गुणवंत शिक्षक
गुणवंत शिक्षक
आज शहरातील टाऊन हाॅल माणसांनी खच्चून भरला होता. शहरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ सौ. प्रमिलाताई देशपांडे ह्यांना राज्य सरकारतर्फे "गुणवंत शिक्षक " हा पुरस्कार घोषित केला होता आणि तो देण्यासाठी जिल्हा कलेक्टर श्री. हेमंत राजमाने स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. देशपांडे बाईंच्या सत्कार सोहळ्याला लागूनच त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतरचा निरोप समारंभ सुद्धा होणार असल्याने बाईंचे असंख्य विद्यार्थी, पालक आणि मित्र परिवार ह्या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दूर दूरच्या ठिकाणांहून आलेले होते.
खरं तर ह्या छोट्या शहरात पहिली बालवाडी शाळा स्थापन करून तिचा विकास करत करत, प्राथमिक, माध्यमिक आणि आता उच्च माध्यमिक शिक्षण देणारी "आदर्श शिक्षण संस्था" म्हणून शाळेचे व संस्थेचे नाव पंचक्रोशीत गाजत होते आणि सरकार दरबारी सुद्धा नोंद झाली होतीच! तरीही देशपांडे बाईंच्या प्रेमळ, नम्र स्वभावामध्ये कोणताही फरक पडला नव्हता. शाळेला भेट द्यायला येणा-या पालक मंत्री असोत किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याची माता असो, देशपांडे बाई सारख्याच आदराने त्यांची विचारपूस आणि आदरसत्कार करत असत. शाळेतील शिक्षिका असोत किंवा मदतनीस म्हणून नेमलेल्या अल्पशिक्षित शिपाई महिला असोत, सर्वांना त्या समान वागणूक देत असत. त्यामुळेच बाई त्यांच्या विभागामध्ये इतक्या लोकप्रिय होत्या की अनेक वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते त्यांना आपल्या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवावी म्हणून आग्रह करत असत. पण बाई नेहमीच विनम्र हसून उत्तर टाळत असत किंवा " राजकारणाचा आग्रह नको, सामाजिक कार्यासाठी कधीही हाक द्या, मी तुमच्या बरोबर नेहमीच उभी राहीन " असे ठाम उत्तर देत असत.
देशपांडे बाईंच्या ह्या सेवाभावी वृत्तीचा लाभही अनेक गोरगरिबांना आणि त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांना झालेला असल्यामुळे त्यांना हा " गुणवंत शिक्षक " पुरस्कार घोषित केल्यानंतर सा-या शहरामध्ये एक उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ह्या निमित्ताने आपल्याला देवस्वरूप वाटणा-या बाईंना फुल ना फुलाची पाकळी अर्पण करावी, अशी इच्छा धरून अनेक व्यक्ती समारंभाच्या संयोजकांना भेटत होत्या. परंतु बाई हे सर्व जाणून असल्याने त्यांनी संयोजकांना आधीच एक अट घातली होती की "कोणत्याही परिस्थितीत मी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही. शासकीय सन्मानपत्र हीच माझ्यासाठी सर्वांकडून मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहे. मला ह्या व्यतिरिक्त काहीही देऊ नये. "
प्रमिला ताईंची ही निस्पृह वृत्ती संयोजकांच्या मनात त्यांच्या विषयी अधिकच आदर व जिव्हाळा निर्माण करत होती. आता सर्वांना उत्सुकता होती ती बाईंचे ओजस्वी भाषण ऐकण्याची आणि त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली तर नमस्कार करण्याची! ह्यासाठीच तर व्यासपीठाजवळच्या खुर्च्या पकडण्यासाठी धावपळ करत लोक वेळेच्या खूप आधीच स्थानापन्न झाले होते.
