंबांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
लग्न समारंभ उरकल्यावर गावाला काही दिवस राहून आणि नंतर अनघाला नोकरी निमित्त मुंबईला परत पोहोचवून अमोल आपल्या कामाच्या जागी रवाना झाला. लग्नानंतर पहिल्यांदा असा निरोप देताना अनघाला खूपच जड गेले होते. पण हळूहळू ह्याचीही सवय होत गेली.
वर्षातून एकदा रजा घेऊन आलेल्या अमोलला त्याच्या आई-बाबांचा सहवास जास्ती मिळायला हवा ह्याची जाणीव असल्याने अनघा प्रत्येक वेळी त्याच्या गावी जाऊन राहात होती आणि आपल्या सासू- सास-यांना आनंद देत होती. अशाच सुमंगल क्षणी आधी अर्णव आणि त्यानंतर चार वर्षांनी अनुजाचा जन्म झाल्यामुळे दोन्ही घरचे नातेवाईकही आनंदात होते.
इकडे अमोलने आपल्या कर्तृत्वाचा आलेख इतका उंचावला की त्यालाही लवकरच आपल्या पत्नी व मुलांना घेऊन पोस्टिंगच्या जागी संसार थाटण्याची परवानगी मिळाली.आपल्या मुलांना बाबाचा सहवास आणि प्रेम लाभावे म्हणून अनघानेही अमोलच्या पोस्टिंगच्या जागी राहण्याचा निर्णय घेतला आणि अमोल - अनघाचा संसार ख-या अर्थाने सुरू झाला. कधी सुखाचे क्षण तर कधी वादळी झंझावात; कधी सैनिकांची पंचतारांकित सुखासीन जीवनशैली , तर कधी जागून काढणारी वै-याची रात्र ; कधी नव-याचा आनंदी सहवास तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देवाची आर्त आळवणी... अनघा आता ह्या जीवनशैलीला चांगलीच सरावली होती. कॅम्पमधल्या इतर अधिका-यांच्या बायकांच्या साथीने ती सैनिक वस्तीमधल्या जीवनाचा अनुभव घेण्यात रमली होती. आणि अचानक ती हृदयभेदक बातमी आली.
सैनिकी वसाहतीपासून थोड्या दूर अंतरावर सैनिकी प्रशिक्षणाची छावणी उभारली होती. देशाच्या विविध भागातले वीस कॅडेट्स तेथे लेफ्टनंट कर्नल अमोल देशपांडे ह्यांचे अनुभवी मार्गदर्शन मिळवण्यासाठी उत्साहाने आले होते. चार दिवस चार रात्री सैनिकी शिस्तीमध्ये तरीही आनंदात पार पडल्या होत्या. रात्री जेवताना प्रत्येकाच्या चेह-यावर अमोल सरांविषयीचा कृतार्थ भाव व्यक्त होत होता आणि त्यांच्या भेटीने सैन्यात भरती झाल्याचे सार्थक झाले, अशाच गप्पा रंगल्या होत्या. एवढ्यात अचानक सायरन वाजू लागले आणि नक्की काय होते आहे हे कळण्याच्या आधीच छावणीमध्ये एकच दाणादाण उडाली. सुदैवाने अमोल सर त्यांच्याच बरोबर मेसमध्ये एकत्र जेवत होते म्हणून पुढच्या आवश्यक सूचना पटापट देण्यात आल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता सर्व कॅडेट्स प्रतिकारासाठी सज्ज झाले. परंतु आतंकवाद्यांनी पूर्ण तयारीनिशी केलेल्या ह्या हल्ल्यात छावणी तर उध्वस्त झालीच, पण अनेकांना प्राणघातक जखमाही झाल्या.
इथेच लेफ्टनंट कर्नल अमोल देशपांडे ह्यांचे कौशल्य पणाला लागले. त्यांनी जीवावर उदार होऊन आपल्या वीसही कॅडेट्सना त्या भयंकर प्राणघातक हल्ल्यांपासून वाचवले आणि सुरक्षित अशा स्थळी सुखरूप पोहचवण्यासाठी व्यवस्था केली. पण दुर्दैवाने अमोल देशपांडे ह्यांना मात्र दैवाची साथ लाभली नाही. आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली.
अमोलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे निर्जीव शरीर गावाला नेण्याचे ठरवले तेव्हाच सैन्यातील पदाधिकारी वर्गाने अनघा आणि दोन्ही मुलांना स्वगृही पाठवण्याची पूर्ण व्यवस्था केली. अनघाने मुलांना पुन्हा मुंबईला शाळेत घालायचा निश्चय केला आणि ती मुलांना घेऊन मुंबईला परतली . मुलांची व्यवस्था लावण्यात व्यस्त झाल्यामुळे आपल्या दु:खाचे सागर डोळ्यात लपवून ती कर्तव्याला सामोरी जात राहिली.