कधी नाही ते शासकीय अधिकारी सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी वेळेच्या आधीच उपस्थित होते. आणि स्वतः जातीने सर्व व्यवस्था ठीक आहे की नाही हे तपासून पाहात होते. वेळेच्या बाबतीत अत्यंत वक्तशीर असणा-या प्रमिलाताई देशपांडे ह्यांनी ठीक साडे चार वाजता सभागृहात प्रवेश केला आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. हेमंत राजमाने स्वतः पुढे आले आणि बाईंना व्यासपीठावर घेऊन गेले. क्षणाचाही विलंब न लावता सरस्वती वंदनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
नेहमी प्रमाणे काही औपचारिक भाषणे, बाईंचा व त्यांच्या संस्थेचा अल्प परिचय आणि काही मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर राजमाने साहेबांच्या हातून बाईंचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बाईंच्या हातात सन्मानचिन्ह देऊन राजमाने साहेबांनी अचानक त्यांच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार केला. साहेब हे काय करत आहेत, हे समजायला बाईंनाही थोडा वेळ लागला. आणि अचानक खाली बसलेल्या अवस्थेतच साहेब हात जोडून म्हणाले, " बाई, मला ओळखलंत? मी तुमच्या शाळेतला वाया गेलेला आणि तुमच्या मुळेच मार्गी लागलेला हेमंता! तुम्ही होतात म्हणून मी आज इथे साहेब म्हणून हजर आहे , नाही तर एखाद्या तुरुंगात खडी फोडत शिक्षा काटत बसलो असतो. बाई, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. "
" अहो साहेब, हे काय करताय? तुम्ही एक जिल्हा कलेक्टर आहात, तुम्ही असे माझ्या पायावर डोके ठेवणे योग्य नाही. उठा, उठा ना साहेब!"
" साहेब नाही, हेमंता म्हणा बाई, मगच मी येथून उठेन."
बाईंनी हेमंताला आपल्या हाताने वर उठवले आणि त्याचा चेहरा न्याहाळत म्हणाल्या, " मगाशी आल्या पासून सारखे वाटते आहे की मी ह्या साहेबांना कुठेतरी पाहिले आहे, पण नक्की कुठे, ते आठवत नव्हते. आता मात्र ओळख पटली. आज तुम्हाला ह्या पदावर स्थानापन्न झालेले पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. माझ्या आयुष्यात एक तरी विद्यार्थी मी घडवला, ह्याचे समाधान मिळाले. आजचा दिवस सोन्याचा झाला. "
" बाई, तुमच्या साठी एक दिवस सोन्याचा झाला, पण माझे संपूर्ण आयुष्य तुम्ही सोन्यासारखे उजळवून टाकले आहेत. आज मी खास तुम्हाला मानवंदना देण्यासाठीच इथे आलो आहे. तुमचे आभार मानण्याची ही संधी मिळाली म्हणून मी स्वतःला कृतार्थ समजतो. "
बोलत बोलत हेमंत राजमाने साहेब माईक जवळ गेले आणि त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करून बाईंच्या मुळे आपले जीवन कसे सफल झाले, ह्याचे वर्णन करायला सुरुवात केली. साहेबांचे भावपूर्ण भाषण ऐकताना अनेक लोक तल्लीन झाले होते, आणि बाईंच्या डोळ्यांच्या कडा तो जुना इतिहास आठवून ओलावल्या होत्या.बाईंना आता तो दिवस लख्ख आठवत होता.
दर महिन्याच्या अखेरीस प्रिन्सिपल प्रमिलाताई देशपांडे ह्यांच्या ऑफिसात सर्व शिक्षिकांची सभा घेतली जायची आणि त्यांच्या वर्गात येणा-या अडचणी किंवा खास गोष्टींवर चर्चा केली जायची. त्या दिवशी सभेत चौथीच्या वर्गशिक्षिका भावे बाई बोलल्या, " बाकी सर्व ठीक आहे, पण एकच समस्या आहे. हेमंत राजमाने नावाचा एक विद्यार्थी मागचे दहा दिवस शाळेत आलेला नाही. त्याने मागच्या चार महिन्यात शाळेची फी भरली नाही, म्हणून मी त्याला पालकांना घेऊन ये सांगितले, तेव्हा पासून तो शाळेत आलेलाच नाही. "
" अहो, मग घरी शिपाई पाठवून चौकशी करायला हवी. कदाचित तो किंवा घरचे कोणी आजारी असेल! "
" नाही मॅडम, आपल्या शिपाई शांताबाई जाऊन आल्या तर त्याचे घर बंद होते. शेजारी म्हणाले की मुलं शाळेत गेली आहेत आणि त्यांची आई नोकरीला गेली आहे. ती संध्याकाळी उशीरा घरी परत येते. शांताबाई शेजारच्या घरी चिठ्ठी देऊन आल्या आहेत, पण अजून कोणीच भेटायला आले नाही. "
आता प्रमिलाताईंना ह्या गोष्टीचे गांभीर्य जाणवले. शेजारी बोलले की मुलं शाळेत गेली आहेत आणि हा मुलगा तर मागचे दहा दिवस शाळेत आलेला नाही, मग हा नक्की गेला कुठे? त्या भावे बाईंना बोलल्या, " एक काम करूया, उद्या आपण दोघी त्याच्या घरी जाऊन पाहू , काय परिस्थिती आहे ती! "
दुस-या दिवशी त्या झोपडपट्टीत हेमंताचे घर शोधत शोधत गेल्यावर समजले की त्याचा बाप दारुडा आहे आणि फारसे काही कमवत नाही, घरात पुरेसा पैसा देत नाही. आई मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून जवळच एका कारखान्यात मजदूर म्हणून काम करते. तिला घरी यायला उशीर होतो, पण ती रोज मुलांना शाळेत पाठवून मगच कारखान्यात कामाला जाते. हेमंतला एक छोटी बहीण आहे आणि तिला सुद्धा नगरपालिकेच्या शाळेत घातले आहे. पण मुलगा चांगला शिकावा म्हणून त्याच्या आईने त्याला मात्र मोठ्या शाळेत घातले आहे आणि तिला त्याचा खूप अभिमान आहे. आता प्रमिलाताईंवर चक्रावण्याची पाळी आली होती. काय बोलावे ते न सुचून त्यांनी फक्त हेमंतच्या आईला निरोप ठेवला, " शाळेत ताबडतोब भेटायला या. "
मोठ्या बाई स्वतः येऊन गेल्या हे समजल्यावर हेमंतची आई अर्धा दिवस रजा काढून शाळेत भेटायला आली. पण तिचे असे म्हणणे होते की माझा मुलगा रोज दप्तर-पुस्तक घेऊन शाळेत जातो आणि त्याने सर्व महिन्यांची फी सुद्धा भरलेली आहे. तिने स्वतः होऊन त्याच्या पेन्सिल बाॅक्समध्ये फीचे पैसे ठेवले होते आणि संध्याकाळी मुलाला विचारले तर तो फी दिली असेच बोलला. ती फक्त मुलाच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट उपसते आहे, मग ती फी देणार नाही, असे होईलच कसे? तिने तर चक्क वर्गशिक्षिका खोटे बोलत असतील असा आरोपही केला.
आता मात्र प्रमिलाताईंना ह्या संदर्भात अधिक चौकशी करणे आवश्यक वाटले. आपल्या शिक्षिकेवर असा आळ येऊ देणे हिताचे नव्हते आणि मुलगा नक्की काय करतो, कुठे जातो, हे समजणे तर त्याहूनही अधिक आवश्यक होते.