आत्ता दिवाळीच्या निमित्ताने दोनच दिवसांपूर्वी अमोलचे बाबा अनघाला आणि मुलांना गावाला घेऊन आले होते. आणि आता मुलं अनघाला कळवळून विचारत होती, " आई, आपण यंदा दिवाळी नाही साजरी करायची? आजी आजोबांना सांगत होती की माझा लेक राहिला नाही आणि तुम्हाला दीवाळी साजरी करायला कसे सुचतेय? मी नाही असलं काही करू देणार घरामध्ये! "
अनघा दोन्ही मुलांना घेऊन सासूबाईंच्या खोलीत आली. तिथे बाबा आधीच आईंची समजूत काढत होतेच! अनघाने सुद्धा त्यांना पटवून दिले, " आई, अमोल अमर झाला आहे. त्याच्या मृत्यूचे दु:ख करत राहिलात, तर त्याचे हौतात्म्य सफल होणार नाही. आपणच त्याच्या भावनांची कदर केली नाही, तर दुनिया सुद्धा आपल्याकडे करुणेने पाहात राहील आणि तुम्हाला एका शहीद वीराच्या माता-पित्याचा सन्मान मिळणार नाही. तुम्ही स्वतःला सावरत मुलांना आधार द्यायला हवा." अमोलच्या आईलाही अनघाचे म्हणणे पटले आणि मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ते सर्वजण सज्ज झाले.
दुस-या दिवशी धनत्रयोदिशीच्या संध्याकाळी अनघाने अनुजाला छोटीशी रांगोळी काढायला शिकवली आणि अर्णवच्या हातून तेथे पणती तेवत ठेवली. नरक चतुर्दशीच्या पहाटेच शेजारच्या काकू फराळाचे ताट घेऊन आल्या आणि आजीला म्हणाल्या, " मुलांसाठी फराळ आणलाय थोडा! तोंड गोड करा सगळ्यांनी! " मागोमाग आळीतल्या आणखी पाच-सहा बायकाही फराळाची ताटे घेऊन आल्या आणि मुलांना आपल्या हाताने खाऊ घातले.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मात्र अनघा स्वतःच खूप अस्वस्थ होती. आजचा दिवस आपण कसा काढणार, हे तिलाच समजत नव्हते! मागची आठ- दहा वर्षे ती अमोल बरोबर त्याच्या पोस्टिंगच्या ठिकाणी दिवाळी थाटात साजरी करत होती. लक्ष्मीपूजनाच्या रात्री सुंदर पूजा मांडून ती कॅम्पमधल्या सर्व ऑफिसर्सच्या बायकांना हळदीकुंकु समारंभासाठी बोलवायची. फराळाचे नाविन्यपूर्ण पदार्थ आणि बरोबर गरमगरम मसाले दूध देऊन त्यांना तृप्त करायची आणि घरी परतताना नारळाची ओटी भरून प्रत्येकीला निरोप द्यायची.
दुसरा दिवस दिवाळीचा पाडवा हा खास अमोलचा दिवस! त्याचे ऑफिसर मित्रच नव्हे, तर हाताखालचे कर्मचारी आणि ट्रेनिंग घेणारे नवजवान सुद्धा त्याने होस्ट केलेल्या दिवाळी पार्टीची मौज लुटायला आतुर असायचे! नानाविध खाद्यपदार्थ आणि उंची मद्याची रेलचेल असलेल्या ह्या पार्टीत कॅम्पमधल्या सर्व महिलाही आनंदाने सहभागी होत असत! यंदा येत असेल का त्यांना अमोलची आठवण? करतील का कॅम्पमध्ये दिवाळी साजरी?
विचारांनी अस्वस्थ झालेल्या अनघाला अचानक आपल्या वाड्याबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. लाल दिव्याच्या सरकारी गाडीतून तीन-चार माणसे उतरली आणि वाड्याचे प्रवेशद्वार ओलांडून घराकडे येताना दिसली, तेव्हा अमोलच्या बाबांनी पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हा कलेक्टर, त्यांचे सेक्रेटरी आणि आर्मीचे दोन उच्चपदस्थ ऑफिसर्स आले होते. त्यांच्या स्वागताला बाहेर आलेल्या अनघाचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अमोलच्या घरासमोरील चौकाचे " लेफ्टनंट कर्नल अमोल देशपांडे चौक " असे नवीन नामकरण होणार असल्याने त्याचे उदघाटन अनघाच्या हस्ते व्हावे अशी विनंती करण्यासाठी ते सर्व आले होते. संध्याकाळी सात वाजता सर्व कुटुंबियांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन घेऊन ते सर्व पूर्वतयारीसाठी परत गेले. बाबांनी आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने गावाला का आणले ह्याचे गुज अनघाला आत्ता उमजले.
संध्याकाळी चौकात गावातल्या माणसांची प्रचंड गर्दी जमली होती. आपल्या गावातील वीरचक्र विजेत्या सैनिकाविषयीचा आदर त्यांच्या कृतीतून व्यक्त होत होता. औपचारिक नामकरण समारंभ पार पडला आणि चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली. फटाक्यांच्या धुमधडाक्याने अमोलला मानवंदना देण्यात आली. गावातील प्रत्येक व्यक्तीने चौकामध्ये एक दीप प्रज्वलित केला आणि " वीर जवान अमोल देशपांडे अमर रहे " अशा घोषणा करत सारा परिसर दुमदुमवला . आपल्या घरची लक्ष्मी पूजा सोडून चौकामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेल्या त्या गावक-यांकडे अनघा अनिमिष नेत्रांनी पाहात होती. तेवढ्यात अनघाचा हात धरून अनुजा बोलली, " आई, तो बघ , आकाशात तारा चमचमतोय! आपले डॅड आहेत ना ते? आपल्याला सर्वांना पाहून ते किती हसताहेत बघ! " अनघाने आकाशातल्या ता-याकडे कृतज्ञतेने पाहिले आणि त्याला साथ देत मनातच हसली.