आता प्रमिलाताईंनी शिपाई शांताबाई ह्यांना ह्या कामगिरीवर लावले. मुलगा घरातून निघाल्या पासून कुठे कुठे जातो आणि काय काय करतो, हे सर्व लक्ष ठेवून पाहण्यास सांगितले, तेव्हा हातात आलेली बातमी खूपच धक्कादायक होती. खात्री करून घेण्यासाठी एकदा स्वतः प्रमिलाताई त्याच्या मागे जाऊन , सर्व पाहून आल्या आणि नंतर मुलाच्या आईला खात्री पटावी म्हणून हे सर्व करण्यासाठी बरोबर नेले. आता लक्षात आले होते की हेमंत एका टोळीच्या सापळ्यात अडकला होता आणि ते लोक हेमंतकडून अवैध चोरीचे काम करवून घेऊन त्याला रोज काही पैसे देत असत. आपल्या मार्गावर कुणी रोज इथे येतेय ह्याचा सुगावा लागताच, त्या टोळीने हेमंतला तिथेच सोडून पलायन केले. सर्व गोष्टी पोलिस खात्यापर्यंत पोहचल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
हेमंतच्या दारुड्या बाबांनी त्याला रागवून, मारून, आईने शाळेसाठी दिलेले फीचे पैसे काढून घेतले आणि ते दारू पिण्यासाठी निघून गेले. शाळेत गेल्यावर भावे बाई ओरडतील, तेव्हा काय करायचे, ह्या भीतीने रस्त्यावर एका झाडाखाली रडत बसलेल्या हेमंतला काही लोकांनी समजावले आणि सांगितले की तू आम्ही सांगतो, ते काम कर; आम्ही तुझी शाळेची फी देऊ. त्या लोकांनी हेमंतला गावाबाहेर निर्जन ठिकाणी एका झाडाजवळ नेले आणि त्या ऊंच झाडावर अगदी वर वर असलेली कावळ्यांची घरटी काढून द्यायला सांगितले. अशी सात-आठ घरटी काढून खाली टाकल्यावर त्या लोकांनी ती घरटी बांधण्यासाठी कावळ्यांनी वापरलेली तांब्याची तार काढून घेतली. प्रमिलाताई व इतरांनाही आत्ता पर्यंत कल्पना नसलेली एक गोष्ट समजली की पावसाळ्यात घरटी बांधण्यासाठी कावळे इलेक्ट्रिकच्या तारा कुरतडतात आणि त्यातली तांब्याची तार वाहून नेऊन आपली घरटी सुरक्षित बनवतात. ही तार घरट्यातून काढून घेऊन विकली, तर त्याचे भरपूर पैसे मिळतात. पण ही तार इलेक्ट्रिकच्या मूळ तारेमधून डायरेक्ट काढून घेणे जीवाला घातक असते, शिवाय चोरी पकडली जाण्याची भीती असते , पण कावळे ते काम सहजपणे करतात आणि कावळ्यांची घरटी तोडून ही तार मिळवणे ह्यामध्ये जीवाला कमी धोका आहे आणि चोरी पकडण्याची भीतीही नाही. त्यामुळे ही टोळी असे उद्योग करण्यासाठी लहान मुलांना आमिष दाखवून झाडावर ऊंच चढवते आणि घरट्यात साठवलेला माल विकून पैसे कमावते. मुलाच्या हातावर चार टिकल्या टेकवल्या की त्यांची चांदीच चांदी होते!
हेमंतच्या निमित्ताने प्रमिलाताई व इतर शिक्षिकांनी हे एवढे मोठे प्रकरण उघडकीला आणले, ह्यासाठी शासनाने त्यांच्या संस्थेला सन्मानपत्र दिले खरे ; पण हेमंतचा प्रश्न तसाच शिल्लक राहिला.
आता प्रमिलाताईंनी हेमंतला विश्वासात घेतले, आपल्या स्वतःच्या मुलासारखी त्याची काळजी घेत, त्याची बाजूही समजून घेतली. आता त्यांच्या लक्षात आले की हेमंतच्या वडिलांना त्याने कमावलेल्या ह्या पैशांची चटक लागली आणि हळूहळू तेच हेमंतला त्या लोकांकडे पाठवायला लागले. त्यांनी दिलेले पैसेही तेच परस्पर घेऊन दारुसाठी वापरायला लागले आणि हेमंतला आईला सांगू नये म्हणून धमकावू लागले. त्यामुळे हेमंतच्या हातात शाळेत भरायची फी जमा झालीच नाही आणि शाळेची अतिशय आवड असूनही त्याला शाळेत जाणे शक्य झाले नाही. प्रमिलाताईंनी हेमंतची फी स्वतः भरून त्याला शाळेत पुन्हा येण्याची व्यवस्था तर केलीच आणि त्याचा बुडालेला अभ्यासही भरून काढण्याची व्यवस्था केली. पुढच्या त्रैमासिक परीक्षेमध्ये हेमंत वर्गात पहिला आला. पण दुर्दैवाने दारूच्या आहारी गेलेले त्याचे वडील मात्र ह्या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत. चार-पाच महिन्यांच्या गंभीर आजाराने त्यांचे निधन झाले. हेमंतच्या आईने खचून न जाता, आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला आणि श्राद्धाला आलेल्या भावाच्या बरोबर जिल्ह्याच्या गावी जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. चोरांच्या टोळीची माणसे तुरुंगातून सुटल्यावर हेमंतला किंवा घरच्यांना परत त्रास देण्याची शक्यता होतीच! शिवाय एका तरुण विधवेने दोन मुलांना सांभाळून अशा वस्तीत एकटे राहणेही धोकादायकच होते. त्यांचा हा निर्णय योग्य आहे हे पाहून प्रमिलाताईंनी जिल्ह्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र दिले, " आमच्या शाळेतील हेमंत राजमाने हा इयत्ता चौथीमध्ये शिकणारा अतिशय हुषार व सद्गुणी विद्यार्थी काही अपरिहार्य कारणामुळे आपल्या शहरात स्थलांतर करत आहे. त्याला व त्याच्या बहिणीला कृपया आपल्या शाळेत प्रवेश मिळवून द्यावा आणि शक्य झाल्यास त्या दोघांच्या फी माफीचा विचार करावा. मी आपली सदैव ऋणी राहीन. " प्रमिलाताईंच्या ह्या पत्राने हेमंत एका उत्तम शाळेत प्रवेश मिळवून पुन्हा नवीन मार्गाला लागला. सुरवातीला काही महिने त्याची आई पत्र लिहून प्रमिलाताईंना त्याची प्रगती कळवत होती, पण हळूहळू पत्र येणे कमी होत होत बंद पडले.
इकडे प्रमिलाताईंच्याही कार्याचा व्याप प्रचंड वाढला आणि हा गत इतिहास केवळ आठवणीपुरताच मनात राहिला. आज सुमारे पंचवीस वर्षांनंतर हेमंत अचानक त्यांच्या समोर येऊन पायांवर डोके ठेवून नमस्कार करताना पाहून प्रमिलाताईसुद्धा भांबावल्या होत्या. इतिहासातील आठवणी धुके बनून त्यांच्या मनाला व्यापून टाकत होत्या .
राजमाने साहेब आता अस्खलित भाषण करत होते. "केवळ मलाच नव्हे, तर अशा असंख्य विद्यार्थ्यांना मार्गी लावणा-या आमच्या लाडक्या बाई प्रमिलाताई देशपांडे ह्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहणे हे माझे सौभाग्य आहे. माझ्या सारखे किमान शंभर तरी विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत, ज्यांना बाईंसाठी काही करून गुरुऋण फेडण्याची इच्छा आहे. आजच्या समारंभात बाईंचे आभार मानण्याची इच्छा आहे. पण आमच्या बाई निरपेक्ष असल्याने त्या आमच्या कडून काहीच घेणार नाहीत आणि समारंभाच्या कमी वेळात सर्वांना बोलायला संधी मिळणार नाही, म्हणून आम्ही काही विद्यार्थ्यांनी बाईंविषयी आपल्या आदरभावना व्यक्त करणारे लेख लिहून अशा शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा लेखसंग्रह आज इथे प्रकाशित करत आहोत. मी बाईंना विनंती करतो की त्यांनी ह्या " गुरुगौरव " लेख संग्रहाचे प्रकाशन करून आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावे आणि त्यांच्या कृपेचा वरदहस्त आमच्यावर अखंड ठेवावा. "
आज प्रमिलाताईंना आपले जीवनकार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटत होते. ओघळणारे अश्रू आवरत त्या केवळ इतकेच बोलल्या, " बाळांनो, तुम्ही मला भरभरून प्रेम दिलेत! आजचा सोन्याचा दिवस मी तुमच्या मुळेच पाहते आहे. तुमच्या सारखे शंभर गुणवंत विद्यार्थी लाभणे हीच माझ्या आयुष्याची जमापुंजी आहे. ह्यापुढे शासनाने दिलेला "गुणवंत शिक्षक " हा सन्मानही फिका आहे. तुमचे सर्वांचे प्रेम हृदयात जपत मी आज कृतार्थ भावनेने शिक्षक पेशातून निवृत्त होत आहे. तुमच्या प्रेमाची मी उतराई होऊ इच्छित नाही, तर तुमची सर्वांची "आई " होऊन पुढचे आयुष्य मी आनंदात जगणार आहे. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते. बाळांनो, खूप मोठे व्हा आणि स्वतः बरोबरच शाळेचे आणि देशाचे नावही उज्ज्वल करा. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. "
